माझी भटकंती देहू ते अलिबाग क्रमशःभाग-४२ ते ४६




[5/14, 9:15 PM] ravindralatinge: 🍂🔅🍂🔅🍂🔅🍂🔅🍂🔅माझी भटकंती
क्रमशः भाग- ४२
   प्रवास     दिनांक ६ जून २०१६ 
        🛕 देहू आळंदी चाकण ते त्रिंबकेश्वर नाशिक  🌱
➖➖➖➖➖➖➖➖➖
भाग एक 
दिवाळी व उन्हाळी सुट्टीत कुटुंबातील सगळ्यांसोबत रोजच्या जीवनातून विरंगुळा म्हणून धार्मिक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे पहायला जायच हा मनातला शिरस्ता... नवीन ठिकाणाची ओळख व देवदर्शन घडावे यासाठी नियोजन. मुलांच्या ही परीक्षा झालेल्या .वडिलही म्हणाले होते,'नाशिक त्रिंबकेश्वर बघायला घेऊन चल.' .दोनतीन दिवस फिरुन येवूया'.मग हर्षदलाही फोन वरून दोन-तीन दिवसाची रजा फिरायला जाण्यासाठी  काढायला सांगितली. त्याचा होकार येताच  विचार विनिमय करून फिरायला जाण्यासाठी पप्पूची गाडी ठरवली. 
   ६ जूनला  फॅमिली टूरला निघालो.वाईतून हायवेने प्रथम देहूला गेलो.सांप्रदायिक वारकऱ्यांचे दैवत श्री संत तुकाराम महाराजांच्या  समाधीचं, इंद्रायणी काठा वरील गाथा मंदिर, इंद्रायणी घाट पाहून आम्ही आळंदीला आलो.तिथं दर्शनासाठी गर्दी असल्याने मुखदर्शन घेऊन चाकणला हर्षद कडे आलो.तोही आमच्यात सामील झाला.दुपारी एक दीड-दोन वाजला असेल.तो दिवस दहावीच्या निकालाचा दिवस होता.. पुतणी प्रियंकाला सहज विचारले ,'तुला किती टक्के मार्क पडतील.'
ती म्हणाली,'८० ते ८५ टक्के पडतील.तेवढ्यात भैय्याने तिचा परीक्षा नंबर विचारुन आॅनलाईन रिझल्ट पाहून ९२ टक्के म्हणाला.तिला प्रथम खरेच वाटाना.मग त्याने मार्कलिस्ट दाखविले...मग काय आनंदी आनंद...आम्ही सगळ्यांनी गाडीत तिचे अभिनंदन केले.दरम्यानच्या काळात घरुनही तिला अभिनंदनाचे फोन आले.. खुप आनंदाचा क्षण आम्ही जवळच्याच धाब्यावर मस्तपैकी तिच्या आवडीची डिशेस मागवून सेलिब्रेट केला...तिचा फोटो काढून हार्दिक अभिनंदनाची इमेज फेसबुक व व्हाटसग्रुपवर शेअर केली.. मस्तपैकी जेवण करून नाशिककडे निघालो.
नाशिक मधून त्रिंबकेश्वरला आलो.गाडी पार्किंग मध्ये लावली.देवदर्शनासाठी निघालो.दर्शन रांगेत भरपूर गर्दी होती.आत प्रवेश करतानाच मोबाईल कॅमेरे व पर्स नो अलाउड असल्याने लॉकरमध्ये ठेवून रांगेत उभे राहिलो... मुखाने ओम नमो शिवाय.हर हर महादेव नामघोष करत पुढे सरकत होतो.दीड एक तासाने देवाचे दर्शन झाले.सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले.मनोभावे दर्शन घेऊन येताना वडिलांची इच्छा पुर्ण झाले चे समाधान चेहऱ्यावर दिसत होते.   रांगेच्या सुरवातीलाच येऊन लॉकरमधील साहित्य तपासून घेतले.व गाडीकडे आलो. मंदिर पाहिल्याने मन भारावून गेले.सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.गोदावरी नदीचे उगमस्थान आहे.ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी आहे. पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. प्रसाद खरेदी करून गाडीजवळ आलो.गाडी होती.हर्षद व पप्पू अजून माघारी न आल्याने वेटिंग करत थांबलो.थोड्यावेळाने दोघेही आल्यावर नाशिककडे रवाना झालो.... सायंकाळ होत आली होती.










माझी भटकंती 
प्रवास दिनांक ६ व ७ जून २०१६
क्रमशः भाग- ४३
नाशिक, सप्तश्रृंगी देवी वणी 
भाग दोन
   नाशिकमध्ये आल्यावर चौकशी करत करत  पंचवटी घाटावर पोहोचलो... गोदावरीच्या काठावरील प्रशस्त घाट . चौपाटी सारखी गर्दी होती...अनेक मंदिरे घाटावर आहेत.. संपूर्ण घाट फिरलो.मस्तपैकी एका ठिकाणी बसून ओल्या भेळीचा आस्वाद घेतला. जवळच्या एका मंदिरात वाद्यवृंदात आरती सुरू होती.थोडावेळ आरतीचा लाभ घेऊन पुढे वणीकडे मार्गस्थ झालो..वाटेतच एका धाब्यावर रात्रीचे  जेवण केले..कळवण मधून नांदुरीत आलो.. घाटरस्त्याने मध्यरात्रीच्या वेळी वणीत पोहोचलो..एक दोन ठिकाणी लॉजिंगची चौकशी केली.फुल्ल होते.तिसरा लॉज बऱ्यापैकी होता.दोन रुम घेतले.. तिसऱ्या मजल्यावर रुम असल्याने वाऱ्याचा वेग वाढला की खिडक्यांचा जोरदार आवाज यायचा...वारं आत घुसायचं.त्याच अवस्थेत विश्रांतीचा प्रयत्न केला.
शुभ रात्री.
सकाळी लवकर आवरून सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर निघालो.सकाळी सात वाजताही बऱ्यापैकी गर्दी होती.वडिलांना पायऱ्या चढणे उतरणेचा त्रास होईल म्हणून पायथ्याशी एका हॉटेलमध्ये थांबविले.बाकीचे सगळे पायऱ्या चढत गडावर गेलो.अनेक छोटे मोठे पाण्याचे कुंड पायऱ्या चढताना दिसतात... आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी  एकपीठ म्हणून या शक्तीपीठाचा लौकिक आहे.. पायऱ्या चढताना अंगातुन घाम येत होता.तरीही तसेच  वाऱ्याचीपायऱ्या चढत होतो.वाऱ्याच्या  मंद झुळकेने गारवा जाणवला की छान वाटत होते.गडाच्या मध्येच देवीचे मंदिर आहे सकाळच्या प्रसन्न व मंगलमय वातावरणात देवीचे दर्शन कुटूंबासह  व्यवस्थित झाले.थोडा तिथेच विसावलो.वारे वेगाने तिथं येत होते. डायरेक्ट गडावर जाण्यासाठी नवीन वाटेचे कामकाज सुरू होते. मंदिरातून मस्तपैकी परिसराचे दृश्य दिसत होते.थोडावेळ तिथेच थांबून फोटोग्राफी केली.मातेचा कृपाशीर्वाद घेऊन  पायऱ्या उतरून पायथ्याशी आलो.तिथेही दर्शन घेतले.वडिल थांबले होते त्या हॉटेलमध्ये चहा घेतला. सर्वांचा ग्रुपफोटो काढला.द्रोणातील रानमेवा करवंदं व जांभळं घेऊन खाल्ली. लॉजवर येऊन आवराआवर करून गाडीतून परिसरात फिरायला निघालो.गडाखालील  परिसरात छोटीछोटी झाडं होती.दूरवर डोंगर रांग दिसत होती. आम्ही तलावाजवळ गाडी थांबवली.बांधीव तलावाजवळ भाविकांची स्नानासाठी  वर्दळ होती.भाविक श्रध्देने त्या तलावात स्नान करीत होते.. काहींची देवीच्या यात्रेची तयारी सुरू होती.भोजनाची तयारी दिसत होती.देवीचा देव्हारा घेऊन ढोल,सनई वाद्यात वाजत-गाजत येत होता.काहीजण पंगत धरुन जेवत होते आम्हीही डोंगरमाथ्यावर रपेट केली..आम्हीही झाडांच्या सावलीत बसून घरुन आणलेला खाऊचा  नाष्टा केला.आणि आलेल्या मार्गाने घाटातून खाली उतरलो. येथून जवळच असलेल्या सापुतारा या  गुजरात मधील थंड हवेच्या पर्यटन स्थळी  निघालो.

 हटगड बोरगांव करत सापुताऱ्याकडे निघालो.. जून महिना असल्याने ऊन्हाची धग जाणवत होती.. शेतात बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या चाळी दिसत होत्या.त्यावरुन कांदा उत्पादक भाग दिसत होता.रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी स्टॉल लावले होते.त्यात कांद्याच्या दोन,पाच व दहा किलोच्या गोणी, लसणाची एक किलोची गोण विक्रीस ठेवलेल्या होत्या .काहींनी भाजीपाला ठेवला होता...आम्ही एका स्टॉलवर पाच किलोच्या दोन  कांद्याच्या गोणी सत्तर रुपयांना घेतल्या.
तदनंतर गुजरात राज्यातील निसर्गरम्य  पर्यटनस्थळ सापुतऱ्याकडे निघालो...
क्रमशः 

    



माझी भटकंती 

क्रमशः भाग--४४

प्रवास दिनांक ७ जून २०१६
सापुतारा ते मुंबई 
भाग तीन
महाराष्ट्राची सीमा ओलांडून आम्ही गुजरातच्या डांग जिल्ह्यात प्रवेश केला.जिल्ह्याचा हा भाग आदिवासी आहे.गुजरातचे थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. नव्याने विकसित केले आहे. हायवेला लागूनच हे पर्यटनस्थळ आहे.ते बघायला आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी निघालो होतो.गुजरात राज्यातील हौशी पर्यटक प्रामुख्याने या ठिकाणी सहलीचा बेत आखतात. परंपरा आणि नावीन्यता यांची जपणूक करत इथल्या प्रशासनाने  सापुतारा  आकर्षक बनवले आहे. आधुनिक पर्यटन शैलीत येणा-या नवनवीन इव्हेंटचा समावेश केला आहे. या पठारावर विविध प्रकारचे रायडिंग करता येते..डोंगराळ रांग, सुंदर सरोवर, डांग जंगल, अभयारण्य, न्याहाळत राहावा असा सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याच्या सोबतीला नयनरम्य महादेवाचे मंदिर, वस्तुसंग्रहालय, विविध शिल्पांचे सौंदर्य, वनवाटिका,  पुष्पक रोप वे, हनी सेंटर, रोड गार्डन, फॉरेस्ट नर्सरी,  इत्यादी गोष्टी पर्यटकांना भुरळ पाडतात.   बांबूपासून बनवल्या जाणा-या विविध कलाकुसरीच्या वस्तू इथं  विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
    सापुता-याचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे पुष्कर रोप वे .तिथं साहसी पर्यटक सापुता-याच्या एका कडय़ावरून दुस-या कडय़ावरचा प्रवास  छोट्या ट्राॅलीतील करतात.चित्तथरारक प्रवास वाटतो. आम्ही तिथं तलावात पेडल बोटने बोटिंग केले.शॉपिंग केले. मस्तपैकी फोटोग्राफी केली.तिथं फोटोग्राफर कडून विविध पोजमध्ये फोटो काढले. महाबळेश्वर इतके निसर्गाचे ओथंबून व्यापलेले ऐश्र्वर्य तिथं जाणवलं नाही. दीड-दोन तास भटकंती केली.तदनंतर आम्ही मुंबईला कोणत्या मार्गाने जावे.याचा विचार    करत होतो.नाशिकमार्गे २४५ किमी तर बलसाड,वापी मार्गे ३२५ किमी होते..वापीमार्गे अंतर जास्त असल्याने आम्ही आल्या मार्गाने नाशिक, इगतपुरी करत करत भायखळा मुंबईत पोहाचलो.

     श्री रामचंद्र कोंढाळकरने फोनवरून सांगितल्या प्रमाणे आम्ही राणीबाग जवळ पोहोचलो. गाडी चालवायला तो बसला... तो मुंबईत टुरिस्ट टॅक्सी मालक आहे.माहितगार चालक .तिथून आम्ही "गेटवे ऑफ इंडिया" पहायला आलो.. सायंकाळची भरपूर गर्दी होती. प्रवेशद्वाराचे जवळून अवलोकन केले.शिक्षकसंघाच्या धरणे आंदोलन वेळी सकाळी सकाळी इथं आल्याची आठवण झाली...तिथूनच प्रसिद्ध व नामांकित फाइव्ह स्टार हॉटेल लांबूनच पाहिले.त्याच्या समवेत फोटे काढले.व नवीन समुद्रावर झालेल्या वरळी ते बांद्रा सीब्रीजवरुन रफेट केली.जणूकाही सिनेमातीलच दृश्य पहात होतो...जीवाची मुंबई करताना यापूर्वी राहिलेला सी-ब्रीज आज पहायला मिळाल्याचे समाधान वाटले.तेथून आम्ही महालक्ष्मी मंदिर व मुंबईतील प्रसिद्ध श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरात देवदर्शन करून राणीबाग जवळील कोंढाळकरांच्या मुंबईतील खोलीवर आलो.फ्रेश होऊन चहापाणी घेतला.माजी विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन वाशी कोपरखैरणे सेक्टर १० कडे  निघालो. दीड-दोन तासाने  कोपरखैरणेत आल्यावर 
अंकुशला फोन केला.तो चौकात येऊन थांबला होता. तो भेटल्यावर गाडीत घेतले.त्याच्या इशाऱ्यावर आमची गाडी त्याच्या रुमकडे निघाली.
दोन-तीन वळणानंतर त्याने गाडी थांबवायला सांगितली.गाडी योग्य ठिकाणी पार्क केली.त्याच्या मागोमाग निघालो.तो म्हणाला, 'रुम 
तिसऱ्या मजल्यावर आहे.'.तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या  पायऱ्या चढायचा त्रास वडिलांना  होवू नये म्हणून तळातील कल्पना ढवळेच्या खोलीवर  वडिलांची जेवणाची सोय केली.आम्ही बाकीचे पायऱ्या चढून 
रुमवर गेलो.
सगळ्यांचे  जेवण झाल्यावर अंकुश कुटूंबियांचा निरोप घेऊन अलिबाग कडे निघालो.. प्रवास करुन अलिबागला मुक्कामाला जायचे होते नियोजित होते पण मुंबईत आल्यामुळे जास्त वेळ गेला.रात्र झाली.
ट्रफिक जाम व खराब रस्त्यांमुळे प्रवासातले अंतर तुटत नव्हते..पाली जवळ हायवेला मध्यरात्रीनंतर मुक्काम केला.





माझी भटकंती 
प्रवास दिनांक ८ जून २०१६
क्रमशः भाग- ४५
अलिबाग किल्ला व काशिद बीच
भाग चार 
सकाळी लवकरच अलिबागला प्रस्थान केले..नाक्यावरचं चौकशी करताना आम्हाला अलिबागमधील प्रेक्षणिय पर्यटनस्थळांचे हॅण्डवेल व नकाशा मिळाला..मग अलिबाग बीचवरील कुलाबा किल्ला पहायला निघालो.पाचदहा मिनिटांनी बीचवर पोहोचलो.भरती असल्याने समुद्राचे पाणी किनाऱ्यावर येत होते.पाण्यातून दीड -एक किमी चालत किल्ला पहायला जाणे शक्य नसल्याने आम्ही सर्वांसाठी घोडागाडी केली. अन्  घोडागाडीतून किल्ल्याकडे निघालो.घोडागाडीत बसल्यावर लहानपणी कधीतरी कराड स्टॅण्ड ते मंगळवार पेठेपर्यंत टांग्यातून आलेलो लक्ष्यात आले...
  किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ घोडागाडी थांबवली.. सगळेजण प्रवेशद्वारातून आत गेलो.पुरातत्व खात्याचे शुल्क भरून किल्ला पहायला अलिबागकडील  प्रवेशद्वारातून गेलो. जलदुर्ग म्हणजे आरमाराचे सामर्थ्य. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या जलदुर्गाची उभारणी झालेली आहे. मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या  साम्राज्याचे केंद्र हा किल्ला होता.परकिय शत्रुंना थोपवून धरण्याचे कार्य या अभेद्य जलदुर्गाने केले आहे.प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. किल्ल्यावर दोन प्रवेशद्वार आहेत.एक अलिबाग च्या बाजूला तर दुसरे समुद्राकडे आहे...गोड्या पाण्याचे बांधिव तळे व विहीर आहे... पद्मावती घुमटी व गडदेवीचे मंदिर असून बुरुजावर दोन तोफा आहेत.गणपती मंदिरात उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती आहे..... भटकंतीत छानपैकी फोटोग्राफी केली.. सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढला.
 एक जलदुर्ग पाहयला मिळाल्याने सगळे खुश झाले.. किल्लाउतरुन घोडागाडी जवळ आलो.मग घोड्याचे लगाम हातात घेऊन घोडागाडी चालक मी,हर्षद, हर्षदा व प्रियंका अनुक्रमे  झालो... मस्तपैकी एकेकाचे फोटो काढले...व गाडीत बसून किनाऱ्यावर आलो....
     मुरुड जंजिरा जलदुर्ग पहायला अलिबाग मधून निघालो... समुद्रकिनाऱ्याच्या काठाने, नारळी पोफळीच्या गर्दसावलीत व डोंगररांगाच्या सहवासात प्रवास होता.वाटेतच एका ठिकाणी गाडी थांबवून आंबे ,फणस व अननस घेतले.गाडीतच सगळ्यांनी फलाहार केला.. बऱ्याच दिवसांनी चोखून आंबे खाल्ले...मजा आली.. डोंगर रस्त्याने घाटमाथा उतरुन काशिद बीच वर भर उन्हात पोहचलो...तापलेली वाळू, रुपेरी किनारा, निळेशार पाणी पहात किनाऱ्यावर गेलो..पाण्यात उभे राहून फोटो काढले...उन्हातही हौशी पर्यटक समुद्रात पोहण्याचा व अंघोळीचा आनंद घेत होते.धमाल मजा करत होते.. तदनंतर माघारी येताना जवळच्या  हॉटेलमध्ये मुरुडला जाण्याची चौकशी केली.त्याने हा रस्ता पुढे जातो..पण तुम्हाला किल्ला बघायला मिळणार नाही.जूनपासून किल्ला पहायला बंदी असते. असं सांगितलं,खात्रीसाठी दुसरीकडे चौकशी केली.त्यानेही तेच सांगितले....  जलदुर्ग पहायला मिळणार नसल्याने नर्व्हस झालो.नाईलाज झाला.नुसता हेलपाटा होवू नये म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला आमची सुरुवात केली..








माझी भटकंती 
प्रवास दिनांक ८ जून २०१६
क्रमशः भाग- ४६
काशिद बीच महाड- महाबळेश्वर दर्शन ते वाई

महाबळेश्वर

भाग पाचवा
काशिद बीच वरुन रोहा मार्गे-मुंबई-- गोवा हायवेला कोलाडला आलो...एका धाब्यावर मस्तपैकी मस्याहारी भोजन केले... माणगाव मध्ये टपोरी काळीशार जांभळं घेतली.महाड--पोलादपूर करत पेठपार घाटाने कुंभरोशीत येतानाच ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट व कडकडाट ऐकू येऊ लागला.थोड्याच वेळात हवामान बदलले वारा वेगाने वाहू लागला. हरोशीच्या जवळ पाऊसाने सुरुवात केली.. निसर्ग धाब्यावर आलो... गाडीतून खाली उतरलो.. हॉटेलमध्ये जातानाच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली.. वाऱ्याच्या झोताबरोबर पाऊस वाढू लागला.योग्यवेळी थांबलो ते बरं झालं.. चहा घेतला  आणिपाऊस उघडण्याची वाट बघत थांबलो..काळेभोर मेघ सगळीकडे दिसत होते.पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले..अर्ध्याएक तासाने पाऊस उघडला आणि   चक्क लख्ख  ऊन पडले. 

     आम्हीही  घाटातून महाबळेश्र्वरात येऊन क्षेत्राकडे निघालो.पंचगंगा नद्यांचे व महाबळेश्वर मंदिरात देवदर्शन केले..तेथून नाकिंदा मार्गाने केटस पॉईंटला आलो.पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता तर सगळीकडे पाणीच पाणी व चिखल झाला होता.थंडगार वारा,हवेचा गारवा अंगावर घेत निसर्गाचा आविष्कार पहायला आनंद वाटत  होता..खाली दिसणारे बलकवडी धरण, समोरच्या नवरा नवरी डोंगरावरील कमळगड पाऊस पडून गेल्यामुळे तेजस्वी  दिसत होता.मस्तपैकी विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.
सगळेजण सापुतारा आणि महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याची चर्चा करु लागले.. महाबळेश्वरचे सृष्टी सौंदर्य विलोभनीयच.आपल्या सह्याद्रीच्या कणखर आणि रांगड्या डोंगररांगेतील  हिलस्टेशन म्हणजे निसर्गाने  मुक्तहस्ते उधळण केलेले लोकेशन. नैसर्गिकरीत्या गर्द हिरवागार परिसर. उन्हाळ्यात गारवा देणारा घनदाट झाडीतील लालवाटा, निसर्गाच्या सानिध्यातील छोटीशी गांवे.  यांच्यामुळे   सरस कसे आहे.हे स्पष्टच दिसते.केटसपासून  चालत चालत निडल व एलिफंट पॉईंट पहायला निघालो...बारीक बारीक पाऊसाला पुन्हा सुरुवात झाली.. कृष्णा खोरे,धोमजलाशय,वयगांव व इतर परिसर न्याहाळत निघालो.दोन्ही पॉईंट बघितले.. वाखाणण्याजोगे नैसर्गिक दृश्य पाॅईंटचे दिसते.तेथील दृश्याला  फोटोत सामावले.. तेवढ्यात तिथले काहीजण म्हणू लागले  'डोंगरकड्यातून  खाली पाणी पडायला लागलय' . मागे वळून पहातोय तर काय! धबधबे सुरू झालेला बघायला मिळाला.
खरोखर आनंदी आनंदाचा क्षण !! निसर्गाचा विलोभनीय आविष्कार ... पडलेल्या पावसामुळे पाणी कड्यातील खाचेतून कड्यावरुन कोसळत होते. त्याचा  धबधबा सुरू झाला होता.. खुप मस्त.आम्हीही थोडेफार पडणाऱ्या पावसाने भिजलो होतो...पुन्हा गाडीजवळ आलो...अवकाळी मार्गाने मेटगुताड  येऊन कोठेही न थांबता वाईकडे प्रस्थान केले.अप्रतिम फॅमिली टूर संपन्न झाली..तीन दिवसात उन्हाळ्यातील सफर अंगाची लाहीलाही ,  समुद्रकिनाऱ्याचा  दमटपणा , किनाऱ्यावरील रुपेरीवाळूतील शंखशिंपल्यांची पखरण, डोंगरमाथ्यावरील वाऱ्याचा आवेग ,तीर्थक्षेत्रांचा भक्तिमय परिसर आणि अचानक आलेला घाटातील उन्हाळी पाऊस, पाऊस पडून गेल्यावर दिसलेला  निसर्गसौंदर्याचा  आविष्कार . थंडगार  घोंगावणारे वारे ,तीन दिवसात निसर्गाची विविध रूपे पहायला मिळाली. कुटूंबियांसमवेत नवीन ऊर्मी आणि ऊर्जा मिळाल्याने ट्रीप सफल झाली....



Comments

  1. आमची फँमिली ट्रीप मस्तच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड