बालपणीच्या आठवणी --आजोळ

बालपणीच्या आठवणी--आजोळ 

आजोळ🍀🍂🍀🍂🍀🍂🍀🍂 🍀बालपणीच्या आठवणी
      🌹माझे आजोळ🌹
〰️➖〰️➖〰️➖〰️➖➖
अजुनी बालपण माझे खेळे आजोळच्या अंगणी 
आजी पुरवती हट्ट चिंब कौतुके रंगुनी
आठवणी दाटतात आज अश्रू डोळासरी
खूप प्रेम केले सगळ्यांनी माझ्या वरी 
      किसन मामा आणि माझ्या वयात दोन-तीन वर्षाचे अंतर तो.मोठा.
मी आजीच्या थोरल्या मुलीचा (यमुना) पहिला मुलगा. त्यामुळे कोडकौतुक.आजी -आजोबा सोडून सगळे मला " दादा" नावाने हाक मारीत...माझे जन्मस्थान आणि आजोळ कराड.मंगळवार पेठेतील करडीपीरा शेजारी घरवजा झोपडीत.आर.के.भोसले यांच्या वीटभट्टीवर मोलमजुरी करणारी माझी आज्जी शांताबाई ,आजोबा बापू जठार भट्टीच्या पलीकडे सागरनिवास या प्रायव्हेट होस्टेटमध्ये सुरक्षा रक्षक होते. रुबाबदार मिशा, डोक्यावर पांढरा फेटा,धोतर व नेहरू शर्ट असा त्यांचा पेहराव.. सगळेजण त्यांना दाजी म्हणत.आजोळी आजी, आजोबा,जिजीमावशी,माली मावशी ,मीनामावशी, किसनमामा आणि पिंटू मामा असे आजोळची मायेची नाती होती..मला चार मावशा व दोन मामे.पारु मावशीचे लग्न झालेले ती इचलकरंजीला असायची..
 मी आणि दिनेश आई बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जायचो..आजी वीटभट्टीवर भटकरी म्हणून काम करायची.मावश्या कच्च्यावीटा डोक्यावरून वाहून पक्कीवीट करायच्या भट्टीवर घेऊन जायच्या.. तिथं दिवाणजी , जिजीमावशी आणि कधीतरी भोसले दादा आणलेल्या वीटा रचायचे...भोसले मामा चिंचेच्या झाडाखाली बसून देखरेख करायचे.माझ्या शाळेविषयी गप्पागोष्टी करायचे.व्यवहारज्ञानावर प्रश्न विचारायचे.विनोदी स्वभावाचे आणि दानशूर वृत्तीचे होते.कधीतरी मीही मामासोबत डोक्यावरून चार पाच वीटांच्या खेपा रचायला घेऊन जायचो.उन्हातल्या कामानं घाम यायचा..
     कच्च्या वीटांच्या पंजी व दश्शी केली की आळेकरी खाउला पैसे द्यायचे.त्यातून मामा व मी गारेगार ,कुल्फी किंवा हिंदुस्थान बेकरीतला बटराचा चुरा घेऊन खायचो... रविवार भट्टीवरील कामगारांचा आठवड्याचा पगार व्हायचा..मलाही एक-दोन रुपये खाऊसाठी द्यायचे.कारण मीही भट्टीवर छोटी कामं करायचो. मग मावश्यांबरोबर नगरपालिके जवळील मंडईत जायचो.फार मोठी मंडई  होती.धान्य मार्केट,फीश मार्केट, भाजीपाला मार्केट स्वतंत्र होती.. आंब्याच्या सिझनला फळमार्केटात घमघमाट सुटलेला असायचा...मावश्या भाजीपाला ,सोडंबोंबिल ,खारा मासा व सुकट घ्यायच्या.
रात्रीसाठी मटणपण घ्यायच्या.मग सगळ्यांसाठी भेळ घ्यायच्या.
आम्ही मंडईत भजी खायचो....घरी आल्यावर सगळ्यांना  चिरमुरे भेळ मिळायची.रात्री जेवताना आजी मावशीला म्हणायची ,"रव्याला मटणाचं खड जरा जास्त वाढ..त्याला लय आवडतं... "सगळेजण जेवण मजेत करायचो..तिथंल मटण खरच चवदार लागायचे.
     सकाळ पासून भट्टीवर कामे सुरू असायची.गारेकरी व आळेकरी  माती व उसाचे बगॅस टाकून गारा करायचे, माती मळायचे , गोळा करून साच्यात (इटाळ)हाताने टाकून त्यावर लोखंडी पट्टी फिरवून इटाळ उपडे करायचे.मग पत्र्याच्या सहायाने एकजण वीट उचलून ओळीने ठेवायचे. अशा वीटा थापताना कुतूहल वाटायचे. वाळलेल्या वीटा नवीन भट्टीत रचायच्या..भट्टीला  नळकाढून  लाकूड व दगडी कोळसा खाली घालून नळ केले जायचे.त्यावर वाळलेल्या वीटा रचायच्या.कोळशाची पावडर टाकायची.कडेने भाजक्या वीटांचा थर. .लाखदोनलाख वीटांची एक भट्टी असायची.योग्यवेळी भट्टीचे विधीवत पूजन करायचे.त्यावेळी पेढे व खोबऱ्याचा प्रसाद मिळायचा..बाहेर काही आणायला जायचे असेल तर मला सगळे घेऊन जायचे. 
        मी मामा बरोबर सुट्टीत नदीला भटकायला गेलो की अंघोळ करायचो.कोंल्ड्रिक्सच्या बाटलीची बुच जमवायचो.त्याची भिंगरी बनवायचो..मंडईत, हिंदुस्थान बेकरीकडे , दत्त चौकात फिरायला जायचो.
   भजी ,भेळ,क्रिमरोल नाहीतर बटराचा चुरा खायचो..श्री.भोसले दादांच्या ट्रकने आम्ही मळी आणायला,खसवा (वाळू ), आणायला किंवा तयार वीटांची खेप टाकायला  त्यांच्या बरोबर जायचो... वीटभट्टीवर काम म्हणजे सगळं कष्टाच काम होतं..आर.के.भोसले कारखान्यातील वीटा म्हणजे नामांकित ब्रॅंड होता.भरपूर मागणी त्यांच्या वीटांना असायची.
आजीची  नातवाने खुप शिकून नोकरी करण्याची इच्छा होती...मावश्यांची लग्न झाली.तिथली भट्टी वाकनरोडला स्थलांतरित झाली.तिथं जीजी,पारु व मालीमावशी भटकरी म्हणून काम करायच्या..पिंटू मामा हेमंत आॅटोमोबाईमध्ये कामाला लागला.किसनमामा सातारला  होता.मावसबहिणीही सुट्टीत आईला मदत करायच्या आजीनंतर जीजीमावशीने आमचे सगळ्या भाचे-भाचीचे  लाड  व  कोडकौतुक केले..मी शिक्षक झाल्यावरही आजोळी जीजीकडे जायचो.... माझी जिल्हा स्तरीय व मुंबई येथे प्रशिक्षणासाठी निवड झालेची पेपरमधील बातमी भोसले दादांनी सर्वांना वाचून दाखवली होती..व उन्हाळ्यात तिथं गेल्यावर शाल श्रीफळ व बुके देवून सत्कार केला होता.. अलीकडे आजोळी जाण्याचं प्रमाण कमी झाले. पण आजही माझी आई जीजीकडे माहेरी जाते.. भोसले दादांनी अजूनही ऋणानुबंध जोडून ठेवला आहे.आजही आम्ही गेलो तरी आजीची उणीव जीजी मावशी व पिंटू  मामा भरुन काढतात..
हळव्या नात्याची जपणूक करणारी आजोळातील नाती.

〰️➖〰️〰️〰️➖〰️➖

आज मातृदिन माझ्या आईस व आईसारख्याच सर्व मावश्यांना हा लेख समर्पित..
शतश:प्रणाम व दंडवत....🙏🏻🙏🏻
रविवार दिनांक १० हे २०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड