माझी भटकंती वासोटा किल्ला प्रवास भाग क्र--४८












🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
: ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
   माझी भटकंती
 क्रमशः भाग--४८
       ⛰️बोटिंग व भटकंती वासोटा किल्ला ⛰️
🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀
नेहमीप्रमाणे  फिरायला गेलोकी लवकर उठून परिसरात फिरायला जायचं हा शिरस्ता..सकाळच्या वेळी शांत वातावरणात फिरल्याने दिवसभरासाठी ऊर्जा मिळते . उत्साह वाढतो...जाधव सर आणि मी टेंटमधून बाहेर आलो.सगळीकडे धुकच धुकं दिसत होते.मुक्कामाच्या ठिकाणी आजूबाजूला काहीच नव्हतं.पक्ष्यांची किलबिलाट कानी येत होती
... रिसॉर्टच्या पश्र्चिमेला धरणाचा जलाशय दिसत होता.पाणी बरेच कमी झाल्याचे दिसून आले..मग आम्ही दोघं वर चढून रस्त्यावर आलो.रात्रीच्या बोर्डकडे लक्ष गेले..धुक्याने परिसर वेगळाच दिसत होता.. तदनंतर चालत पुर्वेकडे निघालो.चढ चढून गेल्यावर दोन्ही कडे घरं दिसली.गावाच्या नावाचा बोर्ड दिसला."शेंबडी ता.जावली " तसचं 
थोडंसं पुढे फिरुन परत माघारी आलो.आवराआवर करताना आचारी नाष्ट्याला काय बनवू विचारायला आला.त्याला फरांदे सरांनी, 'कांदेपोहे बनवायला लावले'.तोवर साळुंखे गाडी घेऊन आला होता.त्याच्याबरोबर बोट बुकिंग करायला बामणोलीला वाडकर  निघाले....
   नऊ वाजता आचाऱ्याला बामणोली तून बोट निघाल्याचा फोन आला...त्याने  येऊन आम्हाला तसा  निरोप दिला.समोर बोट थोड्याच वेळात येईल . नाष्टा करून वासोट्याला जायला तिकडं जावे लागेल.नाष्टा उरकून पाण्याच्या बाटल्या व कोरडा खाऊ सॅकमध्ये घेऊन आचाऱ्याने दाखविलेल्या मार्गाने आम्ही  निघालो. रिसॉर्ट पासून कोरड्या जलाशयातून चालत चालत जिथं  बोट थांबली होती. तिथंवर जाऊन
बोटमध्ये  बसलो.. डिझेल इंजिन वरील बोट सुरू झाली...बोटमन हाच आपला वाटाड्या व गाईड हे वाडकरने सांगितले.माघारी येईपर्यंत त्याच्याकडे आपली जबाबदारी.येताना वाडकरने भटकंतीत पोटपूजेला बिस्कीट पुडे,फरसाण व चॉकलेट आणलेल्या होत्या... बोटिंग भाडे, फॉरेस्ट पास,गाईड फीची माहिती दिली...
   ऊन पडल्याने धुकं पसार झालं होतं.निसर्गाने केलेली मुक्तहस्ते उधळण नजरेत भरत होती.. सगळीकडे पाणीच पाणी, डोंगररांगा पाण्यात बुडलेली झाडे केवळ शेंड्यावरुन ओळखू येत होती...डोंगर आणि जलाशयाच्या कटिबद्ध नात्याचा आविष्कार विलोभनीय दिसत होता....मोबाईल दृश्यांना चित्रबद्ध करु लागला.   पंडित सर कॅमेऱ्याने दृश्य शुट करत होते.सगळीकडील धरतीची  दृश्ये अप्रतिम दिसत होती.जलाशयातील स्वच्छ व नितळ निळेभोर पाणी, अवतीभवती हिरवेगार डोंगर आणि निळं आकाश न्याहाळत पुढे निघालो होतो.बोटीत पुढील शिडीवर बसून व उभे राहून विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.एरव्ही हौस म्हणून महाबळेश्वरला वेण्णा लेकवर तास-अर्धातास तिथल्या तिथं बोटिंग केलेलं. पण इथं मोठी रपेट होती.बोटमनने बोट जलाशयातून उजवीकडे वळवली .तो म्हणाला,'तो पहा समोर दिसतोय तो वासोटा किल्ला आहे.आपण बोटितून  पाणी आहे तिथं पर्यंत जाणार. इतरही  बोटी पुढे मागे  होत्या. दीड तास बोटिंग झाल्यावर इतर बोटी थांबलेल्या ठिकाणी आमची बोट थांबवली.आम्ही खाली उतरलो.बोट खुंटीला बांधली. गाईडच्या पाठीमागे चिखलातील वाटेने  पुढे निघालो.पिवळ्या पडलेल्या गवताच्या वाटेने निघालो होतो.तेवढ्यात चार-पाच म्हैंशी पाण्यावर जाताना दिसल्या..
         थोड्या अंतरावर  पुढं हिरव्या रंगातील वनविभागाची कमान दिसू लागली.गाईडने तिथं पास व साहित्य चेक करतील.. असं सांगितलं.कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,राखीव जंगल
स्वागत कमानी शेजारी ग्रुप फोटो काढला.कोयना अभयारण्याच्या इमारती समोर वनविभागाचे चेकिंग सुरू होतं. प्रत्येक ग्रुपचे साहित्य  चेकिंग करून पुढे सोडत होते.. मी सगळ्यांचीनावे लिहली..प्लॅस्टिक पिशव्या , रॅपर्सची आणि पाण्याच्या बाटल्यांची नोंद करुन व डिपॉझिट भरले.गार्डने सॅक चेक केल्या.तिथं विकायला असलेला  लिंबू सरबत घेतला. मग कोयना अभयारण्यातील जैवविविधतेचे चित्ररुपी प्रदर्शन बघितले..या अभयारण्यातील हिंस्त्र प्राणी,पशूपक्षी, सरपटणारे प्राणी,किडे , फुलपाखरं,वृक्ष व वेलींचे चित्रे माहितीसाठी होती.
 मग  किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगलवाटेने आमची ट्रेकिंगला सुरुवात झाली.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १९ मे २०२०




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड