बालपणीच्या आठवणी-- सिनेमा




💫🍂🍀💫🍂🍀💫🍂🍀

 बालपणीच्या आठवणी

        📽️  सिनेमा 📽️
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
सायकलवरून टाकीजला पिच्चर   बघायला जाण्याची मजा.

    इयत्ता नववीत असताना शाळा सुटली की माझा वर्गमित्र व आळीकर श्री शिवाजी चव्हाण शाळा सुटल्यावर सायकल फिरवत वडात ,जोशीविहीरला नाहीतर हायस्कूल वर जायचा.त्याच्या घरी वडिलांची सायकल होती.त्यामुळे तो दररोज फिरवायचा...मी कधी दिसलोतर मलाही डबलसीट घेऊन जायचा... लहानपणी सायकल फिरवायला गंमत वाटायची... आमच्या घरी सायकल नसल्याने दिपमाला किंवा मनिषा सायकल मार्टची सायकल तास-अर्धातास भाड्याने घेऊन चकरा मारायचो.
        एकदा शनिवारी सायंकाळी दोघ सायकलवर वडात गेलो होतो.. वड म्हणजे वाईला जाताना पुलाच्या पुढे केंजळवाटेपर्यंत सडकेच्या दोन्ही बाजूला उंचच उंच वडाची झाडं आहेत.गारवा जाणवतो.माघारी येताना एका वडाच्या झाडाखाली बसलो होतो.शाळेतल्या ,गावच्या व पिक्चरच्या गोष्टीवर गप्पा चालल्या होत्या.शिवा म्हणाला," वाईला टाकीजला मोसंबी-नारंगी मराठी पिच्चर अशोरसराफ निळूफुलेचा लागलाय.जाता उद्या बघायला. "मी उत्तरलो,'एस.टी.ने का चालत जायचं'
शिवा म्हणाला,'मी आमची सायकल घेतो.दोघ जाऊ बारा ते तीनचा शो बघायला..' घरी विचारुन जावू, नाहीतर फटके मिळतील,पैसे किती घेऊ'
तो म्हणाला,तिकिटीपुरत घे दहावीस रुपये..'  उद्या सकाळी १० वाजता सायकलवरून पिक्चर बघायला जायचा बेत ठरला..
         सकाळी जेवण करून सडकला चव्हाणाच्या हाटिल जवळ वाट बघत कट्टयाव बसलो..आळीतले नेहमीचे मैतर आमचा रुबाब बघून इचारु लागले,पम्या आज काय ? कुठं गावाला निघालाय का नटून थटून..मी उत्तरलो,नाय शिवाबरोबर रानात चाललोय..टी-शर्टचा इनखोचून...मी निरुत्तर... माझं लक्ष शिवाकड तो कधी येतोय..
 पिक्चरच तशी लय आवड  नव्हती.ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक टि.व्ही.वर शनिवारी व रविवारी सायंकाळी सिनेमा बघायला मिळायचा...गणपतीत हौशी मंडळी पडद्यावर सिनेमा आणायची तो ही बघायला मिळायचा.सिनेमाची मशीन, रुळं व पडदा रिक्षात यायचा... रिक्षा आलेली बघितली की  मग हमखास पिच्चर बघायला गावात मिळणार. कधीतरी तिकिटावर पद्यावती मंदिरात सिनेमे बघितले आहेत.पिच्चर बघताना काही प्रेक्षक मनमुरादपणे आनंद घेत.गाणी गुणगुणत.भुमिकेत घुसत, महिला तर खलनायकाला शिव्या घालत... दुःखद सीन पाहून डोळे पाणवत.मला फायटिंग आणि त्यातली तमाशाची लावणी लय आवडायची..फायटिंग बघताना हसायला यायचं तर लावणी बघताना ढोलकीच्या ठेका गुडघ्यावर धरायचो.
                 'चला लटिंगे जायचा ना 'शिवा म्हणाला. मग मी न बोलता कॅरेजवर दोन्ही पाय बाजूला सोडून बसलो.डबलसीट सुरू झाली.शिवा सायकल चालवायला तरबेज होता.रस्त्याला तुरळक वहाण आढळत होती.लालपरी अथवा एखाद्या ट्रकचा हॉर्न ऐकला की तो सायकल डाव्या बाजूला घेऊन सावकाशपणे चालवायचा..वहाने ओवरटेक करताना जवळुन गेली की जरा भीती वाटायची कारण पहिलीच वेळ येवढ्या लांब सायकलवर जायची..केंजळवाट-खानापूर स्टॉपवरुन शिवेला आलो.पदमावती देवीचे दर्शन घेऊन पुढे निघालो.चढाला चांगलं न्याट लागायचं.कारण मी बसलेलो.तो पेंडल मारायचा... दमछाक व्हायची..मग कधी नळीवर एकाबाजूला पाय सोडून बसायचो नाहीतर कॅरेजवर... असं करत करत आमी  फुलेनगरला पोचलो.. फुलेनगर वरुन येताना मशीदीजवळचा अवघड चढ व वळण.मी खाली उतरून चालत निघालो..तो सायकलवर. चढ गेल्याव मागं उडीमारुन बसलो....गणेश टाकीज आल्यावर सायकल थांबविली.बाहेरच  सिनेमाचे पोस्टर लावले होते.. त्याच्या खाली निळ्या शाईने लिहिलेलं.१२ते ३  मोसंबी-नारंगी  सुषमा शिरोमणी, डॉ.श्रीराम लागू, अशोक सराफ व उषा चव्हाण.
       





शिवाने सायकल पार्किंग मध्ये लावली.साखळीच कुलूप लावून... तिकिट काढायला गेला.. गणेश टाकिजच्या बाहेर एक खोक होतं.त्याला दोन खिडक्या.एक पुरुषांसाठी व एक स्त्रियांसाठी.. तिकिट काढायला एवढी गर्दी नव्हती.विक्री सुरू व्हायला अवकाश होता..पावणेबाराला सुरू झाल्याव तिकिटकाढायला झुंबड उडालेली..गर्दीत घुसून तिकिट मिळवायचा प्रयत्न सुरू...कुणी कसंही खिडकीपर्यत आत हात घालून तिकिट काढायचा..शिवाने ही  एक दोघांना रेचत ढकलत दोन तिकिटं काढली..पार घामाळलेला...मग डोअरवरच्या माणसाला तिकिट दाखविले. त्याने मधी फाडून तिकिट परत केली..मंद उजेडात बाकड्यावर जावून बसलो..बाल्कनीला जास्त पैसे मोजावे लागतात म्हणून सर्कलची काढली होती... गणेश टाकिज मध्ये बसायला सगळीकडे लांबच्या लांब बाकडी होती...आडवी टाईज सुरू झाली...साबण व कोलगेटच्या जाहिराती सुरू झाल्या...इलेक्ट्रीक घंटा वाजली.लाईटी घालवल्या. अन् सिनेमाचे सर्टिफिकेट आले. -बी/३५एम एम,रंगीत सामाजिक चित्रपट.मोसंबी -नारंगी
 पाट्या पडायला सुरुवात झाली...कार्टुन सारखी नटांची चित्र येवून त्यांची नावे नाचत येत.ती आमी वाचायचो.अशोक सराफ,निळू फूले श्रीराम लागू.......आणखी कितीतरी.कथा-सुषमाशिरोमणी,
दिग्दर्शक-दत्ता केशव  निर्माती-सुषमा शिरोमणी पिक्चर सुरू होतो..बैलांची शर्यत , दुश्यनी उमा-रमाची चुकामुक , तमाशातील लावणी इंटरव्हल झाला. ...इंटरव्हलला लेमन गोळ्या खाल्ल्या...फायटिंग व  शेवटी सगळ्यांची पात्रांची भेट असा सिनेमा बघितला
           परत आमी डबलसीटने फुलेनगर वरुन गावाकडे यायला लागलो...शिवा सायकल हाताने हॅण्डेल न धरता चालवायचा.तशी चालवायला तरबेज होता.मी कॅरेजवर बसून माझेही दोन्ही पाय पेडलला लावून दोघही सायकल चालवायला लागलो... खानापूर स्टॉपवर जरा थांबलो... सायकल स्टॅडवर लावून छपरात गेलो.पहातोतर काय आत हाटिल होतं.चुलीवर चहा ठेवला होता.दोघतीघ चहा पेत होती.एकजण चिरमुऱ्याची भेळ खात होता...एक घास भेळीचा खाऊन अर्धी कच्ची मिरची व कांद्याची आख्खी फोड खायचा.. शिवा म्हणाला, लटिंगे चहा पिवू या का ?'मी हो म्हणाला.त्याने दोन चहाची आडर दिली...ते बाबा म्हणाले ,'बिनदुधाचा मिळेल'..'चालेल द्या दोन '.शिवा म्हणाला,   मग चहा होईपर्यंतएक बॉबीचा पुडा घेऊन खाल्ला.
      त्याने कान नसलेल्या कपात गाळणिने काळा चहा गाळला.शिवाने  सहा बटरं घेतली.मस्तपैकी बटर चहात बुडवून खाल्ली.. सकाळपासून काहीही खाल्ल नव्हतं. त्यामुळे चहाबटरं फस्त केले.शिवाने बिल चुकते केले..मग पुन्हा डबलसीट स्वारी गावाकडे पिच्चरच्या स्टोरीवर गप्पामारत निघाली....
    गावातल्या चव्हाणाच्या हाटिलजवळ आल्यावर सायकलवरून उतरलो.शिवाला गुडबाय करून पिच्चर मधील सिन मनात आठवत घराकडे निघालो...

लेखन दिनांक ९  मे२०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड