माझी भटकंती-४१ जोरवाडी






🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱🌳

           ⛰️माझी भटकंती⛰️

क्रमशः भाग-४१

    🍂 धनगरवाडी व  जोरवाडी🍂

 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
  साठवणीतल्या आठवणीवर भटकंती लिहिताना घरातील नित्याची एक वस्तु  भाकरीचं टोपलं पहाताना जोरवाडीला सन २००७  ला साधनव्यक्ती असताना केंद्र समन्वयक श्री नागनाथ शिवशरण सरांसोबत गेलो होतो त्याची आठवण झाली.त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोरवाडीच्या  मुलांनी उड्याच्या गवतापासून बनविलेले भाकरी किंवा चपाती ठेवायचं छोटंसं टोपलं भेट दिलं होतं...
      वाई वरुन दुचाकीवरुन  एकसर मार्गे धोम धरण पहात पहात वयगांव वरुन उळुंब पुलावरून बलकवडीकडे निघालो... बलकवडी धरणाच्या भिंतीवर जाऊन धरणाचा जलाशय , महाबळेश्वरचा डोंगर व  पायथ्याची गोळेवाडी  यांचं दृश्य विलोभनीय दिसत होते.. तेथून पुढे आम्ही धरणाच्या कडेकडेने कच्च्या रस्त्याने खडीमधून वाट काढत निघालो.डोंगरपायथ्याची वळणे, जलाशय आणि वाळतचालेले कुसळाचं गवत बघत आम्ही ठेचकाळत सावकाश पणे निघालो होतो... एखादा दुसरा गुराखी दिसायचा..रस्त्याला केवळ आमचीच गाडी.या रस्त्याने सरपटणारे प्राणी रस्त्यावर दिसतात.त्यामुळे सावधपणे गाडी चालवावी लागते..असे सरांचे म्हणणे.
   जोरवाडी शाळेत गेलो... सुंदर लोकेशनवर शाळा आहे.समोर धरणाचा जलाशय डावीकडे नदीचे पात्र व पलिकडे डोंगर.अलिकडे डोंगर .. पायथ्याशी व नदीच्या काठावरील वस्ती कोळी महादेव आदिवासी पाडा...शाळा परिसर पाहणी करून आम्ही धनगरवाडी वस्ती शाळेकडे निघालो.. आलेल्या रस्त्याने तसेच पुढे दोन-एक किमीपुढे जन्नी-कुंबळजाई  मंदिरापर्यंत गेलो.गाडी तिथं लावून पायवाटेने चालत निघालो... सगळीकडे झाडीचझाडी होती...पुढे नदीतून जाताना काही ठिकाणी पाण्याची बारीक बारीक धार वहाताना दिसत होते.. छोटे-मोठे गुळगुळीत दगडगोट्यांवरुन पलिकडे गेलो.
डोंगरपायथ्याने व नदीच्या कडेने जाणाऱ्या अनवटवाटेने पुढं पुढं जात होतो.सगळीकडे निसर्गगाचे विलोभनीय दर्शन घडत होतं. डोंगरकड्याचा नजारा बघत,पानांमधून येणारा  सुर्याच्या कवडश्याची मजा झेलत,तर  मधुनच येणारी वाऱ्याची मंद झुळूक अंगावर घेत पुढं पुढं तंगडतोड करत  जात होतो.
 साधारणपणे दहा-बारा घरांची वाडी.साध्यापध्दतीची झोपडीवजा घरं...लोकांचा शेती ,गुरे पालन व मध गोळा करण्याचं काम.तेथील मध चांगल्या प्रतीचा मिळतो... सगळीकडे डोंगर डोंगर आणि जंगल.त्यावेळी तिथे श्री सखाराम भातुसे स्वयंसेवक होते.ते तर दररोज सायकलवरून जोरवाडी ते मंदिरापर्यंत व तेथून पायी चालत शाळेत जात... शाळेविषयी सरांबरोबर चर्चा करून परतीच्या वाटेने जोरवाडी शाळेत आलो.त्यावेळी तिथे श्री इंगळे सर, व इतरजण होते.तेथील मुलांनी उड्याच्या गवतापासून विविध प्रकारच्या वस्तू  टोपली,सुपर डबे,ताटं इत्यादी बनविल्या होत्या.कार्यानुभवाचा प्रत्यक्ष अनुभव व परिसरातील गवतापासून खूप छान भेट वस्तू तयार केल्या होत्या.  मुलांनी एक भेटवस्तू मला दिली.शिक्षक मुक्कामी रहात होते.त्यांनी खोलीवर मस्तपैकी भोजनाचा बेत केला होता.. जेवण करून दोघेही परतीच्या प्रवासाला लागलो.
शिवशरण सर सावकाशपणे अंदाज घेत गाडी चालवत होते.. धरणाच्या भिंतीपर्यत केवळ आमचेच वहान. हेडलाईटच्या प्रकाशात कच्च्या रस्त्यातून मार्ग काढत आलो.... उळुंब पुलापासून वाईपर्यत येताजाता गाड्या होत्या.
हा रस्ता शिवशरण  सरांच्या परिचयाचा ते यापुर्वी नांदगण्याला होते.



दिनांक ११मे २०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड