गावच्या आठवणी-यात्रेतील छबिना

आमच्या गावची यात्रा,छबिना







         🌸माझा गाव 🌸.

       आमच्या गावची यात्रा
➖❄️➖❄️➖❄️➖❄️
  ओझर्डे गावचे ग्रामदैवत श्री पद्मावती मातेची यात्रा चैत्र कृष्ण चतुर्थी व पंचमीला असते.....
वाईहून गावात पुल ओलांडताच डाव्या बाजूचे मंदिर लक्ष वेधून घेते ते श्री पद्मावती देवीचे मंदिर चंद्रभागा ओढ्याच्या काठावर आहे.चारही बाजूने भक्कम तटबंदी आहे.पुर्वेस प्रवेशद्वार असून त्यावर नगारखाना आहे.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे नगारखान्यावर जायला तोडीच्या दगडी पायऱ्या आहेत.समोरच तुळशीवृंदावन आहे.सभामंडप व गाभारा आहे.गाभाऱ्यात चांदीची मेघडंबरीवर सुबक नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात डावीकडे दीपमाळ आहे .तिथं गावचा हरिनाम सप्ताह संपन्न होतो.तिथेचं छोटेखानी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम संपन्न व्हायचे.  लहानपणी यात्रेचे कुतूहल वाटायचे.आमच्या यात्रेला चैत्रपौर्णिमेपासून सुरुवात होते.मग  देवीच्या "सवाष्णि " ला पौर्णिमेपासून सुरू होते. चतुर्थीच्या ताज्या यात्रेपर्यत सवाष्णि  असत.काहिजण देवीचे दंडवत घेत.स्वता:च्या घरापासून दंडवत घालत देवळापर्यंत जायचं.ताज्या यात्रेच्या दुपारपासूनच दुकाने यायला सुरुवात व्हायची.
खेळण्याची दुकाने,मुली व महिलांच्या साठी ज्वेलरीची दुकाने,दवणा -गुलालाची दुकाने,मिठाईची दुकाने ,आकाशपाळणे,मे-गो राऊंड,फुगेवाला, भेळवाले, सरबतवाले,गारी गारवाले,कलिंगडाचे ढीगच्या ढीग, गारी गार मलई कुल्फी वाले,वडाच्या पानावरची कुल्फी पान चाटून पुसून खायची.आनंदी आनंद ,मजाच मजा वाटायची. यात्रेला नवीन कपडे मिळायची.आलेले पाहुणेरावळे  खायला पैसे द्यायचे.मला यात्रेतला  छबिना ,तमाशा व कुस्त्यांचा फड लय आवडायचा.....
                  🥁छबिना
       ताज्या यात्रेला मंदिराला लाईटच्या माळांची रोषणाई केली जायची.रात्री  देवीचा छबिना आरती करून सुरू व्हायचा.पुलांच्या माळांनी सजविलेल्या पालखीत देवीचा मुखवटा घालून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जायची.खांदा देण्यासाठी मानकरी असतं.आबदागिरी, फुलांची छत्री फिरवणारे,  ढोल-लेझीमचा डाव,झांजपथकाचा डाव सुरू व्हायचा. हलगी ताशाचा "थंदाडांग तथाडांग "आवाजात छबिन्याला सुरुवात व्हायची.'बडीजा नगरको मेहेरबान'जयघोष करत प्रदक्षिणा पुढं पुढं जायची.            दागदागिन्यांनी सजवलेल्या श्री पद्मावती देवीचे गुलाल ,दवणा व गोंडा वाहून देवदर्शन घ्यायचे.
आळीतल्या सवंगड्यांना शाळेतल्या मित्रांना सगळी एक होऊन गुलालाने मढवायचं.पालखीवर गुलाल उधळायचा. सगळी माणसं छबिन्यात गुलालाने माखलेली असायची.पालखी जवळील सर्व मानकऱ्यांना कपाळी गुलाल लावून त्यांच्या पाया पडायचे.शुभाशिर्वाद घ्यायचे.ओळखीच्या मोठ्यांनाही गुलाल लावून पाया पडायचे.

ढोल आणि झांजेच्या तालावर लेझमीचा डाव सुरू व्हायचा.लहानथोर सगळे "डुबांग डुंबाग डिबीवाडी डुंपांग,'डम्बांडाक टपाडाक च्या'' आवाजावर अर्धा पाऊण तास विविध पारंपरिक लेझीम नृत्य पहायला मिळायचे.तदनंतर इतर गावातून आलेली लेझीम पथक,झांज पथकांचे कार्यक्रम व्हायचे..लाठी-काठी-बनाटीचे साहसी खेळ पहात,पालखीवर गुलाल उधळीत , फटाक्यांची आतषबाजी व भुईनळे ,(पाऊस) उडवत असतं......हे सुरु असतानाच बावधन,पसरणी व इतर गावांतील ढोल येत.. छबिना..सगळे ढोलवाले एकाच चालीने डमपांग डमपांग डुमडुमपांग  अशा विविध चाली वाजवून छबिना गावात मिरवूकीने जात असे......हौशी गावकरी  ज्याचं ढोल वाजवणं आवडलकी ढोलाच्या काठीला स्वखुशीने पाच-दहा रुपयांच्या नोटा बांधत.ढोल जसाजसा वाजेल तशी काठीही डुलायची.हे बघताना मजा वाटायची...सगळे ढोलवाले गुलालाने माखलेले असत.. त्यातील काही नाचत ढोलवादन करत... मध्यरात्रीच्या एकदोनच्या सुमारास श्री तुकाबाई मंदिराजवळ पुन्हा सगळे खेळ व कसरती व्हायच्या.....यातील लाठी-काठी-बनाटीचा मर्दानी साहसी व थरारक खेळ कुतुहलाने पहात असू. त्यातील दोन्ही हाताने काठी सगळीकडे फिरवणे. दांडपट्ट्याने कांदा किंवा लिंबू कापने,काठीची स्टाईलबाज मारामारी,पोटावरील नारळ शस्त्राने फोडणे,लाठण्याला लगडलेले कापडी जाळगोळे (दोन,चार,आठ व दहा) पेटवून ते स्वता: भोवती फिरवून कसरत करणे.समोर  व डोक्यावर गोल- गोल फिरवणे.अंधारात हे दृश्य बघताना उत्कंठा शिगेला पोहोचायची.रात्रीच्या अंधारात जाळगोळे फिरताना लय मजा वाटायची.नेत्रदीपक कसरत असायची.सगळी माणसं  मर्दानी खेळ बघायला गर्दी करायची.आमच्या 
आळीतली हौशी पोरंही सहभागी व्हायची.
चारसाडेचारला पालखी देवळात गेलाकी छबिना मोडत असे...घरी येवून तसंच बाहेर झोपायचं .. सकाळी उठून अंघोळीला लाईफबॉय साबणाचा तुकडा घेऊन गायमुखावर नाहीतर ओढ्याला किकतीत जायचो...मग तमाशा आणि खेळण्यांच्या दुकानासमोर खेळणी मनभरुन  बघत बसायचो...

रम्य ते बालपण,स्मरण गंधाची होते आठवण
आंतरिक शक्तीच्या ऋणानुबंधाने ओढावते मन


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक...२मे २०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड