माझी भटकंती शेगाव आनंदसागर क्रमशः भाग. ३९ ते ४०





🌱🍀🌱🍀🌱🍀🌱🍀🌱🍀

            माझी भटकंती

        क्रमशः भाग क्र--३९

        🛕 जालना ते  शेगांव🛕
              फेब्रुवारी २०१५
🔅💠🔅💠🔅💠🔅💠🔅💠
अभेपुरी ता.वाई येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त रात्री  आयोजित केलेला शाळेच्या  मुलांचा कलाविष्कार मेळावा संपन्नकरुन ओझर्डेतील मित्रांच्या बरोबर मी जालन्याला निघालो..श्री.अरविंद गुरव गुरुजी,श्री.शामराव वाघ,श्री भगवान(आप्पा) पिसाळ,श्री दादा पिसाळ,श्री प्रमोद निंबाळकर श्री अर्जुन फरांदे ,श्री दिलीप पिसाळ व मी.व्याजवाडीच्या तवेरा गाडीतून प्रवास वाई-खंडाळा--लोणंद-मोरगांव मार्गे अहमदनगर-औरंगाबाद व हस्तपोखरी ता.अंबड जि.जालना  सुरू झाला... चेष्टा मस्करी आणि विनोद करायला दादा महातयार.समकसूचकतेने असा काय बोलायचा की सगळे हसणारच.फिरकी घ्यायला एकदम तयार...वाघ आप्पा एखादी गोष्ट किंवा घटना  रंगवून सांगायला तयार. दिलीप प्रवास आणि रस्त्यांची परफेक्ट माहिती देणार..गुरव गुरुजी धार्मिक गोष्टी आणि व्यवहारीकपणा मस्तपैकी खुलवून सांगणार..   अर्जून   आप्पांशी हुज्जत घालणार ,मस्ती करणार
.त्यामुळे आमच्या ट्रीपा मजेत व्हायच्या...शेती आणि राजकारण यापैकी एखाद्या विषय उलघडला की त्यावर सगळेजण उस्फुर्त प्रतिसाद व प्रतिक्रिया देणारच.अर्जूनचा ऊस वहातुकीचा व्यवसाय.त्याची टोळी  हस्तपोखरी जवळच्या गावातील.त्यामुळे तो औरंगाबाद आल्यापासून कसं जायचं यासाठी मुकादमाला सारखा फोन करत होता.... सकाळी सकाळी मुकादमाच्या गावात हजर.सकाळी सात वाजताच  तिथं कडक ऊन जाणवलं मग दिवसभर काय अवस्था असेल.विचार करुनच घाम फुटला.
    आमची गाडी बघून दहा-बारा जण जवळ आले.चौकशी सुरू.अर्जूनने मुकादमाचे नांव सांगून भेटायला आलोय सांगितले.. थोड्यावेळाने मुकादम आला.दोघांची चर्चा झाली..आणि कच्च्या रस्त्याने हस्तपोखरीत आलो.आमचे मित्र केटरर्स दिलीप दारकड यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त गेलो होतो..स्वादिष्ट जेवण बनविण्यात दिलीप दारकड माहिर. . दारकड आचारी लग्नात स्वयंपाक करायला असलाकी माणसं आवर्जून  कितीही गर्दी असली तरी जेवणारच.
    तिथला पाहुणचार घेतला.. दिवसभर  तेथील लोकांचे राहणीमान, लग्नाची पध्दत, एकजुटीने गावचा सहभाग.शेती व राजकारण यांविषयी गप्पागोष्टी झाल्या..  सायंकाळी लग्नसमारंभाला उपस्थित राहून . जेवण करून निरोप घेऊन निघालो. अंबड--जालन्यातून चिखली मार्गे शेगावला निघालो... अनोळखी रस्त्याने माईलस्टोन वरिल गावांची नावे व अंतर पहात..धाब्यावर रुट विचारित निघालो.नेहमी सारख्या गप्पामारत मध्यरात्री शेगावमधी पोहोचलो.मंदिराजवळील यात्री निवासस्थानी जाऊन मुक्कामाची चौकशी केली.मॅनेजरनी ३ किमीवरील  यात्री निवासचा पत्ता सांगितला.मग  त्याप्रमाणे यात्रीनिवासला आलो.रजिस्ट्रेशन केले.आम्हाला सर्व सोयींनी युक्त एक मोठी खोली नाममात्र दरात उपलब्ध झाली...सलग दोन रात्री पुरेशी झोप न झाल्याने सगळे झोपी गेलो.
    सकाळी लवकर सगळ आवरुन तिथेच अल्प पैशात चहापान व नाष्टा उरकून संस्थानच्या बसने मंदिरात आलो.शेगावचे श्री.गजानन महाराज मंदिरात  भाविक रांगेने दर्शनबारीत उभे होते.आम्हीही रांगेत उभे राहिलो.सकाळच्या मंदिरातील शांत आणि प्रसन्न वातावरणात पवित्र समाधीचे दर्शन घेतले.
मन:शांतीसाठी तेथील मंडपात पाच-दहा मिनिटे ध्यानस्थ बसून नामस्मरण केले..भक्तीमय माहोलमध्ये मन तजेलदार व ताजेतवाने झाले.. सगळ्यांचे  दर्शन व्यवस्थित झाल्याचे गुरुजींनी सांगितलं. पुन्हा मुखदर्शन घेऊन मंदिरपरिसरात प्रदक्षिणा घातली..बालवारकऱ्याची दिंडी सोहळा चालला होता.प्रसन्न वातावरणात अभंगांचे सुस्वर गायन वादन कानावर पडले.टाळ्यांचा ठेका धरुन मनोभावे त्यात थोडावेळ सामील झालो. ग्रुप फोटोसेशन केले. काहींनी मंदिराला देणगी दिली.घरच्यांसाठी प्रसाद घेऊन यात्रीनिवास जवळीक बसथांब्यावर रांगेत उभे राहिलो.संस्थानतर्फे यात्रीनिवास  ते मंदिर व मंदिर ते आनंदसागर पर्यत  भाविकांना मोफत  बससेवा आसते .बसने श्री गजानन महाराज संस्थानचे अप्रतिम प्रेक्षणिक "आनंदसागर"अम्युझमेंट गार्डन पहायला निघालो...



माझी भटकंती
क्रमशः भाग -क्रमांक ४०

                           आनंद सागर शेगाव
 पर्यटन , आध्यात्मिक आणि धार्मिक संस्कृतिचा अनमोल ठेवा...
आनंदी आनंद म्हणजेच "आनंदसागर" आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सुंदरतेचा ञिवेणी संगम आनंदसागरात आहे.श्री गजानन महाराज शेगांव संस्थानचे  एक नामांकित  भाविकांसाठी प्रेक्षणिय स्थळ आहे. सगळ्यांचे प्रवेशशुल्क देऊन एन्ट्री पास घेऊन बागेत पहायला निघालो. आकर्षक व नक्षीकाम केलेले अप्रतिम प्रवेशद्वार. संगमरवर दगडातील बांधकाम  आपले लक्ष वेधून घेते.लहानमुलांना मौजमजा करायला विविध प्रकारची अनेक खेळणी आहेत.झोपाळे,सी--सॉ,प्राण्यांच्या पाठीबसून उड्या मारणे.मंकी बार,गोलाकार फिरणारे मेरी-गो-राऊंड ,घसरगुंडी इत्यादी खेळणी बघितल्यावर बच्चेकंपनी  खुश होवून त्यावर आरुढ होवून आनंदाने खेळतात.. सर्वाच्या आवडीची छोटी ट्रेन सफरही आहे. मनोरंजक  आनंदसागर लहानमुलांना आहे.
 आतमध्ये फिरायला प्रशस्त रस्ते, दुतर्फा विविध आकारातील वृक्षवल्लीची रचना आहे. जागोजागी तुषार उडविणारी कारंजे . जागोजागी विविध आकाराचे लाईटचे खांब इत्यादी रचना पहाताना मनस्वी आनंद झाला. चालताना थकवा आल्यास जागोजागी विश्रांती साठी छोट्या कुटीर आहेत.ठिकठिकाणी पाण्याची व प्रसाधनगृहाची सोय  आहे.विस्तृत जमिनीवर गार्डन असून मध्यभागी बांधीव जलाशय आहे.विविध रंगीबेरंगी फुलझाडे लक्षवेधून घेतात. जागोजागी विविध प्राण्यांची माॅडेल्स उभारलेली आहेत. ते पाहून फोटोग्राफी करण्याचा मोह होतोच.आकर्षक शिल्पकलेचा नमुना पहायला मिळतो.आम्ही प्रथम देखावे बघत बघत शिवमंदिर बघायला गेलो.विविध नेत्रदीपक दृश्ये बघताना फोटोग्राफी केली..
      शिवमंदिराजवळ एक  मोठा नंदी आहे...मंदिराचे सुबक नक्षीकाम  मार्लबमध्ये  केलेले आहे. अप्रतिम रचना.. तद्नंतर आम्ही मस्यकन्या नावाचा 'कमल पॉंड' पहायला आलो..सर्वत्र सुंदर लॉन, रंगिबेरंगी फुलझाडांची आकर्षक रचना पाहून आनंदित झालो.
तळ्यातील विविध रंगांची कमळाची डौलदार फुले  पाहिली.अनुरंजन विहार पाहून श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन. थोडावेळ तिथेच थांबून . मस्तपैकी कुल्फी खाल्ली.
  उद्यानाच्या जलाशयात पौराणिक कालिया मर्दन दृश्य तरंगते आहे. मध्यभागी विवेकानंद  केंद्र आहे.आध्यात्मिक मनःशांती साठी ध्यान केंद्र आहे.मौन पाळण्याची सूचना देतात.शांत आणि प्रसन्न वातावरणात मनःशांती साठी शांतपणे सगळे जण  ध्यानस्थ बसलो.तेथून सर्व बागेचे विहंगम दृश्य मस्त दिसते.
  तीन-चार तास चालल्या मुळे उपहारगृह दिसताच तिकडे जावूया सर्वांची एकमेकांना न बोलता खुणवाखुणवी झाली.प्रत्येकी ३५ रुपयात येथेच्छ शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला.जेवताना बघितलेल्या ठिकांणावर चर्चा करत जेवण केले....
  खूप रमणीय,आनंदी आणि अध्यात्मिक ठिकाण  पाहिल्याची आनंदसागर अम्युझमेंट गार्डन विषयी प्रतिक्रिया दिली... सगळेजण खूशीत परतीच्या प्रवासाला लागलो.

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड