बालपणीच्या आठवणीतील यात्रा-श्री भवानी माता मंदिर असले ते केंजळ

  बालपणीच्या आठवणी
क्रमशः
                    यात्रा

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    श्री भवानी देवी आसले
बालपणीच्या साठवणीतली यात्रा पद भ्रमंती     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    श्री भवानी देवी माता  आसले
                 पूर्वाध
   एप्रिल महिन्यात सकाळची शाळा असायची.मग शाळा सुटल्यावर आळीतील मित्रांबरोबर नदीकाठी सोनेश्वरला,नेहरमळा,भवानी देवीला जायच्या वाटेकडे जायचं,नाहीतर मराठी शाळेपुढे अथवा किकतीत क्रिकेट खेळायला जायचं.चैत्र महिन्यात आमच्या भागातील अनवडी,पांडे,खानापूर,बोपेगांव,कवठे,असले या गावातील यात्रा असायच्या.पौर्णिमेला हनुमान जयंतीला गोंधळ वाडी(असले) येथील यात्रा असायची.त्याच दिवसांपासून आमच्या यात्रेच्या सवाष्णि सुरू व्हायच्या ते पुढे पंधराएक दिवस पुरणपोळ्या खायला मिळायच्या. आमच्या घरी त्याच दिवशी" सवाष्णी" असायच्या.
       या वर्षी लॉकडाऊने खंड पडला.जेवायला एक-दोन वाजायच्या.
सकाळची शाळा करून आळीतल्या पोरांबरोबर भवानी आईच्या यात्रेला  चालत आसल्याला जायचो.घरुन चार पाच रुपये मिळायचे.माझा बालपणीच्या दोस्त विजय तांगडे व इतरांबरोबर जायचो.गावातील तालीम करणारी पोरं तर सकाळी लवकर उठून चालत वैराटगडावर जायची.ती भवानी आईची यात्रा करून माघारी परतायची आणि व्याजवाडीच्या जत्रेतल्या फडात कुस्त्या करायला जायची.आमच्या घराच्या पाठीमागून नदीला जायला शेतातला रस्ता होता.ज्यांच्याकडे बैलगाडी आहे ती  माचावरुन नदी पलीकडे जात. ज्यांच्याकडे   टॅक्टर-ट्रॉली आहे ती दुपारच्या पुढं पाचवड मार्गे जत्रेला निघायची...
आमी जत्रेला तमाशा कुणाचा हाय.क्रिकेटची मॅच कुणाबर आहे.शाळेतल्या गमतीजमतीवर गप्पा मारत चालायचो.जाताना एखाद्याच्या वावरात ऊस दिसला की पळत जाऊन मोडायचा व चघळत चघळत खात खात वाट उरकायची.. कृष्णानदीच्या गुडघाभर पाण्यातून पलीकडच्या तीरावर जायचं.तिथून पुढे शेतातली बांधाची वाट असायची.बांधाबांधाने चालत पळत पंधरा-वीस मिनिटात पायथ्याशी पोहचायचो. पायऱ्या चढत दुतर्फा दुकाने पहात.मंदिरात जायचं.ताजी यात्रा असल्याने परिसरातील लोकं श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी करत.भल्यामोठ्या रांगेत उभे राहून.. पुढे पुढे सरकत देवळात जाऊन दर्शन घ्यायचे.मंदिराला सभोवती एक प्रदक्षिणा घालायची व काहीजण घरून आणलेलं पीठ-मीठ परडी घेऊन बसलेल्या गोंधळ्यांना द्यायचे. दीपमाळेजवळ  थांबायचे.कारण देवाला नारळ तिथेच फोडावे लागत.आमी मोकळे.कुणीतरी म्हणायचं,ये पोरा एवढा नारळ दे फोडून.मग नारळ घेऊन सोलायचा व फोडून द्यायचा.त्यातला थोडासा तुकडा प्रसाद म्हणून मिळायचा.
 क्रमशः

बालपणीच्या आठवणी   यात्रा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    श्री भवानी देवी आसले व कोचळेवाडी केंजळ
   ओल्या नारळाचा प्रसाद खात खात खाली उतरायला सुरुवात करायची.खेळण्याच दुकान दिसलं की गाडी केवढ्याला, चष्मा कितीला,पिपाणी केवढ्याला,
पिच्चरचं खोकडं केवढ्याला असं विचरायचो.
आमच्यातला एखादा काहीतरी घ्यायचा.मग त्याच बघून वाजवून झाल्यावर इतरांना संधी मिळायची. पिपाणी जोरात वाजवली की जाणारे येणारे आमच्याकडं बघायचे.भेळवाल्याकडून एक-दोन भेळी घ्यायच्या .तो विचारायचा ,ओली का सुक्की देऊ, आमच्यात लवकर एकमत व्हायचं न्हाय.. एकजण म्हणायचा सुक्कीच द्या.कुरकुरीत खायला येईल.काय त्यावेळची भेळ चिरमुरे बुचूकभर,कांदा चिमूटभर,
श्यावचिवडा मूठभर आणं एखादा दुसरा शेंगदाणा.
कागदाच्या शंकुच्या आकाराचे पुडा घेऊन पायथ्याशी यायचो.जत्रेतलं सगळ्यात आवडता खाऊ कलिंगड.
कलिंगड खायला लय आवडायचं .हे कलिंगडाचे ढीगचा ढीग मांडलेले असयाचे जत्रेत.आकाराने पाहून वेगळा  ढीग मांडलेला.बारकी बारकी  बघून दोन-दोन रुपयाला द्या असं त्या बाबाला म्हणायचो.नाय हो करायचा,त्याला विनवणी करायची , "आमी सकाळपासून काही खाल्लं नाय म्हणायचो."मग त्याला दया यायची.कलिंगड हातात घेऊन वाजवून द्यायचा. प्रत्येकजण एकेक  कलिंगड घ्यायचा.आलेल्या वाटेने चालायला सुरूवात करायची.. नदीच्या जवळ आल्यावर झाडाखाली बसून हाताने कलिंगड फोडून खायला सूरुवात..जोडीला भेळीचा घास,असं करतं सगळं  फस्त करायचं...व रमत गमत घरी यायचं...
घरी आल्यावर  आमच्यातला सवाष्णी जेवलेल्या असायच्या.मी व भावड्या(विजय तांगडे) मस्तपैकी पुरणपोळीचा एक घास गुळवणीत बुडवून खायचा , खरावडं ,कुरावडं व पापडाचा खाताना काडकुड आवाज करत,भजी आणि आमटीचा वारंवार फुरका मारत जेवायचो.
मग पानांचं साहित्य ताटातच असायचा.हाताने पानविडा बनवायचा. चघळत चघळत बाहेर पडायचं.
     एकदा असंच जेवल्यानंतर भावड्या (विजय तांगडे) म्हणाला कोचळेवाडीची(मयुरेश्वर) आज- उद्या जत्रा आहे.उद्या रविवार आहे.जाताका आपण सायकलवरून जत्रला.घरी आईला विचारतो.जा म्हणालीतर येतो.घरी निघालो की तो बरोबरच.. आईला विचारल्यावर,"नाही होय करता जा म्हणाली."मग जायची तयारी झाली...विज्या परड्यात गेला. सायकल आणायला,तिथं सायकल नाही.त्याने आक्काला विचारले,सायकल कुठंय.ती म्हणाली , मघाशी सुद्या गेलाय की  सायकल घेऊन. आता काय करायचं.नको जायला उदया पांड्यांच बगाड बघायला जावू.मी म्हणालो.नाय नाय आज जायचच. एकच त्याचा ठेका,  चल आपण चालत जावूया जवळच आहे....
   परिसरातील सर्व जत्रांना त्यावेळी चालतच जायचो.
शाळा सुटली की निघालो.चालत चालत सगळी गावं तीनपाच किमी अंतरावर असायची.जातायेता माणसं असायची.आज पांडं,उद्या खानापूर,परवा बोपेगाव आमची झाली की कवठ्याची मग संपल्या जत्रा.
      मग आम्ही दोघं चलते चलते गावातून  वाई रस्त्याने केंजळवाटेला आलो.तिथनं जायगुडेवाडीच्या शिवारानं गाडी वाटेने वाडीत गेलो.मग  खानापूरच्या माळामाळानं चालत चालत वाई-सुरूर रस्ता ओलांडून टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या रानातल्या, शिवारातल्या वाटेने मयुरेश्वरला गेलो.तिथं विजूच्या पाहुण्यांकडेराहिलो तिथंच सुदामही भेटला .रात्रीचा देवाचा छबिना बघितला.पालखीचे दर्शन घेतले.सगळी कपडे आणि त्वांड गुलालानं माखलं होतं.तसेच जवळच असणाऱ्या रानात झोपायला गेलो.सकाळी विहीरीवर जाऊन  मस्तपैकी अंघोळ केली.पाहुण्यांच्या घरी आल्याव चहा पेला..इतर आलेल्या पाहुण्यांनी कसं आला कधी आला चौकशी केली.विज्याच्या इतर पाव्हण्यांचा घरी गेलो.एका ठिकाणी चहाबटराचा नाष्टा झाला.मग आम्ही जत्रेत फिरायला गेलो..तमाशा सुरु व्हायला  अवकाश होता म्हणून पाव्हण्याच्या घरी आलो.जेवण तयार झालं होतं.मग काय मटणरस्सा भाकरीचा काला करून मस्तपैकी जेवलो.अन चालत चालत आलेल्या वाटेने घरी आलो.

श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड