माझी भटकंती भाग-चौतिस --गणपतीपुळे
🍀☘️🍀☘️🍀☘️🍀🛕माझी भटकंती🛶
क्रमशः भाग चौतीस
गणपती पुळे
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️कोकणातील रत्नागिरी जिल्हा म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांची खाणच आहे.गणपतीपुळे,पावस, मार्लेश्वर इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत.निसर्गाबरोबर तिथली माणसंही आपलसं करतात..
आमची फॅमिली टूर महाबळेश्वर ते गोवा अशी आयोजित केली होती.धार्मिकस्थळे व मुरुड बीच पाहुन आम्ही गोव्याला निघालो होतो.
गणपतीपुळे प्रसिद्ध पर्यटन व धार्मिकस्थळ तिथे स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे.डोंगररांगेच्या पायथ्याशी मंदिर व मंदिरापुढे लगेच समुद्र किनारा हे इथलं वैशिष्ट्य आहे.. नयनरम्य व शांतताप्रिय ठिकाण..आम्ही रात्री तिथंच एका लॉजवर मुक्काम केला.. मस्तपैकी शाकाहारी जेवणाचा बेत होता. शतपावली करायला मंदिर परिसरात गेलो.. लाटांचा नाद कानावर येत होता.वाऱ्याची झुळूक आली की थंडगार स्पर्श जाणवत होता... बऱ्यापैकी भाविकांची दर्शनासाठी घाईगडबड दिसत होती.दर्शन घेऊन काहीजण प्रवासाचा पुढील टप्पा गाठत होती...काहीजण येत होते...दहा वाजताही बऱ्यापैकी भाविक दिसत होते..
उद्याचा सगळयांना प्रोग्रॅम सांगून शुभ रात्री केले.
सकाळी लवकर आवरून किनाऱ्यावर एकटाच फिरायला गेलो....शांत वातावरणात चालताना बीचवरील आठवणी डोळ्यासमोर आल्या.डी.एड.ला असताना प्रथमच हा समुद्रकिनारा पाहिला होता. सायंकाळच्या वेळी पॅन्टी गुडघ्यापर्यंत दुमडून पाण्यात ऊभं राहून मजा करत होतो..लाट आली की किनाऱ्यावर हळूहळू जात होती..उत्साही मित्र पुढे जायला लागले की सर शिट्टी वाजवून इशारा करायचे...
सकाळचा सागर किनारा मनमोहक दिसत होता.. अर्ध्या तासाची छान पैकी रफेट केली.... माघारी वळून देवळाकडे निघालो.. थोड्याचवेळात फॅमिलीचा फोन आला , आमचं आवरलय आम्ही मंदिराकडे येवूका? मी होय म्हणालो.'तुम्ही सगळे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ या.मी तिथं पोहोचतोय.आपण एकत्र देवळात जाऊ.'असं सांगून देवळाकडे
निघालो. क्रमशः
क्रमशः भाग
सगळेजण देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ जमले होते...तुरळक भाविक दिसत होते.. मुखाने गणपती बाप्पा मोरया म्हणत दर्शन रांगेतून पुढे पुढे जात होतो.देवळात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण होतं..देवळात जाऊन जोडीने बाप्पाचे दर्शन शांततेत झाले.. तिथंच सभामंडपात थोडावेळ शांतपणे गणपती स्त्रोत म्हणत बसलो...मन तजेलदार व उल्हासित होत होतं... समाधानाने बाहेर येऊन भावाबरोबर पहिला सेल्फी काढला.. इतरांनाही मंदिर आणि किनाऱ्यावर फोटोग्राफी केली.डीएड कॉलेजची सहल आली होती तेव्हा मित्रांबरोबर एक किमी डोंगराच्या पायथ्याने प्रदक्षिणा पूर्ण केली होती तो प्रसंग सर्वांना सांगितला.... गणपती बाप्पा मोरया म्हणत कोस्टल रोडने रत्नागिरी कडे निघालो.... दोन- तीन किमी अंतरावरुन किनारा मनमोहक दिसत होता.. ते पाहून गाडी थांबवण्याचा मोह झाला... सगळेजण खाली उतरलो... टेकडीवरून किनाऱ्याचे सौंदर्य न्याहाळताना खूपच छान दिसत होते. अप्रतिम दृश्ये पहायला मिळाले... इथं किनाऱ्यावर लाटा येताना मोठाल्या खडकाला धडकत व पाणी वर उसळी घेत होतं.मनमोहक दृश्ये पहायला मिळत होती.मस्तपैकी फोटोग्राफी केली...
रत्नागिरीतील रत्नदुर्ग,भगवती मंदिर ,मस्यालय व थिबा पॅलेस पाहिला..कोकणकृषी विद्यापीठाचे मस्यालय पाहून आमची बच्चेकंपनी जाम खुश झाली...मोठाल्या फिशटॅकमध्ये विविध माश्यांची प्रजाती, विविध रंगांच्या बारीक बारीक दगडांचा वापरुन केलेली रचना .त्या माश्यांची थोडक्यात नावासह माहिती...सागरातील विविध जैवविविधतेची प्रदर्शित माहिती व नमुने.देवमाशाचा सांगाडा पाहून लय मस्त बघायला मिळाल्याची शंभूने प्रतिक्रिया दिली... अनेकविध सागरी माश्यांचे पत्रकार पहायला मिळाले. अनोखे प्रदर्शन पाहिल्याने सागरसंपत्तीची नव्याने इत्यंभूत माहिती समजली....
तदनंतर रत्नागिरीतून भाटये मार्गे पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिर पाहिले. आश्रम पाहिला. महाप्रसाद घेऊन गोव्याकडे मार्गस्थ झालो...
Nice
ReplyDelete