माझी भटकंती-वासोटा किल्ला बामणोली भाग-४७





[5/18, 8:01 PM] ravindralatinge: [5/18, 6:46 PM] ravindralatinge: ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
       माझी भटकंती

        क्रमशः भाग-४७

          ⛰️ शेंबडी व बामणोली ⛰️
🚣🏻‍♂️🌱🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂.

     फेसबुकवर वासोटा ट्रेकिंगच्या अनेक कथा वाचल्या होत्या.शिक्षकमित्रांकडूनही भटकंतीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. वासोटा किल्ला बघायचं मनात होतं...योग जुळत नव्हता.
     एकदा सायंकाळी साई ग्राफिक्स यांच्या दुकानात कामानिमित्त गेलो होतो तेव्हा ते कोयना कृषी रिसॉर्टचा फ्लेक्स बनवताना गुगलवर चांगली वासोटा किल्ल्याची इमेज सर्च करत होते... बोलता बोलता वासोटा भटकंतीची चर्चा सुरू झाली.. प्रशांत वाडकर म्हणाले,हे रमेश साळुंखे यांचे बामणोली जवळ नवीन रिसाॅर्ट आहे.आपलं प्लॅनिंग करता का ? मग ओळखी झाल्या.ते म्हणाले, आदल्या दिवशी रात्री मुक्कामी या.दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला बोट रिसॉर्ट वर येईल.तिथून तुम्ही बोटीतून किल्ला पहायला जाऊ शकता. मग त्यांचा संपर्क क्रमांक घेऊन प्लॅनिंग झाले की कळवितो असं सांगितलं.तदनंतर मित्रांशी वासोटा ट्रेकिंगची चर्चा करून प्लॅनिंग केले.. शनिवारी दुपारी मी,श्री प्रशांत वाडकर,श्री शिवाजी फरांदे ,व श्री विक्रम वाडकर ,श्री राहूल हावरे व श्री बाळकृष्ण पंडीत. फरांदे सरांच्या व प्रशांतच्या  गाडीतून  निघालो.थंडीचे दिवस असल्याने गरम कपडेही  घेतले..
  साताऱ्यातील राजवाडा चौपाटीवर श्री सुनील जाधव आमच्यात सामील झाले.राजवाडा चौपाटीवरुन  वडापाव पार्सल घेतले व कासपठार मार्गाने बामणोलीला घाट रस्त्याने निघालो..नेहमी सारख्याच गप्पामारत निघालो... अधूनमधून गाडीतील गाणीही ऐकत होतो..कास पठारावर आल्यावर एका ठिकाणी गाडी बाजूला थांबवली. बाहेर आल्यावर  वातावरणातील गारवा जाणवायला लागला.थंडगार वारे वहात होते.. जवळच्या गवतातून डाव्या बाजूने निघालो... थोडंसं पुढे गेल्यावर उरमोडी धरण जलाशय दिसला..सायंकाळचे   धरणाचे दृश्य विलोभनीय दिसत होते.जलाशय, डोंगर आणि ढगांच्या दृश्यांचे  अप्रतिम सौंदर्य दिसत होते... सूर्यास्त होताना वेगळीच नजाकत बघायला मिळाली.तिथच रेंगाळत आसमंत पहात मस्तपैकी वडापावचा नाष्टा केला.
श्री रमेश साळुंखेला फोनवरून संपर्क साधून मुक्कामाचे फायनल   केले..जेवणाचाही मेनू सांगितला.थोड्यावेळाने बामणोली कडे निघालो..वाटेने बऱ्यापैकी ट्रॅफिक ये-जा करताना दिसत होते... खिडक्या उघड्या असल्याने थंड  वाऱ्याचा झोत आत येत होता...
कास-तलावाला मागे टाकून पुढे निघालो.क्रांतिस्मृती कॉलेजला असताना पाहुण्यांबरोबर  रविवारची पार्टी करायला आलो होतो.त्याची आठवण आली... मस्तपैकी तीन दगडांची चूल करून रस्सा व चिकन बिर्याणी बनवली होती.अंधार पडत होता.गाईम्हशी घराकडे जाताना दिसत होत्या.. घनदाट झाडीतून वळणावळणाच्या रस्त्याने जाताना हॉर्न सारखा वाजवित होते... आम्हीही सगळे कुतूहलाने पुढं काय येतंय का ? हे बघत होतो.जाधव सरांनी परत एकदा रिसॉर्टला फोन करायची सूचना वाडकरला केली..रेंजमुळे फोन लागत नव्हता..नांव माहिती होतं.पण बामणोलीत नेमके लोकेशन माहित नव्हते.त्यामुळे सापडतेय का नाही ठिकाण?,मनात उलघाल व्हायला लागली...सात एक वाजता बामणोलीत पोहोचलो.. बाजारपेठ दिसली. गाडी थांबवली वाडकरने उतरून एका हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली..तो माघारी येऊन  म्हणाला,'याच रस्त्याने तीन किलोमीटर अंतरावर कोयना कृषी रिसॉर्ट आहे.रस्त्याच्या उजवीकडे फ्लेक्स बोर्ड आहे.' फरांदे सरांनी गाडी चालू करून ऐकलेल्या दिशेने घेतली...आमचं लक्ष आता फ्लेक्स बोर्डचा वेध घेत होते.पाण्याचा फुगवटा आणि डोंगराच्या पायथ्याने गाडीच्या लाईटच्या उजेडात निघालो.. नवीन भाग कच्चा व वळणावळणाचा रस्ता त्यामुळे गाडीचा वेग मंद होता.
थोड्यावेळाने उजवीकडे  एक लाईटचा पेटता बल्ब वाडकरला दिसला.आमचं लक्ष पाटी कधी दिसतेय याकडं .. एकदाचा बोर्ड दिसला..हॉर्न वाजविल्यानंतर  एकजण बॅटरीच्या उजेडात सामोरा आला. गाडी व्यवस्थित पार्क केली.सगळे पायऱ्या उतरून खाली आलो...स्वतंत्र किचनचे पहिल्यांदा दर्शन झाले... समोर लाईटच्या उजेडात पश्चिमेकडे पाणी चमकत होते.. छोटीसी गार्डन आणि दोन तीन पायऱ्या चढून वर गेलो.एका शेडसारख्या इमारतीत मस्तपैकी टेंटमध्ये रहाण्याची सोय केली होती.बंदिस्त  टेंट मध्येच सर्व सोय..आजची रात्र निसर्गाच्या सान्निध्यात  टेंटमध्ये घालवायची .एक वेगळा अनुभव मिळणार याचे कुतूहल वाटले.फ्रेश होऊन बाहेर आलो.श्री रमेश साळुंखेची भेट झाली.उद्याच्या ट्रेकिंगची चर्चा केली.. तिथल्या वेटरला व आचाऱ्याला  सूचना करुन तो निघून गेला.त्याचजवळ शेंबडी गाव होतं..बाहेर चांगलाच गारठा जाणवत होता.जर्किन व टोपी घालून सुध्दा गार लागत होते.त्यामुळे वेटरला  शेकोटी पेटवायला सांगितले.मग शेकोटी भोवती मातीत मस्तपैकी शेकत बसलो.रातकिड्यांचे किर्र किर्र कानावर येत होती.
    तद्नंतर बाहेरच शेकोटीच्या ऊबेत व मंदप्रकाशात मस्तपैकी जेवण केले.कोणाच्याच  मोबाईलला रेंज नव्हती.त्यामुळे टेंटमध्ये गप्पागोष्टी करत. उद्या वासोट्याला किल्ला बघायला किती चालावे लागेल.बोट कुठपर्यंत घेऊन जाणार याची मनाशी खूणगाठ बांधत.सर्वांना शुभ रात्री केले.





➖➖➖➖➖➖➖➖➖🖋️दिनांक १८ मे २०२०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड