Posts

Showing posts from July, 2021

छायाचित्र चारोळी निसर्ग

Image
निसर्गाचा आविष्कार गंमतीदार एक निष्पर्ण तर एक पालवीदार  एक पानगळीनं भुंड  तर एकावर फुलांची झुंबरं

छायाचित्र चारोळी नक्षीदार जाळी

Image
नक्षीदार बहारदार वेली वृक्षाच्या संगतीनं गुंतली जाळीदार नक्षीत सजली पाहूनी नयने हरखली 

छायाचित्र चारोळी पाऊस

Image
कुंद हवा गारेगार वारा झोंबू लागला अंगाशी पावसानं आज भिजवलं गारवा सजला मनाशी...

छायाचित्र चारोळी निसर्ग मैत्री

Image
बांधावरची स्नेहाची झाडं तृणमित्रांची वाट बघतात पाऊस वाऱ्याच्या सोबतीनं त्यांच्याशी मैत्री साकारतात.....

छायाचित्र चारोळी तलाव

Image
निळ्याभोर आभाळी दिसती  पिंजलेल्या कापसाचे ठिपके | जलतरंगावर नक्षी शोभते ताऱ्यांचे चमकती झुमके|

छायाचित्र चारोळी पाऊस

Image
हिरव्या भरजरी पर्णिकांत  वाजतात थेंबांचे पडघम प्रवाहतात ओढे ओहळ उमटते सूरांची सरगम|

काव्य पुष्प- २३९ कोसळधारा

Image
  कोसळधारा घोंगावत्या वेगवान वाऱ्याने काजळी ढग बेसुमार फुटले   आकसलेल्या आषाढ मेघाने  धोधाट्याने तुफान झोडपले  थुई थुई रिमझिम पाऊसधार मुसळधार कोसळधार झाली फुटले बांध पाण्याच्या ओझ्यानं शेती माती ताली वाहून गेली धुवाॅंधार पावसाने चौफेर  फटकेबाजी सुरू केली नदीनाली दुथडी भरून  ओसंडून वाहू लागली  नदीकाठची गावं झाली जलमय   ऊखडले रस्ते घरांच्या पडझडी संततधारेने  दळणवळण ठप्प  पडली झाडं कोसळल्या दरडी दिनांक २२ जुलै२०२१

अतिवृष्टीने मन भयभीत झालं काव्य पुष्प २३८

Image
    अतिवृष्टीने मन भयभीत झालं पावसाच्या आक्रंदाने  मन भयभीत झाले सैरावैरा पाण्याचे लोंढे  पायथ्याला भिडले | जीवनच भुईसपाट केले घरे जनावरं उध्दवस्त झाले काळाने झडप घातली संसार उघड्यावर पडले| अतिवृष्टीने पायथ्याच्या वस्त्या  दरडीखाली गडप झाल्या  सगळीकडे हाहाकार उडाला आसवांच्या आक्रोशधारा झाल्या |   शेतीभाती वाहून गेली सुन्न मनं बेचिराख घरं कालचा धुवांधार पाऊसाने काळजाला पडले चरं| पावसाचा हवाहवासा चेहरामोहरा  आता नकोसा वाटू लागला धुवाॅंधार  आकांडतांडव करून  हृदयाला मात्र तीव्र चटका दिला| हे विधात्या पाऊसराजा  आता रणकंदन थांबव  रौद्ररूपातील विदारक खेळ  आता तरी थांबव|

छायाचित्र चारोळी ढगफुटी

Image
कोसळणाऱ्या ढगफुटीने  काळजावर घाव घातला सगळीकडे हाहाकार उडाला कैकांचा संसार उघड्यावर पडला पावसाच्या हव्याश्या वाटणाऱ्या सरी   आता रणकंदन करु लागल्या आकांडतांडव करत धुवाॅंधारी कोसळधारी पाहता डोळ्यांतून अश्रूधारा वाहत्या झाल्या

काव्य पुष्प-२३७ गुरुपौर्णिमा

Image
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा.... सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!        गुरुपौर्णिमा आयुष्याच्या वळणावर  ज्यांनी आम्हा ज्ञान दिले मनाच्या सद्चिंतनासाठी  सद्गुणांचे विचार पेरले... विश्वास अन् उमेदीनं  आकांक्षांना बळ दिलं  पाठीवरती थाप टाकून  आम्हां लढायला शिकवलं .... अनुभवाची शिदोरी देवून  कलाविष्काराची संधी दिली विश्वासाने आत्मप्रेरणा देवून   नवनिर्मितीची प्रशंसा केली.... निसर्ग, मातापिता, ग्रंथ हेच गुरु सखा,वेळ अन् कामच महागुरु हेची आपले पथदर्शक सदगुरु  तयाला मनोभावे वंदन करु.... श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई दिनांक २२ जुलै२०२१

छायाचित्र चारोळी बेंदूर

Image
सण उत्सव मराठमोळा साजरा करुया बैलपोळा मिरवत नेहूया राऊळा सर्जाराजाला ओवाळा

काव्य पुष्प-२३६ बेंदूर सण

Image
सर्वांना बेंदूर (बैलपोळा) सणाच्या हार्दिक शुभेच्छा!             बेंदूर   सण आनंदाचा क्षण कृतज्ञतेचा आज हाय सण बेंदूर पशुधनाचा कृषी संस्कृतीच्या स्वस्तिकाचा मिरवणूकीत मान सर्जा राजाचा | बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त   करण्याचा बेंदूर सणं पूजा करून फेडती  तुझ्या उपकाराचं देनं| रंगबिरंगी शोभिवंत गोंडे झुली शेंब्या बाशिंग चाळ  शिंगांना चमकती बेगिड  गळ्यात वाजे घुंगरमाळ| सण आहे मराठमोळा  साजरा करा बैलपोळा मिरवत नेहूया राऊळा  सर्जाराजाला ओवाळा|

छायाचित्र चारोळी अन्नदात्री

Image
जलधारा वारा झेलत हात राबती भिजलेल्या मातीत नांगर हाकती शेतात कुळवणी चिखलणी करती लीलाई आज्जी माय घाम गाळती

छायाचित्र चारोळी ऋणानुबंध

Image
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई तुझ्या ऋणातून कसा होऊ सांग उतराई||

काव्य पुष्प - २३५ मेघांची वारी पंढरीची वारी

Image
        गजर हरीचा गजर भक्तीचा  मेघांची वारी,आषाढ सरी | पंढरीची वारी, माझी वारी  | नभ उतरले माथ्यावरी पांघरली दुलई ढगांनी धूसरली हिरवी छाया  खेळ होई पाठशिवणी|| सरीवर सर चळक वाढी झालं ओलं शिवार फण रेघोट्या ओढी कुळव नांगरी वावार || मेघांची आली वारी  झालं रिंगण भुईवरी  वात लहरी फेर धरी थेंब होई विणेकरी|| दिंडी आली मेघांची नाचती आषाढ सरी  साधना भाव-भक्तीची गजर करती जयहरी || आली दिंडी मेघांची बरसली थेंब थेंब धारं पीकं बहरली चैतन्याची पंढरी माझं शेतशिवारं|| भावभावनांचा वारु नाचे   मनगाभाऱ्याच्या रिंगणी आषाढ सरींनी उसळल्या  सुखलहरी हर्षाच्या अंगणी  || भक्तीची वारी घडते पंढरपुरी जय जय विठ्ठल जय हरी पावले थबकली आता घरी घरीच साजरी पंढरीची वारी|| श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई दिनांक  १८ जुलै २०२१

छायाचित्र चारोळी पंढरीची वारी

Image
भावभावनांचा वारु नाचे  मनगाभाऱ्याच्या रिंगणी आषाढ सरींनी उसळल्या  सुखलहरी हर्षाच्या अंगणी | भक्तीची वारी घडते पंढरपुरी जय जय विठ्ठल जय हरी पावले थबकली आता घरी  घरीच साजरी माझी वारी |

छायाचित्र चारोळी निसर्गाची जादूई किमया

Image
ऊनपावसाच्या  रंगपटात  निसर्गाने कुंचला फिरवला   सोनेरी स्पॉटलाईट उमटला  टेकडी नजिकच्या गावात || कोण रंगकर्मी कोण नेपथ्यकार  कोण अभिनेता कोण कलाकार  निसर्ग सौंदर्याचा कोण जादूगार    नेत्रदीपक छबीचा कोण किमयागार||

काव्य पुष्प -२३४ इंद्रधनुष्य

Image
      इंद्रधनुष्य आकार सातरंगी वर्णपटाचा  निसर्ग आहे किमयागार पिवळ्या प्रकाश किरणांचा  क्षणभर दिसे चमत्कार|| आषाढ मासातही रंगला  खेळ ऊनपावसाशी  इंद्रधनूचा गोफ विणला   कृष्णधवल अवकाशी ||  उमटली आभाळाच्या पाटीवर  मनमोहक सप्तरंगी कमान  वाऱ्यासंगे रिमझिम पावसाचे   गायन  वादन छान छान || साज तुषार किरणांचा  उभारला  आसमानी  नजराणा इंद्रधनूचा    भुरळ घालतो मनी||

छायाचित्र चारोळी इंद्रधनुष्य

Image
आषाढ मासातही रंगला खेळ ऊनपावसाचा  कृष्णधवल अंबरी  गोफ विणला इंद्रधनूचा||   साज तुषार किरणांचा  साकारला  आसमानी | नजराणा इंद्रधनूचा    भुरळ घालतो मनी||

छायाचित्र चारोळी भात लावणी

Image
केली नांगरणी पाट्याळणी  शेतात साठवलयं पाणी खाचरात सुरू चिखल मळणी व्हईल सुरू भात आवणी 

छायाचित्र चारोळी मेघांची दिंडी

Image
आली दिंडी मेघांची बरसली थेंब थेंब धारं पीकं वाढती भक्तीची माझी पंढरी शिवारं|| मेघांची आली वारी झालं रिंगण भुईवरी वात लहरी फेर धरी थेंब होईल विणेकरी||

छायाचित्र चारोळी समतल चर

Image
रणरणत्या उन्हात एकजुटीने जलमित्रांनी घाम गाळला जमिनी भिजल्या पावसाने जलसंचय चरात वाढला| समद्या रानी पाऊस बरसला ओलंचिंब केलं धरणीला जलप्रवाह झिरपला पाझरला समतल चरात साठा साचला|

छायाचित्र चारोळी धबधबा

Image
कोसळती उंच कड्यातून सफेद दुधाळ जलधारा धबधबे घेती लोटांगण  अन् तुषार उसळवी वारा|| उसळत्या जलधारा कड्याखाली शुभ्र फवारे वाऱ्या संग उंडारी गतीने उतरती पायथ्याखाली जलप्रपाताचे सौंदर्य दिसे भारी||

छायाचित्र चारोळी दुधाळ जलधारा

Image
तलाव ओसंडतो ओथंबूनी फेसाळतं जातं दुधाळ पाणी| मनमोहक निसर्ग दृश्य पाहूनी स्फुटतात ओठावर आनंद गाणी||

छायाचित्र चारोळी ध्यानस्थ भ्रमर

Image
भ्रमर निपचित शांत बसला   पर्णहीन फांदीच्या अग्रावर  पंख पसरुनी केले सुखासन तीट दिसे जणू हिरवाईवर

छायाचित्र चारोळी फुलपाखरु

Image
फुलपाखरू फुलासवे..... क्षणात हसते क्षणात रुसते क्षणात बसते क्षणात फिरते | कधी भिरभिरते कधी नाचते   कधी फेर धरुनी मुक्त बागडते|

काव्य पुष्प-२३३ मातीतले खेळ

Image
        खेळूया  गोट्या  गावाकडचा खेळ मजेमजेचा  बालपणीच्या सुख आनंदाचा काचेच्या गोट्या नापानापीचा नाहीतर हडकीने तानापाणीचा रिंगणात डाव मांडला  हंटरने मग नेम धरला  गोटीला ताड्या मारला  मग अचूक नेम बसला  मांडला डाव खेळाचा काची अथवा हडकीचा नजरेने गोटी टिपायचा   अख्खी ढाय जिंकायचा नाहीतर गलीत कचायचे  पगा दुगा तिगा ठरवायचे गुढघ्याची घोडी करायचे  नेम धरून गोटीला टिपायचे  गडी वाटून डाव खेळायचं लांबवर  पिंगवत नेहायचं हुकले की गलिकडं जायचं मूठ किंवा ढोपराने खुरटायचं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी  खेळण्याची फार मजाच बालपणी  खेळण्यापायी घरच्यांची बोलणी  तरी पुन्हा डाव पडायचा मैदानी श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई दि.९ जुलै २०२१

छायाचित्र चारोळी खेळूया गोट्या

Image
रिंगणात डाव मांडला मग नेम हंटरने धरला गोटीला ताड्या मारला मग अचूक नेम बसला नेम धरून गोटीला हणायचं लांबवर पिंगवत नेहायचं हुकलं की गलीकडं जायचं मूठ अथवा ढोपरानं खुरटायचं

काव्य पुष्प-२३२ विटी-दांडू

Image
       विटी-दांडू  खेळ हा मजेशीर मातीतला  रिंगण गलीत या खेळायला ओलीसुकीने डाव सुरू झाला  रिंगणातून दांडूने विट्टी कोला| विट्टी झेलण्या टपले खेळाडू  चिअर अप देती सगळेच भिडू  खेळ उधळायला लागले नडू  वादाचे कोलाहल लागले झडू | घेता घेता विट्टीचा झेल सुटला  एकबल होता डबल झाला  मग विट्टीला टोला लगावला विट्टीच्या मापाचा स्कोर झाला| दुसऱ्या भिडूने विट्टी कोलली धावत पळत जावून ती झेलली त्याची मग गलक्याने हुर्यो केली  गटाची एक खेळी संपत आली| प्रतिस्पर्ध्यांचा डाव सुरू झाला  विट्टी कोलता दांडू निसटला  मग दुसऱ्याने टोला हाणला  झेल टिपताना पाय घसरला |  विट्टीला दांडूने थोडं उसळवले  डबल करता करता टिबल झाले मग विट्टीला हवेत टोलवले  चपळाईने झेलबाद केले| असाच खेळ राहिला रंगत चिडाचिडीत होती झगडे  मध्यंतरी बसते खाऊची पंगत  भांडणं विसरण्याचे देती धडे | श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई  ९ जुलै २०२१  

छायाचित्र चारोळी खेळ मजेचे विटी-दांडू

Image
नजरेचा खेळ छान छान हळू उडवून टोला हाण रिंगणातून कोलवी विट्टी झेलून करा त्याची सुट्टी ...

छायाचित्र चारोळी भोवरा

Image
पैज लावली भवऱ्याच्या गतीची खात्री लय वेळ फिरण्याची  उमेद ईर्षा पैज जिंकण्याची उकळी फुटतेय हासण्याची ||

काव्य पुष्प-२३१ गरगर फिरतो भोवरा

Image
गरगर फिरतो भवरा शाळेच्या मधल्या वेळी भवरा फिरवायचा चंग  शाळकरी दोस्तांची खेळी गतीचा वेग बघण्यात दंग कर दोरीनं फिरवला भवरा  अलगद घेतला तळहातावर एकटक बघती गतीचा भवरा   फिरतोय तो गरागरा आरीवर पैज लावती भवऱ्याच्या गतीची  खात्री लय वेळ फिरण्याची उमेद इर्षा पैज जिंकण्याची  उकळी फुटतेय हासण्याची हौस आवडीच्या खेळाची  सर नाही मैदानी खेळाची आठवण येते बालपणीची   मातीतल्या जुन्या खेळाची   दि. ८ जुलै २०२१