बालपणीच्या आठवणी--ग्रामपंचायतीचा टीव्ही
बालपणीच्या आठवणी--ग्रामपंचायतीचा टीव्ही
💫🍂💫🍂💫🍂💫🍂💫🍂बालपणीच्या आठवणी
📺 ग्रामपंचायतीचा टीव्ही.📺
⭕➖〰️➖〰️➖〰️➖〰️ नक्की साल आठवत नाही.साधारणपणे सन १९७५ते १९८५ असावा पण कळायला लागलेल्या पोर सवदा वयात या टीव्हीच आकर्षक आणि कुतूहल होतं.. या छोट्या डब्यातील पडद्यावर जी माणसं दिसतात ती कुठून येतात. लाईटवर कशी काय टीव्ही चालते.आपल्याला कशी काय दिसतात .हे कोण तयार करत असतील.असे अनेक प्रश्न पडायचे.वयवाढत गेले की या प्रश्र्नांची उत्तरे मिळत गेली,
सापडली,वाचनात आली..
गावच्या बसस्थानकावरुन उजवीकडे वळलो की जुनी मराठी शाळा त्याच्या लगत शेतकरी सोसायटीचे गोडाऊन नंतर ग्रामपंचायतीची इमारत.नवीन मराठी शाळेजवळील दगडी बांधकामातील इमारत लक्ष वेधून घेते.दोन मजली इमारत.पुढे छोटेसे स्टेज,मध्यभागी दरवाजा व दोन्ही बाजूला दोन खिडक्या.
इमारतीच्या डाव्या खिडकीत कपाटावर टीव्ही. ठेवलेला असायचा.खिडकीचे कुलूप उघडले ,बटण दाबले की हमिंग संगीताच्या धूनवर दूरदर्शन लोगो दिसायचा..ब्लॅक अँड व्हाईट चित्र पहायला मिळायचे. शनिवारी सायंकाळी बऱ्यापैकी गर्दी असायची.कारण मराठी सिनेमा बघायला मिळायचा.मजा वाटायची.पिक्चर पहाताना मध्येच आडवी टाईज (जाहिराती) लागली की सगळ्यांची चुळबूळ व्हायची.काहींच्या जाहिराती तोंडपाठ.साबण,कोलगेट,निरमा पावडर, वाशिंग पावडर निरमा
निरमा वाॅशिंग पावडर निरमा
दुधसी सफेदी निरमासे आए
रंगिन कपडेही खिल खिल जाए
सबकी पसंद निरमा.....
पुढे बसायला मिळावं म्हणून लवकर जायचो.ग्रामपंचायत माझ्या घरापासून जवळच होती. गावातील हौशी माणसं आवर्जून बघायला यायची.. रविवारी हिंदी सिनेमा असायचा.गुरुवारी रात्री छायागीत कार्यक्रमात अर्धा तास गाणी ऐकायला मिळायची.
शेती विषयी आमची माती आमची माणसं, प्रतिभा आणि प्रतिमा,शरदाचं चांदणं,गजरा आणि कामगार विश्व इत्यादी कार्यक्रम अजूनही आठवतात.
दररोज सायंकाळी सातवाजता मराठी बातम्या आठ वाजता हिंदी बातम्या आणि नऊ वाजता इंग्रजी बातम्या असायच्या.श्री प्रदीप भिडे आजच्या ठळक बातम्या देत आहेत..त्यांची बातम्या सांगण्याची लकब, उच्चार आणि आवाजा वरून टीव्ही.पासून लांब केवळ आवाज ऐकू आला तरी हे प्रदीप भिडे बातम्या सांगत हे ओळखता यायचं.क्रिकेटची मॅच बघायला तर तुडुंब गर्दी व्हायची.
दिवसाची मॅच आॅफिसमध्ये बघायचो.कालवा , टाळ्या आणि गलका व्हायचा नुसता.काहीजण मॅच कोण जिंकणार याची पैजही लावायचे."व्यत्यय " नावाची पाटी किंवा रुकावटके लिए खेद है ❗ही पाटी कधी जातेय असं वाटायचं.
शासकीय योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीला शासनाने टीव्ही.दिलेले होते.. योजनांच्या प्रचारा बरोबरीने लोकांना माहिती मिळावी.लोकांची घटकाभर करमणूक व्हावी.घरबसल्या जगातील घडामोडींची चित्रफीत बघायला मिळावी.दूरदर्शन हे शिक्षण, करमणूक आणि योजनांची माहिती लोकांना व्हावी हे दहावी -बारावीत समजलं.
तेव्हा छतावर बसवलेला टीव्ही.अॅंटिना हे प्रतिष्ठेचे लक्षण होते.
सन १९८२ साली रंगीत टीव्ही बाजारात आला.रामानंद सागर यांची रामायण मालिका दर रविवारी टीव्ही वर सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यावर सगळेजण ज्यांच्या कडे घरी टीव्ही आहे.तिथे गर्दी करायचे. सडकेवर शुकशुकाट असायचा आबालवृद्ध मालिका बघायचे.त्यातले सीनचे थ्रील वाटायचे.कस काय शुट केले असेल.रामायण आणि महाभारत मालिकेने लोकांना गारुड केले होते.भारतीय लोकांच्या धार्मिकतेचा ठसा या दोन मालिकांनी उजळला होता.
रामायण आणि महाभारत मालिकेने टिव्ही घराघरात पोहचले..मी सुद्धा रामायण आणि महाभारत ,गोट्या, चिमणराव गुंड्याभाऊ व इतर मालिका शेजाऱ्यांकडे पाहिल्या आहेत... गोट्या मालिकेचे टायटल साँग आजही आठवते.
" बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात? ''
"बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर"
"लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर "
सन १९९३ साली पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला. घरोघरी टीव्ही आल्यावर सार्वजनिक ग्रामपंचायतीच्या टीव्हीची क्रेझ कमी होत गेली.. शेतकरी सोसायटीच्या गोडाऊन मध्येही झोपायला असल्यावर रात्रीच्या तमस,मुंगेरीलाल के हसीन सपने,आणि सॉर्ड आॅफ टीपू सुलतान व इतर काही मालिका बघितल्या आहेत.
हल्लीच्या मोबाईल जमान्यात ब्लॅक अँड व्हाईट,रंगीत, केबल ते डीएच सेवा अशी दूरदर्शनची सेवा बदलत गेली.
बालपणी ग्रामपंचायतीच्या टीव्हीवर रोज दोन-तीन तास कार्यक्रम बघायला मिळायचे .तर आज दिनरात्र पाहिजे त्या जगातील चॅनेलचा कार्यक्रम कोठेही लाईव्ह अथवा झालेला पाहू शकतो...ही तंत्रज्ञानाची अनमोल भेट आहे...
🍂⭕💫🍂💫⭕🍂💫⭕🍂💫⭕
दिनांक १० मे २०२०
जुन्या आठवणी
ReplyDelete