गावच्या आठवणी-अखंड हरिनाम सप्ताह
अखंड हरिनाम सप्ताह, ओझर्डे मकरसंक्रांती सणाच्या नंतर एके दिवशी भल्या पहाटे स्पिकरवर मराठी संतांची गोडवी गाणारी "या पंढरपुरात काय वाजतं गाजतं सोन्याचं बाशिंग गं लगीन देवाचं लागत."अशी अवीट गोडीची गाणी कानावर पडली की लक्षात यायचं आज पासून श्री पद्मावती देवीच्या मंदिरात गजर भक्तीचा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी "पारायण" सुरु होणार आहे.थोड्यावेळाने "बोला पुंडलीका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव….. तुकाराम…. पंढरीनाथ महाराज की जय..... माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय... गोपाल कृष्ण महाराज की जय...सोनेश्वर महाराज की जय...श्री पद्यावती आईसाहेब माता की जय.... गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त."असा नामघोषाचा पुकारा होतो.तदनंतर काकडा आरती सुरू होतोय सर्वांनी लवकर उपस्थित रहा असा माईकवरुन पुकारा सगळ्या गावाला कळायचा.मग वारकरी आणि भाविक मंडळी देवळात जात.तर महिला पूजेचे ताट घेवून काकड आरतीला जात.संतांच्या थोरवीच्या ओव्या गात असत.सकाळच्या शांत वातावरणात भक्तीरसातील गोडवा ऐकायला मिळत असे. आमच्या ओझर्डे गावच्या पारायण सोहळ्याला अंंदाजे ३५ वर्षे होत असतील.माघ माघन्यातील श्री गणेश जयंतीच्या
नंतर हरिनाम सप्ताह साजरा होतो. ग्रामदैवत श्री पद्यावती देवीच्या कृपाशिर्वादाने माघ शुद्ध पंचमी ते द्वादशी या काळात भागवत संप्रदायाचे आराध्य दैवत श्री संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सार्थ 'ज्ञानेश्वरी' ग्रंथाचे सामुदायिक वाचन दररोज ऐकायला मिळायचे.याच काळात रथसप्तमी सण उत्सव. सुर्यनारायणाचे महिलांचे उपवास. चराचरातील सर्वांना प्रकाश आणि नवचेतना देणारा ऊर्जासागर ' सूर्य 'म्हणजे शक्ती व कैवल्याचा महामेरू संतश्रेष्ठ माऊलींच्या भक्तीचा सुरेख संगम. गावातील जनसागराला वर्षभर आनंद आणि सुखासमाधानासाठी संचित ऊर्जा देणारा अखंड हरिनाम सप्ताह.सात दिवस मंदिरातील वातावरण भक्तीमय असतं. देवळात दीपमाळे समोर मंडप घातला जायचा.मंडप घालण्याचं काम जाधव साऊंड सिस्टीम,ओझर्डे यांच्याकडे.ते ही माऊलींची सेवा मनोभावे करत.ओढ्याच्या पवळीच्याबाजूला स्टेज असायचे.तिथं विठ्ठलरखुमाई व माऊली ज्ञानेश्वरांच्या प्रतिमा असायच्या.तर दीपमाळेजवळ पारायणाचे व्यासपीठ असायचे.ह.भ.प.महाराज व्यासपीठ चालक असायचे.ते सूचना देतील त्याप्रमाणे क्रमशः दिवसाचा कार्यक्रम होणार. दिवसातील हॅण्डवेल प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात. काकडआरती ने व्हायची,ग्रंथवाचन,भोजन,ग्रंथ वाचन, प्रवचन, हरिपाठ ,संकीर्तन व भजनजागर असे क्रमवार कार्यक्रम व्हायचे.शेवटच्या दिवशी दुपारी बारा वाजता काल्याचे किर्तन तदनंतर दिंडी सोहळा. सर्व गावाला व भाविकांना महाप्रसादाची सोय असायची. हरिनाम सप्ताहाच्या आदल्या दिवशी शाळेतील आठव व नववीच्या मुलांना दुपार नंतर मंदिरपरिसरातील स्वच्छता करण्यासाठी शिक्षक घेऊन जायचे.दिंडीच्या स्वागतासाठी प्रत्येक आळीत कमानी उभारल्या जात.रांगोळी काढली जायची.त्याचे परीक्षण होऊन बक्षिस मिळायचं.आम्ही आळीतील मुलं नवजीवन हॉटेल जवळ कळक,पडदे ,साड्या, पाने फुले, झालर व नारळाच्या झावळ्यांचा उपयोग करून कमान करायचो.मुली आखीवरेखीव रांगोळी काढायच्या.
लहानपणी हरिपाठ तोंडाने म्हणत इतरांचे अनुकरण करत ठेका धरायचो.कधीतरी आई बरोबर किर्तन ऐकायला जायचो. समाप्तीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दीपप्रकाशातील ग्रंथवाचन कार्यक्रमाला आवर्जून जायचो.संपूर्ण लाईट बंद करून मेणबत्ती,समई अथवा पणत्यांच्या शीतल व मिणमिणत्या प्रकाशात पाच ओवीचे वाचन करायचे.पसायदान म्हणायचे.शांत आणि मंद प्रकाशात वेगळाच माहोल तयार व्हायचा. शेवटच्या दिवशी प्रसिद्ध ह.भ.प. महाराजांचे किर्तन सांगता समारंभ होऊन. सायंकाळी चार वाजता दिंडी सोहळा सुरू व्हायचा.पालखीत माऊलींची प्रतिमा, टाळमृदुंगाच्या साथीने,"ग्यानबातुकाराम", "ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माउली तुकाराम" मुखाने गजर करत नाचत नाचत पुढे जायचं अभंगांचे सुस्वर गायन गात सोहळा पुढे पुढे जायचा.महिला भगिनीही डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन ओव्या गात,फेर धरत व झिम्माफुगड्या खेळत. गल्लोगल्ली उभारलेल्या कमानींचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून उद् घाटन होत असे.. मंदिरात दिंडी आली की आरती होऊन पसायदानाने सांगता समारंभ झाल्यावर महाप्रसादाची भली मोठी पंगत बसायची,गावातील तरुण मुले जेवण वाढपाचं काम करायचे.माईकवरुन पंगतीत कसं वाढप करावं याची सूचना केली जायची.अधूनमधून श्लोक म्हणत.तर महत्त्वाच्या सूचना करत.'सर्वांच्या पानावर अन्न वाढल्याशिवाय जेवायला सुरुवात करायची नाय'.कुठं काय वाढावे हे सांगत,मग,बोला पुंडलीका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय....माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय... गोपाल कृष्ण महाराज की जय… सोनेश्वर महाराज की जय....श्री पद्यावती आईसाहेब माता की जय.... गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त."... असा नामघोषाचा पुकारा करून,नमस्कार करून भोजनाचा आस्वाद पंगतीतले घ्यायचे.महाप्रसादाची चव न्यारीच वाटायची..या गावच्या कार्यासाठी वस्तु,धान्य व रोख रक्कम स्वरुपात देणगी रुपाने अनमोल मदत करणाऱ्या गावकऱ्यांना, अन्नदान करणाऱ्या भाविकांना साष्टांग नमस्कार.गावचा पारायण सोहळा घरचचं कार्य समजून संयोजनात दिवसरात्र सहकार्य करणाऱ्या अहोरात्र मेहनत घेणाऱ्या ज्ञात-अज्ञात समस्त गावकऱ्यांना मनस्वी साष्टांग दंडवत आणि राम राम!!!
दादा गाव ते गाव दुसरीकडे उपरेच वाटते
ReplyDelete