माझी भटकंती,माडगणी व कोंढावळे परिसर भाग क्र.७ ते १०

🌴माझी भटकंती⛰️🌴

      ✒️क्रमश:भाग सात
 🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️

   ✳️ दुर्गम आदिवासी पाडा माडगणी  भाग-१✳️
〰️➖〰️➖〰️➖〰️➖
धोम धरण पाणलोट क्षेत्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेली
माडगणी व कोंढावळे परिसरात  केलेली सामाजिक व शैक्षणिक पदभ्रमंती.






➿➿➿➿➿➿➿➿
           वाई तालुक्याच्या पश्चिमेला धोम धरणाच्या मध्यावर असलेल्या नवरा नवरी डोंगरावरील कमळगडाच्या जवळ कड्याच्या छोटेखानी माचीवर माडगणी वस्ती महादेव कोळी समाजाच्या आदिवासी पाडा म्हणून ओळख..आजही यावस्तीपर्यंत कोणतंही दुचाकी वाहन पोहचलेले नाही.जाण्यासाठी अवघड चढणाची पायवाट.
,टेकडीच्या माथ्यावरून , दरीच्या कडेकडेने गवत तुडवत जाणारी पायवाट.कधी सरपटणाऱ्या प्राण्यांची तर कधी जंगली श्वापदाची भीतीबाळगत जंगलवाटेने जावे लागते.वस्तीवर जायला मुख्य तीन वाटा आहेत. वासोळे गावातील २ किमीवर असणाऱ्या  तुपेवाडी प्राथमिक शाळेच्या पाठीमागील टेकडीवरून जाता येते. पायथ्याच्या कोंढावळे गावातील पाटील वाडी किंवा कोंढमाळाने  टेकडीवरील पायवाटेने कड्याखाली जावून सपाट पायवाटेने जाता येते.परतवडी गावातून डोंगर चढून दऱ्यापर्यत यायचे व गर्दझाडीतील पायवाटेने पोहोचतो.या वस्तीतील प्राथमिक शाळेचे पहिले गुरुजी  राजेन्द्र गायकवाड (आतल्या ते केंद्रप्रमुख आहेत.) बहुदा याच वाटेने  यायचे.
यावस्तीच्या पश्चिमेकडील रांगेच्या पायथ्याशी कोंढावळ्यात  सन१९८९ सालापासून  होतो.निसर्गातील गडकिल्ले, जंगलवाटा व डोंगररांगा चे कुतूहल वाटायचे....मी रहात असलेल्या पाटीलवाडीतील पांडुरंग बारगे यांचे पाहुणे-रावळे माडगणीचे होते.तेथील शिक्षक श्री सोमनाथ बांगर काही महिने माझ्या शाळेत व पाटीलवाडीत रहायला होते.त्यामुळे त्यांच्या जोडीने  व सपकाळ मामांसोबत जाण्याचे अनेकदा योग आले.
      वस्तीचे दैवत श्री जननी मातेच्या गोंधळ उत्सवी, एकदा लग्नानिमित्त, जनगणना करण्यासाठी धनगरवस्तीवर जाताना  गेलोय.कोंढावळे
शाळेची कमळगडला  सहल घेऊन . आमचे मित्र श्रीकांत मोरे सर यांनी माडगणीत वाशिवली केंद्राचे शिबीर आयोजित केले होते त्यावेळी शिक्षकमित्रांना घेवून गेलो होतो...
भाग क्रमांक ७

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
         
⛰️🌴 माझी भटकंती⛰️🌴

 ✒️क्रमश:भाग आठ
 🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️
   ✳️ कोंढावळे   परिसर भाग -१ ✳️
〰️➖〰️➖〰️➖〰️➖धोम धरण पाणलोट क्षेत्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेल्या माडगणी व कोंढावळे परिसरात  केलेली सामाजिक व शैक्षणिक पदभ्रमंती.
➕➖➕➖➕➖➕➖
        दिवाळीच्या सुट्टीनंतर आमच्या शाळेची सहल  कोंढावळे मुरा, जंगमवस्ती माडगणी परिसर भेट व वनभोजन अशी आयोजित केली  होती. मी, श्री भाऊराव साबळे व  हणमंत वाघ  असे तिघेजण व मुले  सहभागी होतो.शाळेत सकाळी आठ वाजता आलो मुलांची हजेरी घेतली,सुचना दिल्या.व मार्गस्थ व्हायला पाटीलवाडीत आलो.पांडूरंग  बारगेंच्या घरापासून टेकडीवर गेलो.गवताच्या वाटेतून मुलं चालतहोती .खिदळत ,एकामेकां बरोबर गप्पा टप्पा करत होती. कुठं आवाज आला, खुसपुसल की एकमेकांना सांगून सावध करीत....पक्ष्यांचा आवाज अचूक हेरत होती.  .सगळे. सरळ चढ   चढत चढत टोंगंवरून  दाऱ्या जवळ आलो.तिथं मुलांना लेमनच्या गोळ्या दिल्या .देवाला पानं वाहून दर्शन घेतले.मुलांशी  दऱ्याखोऱ्याविषयी गप्पा मारल्या.वरुन गाव कसं दिसतयं त्याची माहिती आदानप्रदान केली.थोडावेळ थांबून दाऱ्याकडील छोट्या वाटेने मुलांवर लक्षदेत माथ्यावरील पठारावर आलो.दाटझाडीतून रानवाटेने पालापाचोळा तुडवत आम्ही धनगरवस्तीकडे निघालो.. घनदाट सावलीतून जाताना उन्हं जाणवत नव्हती,साडेआठची वेळ पक्ष्यांचे कोलाहल ऐकत,त्यावर बोलत  एखाद माकाड दिसलकी त्याला खिजळवत मुले चालली होती. वनातील रानात मशागतीची कामे सुरू होती.गव्हाच्या पेरणीपूर्वीची तयारी सुरू होती ते दिसत होतं.. एखाद्या माहित नसलेल्या झाडांची वेलींची ओळख करून घेत.. कविता गात गात धनगर वस्तीत आलो.
    आमच्या सगळ्यांचा गलका ऐकून शेतात काम करणाऱ्या नागू ढेबेने कोण हायरं,कुठली रं पोरं ,   मुलंओरडली कोंढावळ्याची जंगल फिरायला आलोय..बरं बरं या या,  आम्ही घराजवळ गेलो... सगळीकडे दुधाचावास येत होतो.आम्हाला बसायला घोंगडं हथारलं व घरात आवाज दिला.कोंढावळ्याचं गुरुजी आल्यात पाणी आना अनं चार-पाच कप चहा करा.. आमच्याकडं बघून नागूबाबा म्हणाले .काळा पिणार का दुधाचा करायला सांगू...वाघ गुरुजी म्हणाले चहा नको मडक्यात ताक असेलतर द्या सगळ्यांना.नागूबाबा म्हणाले ,ते तर देतुय पण तुमी काय सारखं येताय का चहा प्यायला ?, साबळे सर म्हणाले ,बाबा त्यापेक्षा आमाला ताकच दया. पुढं जायचयं जंगमाच्या घरी व माडगणीला,मग  ते म्हणाले,असं करा जगमाकडून जावून या.तवर मी ताक करून ठेवतो. बाबांच्या हातावर मुठभर गोळ्या ठेवल्या. साबळे सरांनी सगळ्यांना लेमन गोळ्या व वाघ गुरुजींना चॉकलेट वाटल्यावर , सर्वांना चलो जंगम वस्ती  असे सांगितले..मग तिथून  पश्चिमेकडील जंगलातील पायवाटेने चालायला लागलो. पाचवीसातवीतल्या मुलामुलींना वाटा माहित होत्या.कारण ती आईबापांबरोबर फाटी (लाकडचीमोळी) आणायला येत असत.झाडीतल्या  वाटेने  मुले घोळक्याने पुढे जात होती..... वाटेतल्या झाडांचे विविधांगी मनमोहक आकार नजर वेधत होते.वेलीआणि जमीनीच्या जवळ आलेल्या बांधल्यावर चढून मुलांचा झुमकुळा व्हायचा.तर काहीजण त्यावर चढून फांदी हालवायचे. धनगरवस्तीवर पासून दीड एक किमीवर दुकटी घरं.एक डोईफोडे तर दुसरं जंगमांच.वनातल्या लालवाटेवरला पाचोळा तुडवत आम्ही एकदाचे जंगमांच्या घरी आलो. दाट झाडीत उतरत्या छपराचे कौलारू घर एकटच . घरास  वेगवेगळ्या झाडांचे कुंपण केल  होतं.आमच्यातीलच एका पुढे असलेल्या मुलाने आडवं लावलेलं मेसकाट काढलं व वाट मोकळी केली.सहज त्याला विचारले, हे असलं दार का केलंय? तो म्हणाला गुरुजी ,जंगलात जनावरांची भिती असते.राच्ची जनावर आत येवून नये म्हणून कुपाण केलंय..  मुलाचे उत्तर ऐकून समाधान वाटले.सगळी मुले घराजवळ गेली.तेवढ्यात माझ्या विद्यार्थ्याचे पालक सामोरे आले.राम राम झाला.इथं एकटच घर दिसतयं तुमच ,लाईटची सोय नाय.रात्रीचा सगळीकडे अंधार मग भिती नाहीका वाटत.ते म्हणाले,त्यात काय भ्यायचं सगळं बंद करायचं  ,गुरढोरभी घरातच ठेवायची. कुत्री राकोळी करतात.आणि आता सवय झालीय.तोवर शिक्षकांच्या मदतीने  मुलांनी देवदर्शन केले. पंगत बसवायला सुरुवात झाली.मी ही देवदर्शन केले.घराच्या जवळच दोन खाचरांच्या पलीकडे छोट्याशा केंजळाच्या फाद्यापासून बनविलेले शंकराचे मंदिर . मुलांनी  झाडाच्या सावलीत गोलाकार  बसून आणलेला डबा उघडला.मुलं जवळच्याला आपल्यातलं थोडं थोडं देत होती.सर्वांनी देवाचस्मरण करून "वदनि कवळ घेता श्र्लोक व बोला पुंडली गवरदेव हरिविठ्ठल.....श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय... तुकाराम महाराज की जय....सालपाई मातेकी जय...छत्रपती शिवाजी महाराज की जय."....असा नामघोष करून जेवायला सुरूवात केली.आम्हालाही काहींनी आणलेले पदार्थ दिले. .डब्यांचे निरीक्षण केलं तेव्हा जाणवलं बऱ्याच मुलांनी फडक्यात भाकरी आणलीय. सहज पंगतीकडे जेवतजेवत पाहिलं तर येसूर चटणी,बटाटा,भजी,बेसनपोळी व भाकरीहोती.क्वचित मुलांनी चपाती आणली होती.बाबांनी आम्हाला खायला गुळ शेंगदाणे व मध दिला.सगळ्या मुलांना गुळ-खोबरे दिले.त्यांचा निरोप घेऊन थोड्यावेळाने धनगरवस्तीवर आलो.

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भाग क्रमांक ८

       
      ⛰️🌴 माझी भटकंती⛰️🌴

      ✒️क्रमश:भाग नऊ
 🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️

   ✳️ कोंढावळे   परिसर भाग -२ 

जंगलवाटेने आम्ही धनगरवस्तीत आलो.बाबा वाटच बघत होते.बाबांनी मडक्यात ताक करून ठेवलं होतं.पाच सहा स्टीलच्या ग्लासाने सर्वांना ताक दिलं .आमाला मोठा ग्लास भरून दही - साखर  दिले.मी त्यात थोडंसं पाणी टाकून छोट्या काडीने हालवून लस्सी करण्याचा प्रयत्न केला.तिचाआस्वाद घेतला मुलांना आता भरभर चालण्याची सूचना  केली .अर्द्या तासांनी दऱ्यातून कड्याखाली आलो. झाडीतील गवताळ रानवाटेने जाताना लय भारी रानवाटेचे दृश्य दिसत होते. धनदाट झाडीत खाली प्रकाशकिरणेही पोचत नव्हती.आल्हाददायक थंडगार वातावरण होत.पुढे आल्यावर झाडी विरळ दिसत होती.कड्याच्या बाजूला शेळ्या मेंढ्या चारताना दिसले गुराखी हाळी देवून विचारायचे कुठं चाललाय,मुलं ओरडत सांगायची माडगणीला  निघालोय. . वाटेत एकाबाजूला कडा तर दुसरीकडे दरीचे दृश्य छान दिसत होतं..हिरवं पिवळ गवत वाऱ्यावर डुलत होतं . थोड्या वेळाने वस्तीत पोहोचलो. १५ ते २० घरांची वस्ती.घराच्या पुढेमागे झाडं ,साधी घरं,शेणामातीनं सारवलेल्या भिंती ,काहींच कौलारू  छप्पर . शेणाने सारवलेलं अंगण सगळ्या घरापुढे. उपलब्ध मोकळ्या जागेत परसबाग केलेली.  त्यात   शेंगभाज्यांचे वेल,मिरची ,वांगी व इतर भाज्या दिसत होत्या. मंदीर आणि वस्तीच्या मध्ये शाळा .वस्तीत घरवजा दोन मंदिर होती. वस्तीपासून पुढील बाजूच्या जननी मातेच्या मंदिरात गेलो.देवदर्शनानंतर मंदिराची व वस्तीची माहिती शंकर भगतानी करून दिली.वस्तीत फेरफटका मारून शाळेजवळ आलो.श्री सोमनाथ बांगर सरांशी गप्पा मारल्या.तेवढ्यात एका घरातून आलेला ब्लॅक चहा घेतला.पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येत होती.पाखरे घरट्याकडे येत होती.ठरविलेली सगळी ठिकाणं बघितली .परत जाण्यासाठी   सर्व मुलांना  सुचना दिल्या.वर्गवार उपस्थित घेतली.व परतीचा प्रवास आलेल्या वाटेने  सुरू झाला.... .. सायंकाळच्या दृश्यांना मनात साठवत बोलत बोलत माचीचीवाट-रानवाट-दरा व मुरा असं करत करत शाळेत पोहोचलो. मुलांची हजेरी घेऊन आज फिरलेल्या भागावर माहिती लिहून आणा.हा अभ्यास दिला व उद्या  परिसरभेट हा निबंध घेणार आहे......अशी सूूचना केली. निसर्ग भेटीचा आनंद मिळाल्याचे वेगळंच समाधान वाटले.
             ♻️मध्यंतर♻️
दिनांक १९ एप्रिल २०२०
क्रमशः भाग क्रमांक--९
✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे    वाई

https://raviprem.blogspot.com 


               🌴माझी भटकंती⛰️🌴

                 ✒️क्रमश:भाग दहा

        🏝️⛵🛶⛵🛶⛰️🌴⛰️

   ✳️ दुर्गम आदिवासी पाडा माडगणी भाग--२✳️
〰️➖〰️➖〰️➖〰️➖
धोम धरण पाणलोट क्षेत्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेली
माडगणी परिसरातील  सामाजिक व शैक्षणिक पदभ्रमंती.

            अलिकडे १नोव्हेंबर २०१८ रोजी गटशिक्षणाधिकारी श्री कमलाकांत म्हेत्रे साहेब,केंद्रप्रमुख श्री राजेन्द्र गायकवाड,श्री विठ्ठल माने , श्री भास्कर पोतदार व तिथे कोरेगांवातून ऑनलाईन प्रशासकीय बदलीने आलेले श्री सचिन जाधव यांच्या समवेत तुपेवाडीशाळेपाठीमागील टेकडीवरून मजलदरमजल करत  निघालो.. जाता जाता तिथल्या एका घरातून  सचिनने काठ्या आणून गायकवाड सर,माने सर मी अशा तिघांना जातायेता गरज भासेल म्हणून दिल्या.. पुढे गेल्यावर एक वृद्धा डोक्यावर ओझे घेऊन खाली उतरत होती, सचिन सरांना पाहून ती म्हणाली, गुरुजी आज लय पावणं घेवून निघालाय वरती.... सर म्हणाले ,शाळा बघायला आलेत.यवढ्या उन्हाचं होय निघालाय..?.ही तीची प्रतिक्रिया .बैजवार चाला....
 काठीच्यासाथीने  डोंगर  चढणे  सुरू होते.. अवघड वाट व संपूर्ण चढण असल्याने धाप लागत होती.वय वाढल्याची जाणीव झाली....५० ओलांडलेली तिघेजण  असल्याने आमच्या चालण्यात मंद गती होती.भास्कर,सचिन आणि साहेब नेटाने अवघड वाटेने पटापट टप्पे उरकत होते. पुढे गेल्यावर  थोडा वेळ थांबून सचिन सरांनी आणलेले तहानलाडू व सफरचंदाचा आस्वाद घेत विलोभनीय दिसणाऱ्या डोंगररांगा ,धोम धरण जलाशय,झाडीत लपलेला कमळगड, रायरेश्वर,केंजळगड,पांडवगड यांचे अवलोकन करत, गप्पा मारत "सिनला '" कॅमेऱ्यात टिपत फोटोग्राफी करत होतो..सगळ्यांनी भल्यामोठ्या दगडावर उभे राहून विविध पोजमध्ये फोटो काढले.आकाशाकडे हात करून दृश्यांना नजरेत व मोबाईल मध्ये कैद करत होतो.. पुढे  झऱ्याला बांध घालून लोखंडी नळ्यांनी पिण्याचे पाणी सायपन पध्दतीने  खाली कसं जातयजातंय  माहिती गायकवाड सरांनी दिली....कड्याला वळसा घालून धबधब्याच्या जवळ आलो.पाणी संथपणे वहात होते.अगदी वाहणाऱ्या पाण्याचा जवळ बसून फोटोग्राफी केली.सेल्फि काढल्या... जाताना  जननी मातेच्या देवळाजवळ पोहोचलो.झाडाखाली निवांत बसलो... तेथून शाळेत पोहोचलो.आमचं स्वागत ग्रामस्थ व श्री सचिन जाधव आणि  श्री उमेश हिंगमिरे या शिक्षकांनी केले..... काहींना माझं नाव  माहितझाल्यावर , कोंढावळ्याला पयलं होताना असं एकानं  विचारलं, लगेचच एकजण म्हणाला,आता बी तिथंच परत आल्यात......सरांनी पालकांबरोबर मुलांच्या गुणवत्तेची पडताळणी केली.शालेय अडचणींवर चर्चा केली. टॅबचा वापर मुलं करतायत हे पाहून समाधान व्यक्त केलं. वाडीला रस्ता नाही,पण तंत्रज्ञान पोहचलय,यांचा उपयोग जगाशी संपर्क करण्यासाठी करा.,असे मत व्यक्त केले. पाहुणचार घेऊन परत माघारी फिरलो.
      इथल्या लोकांच्या जीवनमान कसं बिकट आहे.
  आज एकदिवसासाठी भटकंतीचा  आनंद  मला मिळावा म्हणून 
 या वाटेने आलो.आपणाला आनंद होतो.निसर्गाच्या सानिध्यात आज १०० टक्के शुद्ध हवा,पाणी व वातावरणात वावरलो . विरंगुळा म्हणून फिरायला आलो.पण या जंगलवाटा त्यांच्या जीवनाचा हमरस्ताच जणू..... माथा ते पायथा चढ उतार करताना त्यांना आनंद वाटेत असेल ! मुलांना शिकण्यासाठी, लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी वकामासाठी पायथ्याला आल्याशिवाय पर्याय नाही.येताजाता धावपळ,सर्व सामान डोक्यावर घेवून चढ-उतार. उदरनिर्वाहाची माफक साधनं.थोडी रानशेती, जनावर पाळणं,सिझनला आंबुळक्या ,करवंद व इतर फळे विकणे, शिकेकाई हिरडा बेहडा गोळा करणे,मध गोळा करणे इत्यादी व्यवसाय करुन त्यावर गुजराण करायची..स्त्रियांना तर सतत कष्टाच  काम सकाळी लवकर उठून डोक्यावर लाकडाचा भारा  घेवून  पायथ्याच्या गावात जाऊन मोळ्या विकायच्या.........त्यापैशातून वाणसामानाची खरेदी करून परत डोंगरातून चढत यायचे........
      येथील लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने स्वंयसेवी संस्थेकडून शाळेला व गावाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय.सह्याद्रीच्या डोंगर कपारीत राहणाऱ्या आपल्याच बांधवांची संवेदन जाणवूया......स्वखुशीने सहकार्य वृत्ती ठेवूया....

               
       
🏝️🌴🏝️🌴🏝️🌴🏝️
क्रमशः भाग.१०
लेखन दिनांक १९ एप्रिल २०२०
✒️श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे    वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड