माझी भटकंती रायगड शिवजयंती भाग क्रमांक.१७ते १९

               ⛰️माझी भटकंती⛰️
                              क्रमशः भाग सतरावा

                         🚩🔥शिवज्योत रायगड🔥








माझी भटकंती⛰️

 क्रमशः भाग क्रमांक-१७

🚩🔥शिवज्योत रायगड

प्रौढ प्रताप पुरंदर . . . क्षत्रीय कुलावंतस् . . . सिंहासनाधिश्वर . . . . महाराजाधिराज श्री छत्रपती

 शिवाजी महाराज!!! की जय...........

  असा जयघोष ऐकला की चेतना आणि स्फुर्ती मिळते. गौरवशाली इतिहासातील अनेक प्रसंग नजरेसमोर येतात.

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

           🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे जाणते राजे, युगपुरुष, लोककल्याणकारी राजे,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी होतेय.......

  प्रथम महापराक्रमी,अष्टावधानी व अष्टपैलू , स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना  मानाचा मुजरा व त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻

  शिवजयंती शोभायात्रा,गडकिल्ल्यां वरून शिवज्योत आणणे.लोकशाहीरांचे पोवाडे व व्याख्याने ,मर्दुमूकीचे खेळ आयोजित करून शौर्यगाथेच्या विविधांगी कार्यक्रमाने साजरी व्हायची... परंतु  सध्या लॉकडाऊन चा काळ असल्याने घरातच शिवजयंती साजरी करुया  चरित्र वाचूया व  वैचारिक विचार अमलात आणूया......

         🚩 शिवराय मनामनात....

शिवजयंती घराघरात...



  ⛰️ शिवजयंती उत्सव शिवरायांच्या महापराक्रमाचे  साक्षीदार असणाऱ्या गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत प्रज्वलित करून धावत-पळत आणण्याचा साहसी मर्दानी इव्हेंटनेही ( उपक्रम) साजरा केला जातो... गावोगावची तरुणमंडळे आपापल्या परिसरातील गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत आणतात...

     🔥श्री पद्मावती मित्र मंडळ व कलाविष्कार क्रिकेट क्लबचे शिवभक्त साहसवीरांनी  छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड येथून ज्योत आणल्याचे स्मरणात आले.चला आज शिवजयंती दिनी  छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आठवणींना उजाळा देवूया....

        नियोजनाप्रमाणे मंडळाचे  उत्साही ३५ते ४०शिवभक्त  मावळे( कार्यकर्ते,धावपटू व खेळाडू) रात्री साठी शिदोरी घेऊन दुपारी एक वाजता सजविलेल्या व लाऊड स्पिकर लावलेल्या टेंम्पोत बसले.दोघांनी दुचाकी घेतल्या.महाराष्ट्राची आनबाणशान सर्वांचा अभिमान 🚩भगवा ध्वज, ढोलताशा, ज्योत

( आमच्या मंडळाचे धडाडाचे शिवभक्त श्री जयेंद्र पिसाळ यांनी स्वत:बनविली होती.) गुलालाचे पोते,तेलाची बुधली व तेलाचा डबा, कापडाच्या चुंबळी, पिण्याचे पाणी ,शेवचिवडा चिरमुरे (नाष्टा)व प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य घेवून निघालो.शिवाजी महाराजांचा नाम जयघोष करीत.टेम्पोंच्या टपावरील कार्यकर्ते ढोलताशा वाजवत.शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सुप्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आणि कंपनीच्या पहाडी आवाजातील पोवाड्याची कॅसेट लावून; वातावरण निर्मिती झाली होती.आम्ही ओझर्डे येथील पिंपळाच्या झाडाजवळील गुरुकृपा किराणा दुकानापासून जायला सुरूवात केली.वाई, पसरणी घाट, पांचगणी, महाबळेश्वर करत रडतोंडी(फिट्स झेरॉल्ड) घाट उतरून वाडाकुंभरोशी प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.वाटेत शिवज्योत घेऊन येणारे मंडळ दिसले की छत्रपती शिवाजी महाराज की....जय अशी घोषणा करून त्यांचा उत्साह वाढवायचो...ते ही प्रतिसाद द्यायचे.....



              ⛰️माझी भटकंती⛰️

             क्रमशः भाग अठरावा



      🚩🔥शिवज्योत रायगड🔥

अनेक शिवभक्तांची मांदियाळी आम्हाला प्रतापगड व रायगडाकडे कूच करताना दिसत होती.प्रतापगडाच्या पायथ्याला आम्ही थांबून "रसना" व लिंबू सरबत आवडीनुसार  घेतले.

तेथून पुढचा प्रवास आंबेनळी घाटातून सुरू झाला.एका बाजूला प्रतापगडाचा कडा तर दुसरीकडे दरी.तिथल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पहात  येतानाजाताना गाड्या दिसल्याकी जयघोष करीत असू.घाटमाथ्यावरून आंबेनळी घाटातलं निसर्ग सौंदर्य बघत बघत पोलादपूरला आलो.गाडी पेट्रोल पंपावर थांबवली. मुंबई-गोवा हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेतले.

जयजयकार घुमविला.तदनंतर टेम्पोंत व दुचाकीत इंधन भरले.सर्वांनी चहा घेतला.महाड रायगडाकडे मार्गस्थ झालो.......

       सायंकाळचे पाच वाजले होते.

रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.गरजेचे साहित्य बरोबर घेतले.काहींनी भगवेध्वज बरोबर घेतले.महादरवाजातून पायऱ्या चढत गडावर निघालो. गड उतरताना प्रज्वलित शिवज्योत घेऊन जाताना शिवभक्त दिसले की छत्रपती शिवाजी महाराज की जय....अशी गर्जना अधूनमधून ऐकायला मिळायची.. गड चढायला हुरुप यायचा.छत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजधानी गडभूमीवर मी प्रथम पाऊल  टाकले.मी खाली वाकून पवित्र मातीला माथा टेकवून वंदन केले. साष्टांग दंडवत घातले. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.

महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.पाच-दहा मिनिटे तिथेच शांतपणे सर्वजण बसलो. तदनंतर श्री जगदेश्वरमंदीर व श्री शिरकाई मंदिर परिसरात जावून दर्शन घेतले.

ज्योतीचे पूजन केले.ज्योत प्रज्वलित करून गड उतरायला सुरुवात केली. अंधार पडायला सुरुवात झाल्याने इतर ठिकाणी न जाता धावत पळत चालत ज्योत घेऊन गड उतरत उतरत  खाली आलो.ज्योत घेण्याचे नियोजन सर्वांना अध्यक्षांनी सांगितले.दुचाकीवर पुढे ज्याचा नंबर आहे ती मुलं एकाकडे बुधली व चुंबळी देवून पहिले सहाजणांचे पथक ज्योत घेऊन मार्गस्थ झाले.

बाकीच्यांनी शेवचिवडालाह्याचा नाष्टा गाडीतच सुरू केला. दरम्यान दोन्ही गाड्या धावपटू बदलून परत पुढे गेल्या. पाऊण तासाने आमची व शिवज्योतीची गाठ पडली.नवीन गडी ज्योत घेण्यासाठी पुढे सरसावले.नव्या दमाच्या धावपटूंच्या जोरावर शिवज्योत पुढे पुढे निघाली.काहीजण तीन तीन किमी ,पाच किमी मायलेज ज्योत घेऊन पळाले होते.कुणाला लगेच दम लागला ,कुणाला चटका बसला ,कुणाच्या हातावर गरम तेल सांडलं, याच्या गप्पागोष्टी गाडीत चालल्याहोत्या.पोलादपूरच्या अलिकडे सर्वांनी एका धाब्यावर थांबून जेवण केले.  रात्रभर प्रवास होणार आहे.त्यामुळे जागसुद डुलकी घ्या. दुचाकी वाल्यांनी काळजी घ्या.... अशा सूचना मिळाल्या



  ⛰️माझी भटकंती⛰️

         क्रमशः भाग क्रमांक-१९



     🚩🔥शिवज्योत रायगड🔥🚩



   पोलादपूर हून आंबेनळीघाटातून अवघड चढण चढत ज्योतपटू धावत चालत पुढे पुढे जात होता.त्याचा दमसा संपत आला की नवीन गडी ज्योत घेऊन पुढे जात होते.दुचाकीच्या  व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात ज्योतपटू पुढे पुढे जात.कुंभरोशी फाट्यावर मध्यरात्र झाली.आपल्या जिल्ह्यात आलो होतो.रस्त्याने इतरही मंडळाच्या ज्योती दिसत होत्या.रडतोंडी घाटातून पुढे निघालो होतो.

गाडीवर उमेश जाधव  व त्याचे मित्र होते.ज्योत घेऊन मी धावत पळत होतो. खाली बघून पळा नाही तर पडाल गुरुजी,असं उमेश ओरडला.

माझं लक्ष खाली नव्हत अन् अचानक माझा उजवा पाय एका  दगडाला जोरात लागला.

चांगलाच ठेचकाळलो.भर रस्त्यात हनुमानासारखा पवित्रा घेतला.तोल जाऊन पडणार एवढ्यात उमेशने जवळ येवून सावरले.एक मोठा दगड रस्त्यात मधीच पडला होता.कुणीतरी गाडीला उटीसाठी वापरून तसाच राहीला होता.त्याने दगड बाजूला केला.ज्योत स्वताकडे घेतली व धावत पुढे निघाला.उमेशला ज्योत मिरवणूकची फार आवड होती. अनेकदा तो अशा मोहिमेवर सर्वात पुढे असायचा.ज्योत हातात घेतली की पाचसहा किमी अंतर सहज तोडणारच.एके वर्षी तर आम्ही सहा जणांनी अजिंक्यताऱ्यावरून ज्योत आणली तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर त्यानेच तोडले होते.

       मजलदरमजल करत आम्ही सकाळी पाचगणीत पोहोचलो.पसरणी घाटाने आता खरी सुरूवात झाली मिरवणूकीची.ढोलताशा वाजवत, छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी.अशा घोषणा करत.लाउड स्पिकरला पोवाडा लावून निघालो.पांचगणी व वाईत आमच्या शिवज्योतीचे झाले.वाईस्टॅंडवर चहापाणी केले.एकमेकांना गुलाल लावून रंगविले.तसेच गावाकडे वाजत-गाजत निघालो.अर्ध्यापाऊण तासात गावात येतोय,असा फोन करून निरोप सांगितला.तदनंतर  गावच्या पुलावरून स्टॅंडवर येताच शिवज्योतीचे फटाके वाजवून स्वागत केले.ज्योतपटूंचे औक्षण केले. वाजत-गाजत गावातून मिरवणूक निघाली.मिरवणूकीत नंतर स्टॅंडवरील मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले.प्रज्वलित ज्योत समोरचं तेवत ठेवली.सहभागी शिवभक्तांचे ,

ज्योतपटूंचे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.शिवजयंती  शिवज्योत मिरवणूक  काढून साजरी केली होती.🚩🚩?








श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक २५ एप्रिल २०२०

Comments

  1. छान कार्यक्रम शिवज्योत सोहळा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड