माझी भटकंती धोमधरण रिंग रोड भाग क्र.२८ ते २९



⛰️            माझी भटकंती⛰️

                 क्रमशः भाग क्रमांक-२८

   🏝️धोमधरण रिंग रोड 🏝️

     वाईतील एक दिवसाची भटकंती साठी धोम धरण रिंगरोड,जांभळी बंधारा व बलकवडी धरण तेथील निसर्ग रम्य परिसर  पहात एक दिवसाची छान टू व्हीलर वर सहल होते.इंग्रजीतल्या  M आणि V या आकारात वाईतील गणपती मंदिरापासून गंगापुरी किंवा सिध्दनाथवाडी मार्गे एका बाजूने जावून दुसऱ्या बाजूने येवून पुन्हा तिथेच येवू शकतो.एक रफेट पूर्ण होते.

       वाई पासून दोन किलोमीटर अंतरावरील मेणवली येथील मेणेश्वर घाट,नाना फडणवीस यांचा वाडा व गाव ,अनेक मराठी हिंदी सिनेमातील शुटिंग पाईंटचे गाव म्हणूनलौकिकता मिळवली आहे.नानाफडणीस वाड्यासमोर प्रचंड मोठे झाड आहे.त्यांचे खोड हत्तीच्या पायासारखे दिसते.घाट आणि नदीचे दृश्य झाडाच्या कट्टयावरुन विलोभनीय दिसते.घाट आणि गर्दझाडीतून काटकोनात वाहणारी कृष्णा नदी पाहून मन प्रसन्न होते.संपूर्ण बांधीव घाट आहे.घंटेचा नाद व मेणेश्वराचे दर्शन घेऊन पुढे नाना फडणवीस यांची ऐतिहासिक वास्तू पहाण्यासारखी आहे.भोगांव येथील नदीकाठची वामन पंडित यांची समाधी पाहता येते.धोम येथील श्री नरसिंह मंदिर, विशिष्ट रचना असलेली पुष्करणी लक्ष वेधून घेते.गायमुख याठिकाणी नदीचे जुने पात्र आहे. मंदिरे पाहून धरणाच्या भिंती शेजारुन आंबे ओळ पहात आपण सडकेवर येतो.रस्त्याच्या एका बाजूने जलाशय व दुसऱ्या बाजूने पांडवगड ,अभेपुरी येथे विसावलेल्या डोंगर शाखेवरील केंजळगड व रायरेश्वराच्या डोंगररांगेच्या पायथ्याने  विहंगम दृश्ये पहात पुढे सरकतो.

डोंगर पायथ्याच्या या लोकेशनवर अनेक चित्रपटातील सिन चित्रीत केले आहेत. जवळपास असणारी शिंदेवाडी,

उंबरवाडी,वेलंग करत आपण आसरे गावात पोहचतो.

      पानस आसरे जवळील जलसेतू (बोगदा )

जमिनीखालून डोंगराच्या पलीकडे धरणाचं पाणी नेहलं आहे.उळुंब-बलकवडी धरणाचे पाणी या बोगद्यातून खंडाळा व फलटण भागात जाते.हेही पहाण्यासारखं ठिकाण, तेथून पुढे रेणावळे मंदिर पाहून खावली येथील प्रसिद्ध नवलाई-खावलाई मंदिराजवळ आपण पोहचतो.खावलीतील रस्ता नागमोडी वळणाचा आहे. मंदिराजवळील परिसरातत एके ठिकाणी चहूबाजूंनी पाणी व मध्येच शेती व दगडी कमान आहे.तिथली शेती धरण भरल्यानंतर बेटासाठी दिसते. अप्रतिम लोकेशन कमंडलू (वळकीचे)नदीचा रिव्हर व्ह्यू धरणाच्या मधील नवरानवरी डोंगर, केंजळगड दिसतो. तिथून पुढे ओहळी रायरेश्वरला जाणारा घाटरस्ता आहे. तेथून पुढे आपणाला वडवली, जांभळी पूल येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी सवंगड्यासह मावळ्यांसह स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर दिसतो.येथील अवघड डोंगर वाटेने गायदऱ्यावर जाता येते.जांभळी पासून पुढं पाराटवस्तीजवळ जांभळी बंधारा आहे.

क्रमशः


⛰️माझी भटकंती⛰️

                 क्रमशः भाग क्रमांक-२९

   🏝️धोमधरण रिंग रोड 

         आम्ही जांभळी बंधारा पाहून पुन्हा माघारी जांभळी पुलावर आलो.पूल ओलांडून वासोळ्याकडे मार्गस्थ झालो. वाटेतच वाशिवलीचे रामेश्वर आणि ग्रामदैवत मुकाई मंदिर रस्त्यालगत आहे.कोंढावळे फाट्यावरुन आत गेल्यावर श्री सालपाई मातेचे मंदिर आहे.शूरवीर संभाजी कावजी कोंढाळकर यांचे गाव. मंदिराजवळ छोटेखानी पुतळा असून.नवीन पुतळ्याचे बांधकाम सुरू आहे.फाट्याजवळील एक वाट दुर्गम भागातील माडगणी पाड्यावर जाते.

कोंढावळे फाट्यावरून पुढं वासोळे तुपेवाडी येथे जाता येते ,तुपेवाडी येथून पर्यटकांची हौस भागविणारा कमळगड आणि माडगणीला जाता येते.वासोळ्यावरुन मरीआई

मंदिर,भिवडी करत आपण जल फुगवट्याच्या मध्यावर येतो.तिथून जलाशयाचे दृश्य विलोभनीय दिसते.समोर धरणभिंत आणि दोन्ही कडे जलाशयाचा फुगवटा. त्यापलीकडे  डोंगररांगा,आकोशी फाटा,आसगांव करून कृष्णेच्या खोऱ्यात प्रवेशतो.शूरवीर जिवा महाला यांचे कोंढवली गाव, परतवडी येथून कमळगडला जाणारी वाट.नांदगणे व तेथून पुढे उळुंब बलकवडी धरणाकडे जाता येते.तो सरळ पुढे रस्ता जोरवाडीकडे जातो. उळुंब पुलावरून अलिकडे आल्यावर गोळेवाडी रस्त्यावर बलकवडी धरण आहे. त्याच रस्त्याने पुढे डोंगर चढून क्षेत्रमहाबळेश्वरलाही डोंगराच्यावाटेने जाता येते.परत माघारी वयगाव,दह्याट, बोरगावला येतो. पश्र्चिम भागातील मुलांच्या माध्यमिक शिक्षणाच्या सोईसाठी बोरगाव व चिखली येथे स्थानिक संस्थांची हायस्कूल्स आहेत. धावली,मालतपूर,

मोर्जिवाडा करत चिखली फाट्यावर येतो.मुगांव, दसवडी, न्हाळेवाडी जवळ बोटिंग करता येते.या लोकेशनवर अनेक हिंदी व मराठी सिनेमातील दृश्यांचे चित्रण झाले आहे. परिसरातील अनेकठिकाणं शुटिंग पाईंट आहेत.हौशी पर्यटक बोटिंग साठी येथे आवर्जून येतात.याच परिसरात पर्यटनास चालना देण्यासाठी विविध कृषीअॅग्रो फार्म हाउस आहेत.ग्रामीण संस्कृतीची जोपासना व ओळख वृद्धींगत व्हावी यासाठी विविध इव्हेंट आयोजित केले जातात. बोरीव गावाजवळील  धरणाच्या भिंतीजवळ येतो.व्याहळी,एकसर करत सिदधनाथवाडीतून गणपती मंदिराजवळ येतो.या रिंगरोडने अनेकदा मित्रांसोबत,फॅमिली बरोबर गेलो आहे.

या रिंगरोडच्या बाजूने शाळा गावची मंदिरे आणि झाडीतली गावं लक्ष वेधतात.दिवसा,रात्री तिन्ही हंगामात गेलोय.पण वर्षा ऋतूत अथवा सप्टेंबर ते डिसेंबर याकाळातही एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात फिरायला अप्रतिम रिंगरोड पॉईंट आहे.रिंगरोडचे अंतर वाईतून येवून जावून ७० ते ८० किमी भरते.

दिनांक ३० एप्रिल २०२०



दिनांक ३० एप्रिल २०२०

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड