गावकडची रस्सा पार्टी
गावाकडची रस्सा पार्टी
🔰✒️ २५ ते ३० वर्षाच्या पाठीमागे धाब्यावर,हाॅटेलात किंवा भोजनालयात मित्रांसमवेत जेवायला जाणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे.
जो जेवायला घालणार आहे अथवा देणारा आहे.तो सांगेल तिथेच जायलाच लागायचे... आमच्या ओझर्डे गावापासून ३ किमीवर जोशी विहीर येथून पुणे_ बंगळूर हावये गेला आहे.त्याकाळी वेळेपासून पाचवड पर्यत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच हाॅटेल्स होती.आज वेळ्यापासून सातारा पर्यंत किमान शंभरपेक्षा जास्त संख्या होईल.
तर अन्नदाता सांगेल तिथेच जायलाच लागे...नाही गेलो तर पेनेल्टी द्यावी लागायची... जेवण झाल्यावर ,खुशीने मनाने तृप्तीने ढेकर दिल्यावर त्याचे आभार मानावे लागायचे .थॅक्यू..
परंतु सगळ्यांना नेहमीच पार्टीसाठी हाँटेलमध्ये जायला परवडतय होय.त्यापेक्षा गावात केलेली रस्सा पार्टी एकदम झ्याक आन् लय भारी रस्सा,सुक्क अथवा बिर्याणी रस्सा केला की झालं काम...
पार्टी करायला कारण आणि मैत्री केंव्हा आणि कधी जुळेल याचा काय नेम नाय.......
जेवण बनविण्यासाठी जागा एखाद्या मित्रांचे परड्यातील छपार,रानातली झोपडी अथवा घर..या उत्तम ठिकाणा पैकी एक अगोदरच ठरवून ठेवायचं......
रस्सा पार्ट्या विशेषतः मांसाहारीच होत.
🍲सायकलीच्या टायरचा टेंबा करुन रात्रीचं वढ्याला मासे ,खेकडे पकडून तिथचं वढ्यात कालवण करुन खाण्यात जी मजा हाय ना ती हल्लीच्या शिवारभेटीच्या निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या हाॅटेलमध्ये कितीही वेळा जेवण केले तरी येणार नाय....
कारण जेवण आपण आणि आपल्या मित्रांनी बनविलेले असते.
पार्टीचा बेत ठरला की गावातल्या ठरलेल्या दुकानातून मसाल्याचे साहित्य खरेदीकरणे. दुकानदाराला फक्त किती जणं आहे यवढ सांगितलं की पुरेसा मसाला साहित्य देणारच.गावरान कोंबडा हुडकणे . गाडी किंवा सायकलवर भुईंज अथवा वाईला जावून मटण अथवा चिकन आणणे.मसाला तयार करायला घरी देणं .जाला यापैकी काहीही काम जमणार नाही .त्याने भांडी घासणे व धुण्याचं काम करणे अशी कामाची जबाबदारी घेवून आम्ही ५ ते ५० पर्यतच्या रस्सा पार्ट्या बिनबोभाट पारपाडल्या आहेत.
मटण किंवा चिकन घेवून मित्र आले की ठरलेल्या ठिकाणी जायच..दगडाची चूल करायची.पातेल्यात पाणी तापत ठेवायचे.तोवर ज्याच्याकडे मसाला तयार करायला दिला आहे तो डब्यात मसाला घेवून येणार......कांदा मस्तपैकी बारीक चिरायचा व फोडणीला सुरुवात करायची.मांस स्वच्छ करून हळदमीठ लावून वाफलायचं.पातेल्यावर
झाकण ठेवून त्यात पाणी ठेवायचं..शिजण्याची वाट पहात बसायचे....आणि मग विविध विषयांवर गप्पांना सुरुवात व्हायची.पार्टी कश्याची यावरही गप्पा गोष्टी करायच्या....क्रिकेटची मॅच जर भारताने जिंकली असेल त्यावर हमखास चर्चा..आमच्या क्रिकेटच्या टीमने गावोगावच्या मर्यादीत षटकांच्या स्पर्धेत १ ते ४ क्रमांक मिळविला असेलतर त्यावर चर्चा,मॅच कशी जिंकली, गावच्या राजकारणावर चर्चा...होत असत..
अर्ध्या ते पाऊण तासाने मटण शिजलयका ते पहायचे .तोवर राहिलेले मित्र ताट,भाकऱ्या,कांदा व लिंबू घेवून येत असत....कितीजण आहेत हे पाहून रस्सा तयार करायचा...कालवणात तिखट मीठ कसं आहे हे रस्सा पिवून ठरवायचं....
ठरलेली सगळी जमलीकी पंगत बसायची...एकजण प्रत्येकाला पाहिजे तेवढा रस्सा वाढायचा..सुक्क पीस सर्वांना एकाच मापानं वाढायचा....अन् गप्पा मारत कालवण पीत पीत कुस्करून भाकरी खायची अन्य कांदा तोंडी लावत लावत,सुक्क खात-खात जेवणपार्टी साजरी व्हायची...ज्याने कारणपरत्वे दिली असेल तर त्याचे किंवा काॅंट्रीभिषण असेल एकूण खर्च भागिले संख्या करून येणारी रक्कम देत असत....अशी अवीट, चवदार, लज्जतदार आणि आपलेपणाची आठवण करून देणाऱ्या रस्सा पार्ट्या. ....... काळाच्या ओघात नोकरी व्यवसायासाठी परगावी जाणं,गावचा संपर्क कमी होणं आणि हल्ली मनपसंत हाॅटेलात पाहिजे ते पदार्थ पंधरा-वीस मिनीटात मिळतात इत्यादी कारणांमुळे रस्सा पार्ट्या मागं पडल्या आहेत.......
🍲श्री रविंद्र लटिंगे वाई
Comments
Post a Comment