पुस्तक परिचय क्रमांक:१७८ ताई मी कलेक्टर व्हयनू
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७८
पुस्तकाचे नांव-ताई मी कलेक्टर व्हयनू
लेखकाचे नांव-राजेश पाटील
प्रकाशन-मनोविकास प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सव्वीसावी आवृत्ती ३मार्च २०२०
पृष्ठे संख्या–१८४
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७८||पुस्तक परिचय
ताई मी कलेक्टर व्हयनू
लेखक: राजेश पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
परिस्थितीच्या झळा माणसाला खूप काही शिकवून जातात.या झळांमुळे माणूस पोळतो,होरपळतो आणि ‘शेकून’निघतो.हे‘शेकून’निघणे म्हणजे एका अर्थाने प्राप्त परिस्थितीशी झगडण्याचे बळ मिळवणे असते.मात्र असे बळ मिळवण्यासाठी सजगता आणि संवेदनशीलता असावी लागते. ती राजेश पाटील यांच्याकडे असल्याने त्यांनी संघर्षातून आपली वाट ‘घडवली.’प्रचंड परिश्रमाच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर; शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपावणारा संघर्षमय प्रवास करत उच्च पदस्थ आय.ए.एस.अधिकारी झाले. हा संघर्षमय प्रवास श्री राजेश पाटील यांनी ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’या आत्मचरित्रात्मक कहाणीत मांडलाय.
लोकप्रिय आत्मचरित्राचे लेखक तथा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांची प्रस्तावना श्री राजेश पाटील यांच्या आत्मचरित्राताला लाभली आहे.ते म्हणतात की, “ही थक्क करणारी कहाणी शेकडो मुलांना आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करणारी आहे.जीवनात अपयशाचे अनेक कडू प्रसंग येतात,हातातोंडातून यशाचा घास निघून जातो.पाहता पाहता यश हुलकावणी देते.मात्र काही माणसे न खचता,न डगमगता खंबीरपणे यशाचा पाठलाग करुन ते खेचून आणतात आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतात याचे ठळक उदाहरणे म्हणजे राजेश पाटील यांचा परिश्रममय जीवन संघर्ष.”
या पुस्तकाची सव्वीसावी आवृत्ती निघाली आहे.यावरुनच या पुस्तकाची लोकप्रियता लक्षात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पुस्तक जाऊन पोहोचले आहे.काही शाळेत तर या पुस्तकाचे ‘श्यामची आई’सारखे पारायण केले आहे.
मुखपृष्ठावरील आकर्षक आणि समर्पक चित्र. कष्टाची कामे करत संघर्षमय प्रवास अधोरेखित करणारा आहे.पाठीमागच्या मलपृष्ठावरील पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांचा ब्लर्ब पुस्तक वाचण्याची प्रेरणा देतो.तसेच आदरणीय लेखकांचा कार्यालयातील फोटो आणि संक्षिप्त परिचय दिला आहे.सहज सोपी ओघवती लेखन शैलीमुळे वाचताना मंत्रमुग्धता होते.हे अनेकांच्या लिखित अभिप्रायावरुन अधोरेखित होते. वेगवेगळ्या उद्देशांसाठी धडपडणाऱ्या हजारो तरुण तरुणींना भावनिक दिलासा मिळणार असे लेखकांना वाटते.खरतर शिकायच्या वयातील अनुभवकथन तरुणांना उमेद वाटावी असे केले आहे.
लेखकांच्या स्वप्नाला बळ देणाऱ्या मातापित्यांना हे लेखनपुष्प अर्पण केले आहे.
अकरा लेखात शिक्षणाची कहाणी शब्दबध्द केली आहे.गावगाडा,लहानपण देगा देवा,ए ताजा गाववाले!, कोणत्याही कामाची लाज नसली पाहिजे, बापू अण्णाले पैसा देवाले लाव…!ताडे ते पुणे, आणि वाटचाल सुरू झाली, जीवघेणी शेवटची लढाई, ताई,मी कलेक्टर व्हयनू!पुढची दिशा..असे शीर्षक लेखांचे आहेत.ते आशय सिध्द करणारे आहेत. आपले यश साध्य करणाऱ्यासाठी प्रसंगानुरूप आपणाला जी जी कामे झेपतील ती करण्यात लाज बाळगू नये. लहाणपणी त्यांनी सकाळी लवकर उठून ताडे गावात घरोघरी फिरून पाव विकले आहेत.शेतात कष्टाची कामे केली आहेत.घरातून ओवाळून टाकलेला मुलगा चांगल्या मित्रांच्या (संग्राम) संगतीने स्वत्व जागे झाल्यावर यशस्वी कसा होतो?याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लेखक राजेश पाटील यांची कहाणी होय.
जीवनात काही बनायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव त्यांना सतत होत होती.ध्येयपूर्ती झाल्यावर ते म्हणतात की,“मी जेंव्हा माझ्या आजपर्यंतच्या संपूर्ण जीवन
प्रवासाविषयी विचार केला तेंव्हा जाणवले, की आपले यश हे नसून आपल्याभोवती ज्या अनेक व्यक्ती आहेत; ज्यांनी आपल्या गरजा जाणून घेतल्या.आपल्या खांद्यावर हात ठेवला.आपल्यावर कधी विश्वासाची, कधी वास्तवतेची तर कधी मायेची चादर पांघरून आपल्या मार्गातील काटे दूर केले त्या साऱ्यांचे आहे.जेंव्हा जेंव्हा मी नैराश्याने ग्रासलो.अशा वेळी इतिहासातील महनीय व्यक्तींच्या जीवनचरित्राने आणि कर्तृत्वाने माझ्यासाठी संजीवनीचे काम केले.”
शून्यातून आकाशाकडे झेपावणाऱ्या लेखकाचा संघर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दीपस्तंभ आहे. प्रतिकूल परिस्थितीवर संघर्षाने मात करून ध्येय साध्य करता येते.याचे आत्मबळ या कहाणीने मिळते..
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
प्रेरणादायी पुस्तक परिचय 👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
ReplyDelete