पुस्तक परिचय क्रमांक:१८० विचारशिल्प
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८०
पुस्तकाचे नांव-विचारशिल्प
लेखकाचे नांव-डॉ.अलका गायकवाड
प्रकाशन-साईनाथ प्रकाशन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती ऑक्टोंबर २०२३
पृष्ठे संख्या–१५४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८०||पुस्तक परिचय
विचारशिल्प
लेखक: डॉ.अलका गायकवाड
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
माणसांना मिळालेलं विचारांची देणं त्याला चिंतनशील आणि सृजनशील बनवते. त्याच्या जीवनाला आकार आणि नाविन्य -पूर्ण कलाटणी मिळते ती विचारांमुळेच!
लेखिका डॉ.अलका गायकवाड या पेशाने अध्यापिका.लोकसाहित्य, संतसाहित्य अन् साहित्यातील विविध प्रवाहांचे चिंतन मनन करीत त्यातील वाड्मयीन मूल्यांइतकेच जीवन विचारही आकर्षित करीत असतात.
वैचारिकतेच्या प्रक्रियेमुळेच माणूस घडत असतो. भारतीय संस्कृतीतील थोर विचारांची परंपरा असलेल्या महनीय समाज सुधारकांचे खऱ्या अर्थाने हे ‘विचार शिल्प’आहे.
या पुस्तकाचा मलपृष्ठावरील डॉ.रमेश अंधारे यांचा ब्लर्ब विचारांच्या पाऊलखुणा अधोरेखित करतात. आद्यशिक्षिका सावित्रीबाई,स्त्रियांचा पहिला हुंकार शब्दबध्द करणाऱ्या ताराबाई शिंदे ते आजची कवयित्री नीरजा यांसारख्या स्त्रियांनी व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाची महती पटवून देताना उदाहरणं आणि दाखले यांचा उपयोग केला आहे.तर ओवी हा स्त्रियांचा प्रांत!स्त्री मनाची संवेदनशीलता भावभावनांची तरलता आणि उत्कटता व्यक्त होते.ओवीचा सुंदर अर्थ शब्दांतून व्यक्त केला आहे.ओवी म्हणजे स्त्रियांचे मौखिक वाड्मयाचे समृद्ध दालन.जणू समस्त महिलांच्या हृदयाचे स्पंदन.कृषी हा संस्कृतीचा आत्मा आहे. कृषीजीवनातील कृषीकर्मे भावभावनांचे तरंग ओवीबद्ध केलेले आहेत.
‘विचारशिल्प’पुस्तकात वैचारिक मंथन करायला लावणारे लेख आहेत.एकंदर सतरा लेखांचा समावेश या पुस्तकात केला आहे.कृषिविधी:जागर कृतज्ञतेचा, कृषिविषयक ओवीगीतांमधून अभिव्यक्त होणारे स्त्रीमन,महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराजांच्या पुरोगामी विचारांचा लेख मनाला स्पर्शून जातो.संत तुकोबांची अभंगवाणी तुमच्या माझ्या जगण्याला बळ देणारी आहे. चैतन्याची प्रचिती देणारी आहे.संतांची सामाजिक बंडखोरी, गाडगेबाबा: विचार दर्शन, राष्ट्रसंत: अंधश्रद्धा निर्मूलन विचार, लीळाचरित्र:
अपूर्व साहित्यालंकार, सावित्रीबाईंची कविता, ताराबाई शिंदे आणि ‘स्त्री-पुरुष तुलना’,साने गुरुजींचे साहित्य,मराठी स्त्रीवादी कविता,बिराड मधून अभिव्यक्त होणारे स्त्री जीवनदर्शन, स्त्रियांचे विनोदी लेखन,आंदण, सहजीवनाची भावस्पर्शी स्पंदने.जागतिकीकरणाची कविता आणि कोरोनाकाळ कवितेतील प्रतिबिंब आदी नामशीर्ष लेखन विचारांचे आहे.
या पुस्तकाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे स्त्री ची विचार अभिव्यक्ती या लेखातून मांडली आहे.यातील काव्ये,सुभाषिते,कविता विचारांचे बीज पेरणारे प्रेरक आहेत.समाजप्रबोधन करणाऱ्या गाडगेबाबांचे ‘विचार दर्शन’लेख चिंतनशील आहे.त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी असलेला माणूस शोषणमुक्त होऊन त्याचं जगणं संपन्न आणि समृद्ध होईल याचा त्यांना विलक्षण ध्यास होता.
त्यांचे विचार समाजाची क्रांती करणारे सुधारणा करणारे होते.ते समाजाच्या अखंड चिंतनातून ते प्रगटलेले आहेत.अंधश्रद्धेने निर्माण केलेल्या मानसिक गुलामगिरीतून माणसाला मुक्त करण्याची प्रचंड ताकद राष्ट्रसंतांच्या या विचारात आहे एवढे मात्र निश्चित!
मराठी भाषेचे सामर्थ्य व सौंदर्य बघायचे असेल तर ते लीळाचरित्रात!बोलीभाषेचा गोडवा शब्दाशब्दातून अनुभवाला येतो. लहान लहान वाक्ये, त्यातील अर्थसौंदर्य,भावसौंदर्य, लयबद्धता, प्रादेशिक शब्दांचा वापर पाहून अचंबित होऊन जातो. शब्दकळा लळा लावणारी आहे.भाषेत नैसर्गिक सौंदर्य व अंगभूत लावण्य आहे.
सावित्रीबाईंची कविता स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय या आधुनिक मूल्यांची मांडणी करणारी मानवतावादी कविता आहेत.दु:खाला, वेदनेला व अन्यायाचा आपल्या कवितेतून वाचा फोडण्याचे कार्य केले आहे.काळरात्र गेली|अज्ञान पळाले| सर्वात जागे केले,सूर्याने|शूद्र या क्षितिजी जोतिबा तो सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला|| “ताराबाई माझी मर्दीनी,भासे चंडिका रणांगणी|रणदेवी ती श्रध्दास्थानी ,नमन माझिये तिचिया चरणी |
स्त्रियांच्या कर्ममय जीवनाचा दिव्य महिमाच समाजसुधारक साने गुरुजींनी ‘भारतीय स्त्रीवादाची प्रसादचिन्हे’या लेखातून मांडला आहे.स्त्रीने पुरुषांच्या दबावाखाली न राहता, दोघांनी मिळून एक सुंदर जग निर्माण केले पाहिजे.असे साने गुरुजींचे मत होते.ते स्त्री आणि पुरूषांचे सहजीवनाचे स्वप्न पाहणारे महामानव म्हणून साने गुरुजींना संबोधित केले आहे.
त्यांनी अतिशय परखडपणे प्रगल्भ मत मांडले आहे.ते म्हणतात की,“विवाहवेळी मुलीच्या अंगचा वर्ण पाहतात.तिच्या बुध्दीचा व हृदयाचा वर्ण,तिच्या आंतर आत्म्याचा वर्ण याकडे डोळेझाक केली जाते.” स्त्रियांनी आपल्या मातृत्वाचा, स्त्रीत्वाचा परीघ मोठा करून तो समाजाशी जोडला पाहिजे,असा पुरोगामी विचारही त्यांनी या लेखात मांडला आहे.
तसेच त्यांच्या साहित्यातील चिंतनशील विचारांचे दाखलेही विवेचनात आहेत. स्त्री ही जगातील महान शक्ती आहे. त्यांच्यात अलौकिक शक्ती असते.जरी वरवर कोमल वाटणारी स्त्री प्रसंगी आपल्या शक्तीचा यथायोग्य वापर करते.स्त्रियांच्या आत्मजाणिवेचे पहिले हुंकार अनेक कवयित्रींनी शब्दबध्द केले आहेत.
लोकसाहित्यात,ओवीगीतातील रचनांमध्ये स्त्रीमनाचा विद्रोह आपणास दिसून येतो.
पिढ्यानपिढ्या पोटासाठी पाठीवर बिऱ्हाड लादून वणवण भटकणाऱ्या बेलदार जमातीचे हे संघर्षमय आत्मकथन अशोक पवार यांनी रेखाटले आहे.विषम समाजव्यवस्थेतील या समाजाचं जगणं आणि स्त्रियांच्या छळाच्या,अत्याचाराच्या तऱ्हा वाचताना मन अस्वस्थ होते.या लेखात बेलदार स्त्रीचा जीवनसंघर्ष मांडला आहे.विनोद वाचला ऐकला की चेहऱ्यावर हास्य उमटतेअन् थकवा दूर झाल्यासारखे वाटते.पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी विनोदी साहित्यातही मोलाची भर घातली आहे. याचा आलेख ‘स्त्रियांचे विनोदी लेखन’या सदरात मांडलय.खरतर स्त्रियांकडे निकोप अशी विनोदबुद्धी आहे.याच निरागस वृत्तीने त्या मानवी जीवनातील, जगण्यातील विसंगती टिपून त्यावर मार्मिक भाष्य विनोदी रुपाने करतात.केवळ मनोरंजन आणि करमणूक विनोदी लेखनात नसून वाचता वाचता हसताना विचारप्रवण आणि अंतर्मुख बनविण्याची ताकदही स्त्रियांच्या विनोदी लेखनात जाणवते.
प्राध्यापिका मीनल येवले यांच्या ‘आंदण’या ललित लेख संग्रहाचे विश्लेषण आणि विवेचन अतिशय सुंदर शब्दात केले आहे.
निसर्गाच्या सौंदर्याचे ऐश्वर्यशाली रुपडं जणू सृष्टीचा सृजन सोहळाच रंगलाय असं वाचताना भासतं इतकं सुंदर शब्दांकन ‘आंदण’मध्ये आहे.धरती आणि निसर्गात गुंतलेल्या मानवी मनाचा वेध ‘आंदण’या पुस्तकातून उलगडत जातो.सहज सुंदर ओघवत्या भाषेत या पुस्तकाचे समिक्षण केले आहे.
महाराष्ट्रातील थोर सुपरिचित पुरोगामी विचारवंत आदरणीय डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या साहित्याची ओळख ‘सहजीवनाची भावस्पर्शी स्पंदने.’या लेखात केली आहे. स्वातंत्र्य,समता, बंधुता व न्याय या मानवी मूल्यांचा जागर करून त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती केली आहे.त्यातील ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’या ग्रंथातील विचारांचे आयाम आपले वैचारिक मंथन करायला भाग पाडतात.पत्नीच्या वियोगाने आर्त, व्याकुळ आणि एकाकी झालेल्या डॉक्टरांनी त्यांचे भावविश्व उत्कटतेने शब्दबध्द केले आहे.ते संवेदनशील वाचकांच्या मनाचे ठाव घेते.लेखिका डॉ.अलका गायकवाड यांनी अतिशय समर्पक शब्दात विवेचन केले आहे.
लेखक आदरणीय उत्तम कांबळे यांच्या जागतिकीकरणाच्या कविता वैचारिक मंथन करायला उद्युक्त करतात.संवेदना जागे असलेले कलावंत व्यथा व वेदनांशी नाते जोडत माणसाचे माणूसपण नष्ट होऊ नये म्हणून जीवाच्या कराराने त्याला आवाहन करतात. जागतिकीकरणाचे भान मराठी साहित्यात उत्कटतेने व्यक्त होत आहे. “माणूस म्हणून त्यांची असलेली ओळख,शहरानं कुरतडून टाकली भाकरीच्या मोबदल्यात” हातावर रोजीरोटी कमावणाऱ्या फुटपाथवरील जगणाऱ्यांच्या ‘जगण्या’विषयी वरील शब्दातून उत्तम कांबळे जाणीव करून देतात.तर अरुण काळे म्हणतात की, “एकच बाजार होता बंधुभावाचा,पुढं सारं शहरचं मार्केट झालं,दुध बाजार, घास बाजार गेला, पुढं माणसांचा बाजार सुरू झाला.”अशा अनेक नामवंत कवींच्या कवितांमधून येणारी महानगरीय जाणीव नव्या प्रवाहित विचारांची जाणीव करून देत आहे.
कोरोनाकाळातील वास्तव जगणं तर प्रत्येकाने अनुभवलं आहे.अनेकांनी कवितेतून व्यक्त केलं.कारण अभिव्यक्त होणं हे कलावंतांच्या मनाची गरज असते. एकमेकांना आधार देत प्रत्येकजण जगत होता.जगण्याला आशेचा किरण दाखवित होते.माणसांना आशावादी बनविण्याचे काम कोरोनाकाळात साहित्याने केले.
अतिशय सुंदर सुंदर ओघवत्या शैलीत लेखिका डॉ.अलका गायकवाड यांनी
पुरोगामी विचारवंताचे स्त्रियांविषयीची ‘विचार शिल्पे’गुंफलेली आहेत.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment