पुस्तक परिचय क्रमांक:१८५पु.ल.एक आनंदयात्रा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८५
पुस्तकाचे नांव-पु.ल.एक आनंदयात्रा
लेखक: प्रा.श्याम भुर्के
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण डिसेंबर २०१८
पृष्ठे संख्या–११४
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य--१३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८५||पुस्तक परिचय
पु.ल.एक आनंदयात्रा
लेखक:प्रा.श्याम भुर्के
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रतिभावंत साहित्यिक,विनोदवीर , हजरजबाबी वक्तृत्व साहित्य आणि संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक विजेते ऋषितुल्य लाडकं व्यक्तिमत्त्व आदरणीय पु.ल.देशपांडे.आदरणीय भाईंनी वाड्मय क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात पादाक्रांत करुन गाजवली आहेत.मराठी माणसाला पु.ल.देशपांडेंनी काय दिले असेल तर ,माणसांच्या दैनंदिन जीवनातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने टिपून त्यावर लेखन करुन रसिक वाचकांना मनसोक्त हसायला शिकविले.त्याचेच एकत्र संचित प्राध्यापक तथा लेखक श्याम भुर्के यांनी ‘पु.ल.एक आनंदयात्रा’या विनोदीग्रंथात शब्दबध्द केली आहे. लेखक पतीपत्नी यांनी पुस्तकाचे नामभिधान असलेला कार्यक्रम सादर केला आहे.
असं म्हणतात की,
पु.ल.स्पर्श होताच दु:खे पळाली|
नवा सूर आनंदयात्रा मिळाली|
निराशेतुनी माणसे मुक्त झाली|
जगू लागली हास्यगंगेत न्हाली||
विनोदवीर भाईंचे गुणगान यथोचित शब्दात कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी केले आहे.
पु.ल.देशपांडे यांनी हयातभर आनंदाची बरसात केली.ही बरसात करताना जे धन, मानधन मिळाले.ते समाजकार्यास देऊन दु:खितांच्या जीवनात आनंद फुलवला.त्यांनी ट्रस्टद्वारे समाजातील दु:खे दूर करण्याची कायमची व्यवस्था केली.असे त्रिकालाबाधित आनंदयात्री म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व ‘पु.ल.देशपांडे’.
विनोदी किस्स्यांचा महासागरच हे पुस्तक आहे. याचे मुखपृष्ठ पाहूनच आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते.अन् आपण पुस्तकाची पानं उलटत राहतो.दृष्टि पडताच आनंद होतो.यातील सर्वच चित्रे पुलमय आहेत.ते घडलेल्या विनोदी किस्से
आणि मथळ्याची साक्ष उठावदार करतात.
मलपृष्ठावर ‘ब्लर्ब’ तर आनंदयात्रेचा अंतरंग मराठी माणसाच्या मनात कोरला जाईल असा आहे.
लेखक प्रा.श्याम भुर्के यांच्या या पुस्तकाला हास्याच्या दुनियेत मिरासदारी करणारे विनोदी साहित्यिक तथा कथाकार द.मा.मिरासदार यांची प्रस्तावना लाभली आहे.त्यामध्ये त्यांनी आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याची ओळख अतिशय समर्पक शब्दात करुन दिली आहे.पु.लंच्या लेखनात व्यक्तिगत टवाळी टिंगल कधीच दिसून येत नाही.विनोदाच्या धारदार शस्त्राने त्यांनी रसिक वाचकांना आणि श्रोत्यांना पोटधरून भरपेट हसविले आहे.हसण्याला सुसंस्कृत स्वरूप दिले. दोघांच्याही व्यक्तिमत्त्वात गुणग्राहकता होती. ते गुणीजणांचे चाहते होते.१९६६च्या नांदेड येथे झालेल्या मराठी नाट्यसंमेलाचे साक्षीदार असलेले द.मा.म्हणतात की,आचार्य अत्रे,’ पु.ल.देशपांडे’ यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की, “या मावळत्या विनोदाचा उगवत्या विनोदाला आशीर्वाद आहे.”मग पु.लं.नीही आपल्या खुमासदार शैलीत या आशीर्वादाची परतफेड केली.ते म्हणाले की, “अहो, एखाद्याचं नांव प्रल्हाद असतं पण कर्तृत्व मात्र नरसिंहासारखं असतं!”
हास्यविनोद आणि शाब्दिक कोट्यांच्या दुनियेत हजरजबाबी वाक् चातुर्याने मुशाफिरी करणारे असे कित्येक किस्से घटनाप्रसंगासह या हास्याच्या पुस्तकरुपी दरबारात पेश केले आहेत.तसेच
आदरणीय पु.ल.देशपांडे तथा भाईंचे जीवन आणि साहित्यदर्शन मराठी रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य लेखक प्राध्यापक श्याम भुर्के यांनी‘पु.ल.एक आनंदयात्रा’या पुस्तकात केले आहे. याच नावाने कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केले आहेत.तेंव्हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक साहित्यिक त्यांच्या आठवणी सांगत.त्या मनातील आठवणींना शब्दबद्ध केले आहे.तेही विनोदी ढंगाच्या शैलीने.
यातील काही मथळे,अवतरणे, आणि किस्से अफलातून आहेत.मराठी रसिकांना मनोमनी पटलेलं आहे की,पु.ल.म्हणजे हास्य आणि विनोद.
माझे जीवन गाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे…..या
मंगेश पाडगावकरांच्या शब्दांना सूर देण्याचं काम ही पु.लं.च आहे.साहित्याच्या क्षेत्रात चौफेर आतषबाजीने रसिकांना तृप्त करणारा,व्याख्यान देताना हसुन हसुन पुरेवाट करणारे पु.ल.देशपांडे यांचे जीवन हे वरील आनंदगाण्यासारखचं आहे.आनंदयात्रा पुस्तकात पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याचे अंतरंग विनोदी किस्से, चुटके, घटना, प्रसंग,गाठीभेटी आणि लेख यातून उलगडून दाखवले आहेत.सर्वच लेख वाचनिय आहे. लेखकांना पु.ल.बघता आले.संवाद साधता आला ही अलौकिक भेटच म्हणावी लागेल.
विशेष पु.ल.देशपांडे यांची मातोश्री सुद्धा विनोद करायची.आईकडून मिळालेला हा विनोद वारसा पु.लं.नी बहरुन टाकला. विनोदाचे अनेक प्रकारचे असतात हे पुस्तक वाचताना लक्षात येते.प्रसंगनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ,शाब्दीक कोट्या, विडंबने, अपेक्षाभंग आणि अतिशयोक्ती या साऱ्यांचा वापर मुक्तपणे त्यांनी केला.
पु.लं.च्या विनोदाने लोकांची मने निर्मळ बनली.चांगल्याची बाजू घेऊन वाईटाची चेष्टा करण्याचा चांगुलपणा मराठी रसिक वाचकांच्यात निर्माण झाला.विशेष म्हणजे पु.लं.चा विनोद केंव्हाही कोणापुढेही सांगता येतो.त्यामुळे कोणाचाही रसभंग न होता,पोषक असा विनोदरस निर्माण होतो.
पु.लं.चं जीवन ही एक आनंद यात्रा आहे. आपल्या व्यक्तिमत्वातून त्यांनी साऱ्या समाजाला सातत्याने आनंद दिला. त्यांच्या षष्ट्यब्दीपुर्तीनिमित्त त्यांचे मित्र कविवर्य बा.भ.बोरकर यांनी ‘दिवे डोलती साठ, लाटांवरी’ही कविता रचली.त्यातील काही ओळींचे वाचन केले तर ‘पु.ल.एक आनंदयात्रा’ असल्याची प्रचिती येईल.
जराशप्त या येथल्या जीवनाला|
कलायौवने तूच उ:शापिले|
व्यथा तप्त जीवी स्मिते पेरुनी तू|
निराशेत आशेस शृंगारीले|
मिलाफून कल्याणकारुण्य हास्यी|
तुवा स्थापिला स्वर्ग या भूतली|
तुझ्यासारखा तूच आनंदयात्री|
तुवा फेडिली गाठ प्राणातली||
त्यांनी आयुष्यात कधीच दु:ख उगाळली नाहीत.आपल्या विविध कलाकृतींद्वारे समस्तजनांना निखळ आनंद दिला.नाटके
प्रवासवर्णने, चरित्रे,व्यक्तीचित्रे,एकांकिका
पटकथा अशा विविध अंगांनी लेखनकला फुलवली.
रसिक वाचकांच्या वाचनालयात असावे असं अप्रतिम पुस्तक आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:२६नोव्हेंबर २०२४
Comments
Post a Comment