पुस्तक परिचय क्रमांक:१८३ पाटलांची चंची



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८३
पुस्तकाचे नांव-पाटलांची चंची 
लेखकाचे नांव- शंकर पाटील
 प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-अकरावी आवृत्ती 
पुनर्मुद्रण फेब्रुवारी २०१८
पृष्ठे संख्या–१६८
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८३||पुस्तक परिचय 
             पाटलांची चंची
        लेखक: शंकर पाटील 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
ग्रामीण अन् विनोदी साहित्याचे दालन आपल्या कसदार लेखणीने वाचक रसिकांना श्रीमंत करणारे जेष्ठ साहित्यिक तथा कथाकार शंकर पाटील. लेखनाच्या क्षेत्रात कथेच्या बीजातून सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे कथाकार. त्यांच्या कथेत खेड्यातील माणसांना नायक करून त्या कथेतील पात्रांच्या बहुरंगी बहुढंगी अंतरंगी खोलात जाऊन शब्दबध्द करणारे शब्दांच्या फडातले पाटील.त्यांच्या विशेषतःवळीव,धिंड आणि आभाळ या कथासंग्रहांना राज्यशासनाने 'उत्कृष्ट वाड्मय'' साहित्याचा पुरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव केला आहे. रसिक वाचकांनी उत्तम आणि सकस साहित्याची मोहर उमटवली आहे. त्यातीलच एक कथासंग्रह 'पाटलांची चंची'.
   खेड्यातील बहुतांश लोकांना पानतंबाखु खायची सवय असायची.राम राम पाव्हणं म्हणून गळा भेटाभेट झाली,नाहीतर गप्पांच्या चावडीवर, शेतात विसाव्याच्या क्षणी किंवा दोन दोस्त एकमेकांना भेटल्यावर खुशाली विचारली की, पानसुपारीचा विडा नाहीतर तंबाखुचा आर पेश केला जायचा. पानं, कात,सुपारीची खांडं, चुन्याची डबी,लवंगा अडकित्ता, बडिशेप आणि सुवासिक जर्दा(तंबाखू) हे सारे जिन्नस चंचीच्या कप्प्यात बैजवार ठेवलेले असायचे.विडा करणारा चंचीच्या कप्प्यातून हव्या त्या वस्तू काढून आपला विडा तयार करायचा.त्याच धर्तीवर लोकप्रिय कथाकार शंकर पाटील यांनी आपल्या मन:कोषात जपून ठेवलेले विविध अनुभव,खास कोल्हापुरी भाषेत गुंफन करून 'पाटलाची चंची'हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.जसं पान खाल्लं की जीभ रंगते.तसे स्मरण उंची उलगडली की, वाचन विडा रंगणार आणि कथा वाचकांना गारुड करणार.
    मुखपृष्ठावर टांग्यातून गावात रफेट मारणारे पाटील असं शीर्षकास साजेसे चित्र रेखाटले आहे.तर मलपृष्ठावर पान तंबाखुच्या चंचीची खासियत.कथांना वाचनविड्याची उपमा देणारा‘ब्लर्ब’आहे.अस्सल कोल्हापुरी बोलीत ग्रामीण ढंगात मासलेवाईक, नमुनेदार, इरसाल आणि बहारदार अठ्ठावीस कथांचा नजराणा ‘पाटलांच्या चंची’या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.
लेखकांच्या जीवनातील मनात गोंदण झालेल्या घटना, प्रसंगांचे,अनुभवाचे अन् व्यक्तिंचे चित्र हेच कथांचे बीज आहे. त्यांच्या जगण्यातून उमललेल्या स्मृतींचे शिंपण गावच्या शिवार,देऊळ,शेतीभाती पारावरल्या गप्पांचे आहे.
काळीज कप्प्यातील आठवणींचे स्वत: अनुभवलेल्या कथांचीमालिका म्हणजे 'पाटलाची चंची'.ते आपल्या कथेतून गावच्या गोष्टींचा झरा वाहता ठेवतात. आपल्या कथांनी रसिकांना तृप्त ढेकर द्यायला लावतात. इतकं पारदर्शी लेखन शंकर पाटील यांनी केले आहे.कथांची आशयगर्भता नाम बिरुदावली पाहिली की आवाका लक्षात येतो. ’आईचा आशीर्वाद’ या कथेत आई आजाराने अत्यवस्थ अवस्थेत असतानादेखील  लेखकांनी दहावीचा अभ्यास कसा केला असेल.अन्  सर्वच विषयात फक्त ३५टक्के गुण मिळवून ते पास कसे झाले.याचं गुपीत या कथेत शब्दबध्द केले आहे.    विलक्षण आणि बेरकी व्यक्तिमत्वाचे वकील निरगुडकर पाटील यांचे अंतरंग उलगडून दाखविणारी कथा’फास’.त्यांच्या कॉलेज लाईफमधील प्राध्यापकांचे नमुने आणि ‘टारफुला’या  कादंबरीचा किस्सा‘असेही काही प्राध्यापक’या गोष्टीत आहे.तर समवयस्क मित्रांची दोस्ती ‘कॉलेजमधील काही मित्र’ या व्यक्त केली आहे. तर कावळ्याच्या गोष्टीत शिक्षण घेण्यासाठी मार्गक्रमण कसे केले याची इत्यंभूत कहाणी आहे.
 देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भूमिगत राहून स्वातंत्र्यसैनिकांना वेळप्रसंगी कशी मदत केली.याचे किस्से ‘मी एक भूमिगत’ या कथेत समाविष्ट केले आहेत.'साहित्यवादी कलांचा पाया' या लेखात ते म्हणतात की,'ज्याच्या जवळ ऊर्मी आहे.तो काही ना काही करु शकतो. वातावरण अनुकूल असल्यास उत्तमच; तसं ते अनुकूल नसल्यास त्यावर तो मात ही करु शकतो. 'नागोजीराव पाटणकर विद्यालयातील इयत्ता सहावी इंग्रजी वर्गातील वर्गमित्रांच्या जमतीजमती आणि रजतपटातील पडद्याआडच्या गोष्टी खुमासदार शैलीत व्यक्त केल्या आहेत. 
याच बरोबर मनोहारी विश्व!,वाट चुकली, सुटकेचा आनंद,एक नवा शोध, शेवाळलेलं छप्पर,गाठी पैशाच्या व मायेच्या,चक्रव्यूह,एक दांडगा खटाटोप,ऋणानुबंधाच्या गाठी,अस्मानी संकट,आमचं बॉम्ब प्रकरण इत्यादी कथांमधून त्यांच्या अंतरंगाची खरी ओळख ओळख होते.
 अतिशय बहारदार शब्दसाजात कथांचा पानविडा रंगतदार केला आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
दिनांक:८ डिसेंबर २०२४

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड