पुस्तक परिचय क्रमांक:१७७ ग्रामसंस्कृती





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७७
पुस्तकाचे नांव-ग्रामसंस्कृती
लेखकाचे नांव- आनंद यादव 
 प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती २०००पुनर्मुद्रण: जानेवारी २०१२
पृष्ठे संख्या–२००
वाड़्मय प्रकार-ललित लेखसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७७||पुस्तक परिचय 
            ग्रामसंस्कृती 
        लेखक:आनंद यादव 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मराठी संस्कृती ‘एक’च असली तरी मराठी खेड्यांना, शहरांना खास अशी त्यांची त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये लाभलेली असतात.ही वैशिष्ट्ये तेथील विविध प्रकारच्या स्थानिक कारणांतून आणि परंपरातून निर्माण झालेली असतात.या परंपरा भौगोलिक,ऐतिहासिक,धार्मिक असू शकतात. गावाला अंतर्बाह्य त्याची अशी गुणवैशिष्ट्ये आणि खास असा चेहरा मोहरा लाभतो.त्यामुळे एक गाव दुसऱ्या पेक्षा वेगळं असतं.हेच गावचं व्यक्तिमत्त्व असतं.अश्या खेड्यांची ओळख अधोरेखित करणाऱ्या 'ग्रामसंस्कृती'या ग्रंथास सन २०००- ०१चा श्री.रा. सबनीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 ‘ग्रामसंस्कृती’स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांतील ग्रामीण भागाची दशा आणि दिशा जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार आनंद यादव यांनी अतिशय चिकित्सकपणे अभ्यास करून, तेहतीस लेखातून ग्रामसंस्कृतीच्या अंतरंगाचा धांडोळा घेतला आहे.लेखकाची जन्मभूमी कोल्हापुरजवळील कागल.पायी अनवटवाटेने,पाणंदीने,कोकणची लाल मातीच्या वाटेने,माळामुरुडाच्या वाटेने, डोंगर कुशीतल्या नागमोडी वळणाच्या वाटेने अनेक कारणांनी त्यांची भटकंती झाली.त्यामुळे खेड्यांचा लळा लागला. मुक्त नजरेने त्यांनी खेडी बघितली. निसर्गाच्या अंगाखांद्यावरची,विविधांगी आकाराची, नदीनाल्याच्या काठाची, डोंगराच्या पायथ्याशी आदी खेडी पाहताना मन सुखावून जाई. 'ग्राम’म्हणजे खेडेगांव.जमिनीची मशागत करणे.जमिन पिकवली जाणे असा ९५टक्के व्यवसाय जिथं आजही आहे, ते खेडे.अशा खेड्यांची संस्कृती म्हणजे ‘ग्रामसंस्कृती’.
 ‘ग्रामसंस्कृती’ हा संदर्भग्रंथ खेड्यातल्या संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा आहे.बालपणी आईवडिलांसमवेत पैपाहुण्यांकडे,नातलगांकडे जत्रा-खेत्रा, लग्न समारंभ,देवदेव करण्याच्या निमित्ताने बऱ्याच खेड्यात लेखक गेले होते. तर नंतरच्या काळात ग्रामीण साहित्य चळवळ संवर्धनासाठी व्याख्यानाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रभर फिरत राहिले.लेखकास  हेच जीवनुभव आले.त्या शिदोरीवर त्यांनी चार आत्मचरित्रासह अनेक कथा कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. सर्व साहित्याचा सार या संदर्भग्रंथात समाविष्ट केला आहे.यातील सर्वच लेख समाजचिंतनात्मक आहेत. आपला महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षानंतर कसा घडत गेला त्याचे दर्शन या लेखात केले आहे.विश्लेषणात्मक विवेचन अतिशय समर्पक शब्दात मांडले आहे.
   या ग्रंथातील लेख सलगपणे'दैनिक सकाळच्या 'रविवार साप्ताहिक पुरवणीत १९९८सालात जानेवारी ते जुलै या कालावधीत प्रसिध्द झाले आहेत.
एकाच महाराष्ट्रात अंतर्गत भिन्नता असल्यामुळे ग्रामीण संस्कृती ही तेथील निसर्ग, हवामान, पाऊस, जमीन यांच्या एकत्रित परिणामामुळे आकाराला येते.शेतकऱ्यांची शेती शेकडो हातांनी चाललेली असते.अनेक बलुतेदार त्याला मदतीचा हात देतात.हे हातच शेतीची संस्कृती जन्माला घालतात.खऱ्याखुऱ्या सर्जनशील हातांमुळेच अन्नधान्याची निर्मिती होते आणि पांढरपेशे, उच्चवर्णीय,श्रीमंत, कारखानदार, मध्यमवर्गीय आणि सर्व शहरवासीयांना अन्नधान्य मिळू शकते.
हेच माणसं जगवणारे हात आहेत.शेतकरी दादाच्या घरातील सगळेच शेतात दिसभर वेगवेगळ्या कामांत राबत असतात.त्यांच एकमेकांशी नातं मानसिकदृष्ट्या घट्ट बिलगलेलं असतं.एकमेकांच्या विचार विनिमयाने उद्भवलेले प्रश्न अथवा समस्या सोडवतात.
मातीत उगवणारी मुलं म्हणजे पीकं होत. ‘माती असशी,मातीत जगशी,तुझी रे माता माती|माती होऊन,माती जाशी,तरी तुला प्रिय माती|’शेतीच्या मशागतीचा लेख ‘माणसाला जागवणारे हात’ अतिशय भावस्पर्शी आहे.शेतीच्या कामातील बारकावे आणि त्याची नेमकी नावं आपणाला समजतात.शब्दभंडार समृद्ध करतात.गाईला गोमाता आणि बैलांना बळीराजा संबोधित करुन सेवा करणारा कृषीवल आहे.कृषीप्रधान संस्कृतीचा उगम ग्रामसंस्कृतीतून झालेला आहे.मातेची आणि राजाची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचं खरं घर तर शिवारतलं रान-मळा असते.तेच त्यांचे झोपडीवजा घर असतं.शेतीचा सगळा सराजम त्याच रानातल्या घरात असतो.शेतकऱ्यांचा खरा संबंध रानावनाशी,गाईगुरांशी नि गिरीदऱ्यांशी येत असतो.
गावचं मनस्वास्थ्य टिकविण्यासाठीच दरवर्षी गावदेवीची जत्राखेत्रा आयोजित करतात.श्रमजीवी श्रमिकांना मनोरंजन आणि देवाची मनोभावे पूजा करतात. कालौघात गावातील लोकांनी भक्तिभावाने भजन-कीर्तनाचा भक्तीमार्ग चोखाळला.अध्यात्म विद्येचा नवा मार्ग ग्रामसंस्कृतीत अवलंबिला जावू लागला.शेतीचं नवतंत्रज्ञान आपल्या देशात आलं. मोटा जावून इंजिन आणि विद्युत पंप आले. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली.खळ्याच्या जागी मळणी सयंत्र आले.बीयाणांचे सुधारित वाण आले.अन् उत्पादनात भरघोस वाढ होवून हरितक्रांती झाली. चवदार धान्याची जागा हायब्रीड बियाणे सगळीकडे वापरले जाऊ लागले.गुऱ्हाळघरे कमी झाली.साखर कारखाने वाढल्याने ऊसाचे अमाप पीक आले. लोकांच्या हाती पैसा खुळखुळू लागला. खेड्यातले वस्तूविनिमय जाऊन सगळे पैशाची भाषा बोलू लागले.
इंग्रजांनी रस्ते बांधले.रेल्वेमार्ग तयार केले. त्यावर मोटारी व रेल्वे धावू लागली.लोकं शहराकडे स्थलांतरित होऊ लागली…. हळूहळू ग्रामसंस्कृतीत बदल घडू लागला.
अतिशय सुक्ष्मपणे अभ्यासपूर्ण लेख जेष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी ‘ग्राम संस्कृती’या ग्रंथात मांडले आहेत. सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि जाणकार वाचक या सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरक ठरेल अशा योग्यतेचा हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 









Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड