पुस्तक परिचय क्रमांक:१९२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१९२
पुस्तकाचे नांव-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
लेखक: दिलीप बर्वे
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १डिसेंबर २०२४
पृष्ठे संख्या–९४
वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक चरित्र
किंमत /स्वागत मूल्य--१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९२||पुस्तक परिचय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
लेखक: दिलीप बर्वे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
“हर हर महादेव,हर हर महादेव!”
कर्मयोगिनी रणरागिणी दातृत्वसरिता धर्मपरायण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राची ओळख महाराष्ट्रातील सर्वांना व्हावी. यास्तव लेखक दिलीप बर्वे यांनी ‘सती न गेलेली सती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’हे जीवनचरित्र ३००व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रेखाटले आहे.
वाचन साखळी समूहाचे प्रसिध्दी प्रमुख तथा ब्लॉग रायटर आदरणीय कचरु चांभारे सरांनी मला बक्षिसरुपाने भेट दिलेला ग्रंथ.त्याबद्दल सरांना मनस्वी धन्यवाद!
अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी इंदौर येथील मल्हारराव होळकर यांच्या साम्राज्याचे जतन करत संपूर्ण भारतात लोककल्याणकारी कार्य केले आहे. विशेषत: देवादिकांची मंदिरे, धर्मशाळा, नदीवर घाट,पाणपोया (विहीरी) ,बागा आणि जलकुंडे उभारलेली आहेत. तीच आज ऐतिहासिक ठेवा असून समस्त जणांची तिर्थाटने झालेली आहेत.या ऐतिहासिक ग्रंथात अहिल्यादेवी यांची कृष्णधवल रेखाचित्रे,अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याची तपशीलवार यादी परिशिष्टात नमूद केलेली आहे.जीवनपटातील ठळक घटना प्रसंग तारीखवार दिलेले असून होळकर घराण्याची वंशावळ रेखाटली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कारकिर्दीत होऊन गेलेले पेशवे यांची सनवार जंत्री आहे.इंदौर राजघराण्यातील प्रेक्षणिय ठिकाणे होळकर पॅलेस,महेश्वर किल्ला,अहिल्येश्वर मंदिर,महेश्वर राजवाडा, अहिल्यादेवी यांची पालखी आणि शस्त्रे यांचीही छायाचित्रे समाविष्ट केली आहेत.तसेच त्यांच्या काळातील चलनी नाणी,शिक्का आणि होळकर साम्राज्य विस्ताराचा नकाशा आणि बोधचिन्ह इत्यादी उत्तरार्धात आहे.
आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीसारख्या छोट्या गावातून आलेली आठ वर्षाची छोटी कन्या स्वकर्तृत्वाने माळवा प्रांताची सर्वेसर्वा बनते.तसेच हिंदुस्तानसह नेपाळमधील सुमारे ६०तीर्थक्षेत्रांचा उध्दार करते.मोठमोठाली देवादिकांची देवळे बांधते.यात्रेकरू आणि पांथस्थासाठी धर्मशाळा व पाणपोया उभारते.जीवनदायिनी नदीतिरी घाट उभारते.सारेच लोककल्याणकारी विस्मयकारक आणि आदर्शवत कार्य केले आहे.
त्या स्वतःआयुष्यभर अत्यंत साधेपणात राहिल्या. अहिल्यादेवींनी सारी संपत्ती जनतेच्या कल्याणासाठी वापरली.आज भारतात आपण कोणत्याही तिर्थक्षेत्री तिर्थाटने करावयास गेलो की त्यांचे तेथील अलौकिक कार्य पाहून नतमस्तक होतो.त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो.
या पुण्यश्लोकी ऐतिहासिक चरित्रात त्यांच्या जीवनकार्याचा धांडोळा लेखक दिलीप बर्वे यांनी अतिशय समर्पक शब्दात आणि सुंदर शैलीत मांडला आहे.चौंडी ते इंदौर व्हाया पुणे असा त्यांचा जीवनप्रवास आहे.
ज्यांच्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे,तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी केला जातो.अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सर्वधर्मसमभाव,अस्पृश्यता उच्चाटन,सामाजिक एकात्मता,स्त्री पुरुष समानता,दातृत्व,गोरगरिबांना विषयी कळवळा,हुंडा पद्धतीचे उच्चाटन,अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड,दत्तक वारसाहक्क,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारण्याचे कृतिशील कार्य त्यांनी संपन्न केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महेश्वरमधून कारभार,आनंदीबाई -अहिल्याबाई भेट,तुकोजी होळकर, सवाई माधवराव यांचा पुण्यात विवाह, वारसा प्रकरण आदीं भागातील कार्याची महती पटवून दिली आहे. त्यांचे मामंजी रणवीर मल्हारराव होळकरांचा कारभार, मुलगा खंडेराव, जावई यशवंतराव, रखमाबाई,मल्हारबा यांच्या आयुष्यातील घटना प्रसंगांचे वर्णन अतिशय भावस्पर्शी समर्पक शब्दात मांडले आहे.
अहिल्यादेवींच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा पुरोगामी विचार दाखविणारा आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले होते की, “जो कोणी चोर दरोडेखोर लुटारु यांना जेरबंद करेल.त्या व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह लावून दिला जाईल. त्यावेळी जातीधर्माचा विचार केला जाणार नाही.”एवढं जाहीर करून त्या थांबल्या नाहीत तर यशवंतराव फणसे या शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अश्या कितीतरी घटना प्रसंगांतून त्यांच्या संस्थानातील कारभाराची निरपेक्षपता समजून येते.अतिशय सुंदर शब्दात अभ्यासपूर्वक ऐतिहासिक चरित्र ग्रंथ प्रकाशित केला आहे.
परिचयक :श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:२२ डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment