पुस्तक परिचय क्रमांक:१८४ श्री शंभू छत्रपती स्मारकग्रंथ




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८४
पुस्तकाचे नांव-श्री शंभूछत्रपती  स्मारक ग्रंथ 
संपादक: सुशांत संजय उदावंत 
प्रकाशन-एलोरा पब्लिकेशन नाथापुर, बीड
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती १४ मे २०२२
पृष्ठे संख्या–१४८
वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक ग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य--३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८४||पुस्तक परिचय 
             श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ 
       संपादक: सुशांत संजय उदावंत 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
तलवारीचं कलम करून सह्याद्रीच्या रणांगणांच्या कागदावर मराठ्यांनी आपल्या रक्ताच्या शाईने इतिहासातील लिहिलेला झंझावात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज!
अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या व नवनिर्माणाची आस बाळगलेल्या प्रत्येकाला स्फूर्ती देणारा कानमंत्र, म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज.पण या नावाला इतिहास लेखक आणि संशोधकांनी लावलेल्या बदनामीचा कलंक पुसण्यासाठी इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे यांना तब्बल ४२वर्षे संशोधन साधना करावी लागली.तसेच १९६०-७०च्या दशकात पीएच.डी.प्रबंधासाठी डॉ. कमल गोखले यांनी छत्रपती संभाजी महाराज हा विषय निवडून संशोधन कार्यात भर घातली.तदनंतर इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांनी ‘छत्रपती स्मारक ग्रंथ’ प्रकाशित करून ५८ लेख समाविष्ट केले आहेत.
 काही मित्रांशी व लेखकांशी चर्चा करून दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरविले.परंतु सदर लेखांक मासिक दिवाळीपुरतेच  मर्यादित राहिल म्हणून एक स्मारक ग्रंथ बनविण्याचे ठरविले आणि त्यातूनच आकारास आलेला,‘श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ’.याचे संपादन इतिहास अभ्यासक श्री सुशांत संजय उदावंत यांनी केले आहे.
 या ग्रंथाची बांधणी रंगीत छायाचित्रे प्लॅस्टिक कोटेड पेपरमध्ये केली असून मुखपृष्ठावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची रंगीत प्रतिमा असून त्यावरील ‘शिवराई’ नाणी आपले लक्ष वेधून घेतात.तर मलपृष्ठावर जरिपटक्यासह पराक्रमाच्या सोहळ्याचे आकर्षक चित्रण आहे.आणि‘ब्लर्ब’ स्मारक ग्रंथाचा आशय मृद्रांकित करतो.काही यापूर्वी झालेलं आणि सद्यस्थितीत नव्याने झालेल्या संशोधनाचा समावेश या ग्रंथात केला आहे.
       छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या दृष्टीने त्यांचे चरित्रलेखन करण्यात इतिहास अभ्यासक वा.सी.बेंद्रे,डॉ.कमल गोखले, सेतुमाधवराव पगडी, डॉ.जयसिंगराव पवार यांसारख्या दीग्गज इतिहासकारांनी खूप मोठे कार्य केले आहे.त्यांच्याएवढे ताकदीचे काम आजवर झाले नाही.संपादकीय मंडळाने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची पुनर्मांडणी या स्मारक ग्रंथात केली आहे.संपादक म्हणतात की “संत तुकारामांच्या शब्दात सांगायचे झाले तर….फोडिलें भांडार धन्याचा हा माल |मी तवं हमाल भारवाही||”
 या स्मारक ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा,शौर्य स्थळे व स्मारक स्थळांची विविध देशीपरदेशी चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्राकृतींचा समावेश केला आहे.तसेच नाणी लेखात ‘शिवराई’ नाण्यांची कृष्णधवल रेखाचित्रे आणि छायाचित्रांचाही समावेश केलाय.बुधभूषण ग्रंथाच्याहस्तलिखिताच्या पहिल्या पानाचे छायाचित्र,हा ग्रंथ ज्यांच्या हस्तलिखितांच्या संग्रहात सापडला ते डॉ.भाऊ दाजी लाड आणि बुधभूषणचे हस्तलिखित उजेडात आणणारे हरी दामोदर वेलणकर यांच्या छायाचित्राचा समावेश केला आहे. समारोपात सर्वच ऐतिहासिक साधने, संदर्भग्रंथ, पुस्तके,पत्रे यांची जंत्री आहे.
      या स्मारक ग्रंथात आपणास इतिहास अभ्यासकांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्वांगिण कार्याचे नवनवीन संशोधन केले आहे.संपदकीय सह अकरा लेखांचा समावेश केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची नाणी ‘शिवराई’हा लेख आशुतोष पाटील यांचा आहे.डॉ.अनिरुध्द उढाण यांचा ‘लोककल्याणकारी राज्यव्यवस्था आणि संभाजीराजे’.प्राध्यापक रवी बाविस्कर यांचा छत्रपती शंभुराजे यांची थोर युद्धनीती.तर नवसंशोधक प्रवीण भोसले यांचा संशोधनातून सिद्ध झालेला, ‘संगमेश्वरची लढाई आणि सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची समाधी’.केतन पुरी यांचा‘पोर्तुगीज आणि संभाजीराजे’.अमृत साळुंके यांचा छत्रपती संभाजीराजे आणि इतिहास लेखनशास्त्र.संपादक तथा लेखक सुशांत उदावंत यांचा ‘भोसले घराण्याचा साहित्यिक वारसा: बुधभूषण आणि संभाजीराजे.प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र कदम लिखित ‘शंभूराजांचे आरमार आणि जंजिऱ्याची लढाई.’ आणि सचिन परब यांचा ‘वा.सी.बेंद्रे यांचं इतिहास ‘प्रबोधन’.सर्वंच लेखना नंतर ऐतिहासिक साधने,संदर्भ ग्रंथ व पुस्तिका यांची जंत्री दिलेलीआहे.
  छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का? बुधभूषण ग्रंथात नेमकं काय लिहिलंय?आज हा ग्रंथ आहे कुठे?तब्बल नऊ वर्षे मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा? वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय? पोर्तुगीजांना कशामुळे आपली राजधानी गोव्याहून मुरगावला हलवावी लागली? संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले? त्यांची समाधी सध्या कुठे आहे? संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा वापर करावा? छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाची लेखनशास्त्र कसे असले पाहिजे ?परकीय सत्तेविरुद्ध लढताना संभाजी राजांचे आरमार कसे होते? इतिहासाचे भीष्माचार्य वा.सी. बेंद्रे यांनी १९६०साली  संभाजी राजांवरील चरित्र ग्रंथ प्रकाशित केला.परंतु या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न वा.सी.बेंद्रे यांनी केले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी संपादक सुशांत संजय उदावंत यांनी ‘श्री शंभू छत्रपती’ स्मारक ग्रंथ प्रकाशित केला आहे.यामध्ये वरील सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आपण हा ग्रंथ निश्चितच इतिहासप्रेमी वाचकांनी वाचला पाहिजे.अभ्यासला पाहिजे.यातील सर्वच लेख ऐतिहासिक साधनांचा चिकित्सकपणे अभ्यास करून,संशोधन करून अभ्यासपूर्वक खऱ्याखुऱ्या इतिहासावर प्रकाश टाकून स्वराज्याच्या कारभाराची, लढायांची,त्यांच्या न्यायाची  अंतरंगाची खरीओळख सिध्दतेसह सादर केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी  महाराजांच्या खऱ्याखुऱ्या इतिहासाची ओळख या स्मारक ग्रंथातून होते
आत्तापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे स्मरण ग्रंथ विविध अभ्यासकांनी संपादित केले आहेत.इतिहासाचे अभ्यासक वा.सी.बेंद्रे यांनी १९६० साली 'संभाजी'ग्रंथ प्रकाशित केला. बुधभूषण ग्रंथाची हस्तलिखित प्रत १९२६ साली हरी दामोदर वेलणकर यांनी प्रकाशित केली.डॉ.जयसिंगराव यांनी 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' प्रकाशित केला.बुधभूषण ग्रंथरचियेता संभाजीराजे शिवाजीराजे भोसले- अनुवादक डॉ. प्रभाकर ताकवले. संपादक -अॅड.शैलजा मोळक आणि बुधभूषण छत्रपती संभाजी महाराज- संपादक प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम.
वा.सी.बेंद्रे यांचं इतिहास 'प्रबोधन'या सचिन परब यांच्या लेखात प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रकाशित केलेल्या 'कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी'या ग्रंथात स्वाभिमानाने खरा इतिहास मांडला आहे.या पुस्तकातील बिनतोड पुराव्याला आणि कोटिक्रमाला उत्तर देण्याची खुद्द राजवाडे यांची देखील प्राज्ञा झाली नाही. असे आचार्य अत्रे यांनी फर्मास वर्णन केले आहे.या ग्रंथाचे वाचन करून निद्रिस्त जनता जागृत झाली.तसेच खोट्या इतिहासाविरुध्द झालेल्या बंडखोरीतून 'प्रबोधन'या वृत्तपत्राचा जन्म झाला.प्रबोधन वृत्तपत्रात इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे यांचा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वरील पहिला लेख प्रसिद्ध झाला होता.तसेच छत्रपती संभाजी: गोव्याच्या राजकारणाची आवश्यकता.यातील सर्वच ऐतिहासिक लेखात छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राची वास्तव माहिती आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक: १५ नोव्हेंबर २०२४

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड