पुस्तक परिचय क्रमांक:१८९ बाजार
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८९
पुस्तकाचे नांव-बाजार
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पाचवी आवृत्तीचे पुनर्मुद्रण जानेवारी २०१८
पृष्ठे संख्या–१०४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--११०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८९||पुस्तक परिचय
बाजार
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
माणसं चितारणारा लेखक अशी ज्यांची साहित्य क्षेत्रात ओळख आहे ते व्यंकटेश माडगूळकर.माणदेश तसा रुक्ष खडकाळ भाग पण संपूर्ण महाराष्ट्राला साहित्य रुपी ओलावा पुरविणारे दोन खळाळते निर्झर दिले; ते म्हणजे ग. दि .मा आणि व्यंकटेश माडगूळकर.कथा,कादंबरी,
पटकथालेखन, गीत लेखन असे चौफेर क्षेत्रात लेखणीचा षटकार मारणारे कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा माणदेशी माणसांचे स्वभाव वैशिष्टे उलगडून दाखविणारा कथासंग्रह ‘बाजार’.
खरोखरच यातील तेरा कथांचे वाचन करताना आपण तहानभूक विसरून जातो.इतकं बारकाईने,सुक्ष्मपणे त्यांनी त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या वास्तव्याच्या गावातील तऱ्हेवाईक वर्तन करणाऱ्या कष्टकरी रोजगारी लोकांचे शब्दचित्र अतिशय समर्पक,वास्तव शब्दात रेखाटलं आहे. त्यांच्या कथांतून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते.बालपणीच्या मनाला भुरळ घालणाऱ्या गोष्टी,गावच्या जंगल शिवारात शिकार करताना घडलेल्या गमतीजमती चपखलपणे रेखाटल्या आहेत.तर स्वानुभवाचे वर्तन त्यांच्या अनेक कथांतून आपणाला दर्शन घडविते. इतक्या सकस कथांची मेजवानी आपल्याला ‘बाजार’या कथासंग्रहातील कथा वाचून तृप्ती होते.
मनोकोषात विभिन्न अवस्थेत असणाऱ्या गोपा सुताराची कथा ‘पिंजरा’.घरच्या बाहेरच्या लोकांनी त्रास देऊ नये म्हणून स्वतः पिंजरा तयार करून आतमध्ये राहणारा गोपा.शेवटी पिंजऱ्यातही जख्ख होतो.तिथही त्याचं मन रमत नाही म्हणून पिंजऱ्यातून बाहेर येऊन पिंजराच जाळतो.अन् निर्विकारपणे घुशीला आसरा देणाऱ्या बीळाकडे एकटक नदार लावतो.अशी चमत्कारिक वागणाऱ्या गोपाची कथा.
शमसू मुलाणाऱ्या शिकाऱ्यांनी सावज केलेलं हरणाचं पिल्लू शेतात सापडते.ते पाळण्याचा घरातील सर्वजण विचार करत असताना मार्तंड मांजरासारखा झोपडीत येतो.ते हरणाचं पिल्लू बघून सुनावतो. कुरणात हाकारा घालून देशमुख वाडीच्या लोकांनी उठविला आहे.ते सावज हेरत येतील.तु दिलं नाहीस तर हाणामारी होईल अशी फुणगी टाकतो.जमातभाईंना मदतीला बोलवायला लावतो.आन मार्तंड गावच्या पाटलांच्या कानावर ही गोष्ट घालतो.पाटील पोलिसांना खबर देतात.
शमसूचे नातेवाईक आणि पोलिसांच्यात
धराधरी होते.तर हिकडं हरणाचं पिल्लू मरुन गेलेलं असतं.अशी नमुनेदार इरसाल कथा ‘शमसू मुलाण्याला हरण सापडले.’
देना मामाची कथा ‘गावगाडा’गोष्टीत गावच्या कारभाराऱ्यांच्या सभेची हकिकत .आपलं काम प्रामाणिकपणे करणाऱ्याला सुद्धा गाव कारभारी कसं दंड करतात ती कथा वाचताना गावगुंडी लक्षात येते.दुष्काळात माणसांच्या भुकेची कशी होरपळ होते.हातातोंडाला आलेला घास कसा दूर जातो.अन्नावर नजर ठेवून डाव साधणाऱ्या चोरट्या म्हपी कुत्रीचा आणि दत्तूची कथा.दुष्काळात माणसाला अन्नासाठी काय दिव्य करावे लागते.ते ही कथा वाचून उमगते.
खेडेगावात अचानक उंट आल्यावर मुलांचे बालविश्व कसं असतं?याची परिणीती ‘परका’ कथेतून समजते. अतिशय सुंदर शैलीत मुलांचे उंट बघितल्यावर येणारे विचार संवादातून व्यक्त केले आहेत.
शिकारी कथा ‘पकुर्ड्या’गरज असते तेव्हा शिकार पारध होत नाही अन् कोणतही हत्यार नसताना शिकार समोरच दिसते.त्या वेळच्या अवस्थेचे लेखक आणि बापू, पाटील आणि बायजा पाटलीन यांच्यातील घटनांचे वर्णन खुमासदार शैलीत केले आहे.
लेखकांचे भूमिगत चळवळीतील कामकाज करताना पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा अतिशय छान शब्दात ‘अहमद शाबाजी’कथेत मांडला आहे.हाकाऱ्याने आणि सावधपणे सावज गारद करणाऱ्या देनाचं व्यक्तिचित्र ‘देना मांग’या कथेतून प्रकटते.माणूह संगतीने कसा वाह्यात जातो. स्वातंत्र्यपुर्व काळातील आर्थिक परिस्थितीचे दर्शन या कथेत घडते.सात आठ वर्षांनी अचानक पुण्यात ‘देना’ लेखकांच्या समोर उभा ठाकतो.त्यानेही एक हत्यार घेतलेलं असते.पण ते थोडंसं नादुरुस्त झालेलं असतं.पण दुरुस्तीसाठी दूकानात ठेवून द्यायला त्याचा चक्क नकार.शेवटी तो लेखकांना म्हणतो की, ‘तुमी नका तरास करून घेऊ,आमचा पावणा हाय मुंबईला.तेच्या वळखीनं डोळ्यासमोर काम करुन घेतो.’ कुणावरही विश्वास न ठेवणाऱ्या चमत्कारिक देनाची कथा,’देना मांग’. जनावरांचा माग काढण्यात पटाईत, हजारात एखादाच असणाऱ्या धनाजीचं शब्दचित्र अतिशय छान शब्दात मांडलं आहे.त्याचं आणि ‘झ्यागीर’बैलाचं नातं कसं असावं.हे ‘धनाजी’कथेचे रसग्रहण केल्यास समजते.
शीर्षक कथा ‘बाजार’ भर श्रावणात भरलेल्या आठवडी बाजारात कोंबड्या खपविण्यासाठी मालकीन आणि सासुरवाशिण काय शक्कल लढवून नाटक करतात.अन् जादा किमतीला कोंबड्या खपवतात…
प्रत्येक कथेतून संवेदनशीलता भावभावनांची तरलता जोपासणाऱ्या व्यक्तिंच्या कथा अतिशय छान आहेत.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक -१३डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment