पुस्तक परिचय क्रमांक:१९१पांढऱ्यावर काळे
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१९१
पुस्तकाचे नांव-पांढऱ्यावर काळे
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पाचव्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण: नोव्हेंबर २०१३
पृष्ठे संख्या–१६६
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९१||पुस्तक परिचय
पांढऱ्यावर काळे
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
समाजाप्रमाणे निसर्गाकडे देखील डोळसपणे बघणारे एक उमदे व्यक्तीमत्व म्हणजे जेष्ठ साहित्यिक तथा कथाकार आदरणीय‘तात्या’उर्फ व्यंकटेश माडगूळकर.संत, शाहिरी,वाड्मय, संकीर्तन,कथा यांचे संस्कार तर वैदू, फासेपारधी,रामोशी,वाणी,सुतार,धनगर,मांग,न्हावी,कुणबी,मराठी, तेली, मुसलमान अशा सर्व अठरापगड जातींच्या लोकांच्या संगतीत त्यांचे आयुष्य गेल्याने साहित्य,चित्रकला, बोलीभाषा, यांच्या संस्काराचा वैशिष्टयपूर्ण मेळ त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि लेखनातही दिसून येतो. माणसांप्रमाणेच निसर्ग आणि प्राणीमात्रांचीही शब्दचित्रे त्यांनी कथा कादंबरीत रेखाटली आहेत. त्यांच्या कथा लेखनाचा प्रवास मराठी साहित्यात अपूर्व असा ठरला आहे.
माणसा इतकाच निसर्गही माडगूळकरांच्या साहित्यात महत्त्वाचा घटक आहे. शेतशिवार, रानावनात, जंगल भटकंती आणि शिकार करणे.आदी त्यांच्या फारच आवडीचे होते.त्यामुळे प्राणी,पक्षी,झाडे, वेली,पाने,फुले, ऋतू, यांची बहारदार वर्णने त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये ठरलेली आहेत.तसेच ग्रामीण भागातील व्यक्तिंची शब्दचित्रे रेखाटन अप्रतिम असते.
‘सत्तांतर’कादंबरीत हनुमान लंगूर या वानर जातीतील टोळ्यांचा सत्ता काबीज करण्यासाठीचा संघर्ष मांडलेला आहे.तर बनगरवाडी कादंबरीत मेंढरांची वर्णनात्मक प्रसंग अप्रतिम आहेत.हस्ताचा पाऊस या कथासंग्रहात पाळीव जनावरांची शब्दचित्रे रेखाटन कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्राकृतींप्रमाणे गारुड करते.इतक्या सुंदर सुंदर ओघवत्या शैलीतील पाळीव प्राण्यांच्या कथा ‘पांढऱ्यावर काळे’या कथासंग्रहात प्रसिद्ध केल्या आहेत.
ग्रामीण भागातील व्यक्तिंची आणि पाळीव प्राण्यांची शब्दचित्रे अतिशय समर्पक शब्दात रेखाटली आहेत.जणू काही शब्दांच्या उद्यानात अनेक फुलझाडे,वेली, फिरायला आलेली माणसं,त्यांच्या सोबतीचे पाळीव प्राणी, परिसराचं वर्णन हुबेहुब त्यांनी शब्दात चितारलं आहे.
‘पांढऱ्यावर काळे’ या कथासंग्रहात एकूण
सदतीस कथा असून कथेच्या शीर्षकाला समर्पक चित्ररेखाटनही कृष्णधवल रंगात केले आहे. एकापेक्षा एक सरस आणि वेगळ्या धाटणीच्या कथा. उसेन वैदूने पाळायला दिलेल्या कासवाची कथा मजेदार आहे.त्याचे पालनपोषण करण्यासाठी काय उपाय केले त्याची चित्तरकथा ‘प्रभुचा दुसरा अवतार’. ते त्या कासवाला अजब खेळणं म्हणायचे.तर अचानक घरात आक्रमण केलेल्या ‘गुंडू’ मांजराची कथा फारच मजेशीर आणि प्राणिमात्रांवर संवेदनशील मनाने प्रेम करणारी अन् समजून घेणारी आहे.पाळीव प्राण्याचा मृत्यूही मन हळवं करते.त्या ‘जिम’श्वानाची कथा’अकाली गेलेला जिम.त्याच्या अंतिम संस्कार केलेल्या खड्ड्यात ते प्राजक्ताचे रोपटे लावतात.श्रावणात चमकदार फुलांनी बहरून आल्यावर वाऱ्याची थंड झुळूक आली की जिमची आठवणीने लेखकाचे मन गलबलून येते. त्या जिमची यादगारी कथा तर भावस्पर्शी आहे.तर पुढे शंकर वैदू आणि त्याच्या मुलांनी डोंगरातून वागरीत पकडलेले दोन रानटी ससे दुरडीतून विकायला आणले होते.त्या गुबगुबीत रानसश्यांची कहाणी ‘आमचे पण दोन ससे’कथेत समर्पक शब्दात मांडली आहे.अतिशय सुक्ष्मपणे निरीक्षण करून लिहीलेली कथा.
डोंगरकोरेवर उड्या मारत ऐटीत चाललेला माकडांचा कळप अचानक आलेल्या आवाजाने सावध झाली.त्या संपूर्ण प्रसंगांचे वर्णन ‘भय’कथेत केले आहे.
संस्थानातील पंतांची किन्हई येथे लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचं बालपण गेलेले होतं.प्रदीर्घ वर्षाने ते त्याच परिसरात रेडिओ कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी गेले असतात.तेंव्हा ते गाव पाहून त्यांना बालपण आठवते.ते ‘हरवलेले बालपण’ या कथेत व्यक्त केले आहे. अतिशय सुक्ष्मपणे त्यांनी केलेल्या कथेचे रसग्रहण करताना प्रत्यक्ष गावाला भेट दिल्याचे समाधान लाभते.
शालेय वयात जत्रेचे आकर्षक वाटत विलक्षण असते.आटपाडी ते दिघंची हे कित्येक मैलाचे अंतर सलग पाच दिवस जाऊन येऊन करून शाळा ही केली आणि रात्रीचा जत्रेचा आस्वाद घेताना काय काय केले त्याची कहाणी ‘दोन महापुरुष’.
लेखक महाशयांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी घेतला होता.तेंव्हा कोल्हापुरात ते दादांकडे राहत होते.त्या घरी पोलिस चौकशीला आले होते.तेंव्हा त्यांना माडगूळकर कुठे राहतात?असं पोलिसांनी विचारल्यावर ते म्हणाले,’इथंच राहतात. बोळात जाऊन चौकशी करा.’मग काय घडले त्याचे सविस्तर वर्णन ‘पण ते कुठे आहेत’.या कथेत केले आहे.तसेच् त्यांची पटकथा,ग्रहफल,एकमत,नकार आणि मी गोष्टी कशा लिहितो? याही कथा अफलातून आहेत.
नाटक लेखनाचा किस्सा,कवीने केलेला पाहुणचार,साहित्याचे भावविश्व, आषाढ श्रावणात सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे घरात आलेला उंदीर घालविण्यासाठी काय करावे लागले? पुण्यात काय पहावे? अश्या कथा आहेत.
सगळ्यात कोटी म्हणजे लेखकदर्शन कथा.जसे पक्षी जगतातील माहितीचा प्रकल्प करतात.तसं लेखकांचे लेखन पध्दतीचे विविध नमुने आकार, दर्शन, आढळ,सवयी आणि उत्पादन या सदरात केले आहे.पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी, मध्यमवर्गीय,झोपडपट्टी,ग्रामीण,बाल आणि भरड इत्यादी लेखकांचे नमुने वाचताना फारच वेगळेपण जाणवते.
त्याच बरोबरीने रस्ता,भाषण देण्याचा प्रकार,पुणेरी रिक्षावाला,आकाशवाणीचे आबा,तळ्याच्या काठी, माकडास पाहून ,घर आणि जंगल,एक प्रवासवर्णन या कथांमधून प्राणी पक्षी निसर्ग आणि माणसं प्रतिबिंबित होतात अन् अंतरंगातील स्वभाव वैशिष्टे उलगडली आहेत….
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:२४डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment