पुस्तक परिचय क्रमांक:१८८ टारफुला






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८८
पुस्तकाचे नांव-टारफुला
लेखक: शंकर पाटील 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण सप्टेंबर२०१७
पृष्ठे संख्या–२८८
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८८||पुस्तक परिचय 
             टारफुला
       लेखक: शंकर पाटील 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚
ग्रामीण जीवनातील परिवर्तनाची एक अस्सल मराठमोळी झलक ‘टारफुला’त प्रकटते. तिच्यातील मराठी सिनेमाच्या पटकथेसारखी दृश्यवार मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते.इतकं सुरेख शैलीत लेखन केले आहे.सत्ता मिळवणे आणि त्या सत्तेच्या बळावर आपणच निर्माण केलेल्या तरुण कार्यकर्त्यांकडून आपल्या सत्तेला आव्हान मिळणे; एका खेड्याच्या संदर्भात हे सत्ताचक्र कसे काम करते हे कथाकार शंकर पाटील यांनी या कादंबरीत दाखवले आहे.
 ‘टारफुला’ या कादंबरी विषयी लेखक शंकर पाटील 'पाटलांची चंची'या कथासंग्रहातील 'असेही काही प्राध्यापक' या कथेत त्यांनी कादंबरीचा घडलेला किस्सा शेअर केला आहे.
टारफुला या कादंबरी विषयी लेखक शंकर पाटील 'पाटलांची चंची'या कथासंग्रहातील 'असेही काही प्राध्यापक' या कथेत पान क्रमांक:१४वर नमूद केले आहे.त्यांनी कादंबरीची हस्तलिखित प्रत प्राध्यापक महाशयांना अभिप्रायासाठी दिलेली असते. काही दिवसांनी आठवणीत आल्यावर ते  प्राध्यापकांच्या घरी जातात.त्यावेळी प्राध्यापक त्यांना म्हणतात की,"नुसतं शब्दांचं भरताड म्हणजे कादंबरी नव्हे. तुम्ही लिहायच्या आधी नामवंत लेखकांच्या कादंबऱ्या वाचा."अशा महाशयांपुढे काय बोलावे? शंकर पाटील पुढे म्हणतात की,"मी १९६० साली 'टारफुला' कादंबरी लिहिली.पण तिचं मनाजोगते रसिकांनी स्वागत केले नाही. पण १९८०साली तिचं पुनरुज्जीवन झालं.कारण मराठवाडा साहित्य परिषदेने गत पन्नास वर्षांतील पंचवीस कादंबऱ्यांची निवड करुन त्यांच्या परिचयाचा एक 'कादंबरी' विशेषांक काढला आणि त्यामध्ये टारफुलाचा समावेश केला होता.तदनंतर माझ्या कादंबरीला वाचक रसिकांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.कथालेखक शंकर पाटील यांनी या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केला आहे.तसेच टारफुला कादंबरी तील नागू पैलवानाची व्यक्तिरेखा त्यांना ताराबाई पार्कातल्या भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांना मदत करणाऱ्या सरदारजीच्या घरात जेवायला बसलेल्या पंगतीत सापडल्याचे 'पाटलांची चंची' यातील 'मी एक भूमिगत'या कथेत नमूद केले आहे.
 'टारफुला'या शब्दाचा शब्दशः अर्थ जोंधळा,ऊस या पिकांत उगवणारी एक वनस्पती.ही दुसर्‍या झाडांत आपल्या मुळ्या खुपसून स्वतःचा निर्वाह करते व दुसर्‍या पिकाचा नाश करते.
या कादंबरीला जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची स्पष्ट आणि सडतोडपणाची प्रस्तावना लाभली आहे.सुक्ष्मपणे आणि तपशीलाने त्यांनी कादंबरीची प्रस्तावना रेखाटली आहे.‘टारफुला’ एका खेड्यातील परिवर्तनाचे चक्र चित्रित करते.तिचे आशय सूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देते.एका गावाच्या बेबंधशाहीतून,सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे. हे खरे तर १९६४च्या सुमारास सबंध देशाचे रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नैतिक तपशील या कादंबरीत आहेत. एका जबर शासनाच्या अस्तित्वा शिवाय असा समूह नीट चालत नाही.हे  एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतीदायक  बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविलेले आहे.गावातल्या विविध कुटुंबातील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इत्यादी प्रत्येक तपशीलातून जबाबदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथन शैलीचा नमुना आहे.सबंध गावातील व्यवहारांच्या भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलांनी जम बसपेपर्यंत चिरेबंदी रूपात मांडली आहे.’
 टारफुला हे सत्तासंघर्षाचे प्रतिक आहे. गायकवाड,पवार ही सुभानराव पाटलांच्या 
विरोधातली सत्ताकांक्षी मंडळी.सत्ता, सत्ताविरोध, सत्तासंघर्ष,सत्तेचे हस्तक या सगळ्याच गोष्टी गावाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या ठरतात. म्हणजे सगळेच टारफुला होऊन जातात.सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार आहेत.तेच रुबाबात जगतात.खर तर सत्तासंघर्ष शेवटी गावाला सर्वनाशाच्याच कड्यावर आणून उभा करतो.नायक म्हणून खेडेच असून संपूर्ण खेड्याचे शब्दचित्र मांडले आहे.छोट्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांमधून एक समग्र खेडेच ध्वनित केले आहे.तीन भागात ही कादंबरी आहे.
माणसं बदलतील,पिढ्या बदलतील, संघर्षाचे रुप बदलेल,परंतु गावाचे अस्तित्व धोक्यात आणणारा ‘टारफुला’च उदयाला येतो.सत्ताधारी आणि सत्ताविरोधक हे दोघेही या कादंबरीत शेवटी टारफुल्याच्या रुपातच परिवर्तित होताना दिसतात.संपूर्ण एका खेड्याचे क्रमाने घडणारे परिवर्तन शंकर पाटील यांनी ‘टारफुला’कादंबरीत प्रकट केले आहे.
 अतिशय सुंदर कादंबरी.आजच्या घडीला गावच्या राजकारण्यांचे राजकारण उलगडून दाखविणारी आहे.
पुस्तक परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक -१०डिसेंबर २०२४






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड