पुस्तक परिचय क्रमांक:१९०भेटीगाठी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१९०
पुस्तकाचे नांव-भेटीगाठी
लेखक: शंकर पाटील
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसऱ्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण जून २०१८
पृष्ठे संख्या–१२०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--११०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९०||पुस्तक परिचय
भेटीगाठी
लेखक: शंकर पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
कथाकार, लेखक शंकर पाटील यांच्या कथा; गावरान अस्सल मराठी कथांचे लेणे आहे. गावगाड्यातील नमुनेदार इरसाल, मासलेवाईक आणि तऱ्हेवाईक माणसांचे स्वभाव वैशिष्टे उलगडून दाखवितात. त्यांच्या कथागोष्टीतून ग्रामीण भागातील माणसांच्या मनाची भाषा कथांतून उमगते. त्यांच्या अंतरंगाचे वर्णन ढंगदार आणि ग्राम्य शैलीत असते. ते वाचताना मनाला भुरळ घालते.कथा वाचल्यावर आनंद मिळतो.त्यांच्या कथा मनोरंजन करता करता सामाजिक जाणीव जागृती निर्माण करतात. सगळ्याच कथा एखाद्या गावच्या चावडी अथवा गप्पांच्या गुऱ्हाळात गोष्टीवेल्हाळ आजोबा नवलाईची कुतूहल निर्माण करणारी गोष्टच सांगतायत असं वाचताना भासतं. कथासंग्रहाच्या साहित्यरत्नांतील खास कथासंग्रह 'भेटीगाठी'खेड्यातल्या इरसाल, मासलेवाईक, नमुनेदार व्यक्तिंची ओळख अधोरेखित करणारा कथासंग्रह.
कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर शेतकऱ्यांची खरी दौलत बैलाचे चित्र, गावातील घर आणि बैलगाडीचे उठावदार चित्र लक्ष वेधून घेते.ते पाहिले की या पुस्तकातअस्सल गावरान कथेची मेजवानी कथा लेखक शंकर पाटील यांची निश्चितच असणार.
तेरा कथांचा संग्रह ‘भेटीगाठी’ यात शब्दांच्या गावची पाटीलकी लाभलेल्या साहित्यिक शंकर पाटील यांनी एकापेक्षा एक सरस,वरचढ,सकस आणि गावरान कथांची मेजवानी आपल्याला दिली आहे.
लोडणा,खलिता,शेर,व्हला,वसुली,एका उन्हाळ्याची गोष्ट, शेतकऱ्यांचा राजा, जोडणी,पोर,सय,धडा आणि भेटीगाठी.
नावडती बायको बाजीरावाच्या गळ्यात
आबांनी बांधली म्हणून बायकोचा सतत छळ तर सतत कामात ठेवणारा बाजीराव.त्याच्या पाताळयंत्री स्वभावाची कथा ‘लोडणा’.वाचताना आपल्याच अंगावर काटा उभा राहतो.
घरी आलेलं पत्र नेमकं कश्याचं आहे. कुणाकडून आले आहे.याचा गंधही नसणारे आबा.पत्र कुणाकडून वाचून घेतले तर गावभर चर्चा न होता फक्त वाचणारा आणि आपल्यातच राहिल. सगळ्यांना भानगड समजेल म्हणून पाहुण्यांच्या गावाल्या गेलेल्या मुलाकडे जाऊन पत्र वाचून घेतात.त्याची गोष्ट ‘खलिता’.पोरगं आजारी पडल्यावर औषधोपचार करायचा असतो ते सोडून आपण सांगू तसंच पोराने वागले पाहिजे असे पटवून सांगणाऱ्या आडदांड काकांची अन् शिकलेल्या पुतण्याची संवादातून व्यक्त झालेली कथा म्हणजे ‘शेर’.बैलाच्या एकमेकांना मिळालेल्या शिंगातून व्हला गेला तर बैल जास्त दिवस जगत नाही.तो विकण्यासाठी नामी शक्कल लढविणारे तिपन्न,डिगा आणि त्याची आई यांची कथा.आपल्या मेव्हण्याच्या गळी बैलं घेण्याचा प्रयत्न कसा उतरवतात त्याची ‘व्हला’कथा आपल्याच फायद्यासाठी इतरांचे नुकसान होते.याची कदर नसते.हे पटवून देणारी कथा आहे.
रामा परटाने सरावण्याला उसनवारी दिलेले पैसे मिळवण्यासाठी काय काय यातायात करावी लागते त्याची कथा ‘वसुली’एखाद्याच्या गरजेला उपयोगी पडलेल्या माणसांकडे कानाडोळा केला जातो. नुसतेच म्हणतात देतो म्हणून पण ठेंगाच दाखवतात.
बैलगाडी शर्यतीचा नाद असणाऱ्या हरबाची शौकिनता सुंदरश्या शब्दात ‘नाद’ कथेत रंगवली आहे.शर्यतीपायी जमिन घरदार विकायला लागलं तरी हौस फिटना.
जत्रेतील खाऊ मुलांना घेण्यासाठी हरबा लेखकांना एक रुपया मागतात.ते देतात. तोच रुपया घेऊन हरबाने गाड्यांच्या शर्यतीसाठी प्रवेश फी भरुन नोंदणी केली होती.त्याचा शर्यतीचा नाद आणि बैलांची माहिती छानच रेखाटलीय. नाठाळ, अरेरावी, शिरजोरी आणि खोडील स्वभावाच्या परश्या आणि महादाची कहाणी‘एका उन्हाळ्याची गोष्ट’.
शेतकरी अन् बैलांचं नातं कवीवर्य श्री.द. इनामदार यांच्या ‘बैलांचे ऋण’या कवितेचे स्मरण ‘शेतकऱ्यांचा राजा’या कथेचे रसग्रहण करताना लक्षात येते.
तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥
नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥
अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥
बशा बैल म्हणून सर्जाचे नाव बद्दू झालं. म्हातारपणी त्याच्या गुणाला बट्टा लागला.सगळ्यात सुंदर कथा आहे.
शेतकरी राजाला त्याची बैलं जीव की प्राण असतात.अपान्ना खोताचा ऐन उमेदीतला चौसा खोंडसर्जा पंचक्रोशीत बघतच रहावा असा होता.तो सरावण्या विकत घेतो. त्याला मोट,गाडी अन् औत ओढण्याची सवय लावतो.औतकामात तयार झाल्यावर त्याला सरावण्या बाजार दाखवू लागला. एका गावच्या पाटलाने त्याला खरेदी केले.मग सर्जावर पाटलांची मर्जी बसली. तो डिरक्या मारायचा,खुट्याला धडका मारायचा, दावणीतली वैरण शिंगांनी फेकायचा अन् आपल्याच धुंदीत वागायचा.मग एक दिवस त्याची खच्ची केली.मग तो मोट ओढायचा, नांगरट करायचा,पेरणी करायचा,मळणी करायचा.अशी वर्षानुवर्षे काम करत होता.मग मोट बंद झाल्यावर त्याला पाटलाने बाजार फिरवायला सुरुवात केली.एका हमालानं
सर्जाला विकत घेऊन ओझ्याच्या गाडीला जोडलं.त्याच्या उतारवयातही त्याला गाडी ओढावी लागत होती…असं सुंदर शब्दांकन‘शेतकऱ्याचा राजा’या कथेत सर्जा बैलाच्या आयुष्याचा प्रवास अधोरेखित केला आहे.
इरसाल आणि कावेबाज तुकाची कथा ‘जोडणी’तर साध्याबोळ्या सखुबाला जोतिबाच्या डोंगरावरून येताना निवडुंगाच्या गचपनात टोपलीतलं पोरगं रडत असतं ते आवाजाच्या दिशेने गेल्यावर दिसते.त्या लहान लेकरास घरी घेऊन गेल्यावर काय घडतं.ते सांगणारी कथा ‘पोर’.मंडपे अण्णांचे एसटीतून प्रवास करताना खिसा कापला जातो. तिनशे रुपयांवर खिसेकापूने डल्ला मारला असतो.हे लक्षात आल्यावर काय घडामोडी घडतात.गावातली लोकं काय उपदेश करतात त्याची कथा ‘धडा’.तर कथासंग्रह शीर्षक कथा असणारी ‘भेटीगाठी’.आई मरणाच्या अंतिम क्षणी मुलांची वाट बघत असते.गतप्राण अवस्थेत घरातल्या नातेवाईकांचा संवाद मांडला आहे.
अतिशय सुंदर आणि ग्राम्य शैलीतील कथा संग्रह वाचनिय आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:१८ डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment