पुस्तक परिचय क्रमांक:१८१ आनंद पेरीत जाताना
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८१
पुस्तकाचे नांव-आनंद पेरीत जाताना
लेखकाचे नांव-दयानंद घोटकर
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती जून २०२४
पृष्ठे संख्या–८४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८१||पुस्तक परिचय
आनंद पेरीत जाताना
लेखक: दयानंद घोटकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना संस्कारक्षम होण्यासाठी विचारांचे सौंदर्य कथांमधून ओतप्रोत भरलेले आहे.ते पुस्तक ‘आनंद पेरीत जाताना’ सेवानिवृत्त उपक्रमशील विद्यार्थीप्रिय अध्यापक तथा लेखक दयानंद घोटकर यांनी प्रकाशित केले आहे.सुंदर आकर्षक आणि समर्पक मुखपृष्ठ तर मलपृष्ठावरील प्राध्यापक रवींद्र कोठावदे यांचा ‘ब्लर्ब’आशयप्रधान आहे.
अध्यापनात विविधता आणून ते अधिक प्रभावी कसे करता येईल?याचा वस्तुपाठ यातील कथांमधून उलगडून दाखविला आहे.विद्यार्थांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची जडणघडण होण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी काय करावे? यांचे समुपदेशन करणारे ‘आनंद पेरीत जाताना’हे पुस्तक आहे.लेखक तथा शिक्षक बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले अध्यापक आहेत.
आरंभिक लेखात कथांची आशयघनता प्रा.रवींद्र कोठावदे यांनी अधोरेखित केली आहे.तसेच महान विभूतींचे विचार छोट्या छोट्या प्रसंगातून कथेत समावेश केल्याने कथा रंगतदार झालेल्या आहेत. छोट्या छोट्या कथांतून आनंद पेरण्याचे मौलिक कार्य लेखकांनी केले आहे.
या पुस्तकातील चौदा लेख विद्यार्थ्यांना संस्कारक्षम अनुभूती देणारे आहेत. नैतिकमूल्ये, संस्कार जबाबदारी याकडे लक्ष वेधणारे अनौपचारिक शिक्षण,राष्ट्रप्रेम, सामाजिक दृष्टीकोन, कर्तव्याची जाणीव करून देणारे हे पुस्तक छोट्या घटना प्रसंगातून वैचारिक मंथन करायला लावणारा आशय आहे.व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांवर आधारित कथा गोष्टीत आहेत.
मुलांना या गोष्टीतून आपण कसे वागावे? याचाही उलगडा होतो.शाळेतील मुलांना खरं तर यातील सर्वच गोष्टी परिपाठात वाचून दाखविण्यासारख्या संस्कार आणि मूल्यकथा आहेत.सर्वंच शैक्षणिक मूल्यांचा समावेश केला आहे.
गणपती बाप्पा मोरया,आनंदी फुले, आम्ही सारे खवय्ये,मातीआहे संपत्ती,इकोफ्रेंडली बाप्पा, मायबोली, सन्मान, प्रार्थना,छंदाचे पुस्तक, शिक्षा, अलौकिक सिद्धहस्त, खेळ, मनाचे आरोग्य आणि संगीत.यातील माती आहे संपत्ती ही अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.निसर्ग आणि भूमीचे सौंदर्य माती कशी खुलवते याचे वर्णन मनाला भावते.माती जीवनदायिनी आहे.वंदे मातरम्, सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम.शेतकरी आणि मातीच् नातं अधोरेखित करणारा लेख आहे. मातीशी आपलं नातं जपून ठेवण्यासाठी अनेक उत्सवात सणात मातीचे दिवे(पणत्या) लावतात. मातीचे किल्ले अन् मातीचे सैनिक आणि चित्रं असतात.तर मनाचे आरोग्य शुचिर्भूत होण्यासाठी दररोज प्रार्थना म्हणणे. मन शुध्द राहण्यासाठी दिनचर्येत प्रार्थनेला महत्त्व आहे.यातील ‘छंदाचे पुस्तक’ही कथा पर्यावरणाचा संदेश देणारी आहे.प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेला स्वानुभव निबंधात रेखाटला आहे.छोट्याशा कृतीतूनही मोठं कार्य कसं होतं याचे उत्तर देणारी ही कथा आहे. साहित्य संगीत कला क्रीडा याद्वारे मानसिक आरोग्याचा विकास करण्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे.हे पटवून देणारी कथा आहे.
या पुस्तकातील काही कथांना सत्यतेचा व वास्तवतेचा स्पर्श आहे.यातील 'आम्ही सारे खवय्ये'ही कथा आहे ,उरलेल्या अन्नाचा गरजेपोटी उपयोग करून मुलीने बनविलेल्या पराठ्याची. ही कथा स्वावलंबन शिकवते.गरीब घरातील बहुतांश स्त्रिया आदल्या दिवशी उरलेल्या भाजी भाकरीचा उपयोग एखादा पदार्थ बनवायला किंवा तसेच खाण्यासाठी उपयोग करतात.हे सत्य आपण नाकारू शकत नाही.ही कथा मनाला स्पर्शून जाते.विचार करायला भाग पाडते.
समारोपात लेखकाचा साहित्य आणि शैक्षणिक परिचय असून त्यांना सन्मानित केलेली मानांकने त्यांच्या कार्याची ओळख करून देतात.रसिक वाचकांना विशेषतः विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचा अनुभव देणाऱ्या ‘आनंद पेरीत जाताना' या पुस्तकातील कथा आहेत.
अतिशय सुंदर शब्दात संस्कार कथा गुंफलेल्या आहेत.
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४
Comments
Post a Comment