पुस्तक परिचय क्रमांक:१८२ रानफुलांचा झुला




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८२
पुस्तकाचे नांव-रानफुलांचा झुला 
लेखकाचे नांव-प्रा.सुहास बारटक्के 
 प्रकाशन-मधुराज पब्लिकेशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती जून २०१७
पृष्ठे संख्या–५४
वाड़्मय प्रकार-ललित कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८२||पुस्तक परिचय 
            रानफुलांचा झुला 
        लेखक:प्रा.सुहास बारटक्के 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
अवतीभोवती सहजपणे भेटणाऱ्या, दिसणाऱ्या,लक्ष वेधणाऱ्या फुलांचा ललित रम्य परिचय करून दिला आहे.मुलं आणि फुलं याचं नातं अनमोल आहे.सर्वांना टपोरी फुलं आणि सुहास्य वदनाची मुलं आवडतात.सौंदर्य, सुगंध आणि पावित्र्य यांची गुंफण करून अनुभवसंपन्न फुलांचा महोत्सव ‘रानफुलांचा झुला’या आवृत्तीचे रेखाटन आणि दुर्मिळ छायाचित्रे समाविष्ट करुन निसर्गाचे सौंदर्य प्राध्यापक सुहास बारटक्के यांनी गुलदस्त्यात बहरवले आहे.
नेत्रदीपक आणि मनाला भुरळ घालणारी फुलझाडांची रंगीत छायाचित्रे आहेत.
आकर्षक आणि समर्पक असं पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.पाहताक्षणीच आपण पुस्तकाच्या प्रेमात पडतो.काटेसावरीच्या फांदीवर उमटलेल्या गुलाबी फुलातील मध चोसायला जाणारा छोटासा पक्षी, पिवळ्या धमक सोनेरी फुलांचे मनमोहक ताटवे आणि तजेलदार हिरव्या पोपटी रंगाच्या कॅनव्हासवरील छायाचित्र अप्रतिम आहे.
फुलांचे आगळेवेगळे स्वरुप,त्यांची वैशिष्ट्ये आणि औषधोपचार यासाठी परोपकारी असणाऱ्या सतरा फुलझाडांची महती ‘रानफुलांचा झुला'या पुस्तकात आपणास वाचायला मिळते.सदरची माहिती सहज सुंदर आणि ओघवत्या शैलीत मांडली आहे.
  या शब्दगंधित पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक पद्मविभूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी अतिशय सुंदर शब्द फुलोऱ्यात सजविली आहे. ‘रानफुलांचा झुला'हा वाऱ्यासंगे हळुवार झोके घेत असतो.ती फुले झुलत असतात.डुलत असतात. झुलणं ही आत्मानंदाची मुद्रा होय.अनूभूतीत झुलणे उरते,झुलणारा उरत नाही.इथं पाहणाऱ्याला वाचणाऱ्याला स्पर्श होतो आत्ममग्न झुलण्याचा.खर तरं हे पुस्तक आपल्याला परिचयातील फुलांची ‘निसर्गयात्राचं’करते.आपल्या अवतीभोवतीच्या आणि सह्याद्रीच्या कुशीतील रानफुलांची सफर लेखक प्रा. सुहास बारटक्के घडवितात.यातील लेख यापूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाच्या ‘किशोर’मासिकात प्रसिद्ध झालेले आहेत.ही फुलं आपल्याला आल्हाद देतात.परंतु सर्वसमावेशक माहिती आपल्याला फुलांची नसते.ती परिपूर्ण करण्याचं काम चिकित्सकपणे अभ्यास करून, जंगलात भटकंती करुन आणि फोटोग्राफी करुन शब्दचित्रांची मोहर उठवून उठावदार केले आहे.अनेक फुलांची नावं ते उपयोग नव्याने समजतात.
   आजच्या किशोरवयीन मुलांना फुलांच्या गोष्टी ठाऊकच नाहीत.त्या ज्यावेळी समजतात,तेंव्हाच फुलझाडांविषयी प्रेम वाटू लागतं.आजच्या मुलांना अवती भोवतीच्या फुलझाडांविषयी प्रेम निर्माण व्हावं.माणसाचं अन् झाडाचं नेमकं नातं काय याचा बोध व्हावा.यासाठी या पुस्तकाचे लेखन केले आहे याचा उल्लेख आवर्जून ब्लर्बच्या समारोपात केला आहे.
अनुक्रमणिकेत सतरा शब्दांचे गुलदस्तेपर लेख आहेत.’पाणफुगे’लेखात बालपणी पाटी पुसण्यासाठी वापरलेल्या फुले सदृश पुष्पमुकुट फुलांचा उपयोग वाचकांना बालपणीच्या आठवणींच्या वर्गात घेऊन जातो.’वनाग्नी पेटला’यातील पळसाच्या फुलांचे वर्णनात्मक लेखन तर बहारदार केलेआहे.करवंदाची चविष्ट चांदणं फुलं, ‘बांबूचं फुलणं’या लेखातून वाचकांना नवीन माहितीची भर घालते.यातील बांबूच्या फुलांचे फोटो दुर्मिळ आहेत. प्रथमच पहायला मिळाले.लाजाळूची न लाजणारी फुलं आणि अग्निशिखाची रंग बदलणारी फुलं हे लेख वाचताना त्यातील आशय आपणास फुलांचे वर्णन,गंध,रंग आणि औषधी गुणधर्माची महती सांगते. तर पुढे घर आणि शेतीच्या कुंपणासाठी वापरली जाणारी घाणेरी,कारवीच्या फुलांची निळाई,हजारी मोगरा, सुरंगीचे वळेसर, वसंतऋतूत रंगांची पंचमी साजरी करणारे शेवर,पांगारा आणि पळस,तसेच वसंत ऋतूत फुललेल्या फुलांचा रंगतदार लेख ‘फुलला वनीं वसंतबहार,सडा वाघापूर पठारावरील फुलांचा सडा,कासचे सौंदर्य,सुवासिक फुले आणि कोकणातील वणवे आदी लेखांना ‘रानफुलांचा शब्दरुपी झुला’ शब्दांक्षरांच्या लेखणीने झुलत राहिला आहे.अप्रतिम शब्दांकन केले आहे.घरातील फुलबागेतील गमतीदार प्रसंगांचे वर्णन केले आहे.निसर्गातील फुलझाडे आणि माणसांचे नातेसंबंध अधोरेखित करणारे सर्वंच लेखन आहे. फुलांची फोटोग्राफी तर अप्रतिम आहे. शाळेच्या ग्रंथालयात मुलांसाठी माहितीपर वाचनिय पुस्तक आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक:१० नोव्हेंबर२०२४ 


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड