पुस्तक परिचय क्रमांक-७५ परिमळ काव्यसंग्रह
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-७५
पुस्तकाचे नांव--परिमळ-प्रातिनिधीक काव्यसंग्रह
संपादकाचे नांव--दीपक चिकणे
प्रकाशक-प्रमोद प्रकाशन,नेर्ले
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी २०२०/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-८०
वाङमय प्रकार ----काव्यसंग्रह
मूल्य--८०₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖
७५|पुस्तक परिचय
परिमळ
संंपादक --दीपक चिकणे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
सह्याद्रीच्या कुशीत घनदाट निबिड करण्यात वसलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटनसाठी फेमस असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील खेडोपाडी ज्ञानसेवा करणाऱ्या प्राथमिक गुरुमाऊलींच्या काव्याचा आविष्कार 'परिमळ' काव्यसंग्रह आहे.ज्ञान सेवेच्या साधने बरोबरच संवेदनशील मनाच्या शिक्षकांच्या स्वरचित काव्यस्वरांचा हा प्रातिनिधीक स्वरुपातील काव्यसंग्रह होय.
प्राथमिक शिक्षकांच्यातील गुणांची पारख करून त्यांना लेखणी आणि वाणीतून व्यक्त व्हायला लावण्याची किमया साधणारे किमयागार आमचे आदरणीय प्रेरणास्थान आणि साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक सन्माननिय दीपक चिकणे केंद्रप्रमुख , महाबळेश्वर यांनी गुरुमाऊलींच्या रुपातील काव्यताऱ्यांना अन् तारकांना एकत्र गुंफून त्यांच्या काव्यांचा गंध 'परिमळ' काव्यसंग्रहातून रसिक श्रोत्यांना शब्दसुगंध पुस्तकरुपात उपलब्ध केला आहे.
१०नोव्हेंबर २०२० रोजी छांदिष्ट समूहातील अवलिया काष्ठयशिल्पकार रमेश जावीर सरांचे संग्रहालयास भेट द्यायला मित्रगण गेलो होतो.त्यावेळी संपादक दीपक चिकणे साहेबांनी गणपती बाप्पा आणि 'परिमळ' काव्यसंग्रह भेट देऊन सन्मानित केले होते.
मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर तापोळा येथील मनाला भुरळ घालणारा शिवसागर जलाशयाचे नयनरम्य दृश्य रेखाटले आहे.तर मलपृष्ठावर महाबळेश्वर तालुक्यातील आदर्श शिक्षक कविवर्य संतोष ढेबे यांची परिमळ काव्यसंग्रहाची महती अप्रतिम शब्दालंकारात गुंफली आहे.ते म्हणतात," दाट धुक्याची चादर ओढून निजलेल्या सह्यगिरीच्या डोंगररांगा श्रावणातल्या नव्या नवलाई अन् उन्हाने न्हाऊन निघतात. सृष्टीच्या कुंचल्यातील सारेच रंग हिरवाईच्या समृद्ध रंगात ओतप्रत भरतात. तेंव्हा याच डोंगरदऱ्यातील ज्ञानाचे भांडार रिते करण्यासाठी गुरुमाऊली सतत धडपडत असतात.
संवेदनशील मनाच्या गुरुमाऊलींनीऋतूबदलांचे प्रत्येक पान न्याहाळताना निसर्गाविषयीचे प्रेम काव्यातून व्यक्त करताना,काव्यधारांची बरसात मुक्तपणे उधळली आहे. सोसाट्याचा वारा, अन् दरीतून बागडणारा धुक्याचा हळूवार दरवळ, श्रावणातल्या उन्हात बरसणाऱ्या जलधारा, झुळझुळ वाहणारे निर्झर,कडेकपारीतूनलोळण घेत शुभ्र तुषार उडविणारे अल्लड धबधबे.
हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरा पाहिल्यावर शब्दांच्या उद्यानातील भ्रमरांनी मुक्तपणे आपला गुंजारव करत साधलेला काव्यस्वर अद्वितीयच म्हणावा लागेल. कडेकपारीत ज्ञानाचे मळे फुलवणारे महाबळेश्वर,पाचगणी व शिवसागर जलाशयाच्या परिसरातील गुरु माऊली जेंव्हा काव्यातून व्यक्त होतात. तेव्हा नकळत निसर्ग प्रेमाचा परिमळ त्यांच्या कवितेतून दरवळत राहतो सर्वांसाठीच…"
इतकी उत्कटतेने प्रशंसा 'परिमळ' काव्य संग्रहाची केलेली आहे.
या काव्यसंग्रहाचे संपादक केंद्रप्रमुख दीपक चिकणे वेळापूर यांनी कवी मनाच्या शिक्षकांचा सन्मान करुन ते म्हणतात की,"महाराष्ट्राच्या चेरापुंजीत कोसळणाऱ्या पाऊसधारांची पर्वा न करता इथे रमलेल्या कवींच्या काव्यसंग्रहात बालकवींच्या कवितातील निसर्गाचा परिमळ इथे वाहताना दिसतो.
रिमझिमणारा पाऊस, आपली शाळा, समाजातील विषमता,सामाजिक जाणिवांचे भान, निसर्गाची विविध रूपे,कविंचा विद्रोहीपणा आणि चारोळ्यातून गुरुजनांचे व्यक्तिमत्व साकारले आहे.तसेच नवोदित कवि-कवयित्रींच्या मनातील भावनांचा सन्मान केलेला आहे."
एकंदर सतरा कवि-कवयित्रींच्या काव्याचा सुगंध परिमळ काव्यसंग्रहात समावेश केला आहे.नव कवींची रचना वेगवेगळ्या शब्दकळेत आपणाला भेटते.प्रत्येक कवीचं मनातलं हितगुज कवितेतील रचनेतून उलगघडत जाते.
विविधांगी विषयाच्या कवितासंग्रह आहे.
तायघाट शाळेतील कवयित्री सौ.योगिता राजकर मॅडम यांनी 'सांज…,सांज अबोली,उदास सांज,सावळी सांज आणि ती लावते'...या सायंकाळच्या दृश्याचे वर्णन कवितेत उमटलेले आहे.त्यांच्या नजरेतून सांजचं काव्य छानश्या पंक्तीत गुंफले आहे.रचनेतील ओळी मनाला रुंजी घालतात.
काजव्यांसोबत
जरा आनंदली…..
थरथर सावल्यांची
अलवार विसावली ….
सांज अबोल अबोली
हसू असू खेळवत
एक पान दिवसाचे
मिटतेय अलबत….
किती सुखद रचना आहेत.
छांदिष्ट समूहातील सदस्या सौ नजमा कुरेशी मॅडम गिरीस्थान नगरपालिका शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आहेत.यांच्या रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.'पाऊस' कवितेत त्या बरसणाऱ्या पावसानं हिरव्या झालेल्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करतात.तर 'मन' कवितेतून आयुष्यातील सुख दुःखाच्या हिंदोळयाची रंगछटा मांडतात.मनाला त्यांनी दवबिंदू,बालक,पावसाची सर, फुलपाखरू,मोरपिस आणि हिमालयाची उपमा दिली आहे.'सखी'काव्यातून गंधित करणाऱ्या फुलांच्या गुणांची उधळण करतात.तर 'उतराई' कवितेतून माथेरान येथील माहेरच्या ज्ञानमंदिराचा ऋणानुबंध जपला आहे.
कळमगांव येथील कवयित्री सौ.अश्विनी जाधव मॅडम 'सखी' कवितेतून महिलांचे सक्षमीकरण मांडतात.स्त्रियांच्या मनसौंदर्याची भाष्यरचना सुंदर शब्दात गुंफली आहे. स्वप्न,तुझी सय,प्रीत वेडी धरा…. आणि आई,या कविता वाचताना लेखणीचे सौंदर्य दिसून येते.आई..दोन शब्दांत जग व्यापणारा अर्थ कवितेतून संचित केला आहे.
प्राथमिक शाळा शिंदोळा येथील कवयित्री शिक्षिका सौ. रुपाली कारंडे यांच्या काव्यपंक्ती रसास्वाद घेताना मनाचा ठाव घेतात.शब्दगंध कवितेतील
शब्दगंधाची उधळण व्हावी...
कार्याची ती फुले फुलावी...
सहज स्फुरावे मनी हसावे….
शब्द सुरांनी मोहून जावे…
'निरागस मुल' या कवितेतून जगण्याच बळ देत.कसं जगावं याची जाणीव करून दिली आहे.सर सुखाची,कोवळी किरणे..पावसाच्या जलधारा..याही कविता काय करावे?सूर्य आणि पावसाचे वर्णन उठावदार करतात.
प्रसिद्ध कथाकार,कवी शिक्षक मित्रवर्य अंकुश लोखंडे सरांच्या सामाजिक वेदना दर्शविणारी 'माणूस' कविता. प्रेयसी,खरं-खोटं, सर सुखाची,कलियुग याही कविता रसिकांना विचार करायला लावतात. माणूस कविता माणसाचे पैलू उलगडून दाखविणारी उत्तम रचना आहे. हृदय,प्रेम,धाडस,भान,स्वप्न या शब्दांच्या शब्दकळा समर्पक मांडून काव्य रचले आहे.अतिशय सुंदर रचना केली आहे.
परिमळ कार्याचे संपादक दीपक चिकणे केंद्रप्रमुख वेळापूर यांच्या बुजगावणं,फारीष्टा,पानिपत, वाट आणि जीव कविता वाचताना कवींच्या प्रतिभेची आणि प्रगल्भतेची जाणीव होते.सामाजिक प्रश्न आणि वास्तवतेची मांडणी काव्यातून केली आहे. 'जीव'कविता वाचताना प्रत्यक्ष व्यक्तीच डोळ्यासमोर येऊन उभी राहते.इतकं हुबेहूब वास्तवचे दर्शनशब्दकळेतून घडते.
ओ माय वाढ काय तरी
पाटीच्या पोटासाठी
विणवते विणवते
एक तरी वाढ वाटी
वेंगळे शाळेतील गुरुजन श्रीमान राजेंद्र पिसाळ यांची 'शाळा' काव्यपुष्पात विद्यालय आणि देवालय यांच्यातील वास्तव लेखन मांडले आहे.यातून कवीमनाची वेदना,आर्तता आणि तळमळ प्रकटते.सारासार विचार केला असता आजही
विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जा दिला जाते.हे वास्तव प्रकर्षाने लेखणीने व्यक्त केले आहे.मोबाईल,उचलू नको कुठार…या रचना विचार करायला लावतात.तर'भारत देश महान' या काव्यातून भारत देशातील पर्वत,नद्या,थोर युगप्रवर्तक,
संत,धर्म आणि तत्वे यांची गुंफण काव्य बध्द केली आहे.
चारोळीकार कवी शिक्षक मित्रवर्य लक्ष्मण नरुटे सरांची खासियत म्हणजे ते शीघ्र चारोळी रचतात.त्यांचेही 'चित्रचारोळी' पुस्तक प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे.त्यांच्या रचनाही सहज सुंदर समर्पक शब्दांत व्यक्त होणाऱ्या आहेत.संसार,शाळा, कविता,पाऊस आणि समाज अशा सर्वंच विषयांवर भाष्य करणाऱ्या आहेत.त्यांचे सादरीकरण अप्रतिम असते.
आकल्पे ज्ञानमंदिरातील कविमनाचे अध्यापक विनोद कुमठेकर यांची 'खोरं माझं कांदाटीचं..'रचनाही महाबळेश्वरचं नयनरम्य निसर्ग सौंदर्य खुलविणारी आहे.तसेच आशा-निराशा,सत्तेचा सारीपाट,साद कार्यकर्त्याला आणि राजकारण काल आणि आज..या कविता प्रगल्भता दाखविणाऱ्या आहेत.राजकारणी लोकांवर मार्मिकपणे टिप्पणी करणारी काव्य रचना आहे.
कुरोशी प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक कवीवर्य विलास मासाळ यांची 'मराठी माती' काव्य महाराष्ट्राचे अभिमानाने गायले- वाचले जाणारे गौरवगीत आहे.अप्रतिम शब्दसाजात कविता बहारदार केली आहे.वाचताना वीररसाचा भारदस्तपणा जाणवितो.तसेच इतरही धनगर ही कविता धनगर समाजाच्या माहितीचे भाष्य वर्णन आहे.तर 'कमवा व शिका'हीकविता बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना उदात्त हेतूने करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा आणि संस्थेच्या उपक्रमाचेपोवाडे गाणारी,गोडवे गाणारी आहे.'राजगड' काव्यपुष्प स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीची आठवण करून देते.शाहीराच्या पोवाड्यारुपातील काव्यगायन रसास्वाद घेताना गुणगुणावे वाटत राहते.वीरश्री संचारणारे काव्य आहे.अप्रतिम यातील अक्षरशिल्पावरुन कवीच्या प्रगल्भतेची आणि प्रतिभेची सार्थकता दिसून येते.
'महाबळेश्वर'या कवितेतून गिरीस्थानच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ महिबळेश्वर येथील ऐतिहासिक स्थळ, भुरळ घालणारी मनपसंत स्ट्रॉबेरी,मिनी काश्मिर तापोळा,प्रतापगडाच्या रणसंग्राम आणि क्षेत्रमहाबळेश्वर आदी स्थळांचे काव्य महाबळेश्वरची भटकंती करुन आणते.
दैनिक सकाळ वृत्तसेवा माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या 'उपक्रमशील शिक्षक'पुस्तकात ज्यांच्या कार्याचा आलेख मांडला आहे.ते चिखली शाळेतील गुरुमाऊली विष्णू ढेबे यांची 'गांधी बापू'ही रचना महात्मा गांधींचा माझे जीवन हाच माझा संदेश प्रस्तुत करते.तर 'ग्रंथ नाते'हे अक्षरशिल्प वाचनसंस्कृतीतील पुस्तक वाचनाचे महत्व पटवून देते.
नवविचार मनी रुजवू
प्रेरणेची ज्योत पेटवू
संस्काराचे पुष्प फूलवू
ग्रंथसंपदेशी नाते जुळवू
संस्कृतीचे शोभे ते स्पंदन
करमणुकीचे होऊ दे गुंजन
सुगंध दरवळू दे होऊन चंदन
पुस्तकांना कायम करूया वंदन..
तसेच शिल्पकार तुम्ही या विश्वाचे,दिवाळी, कलियुग या रचनाही उत्तम आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष कविवर्य श्री. श्रीगणेश शेंडे केंद्रशाळा मेटगुताड. अनेक काव्यप्रकारात रचना करणारे आणि स्वरचित काव्यपुष्प तालासुरात गाणारे कवितेचा ध्यास घेऊन रचना करणारे कवीमनाचे आहेत.त्यांच्या सर्वच रचना प्रासादिक स्वरुपाच्याही आहेत. प्रतिभा आणि प्रगल्भतेचे दर्शन रचनेतून लक्षात येते.खेळ आनंदाचे,खरी संपत्ती,तो एक क्षण, गुरुमाऊली आणि माझी शाळा या रचना गेय आहेत. आशयगर्भ आहेत.वाचतानाही ताल-सुर समजतो.
उंबरी शाळेतील कवीमनाचे सहाध्यायी संजय गंगावणे यांच्या 'कोप..धाव..जीवनाचा सारीपाट,बाप आणि अश्रू'या रचनेला वेदनांची आणि आक्रोशाची झालर आहे.त्यांच्या रचनेत सामाजिक प्रश्र्नांची मांडणी दिसते.वैचारिक मंथन चिंतन करायला लावणाऱ्या रचना आहेत.मनात उलघाल होणाऱ्या विचारांचे काहूर रचनेतून प्रकटले आहे.'जीवनाचा सारीपाट' या रचनेत आयुष्याच्या सुखदुःखाच्या हिंदोळ्याचा आशय गर्भित अर्थ पटवून दिला आहे.
वेगळे शाळेतील कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक संजय संकपाळ यांच्या रचना कोजागिरी ,काल आज उद्या, माणुसकी,आई तुझे स्मरण करणार, आईची शिकवण आदी कविता आहेत.आईची महती ,मातृप्रेमाचे महामंगल स्त्रोत आणि मातेच्या प्रेमळपणाची आठवण काव्यवाचन करताना येते.माणूसकी कविता माणसाचे चेहरे आणि निसर्ग याची तुलना करतात.सगळं शिकण्यापेक्षा अगोदर माणुसकी शिकण्याची आर्त हाक देतात.
उपक्रमशील शीघ्र कवी उत्तम सूत्रसंचालक आमचे मित्रवर्य श्रीमान संतोष ढेबे यांची'याला जीवन ऐसे नाव..'एक उत्तम रचना आहे.त्यांच्या रचना संदेश देणारी आहे.मनाचा ठावं कधी लागतच नाही.त्यावरच भाष्य करुन विचार करायला लावणारी ही रचना आहे. माणसाने कसं जगावं याची जाणीव या रचनेतून उलगघडली आहे.
अप्रतिम स्वरचित कवितांचा खजिना नवकवी शिक्षकमित्रांचा आहे.वाचताना विशेष आनंद वाटला.कारण दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करत व्यासंगाने काव्यलेखनाचा छंद जोपासत आहेत.एकंदर उत्तम काव्यानंदाचा रसास्वाद मिळाला.अप्रतिम!!!
@परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १७ अॉक्टोंबर २०२१
सुंदरच...!!!!!!
ReplyDelete