पुस्तक परिचय क्रमांक-७३ बा.भ.बोरकर
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-७३
पुस्तकाचे नांव--बाळकृष्ण भगवंत बोरकर
लेखिकेचे नांव-- प्रभा गणोरकर
प्रकाशक-साहित्य अकादमी नवी दिल्ली
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सन २०१० पुनर्मुद्रण
एकूण पृष्ठ संख्या-११२
वाङमय प्रकार----ललित
मूल्य--४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
७३||पुस्तक परिचय
बाळकृष्ण भगवंत बोरकर
लेखिका --प्रभा गणोरकर
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
मराठी साहित्य विश्र्वातील आनंदयात्री , मराठी व कोंंकणी भाषेत कविता करणारे
पद्मश्री पुरस्कारविजेते निसर्ग कवी बा.भ.बोरकर यांची 'लावण्य रेखा''काव्य
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा
देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
कवीवर्य बा. भ. बोरकर यांची सुप्रसिद्ध काव्यसंपदा म्हणजे वरील काव्य पंक्ती आहेत.अत्यंत अर्थपूर्ण भावपूर्ण शब्दांत त्यांनी शरीरावयाचे वर्णन शब्दादित केले आहे.या अवयव आणि कर्मे यांचा सुरेख मिलाफ या ओळीतून प्रकटतो.अनेक निवेदक यातील काव्यापंक्तीची पखरण प्रसंगानुरूप करत असतात.
''यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिर,
घडविले मानवतेचे मंदिर,
परी जयाच्या दफनभूमीवर
नाही चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती"….
यासारख्या दिव्यत्वाची प्रचिती देणाऱ्या काव्याने लोकांच्या. काळजाला हात घालणारे आणि ज्वालेची पूजा करणारा पारिजातक ,असं ज्यांचंं वर्णन ऋषितुल्य साहित्यिक आदरणीय वि. स.तथा भाऊसाहेब खांडेकर यांनी केले आहे.ते महाराष्ट्राचे लाडके कवीवर्य, आधुनिक मराठी वाड्मयातील प्रतिभासंपन्न,भारतीय साहित्याचे निर्माते 'बाळकृष्ण भगवंत बोरकर' या अक्षरशिल्पात त्यांच्या चौफेर क्षेत्रातील साहित्य संंपदेचा उलगडा लेखिका प्रभा गणोरकर यांनी केला आहे.
प्रभा गणोरकर यांनी बोरकरांच्या समग्र वाड्मय व्यक्तित्वाचा शोध या पुस्तकात घेतलेला आहे.प्रभा गणोरकर या मराठीतील १९६० नंतरच्या पिढीतील नामवंत सुपरिचित कवयित्री व लेखिका आहेत. तसेच त्यांनी साहित्य समीक्षक म्हणूनही ओळखल्या जातात.त्यांच्या'व्यामोह'कवितासंग्रहास महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्काराने सन्मानित आले असून त्यांना बहिणाबाई व शांता शेळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
'व्यतीत'आणि 'वर्तन' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून आधुनिक मराठी साहित्य विषयीचे त्यांचे अनेक लेख आणि कविता नियतकालिकातून प्रकाशित झालेल्या आहेत.
कवीवर्य बा. भ.बोरकर यांच्या समग्र साहित्य यांचा परिचय या पुस्तकातून होतो.१)चरित्रपट,२)घडण,संस्कार आणि भूमिका,३)बोरकरांची कविता,४)गद्यलेखन, ५)संकीर्ण लेखन आणि उपसंहार आदी लेखप्रबंधातून साहित्याची ओळख करून दिली आहे.कवितेचे दालन म्हणजे काव्यानंदाचा खजिनाच आहे.
कविश्रेष्ठ सन्माननिय बा. भ. बोरकरांचे नाव घेतल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य डोळ्यांसमोर उभे राहते. जवळजवळ पाच तपे अहर्निश कवितेच्या निर्मितीत ते मग्न राहिले. दैवी प्रतिभेचा आनंदानुभव त्यांनी काव्यरसिकांना भरभरून दिला. म्हणूनच आदरणीय पु.ल.नी त्यांंना 'आनंंदयात्री' बिरुदावलीने संबोधले आहे अक्षरांच्या वर्षावात ते भिजत राहिले.अन् रसिकांनाही त्यांनी भिजविले.अनेक वर्षाऋतू आले अन् गेले.काव्यभाषा बदलत गेली.
अभिरूची भिन्न भिन्न झाली.पण बा.भ. बोरकरांची कविता रसिकांच्या ओठांवर राहिली. काव्यनिर्मितीचा ध्यास त्यांनी निरंतर जपला.कौतुके डोळ्यांनी त्यांनी ज्ञानियांची ओवी जोजविली. तुकारामांचा मनस्वी आत्मभाव डोळे भरून न्याहाळला.त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य तनुमनावर पडत गेले.त्यामुळे अंतर्मुखता आली.भावकोमलतेबरोबर रुद्रभावही त्यांना भावला.त्याचं काव्य बनत गेलं. जनमाणसावर कवितेने गारुड केले.
जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी कविता हीच त्यांच्या चिंतनाचा अन् निदिध्यासाचा विषय झाली. त्यांचे समग्र जीवन हीच कविता; त्यांची कविता हेच त्यांचे जीवन.असे मनस्वी कवी गोमंतकाच्या यक्षभूमीत जन्मला… नक्षत्रांचे देणे देऊन गेला… खूप धन्यता वाटते. गोमंतकातील निसर्ग हा बोरकरांचा प्रिय सखा. त्याच्या प्रत्येक रूपकळेत त्यांना कवितेचा छंद गवसला. उत्कट भावना आणि उत्कट संवेदना यांमुळे त्यांच्या अंतःकरणाची तार निरंतर छेडली जायची. त्यामुळे सहज उमललेली अनुभूती कवितेचा उद्गार बनून यायची. कविमन तुडुंब तृप्तीने भरून यायचे.पर्जन्याची धून ऐकू आली की हा रंगमेळ अधिक खुलायचा. डोळ्यांसमोर स्वप्नपुष्पांचे थवे नाचायचे.तनुमनात मृदंग वाजत राहतो. इतक्या उत्कट भावभावनांची गुंफण केलेल्या त्यांच्या कविता आहेत.
बालपणीच बोरकरांना कविता भेटली. आयुष्यभर त्यांनी ती प्रेमाने जोजवली. गोव्याचा निसर्ग, परिसराचे संचित आणि विविध स्वभाववैशिष्ट्यांची माणसे हा त्यांच्या कवितेला सतत ऊर्जा पुरविणारा घटक ठरला. बोरकरांचा जन्म त्यांच्या आजोळी कुडचडे येथे झाला.बालपण जुवारी नदीच्या काठावरील हिरव्यागार बोरी गावात गेले.दोन्ही गावांतून वाहणारी जुवारी तीच जीवनदायिनी अन् प्रेरणादायिनी.बोरी गावाची महत्ताही बोरकरांनी कवितेत गुंफली आहे.
"निळ्या खाडीच्या कांठाला माझा हिरवाच गांव
जगांत मी मिरवतों त्याचे लावुनियां नांव'' अलौकिकाची लेणी निर्माण करून मराठी कविकुलात आपली तेजस्वी मुद्रा निर्माण केली.बोरकरांची कविता हा सर्वांचाच आनंदानुभवाचा प्रत्यय आहे.
कविते प्रमाणेच त्याचे कथा-कादंबरी लेखनही अनमोल आहे.त्यांची गद्य लेखनाची सुरुवात ललितनिबंधाने झाली.गद्य लेखनाचे प्रेरकही भाऊसाहेब खांडेकर होत.त्यांचा पहिला लघुनिबंध'कागदी होड्या'१९३८ साली प्रकाशित झाला.हा एक नवीन वाड्मय प्रकार होता. घुमटावरचे पारवे,चांदण्यांचे कवडसे,पावलापुरता प्रकाश हे ललित लेख संग्रह असून प्रियकामा,मावळता चंद्र,अंधारातही वाट आणि भावीण या कादंबऱ्या सुप्रसिध्द आहेत.तर प्रियदर्शनी आणि समुद्रकाठची रात्रभर हे कथासंग्रह आहेत.बोरकरांच्या स्वभावाला मिश्कील किनार आहे.काही वेळा प्रकटून प्रसन्न हास्याचा शिडकावा देते.त्यांच्या कथा कादंबरीचे सुक्ष्मपणे परिक्षण या ग्रंथात केले आहे.समग्रपणे विषयातील आशयगर्भता सहज सुंदर ओघवत्या शैलीत विवेचन केले आहे.
काही कथांची सोदाहरण मांडणी व्यक्ती चित्रांतून केलेली आहे.पात्रचित्रण,पुरवणारी निसर्ग वर्णने,भावोर्मीना सजविणारी,वातावरण निर्माण करण्यासाठी गाण्यांचा वापर या सर्वांना उठाव देणारा गोमंतकीय प्रदेश आदी गोष्टींमुळे कादंबरी वाचनीय बनली आहे. 'भावीण ' ही बोरकरांची सर्वात महत्त्वाकांक्षी कादंबरी आहे.गद्य लेखन कौशल्य पणाला लावून त्यांनी दर्जेदार कादंबरी लिहिली.ही काव्यात्म कादंबरी आहे.परंंतु रसिक वाचकांना कादंबरी पेक्षा त्यांंच्या कविताच फार लोकप्रिय आहेत.त्या रसिकांना मंत्रमुग्ध करतात.याच क्षेत्रात त्यांची मुद्रा सुवर्णमय मोहराची आहे.
परिशिष्टात कवीवर्य बा.भ.बोरकर यांचा जीवनपट सनावळीसह दिलेला आहे.तर. त्यांचे प्रकाशित साहित्याची यादी सनावळीसह दिली आहे.त्यांची मराठी व कोंकणी चाळीस वर्षे पुस्तके प्रकाशित झाली आहेत.बोरकरांच्या कवितेत उमटलेल्या या आनंद स्फुरणांनी वाचकांच्या जीवनाचे क्षण उजळून टाकले आहेत. हेच कवितांचे श्रेय व सार्थक झाले आहे.
अतिशय उत्तम शब्दलालित्याने साहित्याचा चिकित्सकपणे संशोधन करून त्यांच्या साहित्याची अभिरुची वाढवलेली आहे.
परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १० अॉक्टोंबर २०२१
Comments
Post a Comment