पुस्तक परिचय क्रमांक-९०सुरेश भट ह्यांची निवडक कविता





वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-९०

 पुस्तकाचे नांव--सुरेश भट ह्यांची निवडक कविता १९४६ ते १९९६

 संपादकाचे नांव--शिरीष पै

प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०१८/ सहावी आवृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-२००

वाड्मय प्रकार---काव्यसंग्रह

मूल्य--२००₹

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

९० ||पुस्तक परिचय

          सुरेश भट ह्यांची निवडक कविता

      संपादक:शिरीष पै

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️


माझिया गीतांत वेडे

दु:ख संतांचे भिनावे;

वाळलेल्या वेलीस माझ्या

अमृताचे फूल यावे!!

        --कवीवर्य गझलसम्राट सुरेश भट

गझलकार सुरेश भटांच्या कवितेत पंडित- अपंडित दोघांनाही हलवण्याचे सामर्थ्य आहे. सुरेश भट यांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो.इथेच भटांचे यश आहे.मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे.

                            ----पु.ल.देशपांडे

या अभिप्रायात आदरणीय पु.ल.देशपांडे यांनी कवीवर्य गझलसम्राट सुरेश भट यांच्या कवितांचे कौतुक केले आहे.गझलसम्राट कवीवर्य सुरेश भट यांचा 'सुरेश भट ह्यांची निवडक कविता: १९४६ते १९९६ 'पन्नास वर्षातील निवडक रचनांचा संग्रह आहे. शिरीष पै यांनी संपादित केला आहे. यामध्ये कवितेचे स्फूर्तिगीते, गझल, भावगीते,भावकविता आणि कविता असा सर्व काव्यप्रकार समाविष्टकेलेला आहे.'गझलसम्राट सुरेश भट ह्यांच्या गझल प्रदेशात'या अप्रतिम प्रस्तावनेवरील शिरीष पै यांचा लेख गझल रचना आणि गझलेची आशयगर्भता यांचे स्पष्टीकरण व अन्वयार्थासह विवेचन केले आहे.खऱ्याअर्थी हाच लेख गझलेचा आयाम अधोरेखित करतो.अतिशय सहज सुंदर ओघवत्या शैलीत शिरीष पै यांनी उलगडा केला आहे.गझल रचनेचा पैलू उलगडत जातो.


मराठी कवितेच्या इतिहासात आपल्या उत्कृष्ट गझल निर्मितीमुळे इतिहास निर्माण केला.असे सुरेश भट हे एक श्रेष्ठ प्रतिभावंत कवीवर्य आहेत.हे निर्विवाद सत्य आहे!तिसवर्षाहून अधिक काळ त्यांनी मराठीतून गझल लेखन केले आहे.या गझलांच्या रचनेने सारा महाराष्ट्र प्रभावित झाला.गझलकार सुरेश भटांच्या गझलांची स्फूर्ति घेऊन असंख्य तरुण कवी गझलनिर्मिती करु लागले आहेत.


मराठी कविता,मराठी भाषा आणि देशावरही ते नितांत प्रेम करत.या काव्यसंग्रहात 'रुपगंधा', 'रंग माझा वेगळा','एल्गार', 'झंझावात'आणि सप्तरंग या काव्यसंग्रहातील निवडक १४२ सुरेल, आशयघन, लोकप्रिय काव्यांचा समावेश केलेला आहे.त्या काव्य रचनांची निवडहीस्वत: शिरीषताई पै यांनी केली आहे. 


मराठी मायभूमीवरील महाराष्ट्राची पूजा कशी या नात्याने कशी केलीय.त्याचे वर्णन करणारी कविता….

गीत तुझे मी आई गाईन

शब्दोशब्दी अमृत ओतुन

भावफुलांना पाती उधळुन 

मम प्रतिभेचे झिजवुनि चंदन

आयुष्याचा कापुर जाळुन

तुझे सारखे करीन पूजन…


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी


मराठी भाषेच्या नजाकतीचा ज्यांना रास्त अभिमान आहे त्या गझलकार गायक कवीवर्य सुरेश भट यांनी आपल्या मराठी गझलांमध्ये नजाकत,नखरा,ऐट, तेज,धार,आशय आणि मोहकपणा भरला आहे.मराठी कवितेच्या इतिहासात तिला चिरंतन यश,नाव आणि स्थान मिळवून दिले आहे. गझलपलीकडेही त्यांनी उत्तमोत्तम भावकविता लिहिल्या. त्याची उत्तम गाणीही तयार झाली.प्रतिभावंत संगीत 

दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी अनेक भावकवितांना चाली बांधल्या.त्या अप्रतिम गीतसामर्थ्याने अनेक गायक कीर्तिवंत नामवंत झाले.ते मराठी जनतेचे लाडके झाले ते सुरेश भट यांच्या गझल रचनेमुळेच!!!

मेंदीच्या पानावर,तरुण आहे रात्र अजुनी, आज गोकुळात आदी मुक्त रचनेचा वापरही त्यांनी केला.ती गीते रसिक श्रोत्यांनी डोक्यावर घेतली.इतकी अवीट गोडवी व श्रवणीय गाणी आहेत.

अवीट गोडीच्या श्रवणीय आणि ठेका धरायला लावणाऱ्या सिनेमातील गाण्यांचाही समावेश केलेला आहे.त्या गाण्यांचे शब्द वाचताना त्यांतील भाव मनाला स्पर्शून जातो.ओठांवर गाणी गुणगुणत रहावे असे वाटते.कविता वाचताना शब्दांच्या नजाकतीने मनस्वी आनंद मिळतो.


गझल काव्यप्रकाराचा त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला,गझलचे मर्म त्यांनी जाणले, त्यांचे नियम कसे टाळावेत हेही त्यांनी  'रंग माझा वेगळा'या काव्यसंग्रहाला 'गझलेची बाराखडी'हा लेख त्यात समाविष्ट केलेला आहे.


वार झेलायास केली मी खुली छाती जरी

नेमके पाठीस माझ्या चालणारे धावले!

जीवनातल्या दु:खाच्या गदारोळात कवीच्या जीवनात दोनच अद्भुत घटना घडत असतात. ज्या कवीच्या जगण्याला, तसाच शब्दांना खोल अर्थ देतात.क्रांती आणि प्रीती या दोनच मूल्यांवर कवीची निस्सीम श्रद्धा आहे. 


संपला आता माझा श्वास घ्यायचा दावा!

राहिला जुगाराचा हा उदास देखावा!

ही न आग दु:खाची!ही न जाग सत्याची!

हा हुशार शब्दांचा अर्थहीन मेळावा!

कवीवर्य सुरेश भट म्हणतात की,"माझ्याजवळ अर्थहीन, हुशार शब्द नाहीत.आणि माझा 'गझलसम्राट'असण्याचा दावाही नाही. सिंहासने कोसळतात.मी जमीनीवर ठामपणे उभा आहे.मी गझलेचा सर्वज्ञ नाही.ज्याला त्याला या लोकशाहीत गझलेची आपापली व्याख्या करण्याचा हक्क आहे.''आजपर्यंत जे लिहायचे होते,ते मी संपूर्ण लिहू शकलो नाही.याची ते खंत व्यक्त करतात.

मज सांगावयाचे होते साऱ्यांना सारे काही..

पण सारे सांगायला आयुष्यच उरले कोठे?


जो माणूस असतो,तोच कवी असतो.जो कवी असतो,त्यांचे शब्द ही दुनिया सुंदर व स्वच्छ करण्यासाठी लढत असतात.कवीचा लौकिक अर्थाने अनेकदा पराभव होतो;पण हे पराभवच माणसाला आणि कवीला अजिंक्य बनवतात. कवी खऱ्याअर्थाने कधीच पराभूत होत नाही.

पराभवापलीकडे अजून युद्ध चालले!

अजून माणसेच ही खरीखुरी न पेटली!

                                    -----सुरेश भट

'सुरेश भट ह्यांची निवडक कविता'हा कविता संग्रह म्हणजे काव्यरचनेचा अनमोल ठेवा असून गझलचा दस्ताऐवज आहे. नवकवींना हा संग्रह प्रेरणादायी मानदंड आणि मार्गदर्शक आहे.आशयघन गझल आणि कविता कशी निर्माण होते.याचा उत्तम संग्रह आहे.प्रत्येक साहित्यिकांच्या व रसिक वाचकांच्या संग्रही असावे असे उत्तम पुस्तक आहे.गझलसम्राट कवीवर्य सुरेश भट यांच्या प्रतिभेला आणि लेखणीला त्रिवार सलाम आणि वंदन!!!!


आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले?

माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला,

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे,

हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले!


हारुनहि दाखवाल माझी झाली न हार 

मी माझ्या स्वप्नांना फिरफिरुन पिसणारच 

माझे घर वाऱ्याचे अन् पायच पाऱ्याचे

मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच

                                 --(दंश--एल्गार)


#############################

# श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक :२१नोव्हेंबर २०२१


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड