पुस्तक परिचय क्रमांक-७६ माणदेशी माणसं






वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

पुस्तक क्रमांक-७६

 पुस्तकाचे नांव--माणदेशी माणसं 

 लेखकाचे नांव--व्यंकटेश माडगूळकर

प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण/ डिसेंबर २०१८

एकूण पृष्ठ संख्या-१२४

वाङमय प्रकार ---व्यक्तिचित्रण

मूल्य--१२५ ₹

📖📚🍁📖📚🍁📖📚🍁📖📚🍁

७६||माणदेशी माणसं 

            व्यंकटेश माडगूळकर

                व्यक्तिचित्रण

-----------------------------------------------

प्रसिध्द साहित्यिक ग्रामीण कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'माणदेशी माणसं'या शब्दचित्रातील व्यक्तीरेखा गरिबीने वेढलेल्या अन् दारिद्र्याने पिचलेल्या आहेत.पण जगण्याचं साधन सोप्पं तत्त्वज्ञान शिकवितात.कठीण परिस्थितीत जगण्याची उमेद दाखवून देतात.


स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षरग्रंथ निर्माण झाले. त्यात 'माणदेशी माणसांचा' समावेश होतो.या व्यक्तिचित्रांत जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच,पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे.अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फुलं व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली ही अस्सल चित्रे मराठीच आहेत. 

माणदेशीच्या सामान्य जीवनातील न संपणारं दुःख निरागसपणे तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर या कथांतून सांगतात.


हे दुःख वाचलं की मन भांबावतं. माणसं सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात. असा उदार विचार मनात येतो.जीवनातील हे कारुण्य दारिद्र्य  माडगूळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहे. त्यामुळे त्यांची ही माणसं आपल्याला विसरता येत नाहीत. त्यांची आठवण झाली की ती मला अस्वस्थ करून टाकतात. विचार करायला लावतात. त्या काळच्या सामाजिक आर्थिक आणि संस्कृती परिस्थितीची…उजाड माळावरचा ऊन्हाळा,दुष्काळाची परिस्थिती अशा परिस्थितीत असणाऱ्या माणदेशातील खेड्यात लेखकांचे बालपण गेले होते.किन्हई,कुंडल आणि माडगूळच्या माणदेशी खेड्यातील मानवी जीवनाचे नाट्य अनेक कथात उतरवलं आहे.त्यांच्या मनात घर केलेल्या व्यक्तींचे चित्रण केलेले आहे.


 जेष्ठ प्रतिभासंपन्न साहित्यिक ग्रामीण कथाकार व कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी वाड्मय क्षेत्रात चौफेर विस्तृतलेखन केले आहे.त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसतानाही त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने मराठी साहित्य क्षेत्रात मौलिक भर घातली आहे.त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या नाटकं गाजलेली आहेत. बनगरवाडी, माणदेशी माणसं, सत्तांतर आणि रानमेवा आदी हिरव्या बोलीच्या अक्षरशिल्पांनी वाचक रसिकांवर गारुड केले आहे.अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


'माणदेशी माणसं' हा कथासंग्रहाची पहिली आवृत्ती स्वातंत्र्यपुर्व काळात १९४९साली प्रकाशित झाली. माणदेशीच्या खेडेगावातील सामाजिक परिस्थितीचे विदारक वर्णंन केले आहे.व्यक्ति चित्रातून कैफियत मांडली आहे. दारिद्रयाने पिचत असलेल्या गावकुसाबाहेरील वंचित समाजातील माणसांचे अनोखे शब्दचित्र लेखणीने रेखाटले आहे.दरदिवशी पोटाच्या भ्रांतीसाठी काय करावे?उपासमारी सहन करीत ही गरीब माणसं जगरहाटीत कशी जगत होती. याचे ज्वलंत चित्रण या व्यक्तींच्या कथा वाचन करताना उद्वेग काळजाला भिडतो. पुस्तक वाचताना विदारक दृश्याने डोळे पाणावतात.पापण्याच्या कडा ओलावतात.


पडलेल्या दुष्काळातील हलाखीच्या परिस्थितीत जीवन कसे कंठतात यांचे वर्णन सूक्ष्मपणे व बारकाईने तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर यांनी केले आहे.वर्णन अस्सल ग्रामीण बाजात असल्याने वाचताना त्यांच्या जगण्याची कथा उलगडत जाते.इतक्या खडतर अवस्थेत एकवेळचं मिळेल ते अपुरे जेवून दिवस कंठीत होते.हे वर्णंन वाचताना खुपचं दु:खाची भावना अनावर होते.मन विषण्ण होते.इतकी ताकद लेखकांच्या लेखणीत आहे. मांडलयं ते सारं वास्तव आणि खरं.त्यामुळे तात्यासाहेबांचे निरीक्षण आणि वर्णनातून प्रगल्भतेची आणि प्रतिभेची उत्तुंगता लक्षात येते.इतकी शब्दचित्रे अप्रतिम,हुबेहूब व बोलकी आहेत. 


'माणदेशी माणसं'या शब्दचित्रांच्या पुस्तकात १६ माणसांची व्यक्तिचित्रे ग्रामीण भाषेत रंगविली आहेत.पहिलं चित्रण आहे.धर्माचं ,धर्मा आणि तिची लेक 'बजा'दुष्काळात दिवस कसे कंठत आहेत.याचे चित्रण केले आहे.दीड-दोन महिने राहण्यासाठी लेखक गावी आलेले असतात.तेव्हा धर्माची कष्टी हाक "दळण आणा जी आक्काऽऽ"ऐकतात.तदनंथर ते धर्माच्या घरी आंब आणायला जातात तेंव्हा खोपटाच्या बाहेर ऊन्हात धर्मा पुढ्यात थाळीत काहीतरी खात असतो.त्यावेळी आंब पाहिजे म्हणून लेखक सांगतात.तेव्हा धर्मा,"बजे,आंबचा शिसा आणून दे धन्यांना"असे म्हणतो.

त्यावेळी फक्त एक काळासावळा हातच बाहेर येतो.त्यावरुन बजा बाहेर का आली नाही? धर्माचं जेवलं असलं कसलं?''न राहवून ते धर्माला विचारतात,"मग पोटापाण्याचं काय करतोस धर्मा?""भागवतो कसतरी कळणाकोंडा करुन,कधी रताळं,कधी गाजरं उकडतो,अन् खातो बापलेक.बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी.वंगाळ वंगाळ!" आतडं तोडून आर्ततेने धर्मा बोलत होता.इतकं वाईट दिवस आले होते.त्यामुळे आईला सांगून लेखक दळण दळण्याचे काम बजाला देतात.ते दळण न्यायला दररोज धर्मा घरी यायचा.


एकदा धर्मा खाली मान घालून लेखकाला जुनं धोतर विनवणी करीत मागतो.लेखक लगेच एक जुनं धोतर देतात.दोन-तिन दिवसांनी घरी आलेल्या बजेला बघतात.तर काय?धर्माला दिलेल्या धोतराचे लुगडे नेसून बजा दळण न्यायला आली होती.खळगी भरण्याची आणि कापडांची किती बिकट परिस्थिती होती.ते या कथेतून प्रकर्षाने लक्षात येते.


'झेल्या'उनाड,खट्याळ व खोडकर मुलाची कथा.सतत शाळेला दांडी मारुन बाहेरचं भटकत असायचा.उनाडक्या करायचा.एकदा गुरुजी हजेरी घेताना गैरहजर असल्याने त्याला दोन-तीन मुलांना घेऊन यायला सांगतात. थोड्या वेळाने मुले त्याला धरुन आणतात.तो मुलांवर डाफरत असतो.तेव्हा गुरुजी त्याला फटके न मारता,न रागावता त्याची विचारपूस करतात. समंजसपणे त्याच्याशी बोलतात.

त्यामुळे त्याला शाळेचा लळा लागतो. 


गुरुजींच्या एकलकोंड्या वेळात तो साथीदार बनतो.हर एक प्रश्र्नांची उकल करुन घेत असतो.तदनंतर तीन महिन्यांचा बदलीचा काळ संपल्याने गुरुजी दुसऱ्या गावी जायला निघतात. त्यावेळी हाच झेल्या तोंड झाकून रडत म्हणतो, "मास्तर मी नाय जायचा आता त्या शाळेत!"इतका लळा जिव्हाळा त्याला लागलेला असतो.गुरुशिष्याचं नातं कसं असावं हे या शब्दचित्रातून लक्षात येते.नंतरच्या काळातही तो काय करत असेल?यांचे चित्रण छान शैलीत मांडले आहे.गुरुजींनी शिक्षा न करता सम जावून जाणीव करून दिली की मुलांच्या वर्तनात बदल घडतो.याचे दर्शन या कथेतून घडते.


'रामा मैलकुली' सडकेची स्वच्छता ठेवणारा मैलकुली. सडकेच्या मैलस्टोनवर नंबर घालण्याचे मक्त्याने काम करताना हितगुज साधताना घडलेली हकिकत.रामाच्या शरीरयष्टीचे वर्णंन वाचताना ती व्यक्तीच डोळ्यासमोर तराळते."त्याच्या तोंडावरच्या कळे कडे पाहून कुणालाही असं वाटलं असतं की,दिलानं भला असलेला हा माणूस रुपानं गेला आहे.आणि खाण्यापिण्याची बाबतीतही  याची भलती आभाळ झाली आहे!"


दुपारच्या जेवणावेळी लेखकाने दिलेल्या मऊसूद चपात्या पिठलं लोणचं न खाता, फडक्यातून आणलेल्या दोन भाकरी चटणीच्या भुकटीबर खातो.''अन् रामजी हे काय?हे कशासाठी ठेवलसं?'' असं म्हणताच,खजिलपणे रामा म्हणतो,"असं कुठं मिळतयं आमास्नी,घरी बहिणींचं पोरगं हाय.त्याला होईल दोन घास म्हणून ठेवलयं."रामाची खाण्याची किती आबाळ आहे.त्यांना चांगलंचुंगलं खायला मिळत नाही.म्हणून ठेवणारा रामा..खरंच कथा वाचताना आर्थिक परिस्थितीचे चटके सहन करत ही माणसं जीवन कसं जगली याची प्रचिती येते.

लेखक चोपडीगावातल्या चावडीजवळच्या शाळेत त्यांना 'राम राम यंकापराव'असा आवाज येतो.तो त्यांच्या शाळकरी नामाचा असतो.बऱ्याच दिवसांनी गाठपडल्यावर दोघेजण चहापाना सोबत गप्पा मारतात. शाळेतल्या आठवणींत मनसोक्त रमतात.नामा मास्तर ते तमाशा कलावंत अश्या पेशाचे चित्रण 'नामा मास्तर' या कथेत रंगवलं आहे.

शाळेत गाणी म्हणायला सांगितल्यावर लावणी म्हणून दाखविल्याने गुरुजींचा खाल्लेला मार, त्याच्या वडिलांचे वर्णन,हातानं करुन खाणं, चहाच्या टपरीचं आणि तमाशाचे वर्णन रसदार शब्दांत मांडले आहे.


शेतात काम करत करत शेरडं राखणारा 'मुलाण्याचा बकस'. बोबडं आणि गतीनं बोलणारा, आई-वडिलांना पोरका झाल्याने चुलत्याकडे राहणाऱ्या बकस.त्याचे कसे हाल होतात.याचे वर्णंन शब्दचित्रात मांडले आहे.

 पूर्वीच्या खेड्यातील वाड्यांचे वैभव लोप पावले तरी इनामदारी खाक्यात आणि झोकात राहणारे,घरी आलेल्यांचा पाहुणचार करणारे बन्याबापू.यांचे शब्दचित्र अप्रतिम शब्दात मांडले आहे.त्यांचा पान खाण्याचा शौक, मिठ्ठास लाघवी बोलणं आणि गप्पा मारणं याचं सुंदर कथानक 'बन्याबापू' कथेत आहे.

काही माणसं उर्मठ व शीघ्र कोपिष्ट असतात. बलदंड देहाची आणि उफराट्या काळजाची असतात.सतत यांचे गावात कुणाकुणाशी तेढ असते.यातील एका नमुनेबाज, डेअरिंगबाज 'कोंडीबा गायकवाडचे'व्यक्ती चित्रण खुलविले आहे. लेखकाचे शेत खंडीने केलेले असते.त्याचा खंड मागायला वारंवार कोंडिबाच्या घरी चक्रा माराव्या लागतात.त्यावेळची घडलेली हकीकत आणि त्याचा वचपा काढण्याची पद्धत खरंच दाहकता दाखविते.ते वाचताना लक्षात येते.

 शिदा,आभार घेऊन पसार होणारा.दिलेल्या कामासाठी हेलपाटे मारायला लावणारा शिदा.आपलं काम चोख साधण्यासाठी शांतपणे बोलत इप्सित साधवून घेणारा शिदा. तात्यासाहेबांनी नवीन चप्पल इसार देवून शिदाला बनवायला सांगितली असते.ती मिळवायला पडलेले कष्ट,आणि शिदाच्या स्वभावाचे गुण'शिदा'कथेत खुमासदार शैलीत मांडले आहेत.


शिवा माळी,प्राथमिक शाळेतील शिपाई सर्वांनी मिळून मिसळून वागणारा शिवा.बायकोला दागिने करण्याच्या हट्टापायी आणि बक्कळ पैसा मिळविण्यासाठी वाईट संगत सवयीने चोरी करतो.त्यापायी पकडला गेला.शिक्षा भोगून झाल्यावर लेखकांच्या पुढं मनातील सल उघडी करतो.ते शिवा माळीचे शब्दचित्रण मनात घालमेल करते. साधीभोळी माणसही लोभापायी पायावर धोंडा पाडून हकनाक सर्वस्व कशी गमावतात,ते कळतं.


स्वत:चा उदरनिर्वाह चणे फुटाणे शेंगदाणे विकून त्यावर गुजराण करणारी 'तांबोळ्याची खला'हे चित्रण गावभर माल विकायला फिरणाऱ्या फेरीवाल्यांचे वास्तव चित्रण दाखविते.तर 'रघू कारकून 'कथेत त्याचे आणि प्रापंचिक स्थितीचे वर्णन कथेत मांडले आहे.दारिद्रय मरण यातुनि मरण बरे बा दरिद्रता खोटी | मरणात दु:ख थोडे दारिद्यामधि व्यथा असे मोठी||याप्रमाणे नोकरी आणि प्रपंचाची कथा.संसारातील दु:खाच्या व्यथा दिसतात.


अस्वलाचा खेळ करून दाखविणाऱ्या 'बाबाखान दरवेशी' कथेतून उदरनिर्वाहासाठी खेळ दिखविणाऱ्या माणसांची व्यथा उलगडून दाखविते.त्याचा आणि बायकोचा कलह, पोरांचे लेंढूर सरकार,हुजूर असं मधाळ बोलण्याची सुरुवात करून गारुडी करणारा दरवेशी छानच रंगविला आहे.


तमासगिरांच्या खासगी जीवनाचं कुतूहलवाटते, म्हणून गणाला विचारले.तर त्याने उत्तर दिले, "साहेब,आमा लोकांना तुम्ही बघावं तमाशाच्या थेटरात, बोर्डावर उभं राहिल्यावरच. त्यांचं बाकीचं काय बघू नये.मिठाई खाली,पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये." असं सांगणारा तमाशात ढोलकी वादक असणारा माणदेशी भागातील गणा भागवाला भेटतो.

शिवडीतल्या बसस्टॉपवर गणा व लेखकाची ओघानं बोलताना गाठ पडते.गावाकडचे भागवाले म्हणून हाॅटेलात चहापान करून पाहुणचार करतो. त्यावेळी बोलण्याच्या ओघात गाव का मुंबई बरी यावर गप्पा रंगतात.मग तमाशात कसा आलो.याचा उलगडा गणा करतो.तमाशा बघायला येण्याचं निमंत्रण देतो.या भेटीचे आणि तमाशाचे खुमासदार शैलीत सहज सोप्या ग्रामीण ढंगात गणाचे शब्दचित्र रेखाटले आहे.


'गण्या भपट्या' ही कथा गावातल्या कामधंदा न करता आयतं बसून खाणाऱ्या गणा भपट्याची आहे.त्याला काम धंदा न करता जादुने बक्कळ पैसा कमवायचा असतो. त्यासाठी गावात आलेल्या गारुड्याला पैसे मिळवून देण्याची विद्या शिकवायची गळ घालतो.गारुड्याचे हातचलाखीचे खेळ त्याला खरेच वाटतात.गारुडी त्याला ही विद्या पंढरपुरला पुस्तकाचा दुकानातील 'इंद्रजाल' पुस्तक घेण्याचा सल्ला देतो.मग गणा पैसे जमवून चालत जाऊन पुस्तक आणतो.आणि ते वाचून करामती करायला लागतो.त्याचे वर्णन वाचताना विक्षिप्त आणि बिनडोक गणू कसा आहे हे दिसून येते…

माणदेशी माणसे व्यक्तीचित्रे पुस्तक अप्रतिम शब्दलालित्याने खेड्यातील समाजजीवन, आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडते.बोलीभाषा, खेडेगाव

बलुतेदारी, फेरीवाले,वाहतुकीची साधने व दुरावस्था, आजूबाजूच्या घरपरिसराचे तिन्ही ऋतूतील दृश्यांचे वर्णन अप्रतिम अक्षरवैभवात मांडले आहे.

जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्याही परिस्थितीत आयुष्य सुखदुःखासह जगण्याची ताकद सामान्य माणसांकडे आहे. साध्या सरळ गरीब आणि कष्टकरी माणसांची  शब्दचित्रे 'माणदेशी माणसं'तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर यांनी सुंदर शब्दात रंगविले आहे.उत्तम शब्दात रेखाटलेली अस्सल व्यक्तीचित्रण मनाला भावतात. अप्रतिम पुस्तक आहे! कथाकार लेखकास सलाम व त्रिवार वंदन!!


@श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक १९अॉक्टोंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड