पुस्तक परिचय क्रमांक-७४गोष्टी माणसांच्या
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-७४
पुस्तकाचे नांव--गोष्टी माणसांच्या
लेखकाचे नांव--सुधा मूर्ती
अनुवादक-लीना सोहोनी
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जुलै २०२०/पुनर्मुद्रण
एकूण पृष्ठ संख्या-१६६
वाङमय प्रकार ----कथासंग्रह
मूल्य--१६०₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖
७४|पुस्तक परिचय
गोष्टी माणसांच्या
लेखिका--सुधा मूर्ती
अनुवादक -लीना सोहोनी
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे व तदनुषंगाने आलेली आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे.'माणसाची गोष्ट'या कथासंग्रहातील कथा वास्तवता दाखवितात.त्यामुळं त्या सकस अन् खऱ्याखुऱ्या आहेत.कल्पनाविलासापासून अलिप्त आहेत.साध्या सोप्या भाषेत आहेत.
प्रत्येक कथेत काहीनाकाही जीवनावश्यक संदेश दिलेला आहे.रसग्रहण करतानाच वैचारिक मंथन करायला उद्युक्त करतात. हसवणाऱ्या, टवटवीत,ताज्या आणि खेळकर गोष्टी आहेत. प्रत्येक कथेतून काहीतरी नवीन शिकायला मिळते.
आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात.अनेक घटना -प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातुन बरेवाईट अनुभव येतात.
काही व्यक्तिंचे अनुभव मनात घर करतात, त्यातील काही व्यक्ती चमत्कारिक तर काही मन थक्क करणाऱ्या आहेत.या व्यक्तींमुळे आपणाला खूप काही शिकायला मिळते. आपल्यात परिवर्तन घडवून समृद्ध आणि परिपक्व बनवतात.अशाच स्मृतीतील अन् स्मरणातील लोकविलक्षण बिरुदावली असलेल्या प्रत्यक्ष लेखिकेल्या भेटलेल्या, परिचित ,सहवासातील आणि कुटूंबातिल व्यक्तींचे रेखाटन,'गोष्टी माणसांच्या' या कथासंग्रहात विख्यात लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या, सिध्दहस्त लेखिका आणि संगणक अभियंत्या आदरणीय सुधा मूर्ती यांनी ३३ वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत.मूळ पुस्तक इंग्रजी भाषेत आहे.या पुस्तकाचे मराठीत अनुवादन लीना सोहोनी यांनी केले आहे.
२००६ साली "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित झालेल्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या 'इन्फोन्सिस फाउंडेशन'च्या अध्यक्षा, प्रसिध्द लेखिका यांनी सामाजिक कार्यासाठी भारतभर प्रवास केला.अनेक गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वत: अथवा इन्फोसिस संस्थेच्या माध्यमातून अर्थस्वरुपात त्यांनी मदत केली आहे.गोरगरिबांना आपत्तीजनक परिस्थिती नुसार मदत केली.खेड्यातील जीवन अतिशय जवळून पाहिले आहे.त्यांच्या बालपण, कॉलेज जीवन,नोकरी आणि जगभरातील प्रवासातील अनेक माणसांच्या जीवनाचे दर्शन घडले.
दैनिक लोकसत्ता,सकाळ, सामना आणि तरुण भारत या लिखित माध्यमांनी या पुस्तकाचे कौतुकास्पद सदर लिहिलेली आहेत.दैनिक लोकसत्ता मध्ये २६डिसेंबर २००४मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात या पुस्तकाची यशाची चढती कमान आहे.खेडेगावात जन्मलेल्या मुलीने पाहिलेले जग, गावातील अनुभव आणि त्यातून घडलेली माणुसकी' गोष्टी माणसांच्या' कथासंग्रहात भेटायला येतात.त्यांची मांडण्याची पद्धत आणि त्यातून वाचकांचे उद्बबोधन होत जाते.आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची झालेली गोष्ट पाहण्याची वाचण्याची नवी दृष्टी देते.नवी जाणीव निर्माण होते.
सुधा मूर्तीना कथा गोष्टींचे बाळकडू त्यांच्या आजोबांकडून मिळालेले आहे.त्यांचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षक होते.त्यांचे कैक संस्कृत पाठ मुखोद्गत होते.भारताचा इतिहास,अवकाश
रामायण-महाभारत, प्रदेशातील घटना प्रसंग आदी आजोबा मला गोष्टीरुपाने सांगत.कथेतून आयुष्याचे अनेक धडे वाचले-ऐकले.असा उल्लेख त्यांनी प्रस्तावनेत केला आहे.त्या म्हणतात की,"माझ्या आयुष्यात आलेले काही अनुभव मी जसेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्या, कारण या प्रत्येक अनुभवाने मला काहीतरी शिकवलं आहे."
'वयाची अट नाही' या कथेतून त्या निरक्षर आजीला वयाच्या ६२वर्षी मुळाक्षरे शिकवून साक्षर करते.तेव्हा लेखिका १२व्या वर्षाच्या असतात.एवढ्या लहान वयातही त्यांनी आजीला साक्षर केले.आणि शिष्याला भेट दिली.आजीला प्रिय असणारे 'काशीयात्रे' पुस्तक.कारण लेखिका परगावी गेल्याने 'कर्मवीर' मासिकातील 'काशियात्रे'चा लेख वाचायला न आल्याने ती हिरमुसली होती.मला वाचायला आलं नाही याचं वाईट वाटलं.तेंव्हा आजी म्हणते,"माझ्याकडे पैसा असून मला जर स्वावलंबी होता येत नसेल,तर काय उपयोग?''
म्हणून शिकायचं ठरवते.ते ही नातीकडून.
'रशियामधील लग्नसोहळा' या कथेत आपल्याकडे लग्न सोहळा म्हणजे ऐश्वर्याचे प्रदर्शन होते असते.पण रशियात रजिस्ट्रार कचेरीत लग्नाची नोंदणी झाली की लगेच त्या शहरातील सर्व युध्दस्मारकांना भेटी द्यायच्या.तेही वराने सैनिकी पोशाख घालून.कारण तिथं यास कृतज्ञतेचे प्रतिक मानले जाते.खरचं या कथेचे वाचन करतानाआपल्याकडच्या लग्नाची आठवण येते.आपण किती उधळपट्टी करतो.याचा विचार ही कथा वाचताना मनात सुरू होतो.
मोठी माणसं अथवा शाळेत शिकविते असताना शिक्षक जे सांगतात,आयुष्य कसे जगावे?,सवयी का बदलाव्यात यांचे विवेचन 'आज आपण त्यांना 'घासू' पण उद्या….'या कथेत हसनची कथा सादर केली आहे.नेहमीच वर्गात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांला अनेकदा सांगूनही वृत्तीत बदल होत नाही.त्यामुळे तो हुशार असूनही पुढे नोकरीत कुठेचं उशीरा जाण्याने टिकत नाही.त्यामुळे त्याला दारोदारी शाळेसाठी लागणारी सॉफ्टवेअर शिकण्याची पाळी येते.हे केवळ शिकत्या वयात आई- वडिल आणि पालकांचे न ऐकल्याच्या परिणाम कसा होतो.याचे जळजळीत अंजन घालून डोळे उघडायला लावणारी कथा आहे.
दातृत्व कसे करावे?यांची यथार्थ व समर्पक कथा 'लाल भाताची कहाणी'त्यांच्या घरातील अधोरेखित केली आहे.दानशूरतेचे प्रदर्शन कसे करतात.इतरांना मदत म्हणून सधन नोकरदार कोणत्या अवस्थेतील वस्तू देतात.याचा परामर्श त्यांनी घेतला आहे.ही कथा वाचताना खरचं सामाजिक बांधिलकी लेखिकेच्या कुटूंबियांनी कशी जोपासली आहे.
याचा आदर्श वास्तूपाठ आपल्या दृष्टीस पडतो.दानधर्म करताना ती देणगी नसून ते आपले कर्तव्य म्हणून मदत करावी.छान विचार त्यांनी कथेत संबोधित केला आहे.त्यांची आजी कृष्तक्का म्हणते,की "आपल्याला जर दुसऱ्या कुणाला काही द्यायचंच असलं,तर नेहमी आपल्याकडे जे चांगल्यातला चांगलं असेल,ते द्यावं.निकृष्ट दर्जाचं कधी देऊ नये.हा धडा मी जीवनाकडून शिकले.देव लोकांच्या ठायी असतो.आपण जर लोकांची सेवा केली, तर खऱ्या अर्थाने ईश्र्वराची सेवा होते." माझ्या आजीआजोबांनी मला त्या नकळत्या वयात केलेल्या उपदेश माझ्या मनात अबाधित आहे.माझ्या हातून झालेली मदत ती त्यांच्या शिकवणीमुळेच आहे असं त्या म्हणतात..
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या बरोबर झालेल्या भेटीची कथा मोठेपणाचा लवलेशही न दाखविता त्यांनी सुंदर शब्दात कथा प्रस्तुत केली आहे.महिमहिम कलाम साहेबांचे वैविध्यपूर्ण स्वभावांचे वर्णन उत्तम शब्दात केले आहे.त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व साजेशा शैलीत वर्णिले आहे.'द वीक'या नियतकालिकातील 'आय.टी.डिव्हाईड'या स्तंभलेखनातील लेखाचे कौतुक फोनवरून केल्याचे ते आवर्जून नमूद करतात. खरचं लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यातील ही 'ग्रेट भेट'च होय.
'खरा दागिना' या कथेत शिक्षणचं अस्सल मौल्यवान दागिना आहे.हे या कथेतून बिंबवले आहे.लेखिका सुधा मूर्ती खेडोपाडी शाळेच्या वाचनालयासाठी सतत फिरतीवर असायच्या.खेड्यात लॉजिंगची व्यवस्था नसल्याने कुणाच्या तरी शिक्षकांच्या ओळखीच्या घरी मुक्कामाला थांबावे लागायचे.तेंव्हा आजी बरोबर गप्पा मारताना दक्षिण कॅनरा जिल्ह्यात साक्षरतेचे गमक आश्रमात आहे हे त्यांना शोधायचे होते.एकदा तेथील आजींबरोबर गप्पा मारताना,त्यांना समजले की,त्यांचा मुलगा ऐथप्पा मुंबईला हॉटेलमध्ये नोकरी करत करत शिकला आणि लोकप्रिय उडपी हाॅटेलचा मालक झाला.त्यावेळी आईला तो म्हणतो की,"तू अर्धपोटी राहून मला शिकवलेस,कॉलेजची फी भरण्यासाठी सर्व दागिने विकलेस.मी तुला पुष्कळ दागिने करतो."त्यावेळी आजीने दिलेले उत्तर अत्यंत विचार करायला लावणारे आहे."अरे खरा दागिना माणसाचं शिक्षण आहे.मी लहानपणी ज्या शिक्षकांच्या घरी मजुरीचे काम करायचे,ते मला नेहमी सांगायचे,आयुष्यात सर्व नाशवंत आहे...फुलं, सौंदर्य, अन्नपदार्थ कोणीही व्यक्ती कायम सुंदर दिसत नाही.पण शिक्षणामुळे मात्र आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास चमकू लागतो.व तेच खरं सौंदर्य आहे."तुला मला दागिनेच घालायची इच्छा पूर्ण करायची आहे.तर आपल्या जिल्ह्यातील खेडोपाडी शक्यअसतील तेवढ्या शाळा बांधून मोफत शिक्षणाची सोय कर".केवढी महती शिक्षणाची..'खरा दागिना' या गोष्टीतून आपल्याला समजते.खरचं शिक्षण हाच लाखमोलाचा दागिना आहे.
'आपरो जे.आर.डी.'स्त्रीयांनी या पदासाठी अर्ज करु नयेत अशी नोटीस बोर्डावरील जाहिरात वाचून त्यांनी आव्हान म्हणून थेट लेखिकेने आपरो जे.आर.डी.टाटांना पोस्टकार्ड पाठवून दिले.तदनंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले.टेल्कोत नोकरी स्वीकारली.या दरम्यान जे.आर.डी. टाटांबरोबर झालेल्या भेटीतून अनेक संस्कारी मूल्यं समजली.
त्यांच्याकडे कामाचा प्रचंड व्याप असतानाही, एका मुलीने लिहिलेल्या पोस्टकार्डची दखल त्यांनी घेतली.यातील एक विचार तर अप्रतिम आहे.ते म्हणतात,"नेहमी जे काही सुरू करायचं, ते आत्मविश्वासानं आणि एकदा का यश मिळालं, की मात्र समाजाचं देणं असतं ते समाजाला परत करायचं. समाजाचं आपल्यावर केवढं ऋण असतं.त्याची परतफेड आपण केलीच पाहिजे."
हल्लीच्या तरुणाईला इतिहासाचं त्रोटक ज्ञान कसं आहे.याचा परामर्श त्यांनी'इतिहासाचं अगाध ज्ञान'या कथेत सडेतोडपणे मांडला आहे.राष्ट्रीय दिवसांचे केवळ सुट्टी म्हणून एन्जाॅय नकरता,त्या दिवशी जबाबदारीने त्या दिवसाच्या स्मरण चिंतन करुन सामाजिक भान जपलं पाहिजे.'ए फॉर अॉनेस्टी'या लेखात मुलाच्या परीक्षेतील घटनेचा उल्लेख केला आहे.त्यातील नितिमूल्ये आयुष्यात अशी मदतीला धावून येतात.याची ओळख करून दिली आहे.छानच!संस्कारी कथेचे बीज आहे.
माझ्या मुलीकडून मला जबाबदार नागरिकांची कर्तव्ये शिकण्याची वेळ आली.अनाहुतपणे त्या कार्यारंभीचा धडा मला मुलीनेच दिला.आणि इन्फोसिस संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देतात आले.त्या कार्याचा प्रारंभ'अम्मा,हे तुझे कर्तव्य नाही का?'या कथेतून उलगडत जाते.
खरचं वैद्यकीय व्यवसायातील लोकांच्या स्वार्थत्यागाची झलक 'अॅनेस्थेशियाची कथा'या गोष्टीत वाचायला मिळते. सेवा देताना इतरांच्या कल्याणासाठी वेदना सहन करण्याची अत्युच्च क्षमता डॉक्टर मुलात कशी आली याची उकल या कथेतून समजते.
अनुभवप्रक्रियेतून अनुभूती कशी मिळते.याची सुंदर कथा 'वाटणी'होय.अनेक कार्यशाळेत, व्याख्यानमालेत वक्ते या कथेचा-गोष्टींचा समावेश करत असतात.धनिकांच्या तीन मुलांना मृत्यूपत्राप्रमाणे १७ घोड्यांची वाटणी कशी करावी. या गोष्टीची उकल सहज सुंदर शैलीत केली आहे. तसेच वडिलधाऱ्यांनी अनुभवातून बरंच काही शिकलेली असतं. त्यांचा निर्णय मानधन हितकारक कसं आहे.याचा उलगडा होतो.
इन्फोसिस फाऊंडेशन संस्थेने वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अनेक खेडेगावात वाचनालये कशी उभारली. याची ओळख करून दिली आहे.एकदा पाठ असलेल्या कवितांचा खेळ खेळत असताना आजोबांनी तिला विचारले,''जर मला पंख असतील तर.''मी क्षणार्धात उच्चारले,"मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन आणि खूप खूप पुस्तकं वाचीन." आजोबांना दिलेलं वचन 'निदान एकातरी वाचनालयासाठी पुस्तकं..'या लेखात प्रस्तुत केले आहे.लेखिकेने खेड्यातील वाचनालयांना पुस्तकांची देणगी देऊन समृध्द केली आहेत. हा पाठ शालेय अभ्यासक्रमातही आहे.
लेखिकेच्या वाणीतून ऐकलेल्या कथेमुळे आयुष्याला कशी कलाटणी मिळाली.गोष्ट ऐकल्याने नोकरी करत शिक्षण घेऊन लकी गॅरेज कसे काढले याची कहाणी म्हणजे लेखिकेच्या शिक्षण प्रवाहात इतरांना सामावून घेण्याच्या पध्दतीला सलाम केला पाहिजे.अशी कथा म्हणजे 'वाळवंटातील प्रवास'होय.अशा संस्कारक्षम, अनुभूती देणाऱ्या बोधप्रद एकापेक्षा एक सरस कथा आहेत.वाचताना अनेक संदेश समजतात.संस्मरणीय विषय ओतप्रोत भरलेला असून बऱ्याच कथा वास्तव असल्याने पटतात.रसग्रहण करताना आनंद देतात.प्रत्येकाच्या संग्रही असं पुस्तक असावे.
आणि श्यामच्या आई पुस्तकासारखे यातील कथा सहृदयतेने शालेय मुलांना ऐकवाव्यात.यांचे पारायण करावे .इतक्या सकस दर्जेदार आणि अनुभवसिध्द संस्कारक्षम कथा आहेत.
लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीस मनापासून सलाम.आणि अप्रतिम अक्षरशिल्पातील शब्दसाजातील 'गोष्टी माणसांच्या' पुस्तकातील कथा मनगाभाऱ्याच्या कप्प्यात जपून ठेवून.
इतरांना सांगाव्या वाटतात.मौलिक मूल्यसंस्कार शिकविणाऱ्या प्रेरणादायी कथा आहेत…
परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १५ आॅक्टोंबर २०२१
Comments
Post a Comment