पुस्तक परिचय क्रमांक-८१गावाकडच्या गोष्टी




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-८१ पुस्तकाचे नांव--गावाकडच्या गोष्टी लेखकाचे नांव--व्यंकटेश माडगूळकर प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण/ऑक्टोंबर २०१७ एकूण पृष्ठ संख्या-१२२ वाड्:मय प्रकार--कथासंग्रह मूल्य--१४०₹ 📖📚🍁📖📚🍁📖📚🍁📖📚🍁 ८१||गावाकडच्या गोष्टी व्यंकटेश माडगूळकर कथासंग्रह ----------------------------------------------- प्रत्येक मराठमोळ्या माणसाला .... जो गावाकडच्या काळ्या मातीत, काळ्या आईच्या कुशीत वाढलेला आहे.अशा गावाची ओढ लावणाऱ्या कथांचा संग्रह.'गावाकडच्या गोष्टी.' ''काहीवेळा कथेचं लहान बीज मनात येऊन पडते.पिंपळाच्या बीजासारखे..अशी बीजे नेहमी पडत असतात,पण त्यातलं गवताचेकोणते आणि पिंपळाचे कोणते,हे मात्र नेमके कळत नाही.पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो, त्याच्या पानाची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते." ही पानांची सळसळ असलेला वृक्ष म्हणजे ''गावाकडच्या गोष्टी" माणदेशी कथासंग्रह होय. व्यंकटेश माडगूळकर यांनी पानांची सळसळ कशी ऐकली असेल.याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण किन्हई,कुंडल आणि माडगूळच्या माणदेशी खेड्यातील मानवी जीवनाचे नाट्य अनेक कथात उतरवलं आहे. जेष्ठ प्रतिभासंपन्न शब्दमहर्षी साहित्यिक ग्रामीण कथाकार व कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी वाड्मय क्षेत्रात चौफेर व विस्तृत लेखन केले आहे.त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसतानाही त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने मराठी साहित्य क्षेत्रात मौलिक भर घातली आहे. त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या नाटकं गाजलेली आहेत. बनगरवाडी, माणदेशी माणसं, गावाकडच्या गोष्टी,सत्तांतर आणि रानमेवा आदी हिरव्या बोलीच्या अक्षरशिल्पांनी वाचक रसिकांवर गारुड केले आहे.अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ब्रशच्या सानिध्यात रममाण होऊन चित्रकला जोपासताना वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी लिहिलेल्या एका कथेला पारितोषिक मिळाले.हे लेखणीचं सामर्थ्य लक्षात आल्यावर 'लेखन' क्षेत्रात भरारी घेऊन अनेक कथा कादंबरी आणि पटकथांचे लेखन केले. अल्पकाळ मुंबईत पत्रकारिता केली. पण त्या क्षेत्रात मन न रमल्याने पुढे त्यांनी'अॉल इंडिया रेडिओ'च्या पुणे येथे ४०वर्षे ग्रामीण विभाग सांभाळला. 'गावाकडच्या गोष्टी'हा कथासंग्रह माणदेशी खेड्यातील अनेक व्यक्तिंच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करत आहे.त्या काळातील गावांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे चित्रण या कथेत उभारले आहे.त्यांच्या कथा माणसाचे विविध पैलू उलगडून दाखवितात. कथेतील भाषा शैलीचा रसरसरीतपणा आणि टवटवीतपणा वाचताना लक्षात येतो. ते कथा लेखनाच्या कळसुत्राविषयी सांगतात की,''किती तऱ्हांनी कथा येतात; किती दिशांनी येतात!सुगीच्या दिवसात भोरड्यांचा कळप यावा , तशा येतात.पाऊसकाळात नको त्या ठिकाणी कोंब उठावा, तशा उठतात. निळ्या-काळ्या आभाळात धना उमटावा,तशा उमटतात. वीज लवावी, तशा लवतात. माणसाने आपले चकित होऊन पाहावे.तसे हे सगळे खेळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता येते का? चारचौघापेक्षा कलावंताना याची देणगी लाभलेली असते.'' 'गावाकडच्या गोष्टी'या कथासंग्रहात सोळा कथांचा समावेश केला आहे. अस्सल गावरान किंवा ग्रामीण कथा वाचायची इच्छा असेल तर त्याची वाचनाची भूक हे पुस्तक नक्कीच शमवेल.असे हे अप्रतिम पुस्तक आहे.पुस्तकातील कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत.तेव्हाची खेड्यांतील परिस्थिती , तेव्हाची अंधश्रध्दा , चालीरीती, परंपरा, न्यायव्यवस्था , आर्थिक साधने , वेशभूषा , यांचे वर्णन लेखकांनी इतकं हुबेहूब आणि अस्सल गावरान भाषेत केलं आहे की पुस्तक संपेपर्यंत ते खाली ठेऊच शकत नाही इतकं गुंतवून ठेवत . प्रत्येक गोष्ट इतकी अप्रतिम आहे की जसं किनाऱ्यावरून सागराच्या खोलीचा अंदाज लावू शकत नाही तस गोष्टीच्या शीर्षकावरून या पुस्तकातील गोष्टीचा अंदाज लावू शकतो.प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्याला त्याकाळात घेऊनजाते . इतकं सुंदर वर्णन आहे की वाचक त्या कथेत गुंतत जातो आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मनाला चटका लावणारा आणि विचार करायला लावणारा कथांचा शेवट हा या पुस्तकाचा मुख्य पैलू आहे.१२२ पानी १६ कथांचा संग्रह असणारे हे छोटेखानी पुस्तक निखळ वाचानाचा आनंद देते. बोजा, सोन्याची माडी, झोंबी, करणी, मारुतराया, कलागत, गुप्त धन, भुताचा पदर,कुत्री, विलायती कोंबडी, न्याय, काय सुदीक गेलं न्हाई,बेत, वहाणा, आडिट आणि फक्कड गोष्ट….. 'बोजा' ही कथा मौज साप्ताहिकात प्रसिद्ध झाली होती. या कथेत आई आणि बायकोच्या उलाढालीसाठी कर्जबाजारी झालेल्या नेवऱ्याची व्यथा 'बोजा'कथेत छानच मांडलेली आहे. घरातल्या एका खोलीत छोटेशे किराणा मालाचे दुकान थाटणारी बजा वाणीण. आपल्या मिळकतीचा एक छदामही मुलाला न देता , दुकानाचा माल मात्र त्याच्या पैशाने खरेदी करणारी आई. नेहमी दोघा सासवा सुनात कलह आणि भांडाभांडी निर्माण होत असते. त्यामुळे बेजार होणारा आणि कर्जानं खंगणारा नेवरा…कर्ज भागवायला तो जमिनीचा तुकडा विकायचा ठरवितो.आणि तो गणालाच हुलिवर घालून त्याला इसारपावती शंभर रुपयात करून देतो. पैसे कनवटीला लावून घरी येतो.इकडं घरी म्हातारीनं आढ्याला दोर टांगून फास केलेला तर बायकोने कपाळ रक्तबंबाळ केलेलं असते.ते पाहून याची पाचावर धारण बसते.आई तर नेवऱ्याला लाखोली वाहते.बडबडीने तिची दातखिळी बसते.जेंव्हा तो म्हणतो की 'आई ,मी जिमिन विकली नाही,इसारपावती केलीय.ती रद्द करतो.'तेंव्हा म्हातारी सावध होते.मग नेवऱ्या गणाला काकुळतीने इसार पावती रद्द करण्याची गळ घालतो. पण तो पाचशे रुपये घेतल्याशिवाय मागं हटत नाही.त्यामुळे न घेतलेल्या पैशाचा त्याला वाढीव बोजा पडतो. तो तसाच राहतो.असं सुंदर चित्रण नेवऱ्याचं केले आहे.माणसांच्या स्वभाववैशिष्ठ्यांची ओळख या कथेतून घडते. हौसेला मोल नसते.याचा प्रत्यक्ष अनुभूती देणारी कथा म्हणजे 'सोन्याची माडी' कर्ज काढून सोन्याने इर्षेपायी डामडौलापायी बांधलेली माडी.अन् झालेलं कर्ज फेडण्यासाठी 'माडी विकणे आहे'असा बोर्ड लिहिणारा सोन्या साळी. अप्रतिम प्रवाही गावरान भाषेत दुमजली माडी बांधताना आलेल्या अडचणींचे वर्णन केले आहे.वाचताना कुतूहल वाढतच जाते. गावच्या बाबू म्हातऱ्याच्या उर्मट आणि रागिटपणामुळे गावातील अनेकजण त्याला वचकून असतात. एके दिवशी त्याच्या बंडा नावाच्या मुलाशी मोमीनाचा पाहुणा मेहमान यांच्यात कुस्तीचा आखाडा रंगतो. अन् मेहमान पैलवान आनंदाच्या नादात साला म्हणतो. त्यामुळे शिवी दिल्यानं बंडा चिडतो. मग काय त्यात बंडा हारल्याचे आणि साला म्हणल्याचे कळल्याने म्हातऱ्याचे पित्त खवळले.तो रातचाच चावडीत येऊन एकटाच बसतो. मोमीनाचा पोरगा माफी मागायला चावडीवर बाबूच्या जवळ जातो.व माफी मागत असतानाच तो मोमीनाला चपलेने निबार बदडतो. त्यामुळे तो पोरगा अर्धमेला होतो. काही दिवसांनी भीतीने मोमीनची मुलं गांव सोडून जमिन विकून निघून जातात.अशी बांबू म्हातऱ्याची इरसाल कथा 'झोंबी' होय. गावातल्या मासलेवाईक धोंडी लेंगरा आणि बाबू नाभिक यांच्यातील जमिन खरेदीच्या पायी घडलेली कथा 'करणी' अंधश्रध्देला माणसं कशी बळी पडतात.त्याची तपशीलवार वर्णन करणारी ही कथा आहे.ज्याच्या अंगात रग आणि डावपेची व्यवहारात पारंगत असणारा वरचढ कसा ठरतो.ते या कथेतूनप्रकर्षाने लक्षात येते. पावसाळ्यातील एका सकाळी वानराने गावात येऊन कसा धुमाकूळ घातला.आणि लोकांना सैरावैरा पळायला लावलं.याची गोष्ट म्हणजे 'मारुत राया' नाना गोडीगुलाबीने वानराला शेंगदाणे चारताना,ते नानांच्या हातालाच कडाडून चालतं.त्यामुळं नानांचा हात रक्तबंबाळ होतो.ते बेशुद्ध पडतात.मग त्यांच्या मुलांना चेव येतो.ते वानराला काठ्यांनी मारतात. काठ्यांच्या तडाख्याने ते जागीच गतप्राण होते.मग भजन करत हरिनामाचा गजर करीत त्या वानराचा अंत्यविधी करतात. काही दिवसांनी नाशिक दुखण्यातून बरं झाल्यावर ज्या जागी वानर मारला तिथं चौथरा बांधतात .अशी ही मारुतरायाची कथा.नानांच्या स्वभावातून संवेदना अन् भूतदया व्यक्त होते. वतनाची आनेवारी असणारा सखाराम कसा,आडगा आहे.याचं उत्तम उदाहरण 'कलागत 'कथा. माणसं त्याच्याशी भांडायला गेल्यावर तो मग्रुरीने बोलणार. बया आणि तुळशीरामशी यांच्याशी तो मुद्दाम भांडण वाढवितो. त्याचं रसभरीत आणि सुंदररित्या वर्णन केलेलं आहे. दुसऱ्याची एखादी वस्तू आल्यावर तीच मागायला आल्यावर चाल ढकल करणं. सतत वायदे करून न देणं.. सरशेवटी भांडणावर आल्यावर नाकबूल होणं. आणि चढाक भाषेत अपमर्द करणं… करुन सवरुन मीच कसा मोठा… माझंच कसं खरं…. साळसुद पणाचा आव कसा आणणं….याचा प्रत्यय 'कलागत' कथा वाचताना येते. मितभाषी शांत असणारा अनोळखी बुवा गावच्या पाटलालागुप्तधनापोटी कसा चुना लावतो.फसवितो.याची कथा 'गुप्त धन'आहे.बुवा माणसांच्या धनाच्या हव्यासापोटी कशी फशी पडतात.याचे सुंदर लेखन या कथेत केलेलं आहे. कुत्र्याचे एक पिल्लू मी पाळले होते. माझ्यासह सगळेच सुरुवातीला त्याचे लाड करीत होते. त्याचे तोंड काळे होते.ते अपशकूनी असते. म्हणून सगळेजण त्याची हिडीस फिडीस करु लागले. त्यामुळे ते घरातून निघून गेले.पहिली गोष्ट कुत्र्याच्या पिल्लावर लिहिली.ती 'अभिरुची' मासिकात छापून आली. तिचा फार गवगवा झाला.तिथेच माझ्या कथेचा पाया रचला असे कथाकार व्यकंटेश माडगूळकर यांनी नमूद केले आहे. 'भुताचा पदर' अंधश्रद्धेच्या जोखडात पुर्वीची लोकं कशी असायची याची माहिती या कथेतून प्रकर्षाने लक्षात येते.नाना कुलकर्णी हा बेरकी माणूस, हुशार खोकल्याचा पण परिस्थितीमुळे शनिच्या फेऱ्यात अडकलेला असतो.पाच वर्षाची त्याला गावची वतनदारी मिळते.त्या काळात त्यांची चांगलीच बरकत होते.त्यामुळे तो अहंमपणाने वागायला लागतो.पाटलालाही त्याने हातचे बाहुले बनवले असते.नाना गबरगंड कसा झाला असेल याचा गवगवा गावभर होत असतो. सगळ्यांच्या चर्चेचा एकच विषय. नानाने बक्कळ माया कशी जमविली असेल?मग एके दिवशी रात्रीची मारुतीच्या कट्ट्यावर गप्पांचा फड रंगलेला असतो.विषय लाच खाण्याचा निघतो.तेंव्हा हा आळ घालवण्यासाठी तो 'भुताचा पदर 'ही कथा सगळ्यांना सांगतो.त्याचे रसदार , बहारदार आणि अस्सल गावच्या भाषेत तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर यांनी केले आहे. खेड्यांची सुधारणा करण्यासाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत असते.त्याची कथा 'विलायती कोंबडी'आहे. हुबेहुब वर्णन केले आहे.मामलेदार दफ्तर तपासणी चावडीवर करण्यासाठी येतो.त्याच्यात अनेक चुका असतात. त्याच्या रागाला शमविण्यासाठी काय काय आक्रित पाटलाला करावं लागतं. खारा पाहुणचार करायला पाटलीन विलायती कोंबडीचं कापते.हे पाटील आणि मामलेदाराला कळल्यावर काय होते.त्याचे खुमासदार शैलीत वर्णंन केलंय. संताच्या शेतातलं पिकाचा ढोबळा जनावरांनी कसा खाल्ला आणि बाटुक कसं काढलं यांचा माग नामा नाईक कसा काढतो.कालवड हऱ्यानं चारली हे शोधून काढल्यावर. त्याला देवळाम्होर बोलावणंआल्याचं येराळ सांगतो. आणि मग चावडीत 'न्याय 'होतो.हऱ्या पहिल्या पहिल्या नाकबूल होतो, मग सवाल जबाब आणि माग यामुळे हऱ्याला मारुतीची शपथ घ्यायला भागपाडल्यावर शेतात कालवड चारल्याची कबुली देतो.त्याला गावकरी मारुतीला चार घडं तेल देण्याचा दंड ठोकतात.त्यासाठी त्यांची न्यारी योजना मनात तयार असते.घरात आल्याव बायकूला म्हणतो,"भागे, आज राच्याला कुणाच्या तरी परड्यातल्या वैरणीचा काटा काढायला हवा.दंडाचं तेल दिलं पाहिजे.वैरण वाण्याच्या दुकानी घालू आन् तेल आनू!" इतकी कठीण परिस्थितीतजीवन कंठीत असणारी वंचित समाजातील माणसं होती. अशा अनेक विधारक कथांतून दिसून येते. चोरांनी बाबालालच्या घरावर दरोडा टाकल्याची कथा 'काय सुदिक गेलं न्हाई'बाबालाल पोलिस आणि कोर्टकचेरी झंझट मागू लागू नये म्हणून चोरी झाली तरी' काय सुदिक गेलं न्हाई'म्हणतो. कारण या पाती कर्ज होईल, सगळ्यांना चौकीवर व कोर्टात बोलावतील . काय -भाय विचारतील म्हणून काहीच सांगत नाही.अशी ही कथा आहे. इटुबा आणि संद्यानं लय दिवस वशाट खाल्लेलं नसतं.त्यामुळे सावज हेरण्याचा बेत करतात. दोघांबरोबर घरातील सगळ्यांचं मेजवानी मिळाली म्हणून पाटलाच्या तोंडाला ईख घालून मारतात. शिकार न्हाय निदान मेललं जनावर तरी खायला मिळेल म्हणून ते उपद्याप करतात.घरी पाटलाचा मुलगा दु:खाने रडत असतो.तिथं सगळेजण जमतात.तो खोंड देण्याची विनवणी करतात. "व्हय व्हय! सोन्याहारखा खोंड मातीत का घालता?होऊ द्या आमास्नी मेजवानी!''मग पाटील ओरडतात, "अरं,मानसं म्हनावं का राकीस रं तुम्हाला?आमचं काळीज फाटलंया आनंद तुमी मेजवानीची भाषा बोलताय,आं.'', असं ओरडून मग मात्र पाटील ,पाटलीन आणि पाटलांचा पोरगा गहजब करून समद्यानी हाकलून लावतात. पांडाला जुन्या चपलांची दुरुस्ती आणि नव्याची खरेदी करायला काय काय दिव्य करावे लागते. त्यांचे छानच वर्णन 'वहाणा'कथेत वाचायला मिळते.नव्या शहाण्यांना तेल लावण्याने वहाणा कुत्र कसं भुगा करतं.नमुनेदार आणि मासलेवाईक सुरस कथा वाचायला मिळतात. 'आडीट' कथेत बोकडाच्या खरेदीवरून झालेल्या कजागतीचा वाद गावकरी कसा मिटवतात याची कथा 'आडिट'. गोप्याच्या स्वभावाचे आडीट सुंदर शब्दात मांडले आहे. एकंदर सर्वच कथा गावातल्या हरेक बित्तबातम्या सारख्या आहेत.प्रत्येक कथेतून माणसांच्या स्वभावाचे पैलू उलगडत जातात.लेखनशैली लक्षवेधक आहे.कथाकार तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखणीस प्रणाम!आणि जेष्ठ साहित्यिक तात्यासाहेबांना त्रिवार वंदन!!!! श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई लेखन दिनांक - ४ नोव्हेंबर २०२१






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड