पुस्तक परिचय क्रमांक-७७ अजिंठ्याची चित्रे




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

पुस्तक क्रमांक-७७

 पुस्तकाचे नांव--अजिंठ्याची चित्रे

 लेखकाचे नांव--म.वि.सोवनी

प्रकाशक-शब्दवेध प्रकाशन , पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-आॅगस्ट १९९६,प्रथमावृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-४८

वाङमय प्रकार---ललित

मूल्य--२५ ₹

📖📚🍁📖📚🍁📖📚🍁📖📚🍁

७७||अजिंठ्याची चित्रे 

           लेखक-- म.वि.सोवनी

                ललित

-----------------------------------------------

महाराष्ट्राच्या भूमीचा अलौकिक अद्वितीय खजिना म्हणजे लेण्यांचे सौंदर्य आहे.डोंगरात खोदलेली वैशिष्ट्यपूर्ण लेणी,ही महाराष्ट्र भूमीचे अलंकार!यामुळे आपल्या भारताचे नांव विश्वविख्यात झालेले आहे.सह्याद्रीच्या डोंगर रांगेत ठायी ठायी ही आश्र्चर्य‌कारक आणि अद्भूत वाटणारी लेणी आढळतात.या सर्व लेण्यांत अजिंठ्याचा क्रम अग्रमानांकित आहे. कारण ती जगभरात लोकप्रिय आहेत.अजिंठा ही केवळ खोदलेली लेणी नसून अंतर्भागातल्या भिंतींवर अज्ञात चित्रकारांनी चितारलेल्या नयनरम्य अभिजात चित्राकृती चित्तथरारक आहेत.ती पाहिली असता अगदी कालपरवा रंगविल्यासारखे त्यांचे रंग आजही ताजे दिसतात.लेणी हे महाराष्ट्राचे वैभव जगातील काही मोजक्या,अप्रतिम कलाकृती मध्ये त्यांची गणना होते.हजारो वर्षे ही तयार होत होती.तर तद्नंतर हजारो वर्षे ही जनमाणसातून अज्ञात राहिली होती.


जगप्रसिध्द अजिंठ्याची लेणी.या लेण्यांचा ऐतिहासिक  इतिहास लिखित करण्याचं महान कार्य लेखक म.वि.सोवनी यांनी 'अजिंठ्याची चित्रे' या पुस्तकात उलगडला आहे.चिनी प्रवासी ह्युएनत्संगापासून ते आजच्या नव पर्यटक शाळकरी मुलांपर्यंत लाखो जणांनी या स्थळाला भेट देवून, खोदलेल्या लेण्यांचा स्थळ समूह  'याची डोळा याची देहा' पाहून तृप्तता मिळविली आहे.भेट देणारे अचंबित होतात.


अजिंठ्याचा इतिहास, चित्रशैली,चैत्य,विहार याची वैविध्यपूर्ण माहिती घेताना, नेमकेपणानं गुहांचे निरीक्षण कसे करावे,चित्र कसे पहावे. याची माहिती 'अजिंठ्याची चित्रे' हे पुस्तक वाचताना समजते.


नऊ लेखांमध्ये ही लिखित चित्र मालिका गुंफली आहे. अजिंठा, ऐतिहासिक पार्श्वभूमी, अजिंठ्याचा शोध,भारतीय गुहाशिल्प, भारतीय चित्रकला, चित्रतंत्र, अजिंठ्याची चित्रे, यथार्थ दर्शन आणि वैभवशाली वारसा या लेखात गुहाशिल्पाची माहिती उलगडत जाते.


संशोधक लेखक म.वि.सोवनी यांची संस्कृती आणि कला या क्षेत्रातील आपले मराठी अलंकार,सण उत्सव, महाराष्ट्राचे मानकरी खंड १ व २ आणि अजिंठ्याची चित्रे आदी पुस्तके प्रकाशित आहेत.त्यातीलच अजिंठा लेण्यांच्या माहितीचा खजिना रसिक वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.


महाराष्ट्राच्या खेडेगावातील प्राथमिक शाळेतील ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी सन १९९६-९७या वर्षात 'आॅपरेशन ब्लॅकबोर्ड'योजनेखाली पुस्तके मिळाली होती.त्यातीलच हे एक पुस्तक ,वाचनालयातील पुस्तके मुलांना वाचायला देताना दृष्टीस पडले.वरवर पाहता छोटेखानी पुस्तक, पण अजिंठ्याच्या लेण्याची माहिती वाचताना लक्षात येते.


 प्रस्तावनेनंतर अजिंठा स्थळी आपण कसे पोहचू याची माहिती दिली आहे.तसेच त्याची भौगोलिक स्थान माहिती दिली आहे.'अजिंठा'  या लेखात अजिंठ्याचे कृष्णधवल छायाचित्र, समुह गुहा शिल्पांचे क्रमांक,लेण्यांच्या अंतरंगातील भिंतीवर रेखाटलेली चित्रे आणि भौगोलिक माहिती रेखाटली आहे.ऐतिहासिक पार्श्वभूमी या लेखात बौद्ध धर्म आणि प्रसार, सह्याद्रीच्या प्रस्तराची माहिती आणि लेण्यांचे खोदकाम या विषयाची माहिती प्रस्तुत केली आहे.तसेच भारतातील सर्व लेण्यांची गणना केली तर जास्तीत जास्त लेणी महाराष्ट्रात आहेत.सह्याद्रीच्या तर अंगभर लेणी खोदलेली आहेत.लोकांनी इथं यावे.विश्रांती घ्यावी. समाधानी वृत्तीने धर्माबद्दलचे ज्ञान अवगत करावे. या हेतूने लेण्यांचे खोदकाम केलेले असावे.एका अखंड कातळात हे कोरीवकाम कसं केले असेल ते वाचताना आपण अचंबित होतो. छानच लेखन केले आहे.


'अजिंठ्याचा शोध' या लेखात शोधाची कहाणी उलगघडत जाते.आधुनिक जगाला अजिंठा लेणींचा(गुंफा)शोध सन १८१९ मध्ये इंग्रज अधिकाऱ्याला योगायोगाने लागला आहे.लेणी म्हणजे नैसर्गिक गुंफाच असतील या कल्पनेने इंग्रजांची मद्रास येथील तुकडी मराठ्यांच्या पाठलागावर असताना शिपायांनी येथे ठाणे उभारले होते.त्यावेळी भोजन बनविण्यासाठी चुली मांडलेल्या होत्या.त्या जाळाच्या उजेडात भिंतीवर रेखाटलेली रंगित चित्रे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.ही बातमी कर्णोपकर्णी ब्रिटिश सैन्यात पसरली.मग लेफ्टनंट ई.जे.अलेक्झांडर याने ही लेणी पाहून त्याने 'रॉयल एशियाटिक सोसायटी'मध्ये निबंध वाचन केले.तदनंतर ईस्ट इंडिया कंपनीने मेजर गील यांची नेमणूक चित्रांच्या प्रतिकृतीसाठी करण्यात आली.


तदनंतरचा इतिहास जेम्स फर्ग्युसन व डॉ. बर्जेस यांची शोधणं कार्य, जॉर्ज ग्रिफिथ्स यांचे नकला करण्याचे काम,लेडी हॅरिंगहॅम यांनी भारतीय कलाकारांच्या अस्सल कुंचल्यातून साकारलेली चित्रे  घेऊन इंडिया सोसायटीला अर्पण केली.तसेच औंध येथील संग्रहालयात ही चित्रांची छायाचित्रे उपलब्ध आहेत.याची इत्यंभूत माहिती या लेखातून समजते.


भारतीय गुहाशिल्पाची ओळख या लेखातून केली आहे.आदिमकाळ, मौर्य काळातील घडामोडींची माहिती आणि गुहां स्थळांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती समजते.रेषा आणि आकारतून साकारलेली चित्रकला.

तिला  रंग आणि छायाप्रकाशाचा अचूक वापर करून चित्र कसे खुलवायचे? याची समर्पक छायाचित्रासह उदाहरण देऊन माहिती दिली आहे.रेषांच्या ज्ञानाचा वापर चित्राकृतीसाठी चतुराईने अफलातून केलेला आहे.तरल आणि प्रच्छन्न रेषाविलासाचा वापर केल्याने चित्रांचे सौंदर्य कसे खुलते,यांचे अत्युच्च उदाहरण म्हणजे अंजिठ्याची चित्रे आहेत.असं लेखक या लेखातून प्रस्तुत करतात.


चित्र तयार करण्यासाठी कशाकशाचा वापर केला आहे.याची माहिती'चित्रतंत्र'या लेखातून समजते.रंगछटा अक्षय रहाण्यासाठी रंगछटा आणि कारागीरांच्या त्याकाळातील रंगज्ञानाची परिपक्वता या लेखातून स्पष्ट होते.मोजक्याच रंगांच्या माहितीची उधळण यावरुन लक्षात येते. सहज सोप्या भाषेत लेखन केले आहे.


पुस्तकाच्या शिर्षक लेखात आपणाला 'अजिंठ्याची चित्रे'या लेखातील मजकूर ही नव्याने समजतो.चित्रांचे रसग्रहण कसे करावे? शरीरसौष्ठव,बाह्यरेषा, यथार्थ दर्शन, रंगसंगती आणि रचना या चित्रांच्या गुणमाध्यमांची माहिती समजते.भारतीय चित्र पध्दतीची ओळख होते.तसेच चित्र सौंदर्याचा अच्युत्तम नमुना म्हणून अजिंठ्याची चित्रे प्रसिद्ध आहेत.

याचीही माहिती समजते.लेण्यांची पहाणी कशी करावी याची माहिती'यथार्थ दर्शन'या लेखातून समजते.तसेच तेथील लेण्यांमध्ये काय पहावे. याचीही माहिती विषद केली आहे.


अजिंठा लेणी आपला वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दस्ताऐवज स्थळरुपातआहे.हा अप्रतिम चित्रांच्या सौंदर्याचा खजिना आपणाला उलगडून दाखवला आहे.ही आपली स्मृतीस्थळे तेथील चित्रांचा अनमोल ठेवा जतन करणं.आपलं कर्तव्य आहे.अश्या पुस्तकातून ऐतिहासिक माहिती समजते.पुस्तकातील लेखन शैली सहज सोपी आहे.कुतूहल वाढविणारी आहे.तसेच चित्रकलेच्या आशयाची माहितीही आपल्या ज्ञानात अधिकची भर घालते.

 हा अनमोल ठेवा, चित्र ही दृष्टीगम्य वस्तू असल्यामुळे ती प्रत्यक्ष पाहणेच श्रेयस्कर! शब्दांकित वर्णनाच्या शतसहस्त्र पटीने आपल्या वैभवाचे प्रदर्शन करीत अजिंठ्याची लेणी दिमाखात उभी आहेत.


परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक-२२आॅक्टोंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड