पुस्तक परिचय क्रमांक-८३वैर





वाचसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई

पुस्तक क्रमांक---८३

पुस्तकाचे नांव--वैर

लेखकाचे नांव--अण्णाभाऊ साठे

प्रकाशक-सुरेश एजन्सी,पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०२१/चौदावी आवृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-१०३

वाड्मय प्रकार --कादंबरी

मूल्य--१२०₹


📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

८४|पुस्तक परिचय

         वैर कादंबरी 

लेखक-अण्णाभाऊ साठे

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾


"सातारा जिल्हा ही माझी कर्मभूमी आहे. तिथंच जन्मलो,वाढलो नि वावरलो आणि सातारी माणसं मी जवळून पाहिली.वैर वाढवणं सोपं नाही.त्यासाठी माणसं कणखर,करारी आणि अहंकारी असावी लागतात.दुबळी , लाचार माणसं 'वैरा'चा खेळ खेळू शकत नाहीत."साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी 'वैर' कादंबरीत सातारा जिल्ह्याचा गौरव केला आहे.


गावकुसाबाहेर अठरा विश्व दारिद्यात आहे. उपाशीपोटी उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या समाजातील व्यक्तीरेखांचे जीवंत व बोलके चित्र अनेक कथा कादंबरीत रेखाटले आहे.

वास्तवतेच्या दाहकतेचे दर्शन आणि कष्ट, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी शूरता यांचे अनोखे मिश्रण त्यांच्या साहित्यसंपदेत  आहे.ग्रामीण रांगडी बोलीभाषा अफलातून शैलीत कथा,कादंबरी,पोवाडे आणि नाट्य रुपाने साहित्य रेखाटन करणारे 'साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे.


 शब्दांशी इमान राखून शब्दांशी नाते जोडले.शब्दांच्या सहवासात शब्दांशीच जगले.चिरागनगरच्या पत्राचाळीतील झोपडीत साहित्य निर्मिले.अण्णाभाऊं या लोकसाहित्यिक साहित्यसम्राटाने आपल्या सिध्दहस्त लेखनितून एकापेक्षा एक सुरस लोकप्रिय कथा, कादंबऱ्या,नाटकं, प्रवासवर्णनं,लोकनाट्ये ,शाहिरी वाड्मय आणि त्यावर कळस म्हणजे मराठी चित्रपट कथाही लिहिल्या.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संपदेने शंभरी पार केलेली आहे.या सगळ्या साहित्यकृतीतून त्यांनी सामाजिक जाणीवांच्या व्यथा कथेत मांडल्या आहेत. उपेक्षितांचे अंतरंग विद्रोही बाण्यात लिहिणारे अण्णाभाऊ. फकिरा कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीस अर्पण करणारे अण्णाभाऊ.वीरांच्या शौर्य गाथा गाणं हा शाहीरांचा धर्म,अन्यायाची सांगड घालणे हे तिचं कर्म आणि लोकनिष्ठा व देशनिष्ठा ही शाहीराची लेणी,असं मानून कामगारकष्टकरी वर्गांच्या संवेदनाचे मर्म त्यांनी पोवाड्यात रचून सादर केले.


त्यांच्या लोकप्रिय कथाकादंबरीवरुन मराठी चित्रपट निर्मिती झाली आहे.डोंगरची मैना, फकिरा,वारणेचा वाघ,बारा गावचं पाणी,अशी ही साताऱ्याची तऱ्हा आदी सिनेमा होत.त्याच लोकप्रियतेची 'वैर' कादंबरी आहे.अन्यायाचा बदला घेणारी कादंबरी,तिला वास्तवतेचा दाह आहे.वेदनेची किनार आहे. वैरत्वाचा आशय आहे.पहिल्या कादंबरीच्या आवृत्ती निमित्ताने लिहिलेली प्रस्तावना या आवृत्तीत रेखाटली आहे.

या कादंबरीची पुर्वपिठीका त्यांच्याच शब्द वैभवात साकारली आहे.ते म्हणतात की,"दहा वर्षांपूर्वी मी भूमिगत होतो.त्यावेळी फकिरा आणि वैर या दोन कादंबऱ्या लिहून काढल्या. वैर वरुन नाट्यलेखनही केले.त्या नाटकाचे प्रयोगही सादर झाले होते.


सातारा जिल्ह्यात कष्टाची कृष्णामाई अखंड पणे वाहते. तिला सगळ्या नद्या मिळत जातात. इथं देशभक्तीची कोयना नवजीवन निर्माण करते.अन् त्यागाचे महान कुंड सदैव धगधगत असते.ही माती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने आणि घोड्यांच्या टापांनी पुनीत झालेली आहे.इथं मराठा सैनिकांची तलवार तळपली आहे आणि मराठी साहित्यिकांच्या प्रतिभेने इंद्रधनुष्य निर्माण केले आहे.अशा या भूमीला नंदनवन हे सार्थ नांव आहे.अशा वारणेच्या खोऱ्यात आजवर अत्याचार अन्यायाविरुद्ध धगधगणारे पलिते प्रज्वलित झाले.त्यांनी घेतलेल्या सूडाच्या अनेक ज्वलंत कथा लेखणीबध्द झाल्या.


डोंगराच्या कुशीत वसलेले येळापूर गांव. गावचे वतनदार गोपाळराव देशमुख (इनामदार). त्यांच्याकडे सत्तर गावच्या जमिनीची मालकी आणि खंड वसूल करण्याची पिढीजात वतनदारी.कुळाने जमीनी करणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांच्या वैराची आणि दरोडेखोर नरशाची ही कादंबरी आहे. गोपाळराव इनामदार नेहमीच कुळांना आपल्याच धाकात ठेवण्यासाठी अन्याय अत्याचार करणारा.. वेळ प्रसंगी हस्तकाकरवी खून करून बदला घेणारा…. शेतकऱ्यांना नाहक  खटल्यात अडकविणारा... तर एकीकडे कुळांनी जमीनी कसून त्याचा खंड दरवर्षी वतनदारांना द्यायचा.अन यात अन्याय झालेल्या शेतकऱ्यांच्या खंडकऱ्यांच्या बाजूने लढणारे मुकिंदा मोहिते व महिपती नलावडे.तर तिसरीकडे गावच्या गावं बेचिराख करणाऱ्या नरशा दरोडेखोराची कथा असे तिहेरी कथानकाची कादंबरी अक्षरशिल्पात गुंफली आहे. 


मातब्बर शेतकरी महिपतीची रुपवान कन्या गुणा दररोज बापाला जेवण घेऊन मळ्यात जातेमहिपती आणि मुकिंदाचे मळे बांधालाबांध लागून असतो.मुकिंदाचा मुलगा राजाराम हा तिचा प्रियकर. एके दिवशी मळ्यात जाताना वाटेतच हे रूपवान पाखरु बघून मल्या तिला 'बर्फिचा तुकडा'म्हणून डोळा मारुन निघून जातो. त्यामुळे गुणा हल्ल्याची भीती घेऊन मळ्याकडे जाते.मल्या आणि गुंड्या गुणासाठी झुरणी लागलेले असतात.


मल्या हा गोपाळरावांचा शरीररक्षक अक्राळ विक्राळ आणि आडदांड असतो.गुणा आपल्या मातब्बर बापाच्या कानावर मल्याचा खोडील पणा घालते.तो संतापाने बेभान होऊन एका रात्री मल्याला जायबंदी करतो.त्याच्या मनात गुणा सलत राहते.


इकडे राजाराम आणि गुणाला मळ्यातहितगुज करताना पाहून स्तब्ध होतो.अन् दोघं मित्र व्याही व्हायचं ठरवितात. गुणाचं आणि राजारामचं लगीन ठरतं.तदनंतर एकेदिवशी गुणा मळ्यात निघालेली असताना मल्ल्या तिला पळवितो.ती 'आऽऽईऽऽ'किंकाळी फोडते.ते धनगऱ्याच्या बिऱ्या बघून जोरदार बोंब ठोकतो.गुणा भेटायला आलेल्या राजारामला सांगतो.तेवढ्यात महिपती तिथं आलेला असतो.हे ऐकून तो पिसाट आणि निर्भान होतो.आता दोघेजण,तरुणपोरं आणि गावकरी वाऱ्यासारखे डोंगराकडे धावत सुटतात.भालं ,कुऱ्हाडी ,बंदुका हातात असतात.हत्यारं चमकत असतात. लखलखत असतात.गावकऱ्यांनी तिन्हीबाजूंनी डोंगर वेढलेला असतो.आपल्या मागावर गावकरी आहेत.हे मल्याच्या लक्षात येत नाही.त्याला वाटतं आपण सावज पळवलय हे कुणाही पाहिलं नाही.आता राजारामच्या हातातील बंदूक हल्ल्याचा वेध घ्यायला अधिर झाली होती. कधी त्या मल्याला टिपतोय यासाठी त्याचे हात शिवशिवत होते.


मल्याला तिन्हीबाजूने राजाराम, महिपती आणि गावकरी घेरतात.थोड्याच वेळात सुर्य डोंगराखाली दडी मारतो.सूर्य मावळताच चंद्रोदय होतो.चंद्रप्रकाशानं चराचर उजळतं.

कड्यावल आल्याव तो गुणाला खाली ठेवतो.आणि म्हणतो,"त्या दिवशी भल्या नुसता डोळा मारला,तर घरात सांगून मला मागल्या मार दिला.आता मी काय करतो ते बघ!" कड्यावनं उडी घ्यावं असं तिला वाटलं.पण हल्ल्याने तिला जखडलं होतं.तो काही करायच्या आतं. राजारामची गोळी कडाडली.त्या आवाजाने कपारी दणाणल्या,डोंगर गरजला.पाखरं घाबरली.'हाणा, मारा.' असा एकच गिल्ला झाला. माणसं कडाडली.आणि मल्यावर दगडांचा वर्षाव करु लागली.महिपतीला बघितल्यावर गुणाने टाहो फोडला.आणि तेवढ्यात राजारामने मल्यावर गोळी झाडली. तिने हल्ल्याची मांडी फोडली.अन् तो खाली कोसळला. त्याचवेळी गुणा महिपतीच्या गळ्यात पडून रडत होती. त्याला मारु नका जिवंत झरा असे म्हणताच.तो हळूहळू कड्यावरुन खाली उडी मारतो….आणि नदीत कोसळतो. पण सुदैवाने वाचतो. 


येळापुरात सगळी गावच्या जत्रेची तयारीत मश्गुल असतात.मुख्य आकर्षण 'महांगोळी'चे असते.ती जिंकण्याची गोपाळराव आणि मुकिंदा-महिपती करत असतात. आत्तापर्यंत गोपाळरावच्या लोकांनी महांगोळी शर्यत जिंकलेली असते.पण यावेळी मात्र मुकिंदा महिपती जिंकूनआत्तापर्यंतचा वचपा काढतो. त्यामुळे गोपाळरावच्या लोकांचा तिळपापड होतो.त्याच्या मनात कटकारस्थान थैमान घालत असते.एका रात्री मल्ल्या गोपाळरावच्या वाड्यावर येऊन धडकतो.नरश्याच्या टोळीत सामील झाल्याचे सांगतो.माझ्या एका एका वैऱ्याची हाडं मोडणार असं सांगून निघून जातो.


वैशाख महिन्यातील एका मुहूर्तावर गुणा आणि राजारामचं लग्न होतं.जुने मैतर आता नवे पाव्हणे होतात.नवी श्री होऊन सासरचा संसार सुरू होतो.नवीपीकं जोम धरत असतात. काळी आई हिरव्या शालूत नटलेली असते.मीच या खोऱ्याचा मालक,हे गोपाळरावचे मत बदलत नाही. सगळ्यांनी माझे वर्चस्व प्रस्थापित केलेच पाहिजे.त्यासाठी तो उचापती काढणं, कुरापती काढणे.चिथावणी देण्याचं काम करत असतो.


एकदा गोपाळरावचा शरीररक्षक गुंड्या बाजारातील एका बोळात गुणाला अडवतो. आणि मग्रुरी करत म्हणतो,"गुणा, माणसानं माणसाकडे बघावं,त्याला पैसं पडत नाहीत." त्यावर गुणा कडाडते."तुझं इतक्या लवकर दिवस भरलं असतील,असं वाटलं नव्हतं."थोड्यावेळाने गुंड्या चावडीवर येतो.चेहरा पडलेला असतो.तेवढ्यात महिपती काठी घेऊन चावडीवर येतो.अन् गुंड्याला काठीनं बदडून काढतो.त्याला मारल्याची बातमी रामूसवाडा आणि गोपाळरावाला समजते.तो आगीत तेल ओतून महिपती विरुद्ध गुंड्याच्या भावकीला चिथावतो.खर खोटं कळल्यावर त्याचा बाप पांडा  मुकिंदा आणि गुणाची क्षमा मागतो."ह्ययो गाव हाय.हिथं अनेक नाती आहेत.जातीधर्मांनं समाज वेगळा असला तरी, नात्याने एक असतो.अन् सारी नाती डोळ्यांत नांदतात आणि काळजात विसावा घेत असतात.पण काही लोकांनी नाती सोडली. त्यांच्या डोळ्यात नाती नसून त्यांच्या डोळ्यावर धुंदी चढलीया ती गोपाळराव इनामदाराची." 


काही दिसांनी इनामदाराचा शिपाई रामू नरश्याच्या साथीदारांच्या तावडीत सापडतो.ते त्याला अड्यावर घेऊन जातात.बेदम मारुन बैठका व दंड मारण्याची शिक्षा करतात. इनामदाराला पैश्याच्या मागणीची चिठ्ठी रामूकडे देतात. नरशा दरोडेखोर आणि त्याची टोळी इनामदाराच्या वाड्यावर येते.नशापाणी जेवणखाण करुन येळापुरातली घरं पेटवून देतात.सगळीकडे आगडोंब उसळतो.घरांना आगी लावलेल्या असतात.महिपती व राजाराम  बहुतांश माणसं शेजारच्या गावात जत्रेला गेलेली असतात.याचाच फायदा घेऊन नरश्या मुकिंदाच्या घराकडे येतो.मुकिंदा परिस्थितीचे भान ओळखून गुणाला दुसऱ्याच्या घरी रात्रभर जायला बळजबरीने धाडतो. नरश्या गर्जतच मुकिंदाच्या घराकडे येतो.दारावर थाप देतो. दार उघडून मुकिंदा पवित्रा घेतो. नरश्या किंचाळून हल्ला करतो.मुकिंदाचीफरशी तळपते.तेवढ्यात नरशा माग सरुन नेम धरून चाप ओढतो.अन् गोळी छाती फोडून बाहेर पडते.मुकिंदा खाली कोसळतो.इभ्रतीसाठी हयातभर गोपाळरावाशी लढणारा येळापुरचा कर्ता झुंजार पुत्र निद्राधीन होतो.मग नरशा आणि त्याचे साथीदार डोंगराकडे धावत घेतात


नरश्याने खून केल्यामुळे पोलिसपार्टी गावात दाखल होते. कारण महिपती आणि राजाराम यांच्यापासून जीवाला धोका आहे म्हणून कंप्लेंटी केलेली असते.त्यामुळे फौजदाराला मुक्काम इनामदाराच्या वाड्यावर असतो.


फौजदार नरश्याला पडायला जंग जंग पछाडतात.पण तो काही हाती लागत नाही.नरश्याच्या टोळीला जेवणखाण पोचवायची जबाबदारी इनामदाराची असते.ते पोचविण्याचे काम गुंड्या करत असतो.गुणाला अन्नपाणी गोड लागत नाही. कारण नरशाचा  भेटीला येणार आहे हा सांगावा आलेला असतो. तेंव्हापासून हत्यारी माणसं मुकिंदाच्या घरावर पहारा करीत असतात.


नरशा अधूनमधून इनामदाराच्या घरुन पैसे घेऊन जातो.तर मल्या बंदूक घेऊन जातो. बापूतळ्यात त्यांचा तळ असतो. इनामदाराचे एकेक नोकर त्याला सोडून जातात.केवळ मुनीमजी आणि गुंड्या उरतो.एकट्याला दोन्ही वाडे भकास आणि भयाण वाटतात.


एके दिवशी हिम्मत करुन गुणा रामला सोबत घेऊन गुंड्याचे मागोवा घेत बापूतळ्यात जाऊन तळ पाहून येते.त्याच रात्री नरशाचा समाचार कसा करायचा,याची चर्चा करायला माणसं जमलेली असतात.त्यांच्यात एकदम होत नव्हतं. म्हणून हल्ल्याचा आणि नरशाचा बदला घ्यायला बंदूक घेऊन एकटीच गुणा धावत सुटते.ही बातमी रामू महिपतीला धावत पळत जाऊन सांगतो.मग महिपती राजाराम,राणोजी रामू आणि गावकरी हत्यारं घेऊन डोंगराकडील बापूतळ्याकडे धावत जातात.


रात्रीचं वेळ चांदण्यांच्या शीतल प्रकाशात वाट तुडवत राजाराम गुणाला मदत करायला निघालेल्या असतो. तळ्याच्या पलीकडं जाळ जळत होता.नरशा निजला होता.मल्या जागा होता.दोन तीन गडी बोलत होते. तिन्हीकडून तिघांनी तळाला घेरलं.तेवढ्यात झाडाआड दडलेल्या गुणानं सरळ मल्याच्या छातीचा नेम धरून बार उडविला.गोळी कडाडली.आणि हल्ल्याची छाती फुटून तो धडपडू लागला. आवाजानं नरशाला जाग आली.त्यानेही बार ठासला अन् तयार असल्याचा इशारा दिला. त्याच वेळी गुणाच्या मदतीला राजाराम आला.वातावरण तंग झालं. बंदूका गरजू लागल्या.सगळीकडून फैरी झडू लागल्या. दरोडेखोर वेढ्यात सापडले.राजारामच्या एका गोळीने नरशाचा पाय उडाला.मोडका पाय ओढीत त्याने झाडाचा आसरा घेतला.आणि आता माझा कारभार संपला.असं म्हणून तो वेडा पार करु लागला.ओढ्याच्या धारेतून तो चकवा देत , गुंगारा देत इनामदाराच्या वाड्यात येतो.नरशा सुटला आता खुनाखुनी होईल .कत्तल होईल याचे गुणाला वाईट वाटते.


गोपाळराव इनामदाराच्या वाड्यात फौजदार, भिडे,ढेकणे, पवार आणि पाटील ही बडी मंडळी असतात.गोळीबार बंद झाला.त्यावर चर्चेला उधाण आलेलं आसतं.गोपाळराव आता कराडला रहायला जाणार असतो.पहाटेच्या अचानक नरशा वाड्यात उगवतो.'तु मला पैसे दिले नाहीस.काट्यानं काटा काढलास.पण आता मी तुला सोडणार नाही.' गोपाळरावला नरशा चार गोळ्या घालतो.चिंधी उडून पडावी तसा तो खाली पडतो.आणि संधीसाधून लगेच फौजदार नरशावर गोळ्या झाडतात.अशा रितीने वैर खलास होतं.एखाद्या भयावह, थरारक चित्रपटासारखं कथानक आहे.याची प्रचिती पानोपानी येते. अत्यंत सुंदर सहज सोप्या ग्रामीण अस्सल सातारी बाजात लेखन केले आहे.दर्जेदार आणि लोकप्रिय लेखणी महर्षी,साहित्यभूषण महान लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीस सलाम... आणि त्रिवार वंदन!!! लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे समग्र वाड्मय बार्टी या संस्थेने दोन भागात प्रसिद्ध केले आहे.यात लोकप्रिय कादंबरी व कथासंग्रहाचा समावेश आहे.

 



✒️श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक-६ नोव्हेंबर २०२१

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

Comments

  1. खुपचं सुंदर परिचय सरजी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड