पुस्तक परिचय क्रमांक-७८ सुखाचा शोध
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-७८
पुस्तकाचे नांव--सुखाचा शोध
लेखकाचे नांव--वि.स.खांडेकर
प्रकाशक-देशमुख आणि कंपनी, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पाचवी आवृत्ती १९९२
एकूण पृष्ठ संख्या-१६८
वाङमय प्रकार--- कादंबरी
मूल्य--६५₹
------------------------------------------------
७८||पुस्तक परिचय
सुखाचा शोध
लेखक-वि.स.खांडेकर
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
बरेचदा कादंबरी अथवा कथेवरून पटकथा तयार होते.मग त्याचा चित्रपट निर्माण होतो.परंतु अगोदर चित्रपट बनवला आणि तद्नंतर कादंबरी लेखन तेही केवळ तेरा दिवसांत. यावरुन लेखकाच्या प्रगल्भतेची आणि प्रतिभेची दैदिप्यमान उत्तुंगता दिसून येते.ते महनीय लेखक आहेत,लेखणीला सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले कादंबरीकार भाऊसाहेब तथा वि.स. खांडेकर. मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने देशपातळीवर लोकप्रियता मिळवून देणारे ऋषितुल्य गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक, पटकथा लेखक,ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित झालेले भाऊसाहेब तथा वि स खांडेकर यांची साहित्य संपदा विपुल आहे.त्यातील एक सुप्रसिद्ध अक्षर कृती 'सुखाचा शोध'ही साहित्यक्षेत्रातील अत्युच्च पराकोटीतील कादंबरी होय.
प्रस्तावनेत भाऊसाहेबांनी या कादंबरीची जन्मकथा शब्दफुलोऱ्यात गुंफून शब्दसाजात मांडली आहे.ते म्हणतात की,"यौवन हे जसे अंध अनुरक्तांचे नृत्यमंदिर आहे, त्याचप्रमाणे वार्धक्य हे विकल विरक्तांचे तपस्या मंदिरआहे.
झुंजणाऱ्या,धडपडणाऱ्या, झगडणाऱ्या आणि तडफडणाऱ्या मानवी जीवनाचे कडूगोड अनुभव या दोन्ही मंदिरात फारसे प्रतिबिंबित होत नाहीत.पण असले अनंत अनुभव हीच तर संसारपथावरल्या यात्रेकरुंची महत्त्वाची शिदोरी असते.हे मूक अनुभव कुणीतरी व्यक्त करावे.
कुटूंबाच्या सुखासाठी सर्वस्व वाहणाऱ्या एका सालस व बुध्दीमान पुरुषाला भोगाव्या लागणाऱ्या मुक्या दु:खांना या कथेत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे."
जीवनात सुख शोधणाऱ्या मानवी मनाच्या अंतरंगातील कवाडे उघडून मूक संवेदना व्यक्त करणारी ही दर्जेदार कादंबरी 'सुखाचा शोध' आहे.हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचावे. कारण आनंदात असाल तर दुःख समजेल. दु:खात असाल तर सुखाचा शोध घ्यावा वाटेल. मराठी भाषेचे अत्युच्च कोटीतील शब्द सामर्थ्याचे सौंदर्य म्हणजे ही कादंबरी आहे. सुंदर अक्षरशिल्प 'सुखाचा शोध'पुस्तक आहे. अनेक नाती गंध, दृष्टिकोन आणि प्रत्येक पात्राचे दुःख यातून आपल्याला समजत जाते. कादंबरी वाचताना याची प्रचिती येते.
भाऊसाहेबांच्या प्रस्तावनेतील हा शब्दवेचा परिच्छेद
(विचार मौक्तिके)मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी.कुटुंबाचे ॠण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती. व्यक्तिगत ॠण आणि समाजॠण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी 'सुखाचा शोध' या कादंबरीतून मांडले आहेत."त्यागातच सुख असते" ही परंपरागत जीवनमूल्ये जपणारा 'आनंद' रक्ताचं पाणी कुटूंबासाठी करत असतो.पण त्याच्या पदरी कुणाचाही सुखाचा शब्द नाही. कौतुक नाही त्यामुळे त्याला कुटूंब हा कैदखानाच वाटतो.संसार ही लढाई आहे याचा पुरेपूर अनुभव घेणारा आनंद.त्याच्याच वाट्याला संसारातल्या लढाईतल्या जखमा येतात.
तर एकावरच संसाराचे ओझे लादणारी 'अप्पा आणि भैय्या' ही कर्तृत्वहीन माणसे, यांच्या पदरात मात्र लूट पडते. मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित 'माणिक' आणि भावना अतिरेक व भावना शून्यता या दोन्ही विकृतीं पासून अलिप्त असलेली 'उषा'.ही सर्व पात्रे हेच सांगतात की,"परंपरागत आदर्श संकेत आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते. मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे.सन १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरत आहेत.
कुटूंबातल्या एका संतावर आपले सर्व ओझे लादून जगणारी ही माणसे स्वभावत:दुष्ट असतात असे कुणीच म्हणणार नाही.पण ती मूर्ख असतात यात मात्र मुळीच संशय नाही. आणि जगातले बहुसंख्य अनर्थ दुष्टपणापेक्षा मूर्खपणानेच घडून येतात हे कटू सत्य सुप्रसिध्दच आहे. याचा उलगडा ही कादंबरी वाचताना होत जातो.
'आनंद'ची वेडी कुटूंबनिष्ठा आणि 'मानिक'ची अंधआत्मनिष्ठा यांच्यामुळेच संसार सुखाच्या शोधातली सर्व दु:खे निर्माण झाली आहेत.पण भावनातिरेक आणि भावनाशून्यता या त्यांच्या दोन्ही विकृती पासून उषा पूर्णपणे अलिप्त आहे. ती माणिक सारखी शिकलेली नसल्यामुळे की काय त्याच्या सर्व भावना जिवंत आहेत. तिचे मन जीवनवादाच्या दृष्टीने अविकृत राहिले. च्या कुटुंबाकडून तिचा छळ झाला होता.ते सोडण्याची जसे ती धैर्य दाखविते. त्याचप्रमाणे आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आनंदाला सावरण्याकरता पोकळ नितीची पोपटपंची करत बसणार्या समाजाचा रोष स्वतःवर ओढवून घेण्याचे साहसही ती करते.मनुष्याचे सुख सर्वस्व जसे केवळ स्वतःसाठी जगण्यात नाही, तसेच आपल्यावर प्रेम न करणाऱ्या माणसासाठी पशूप्रमाणे कष्ट करून नि:सार आणि निरस जीवन कंठण्यातही ते नाही. सुख हे त्यागात आहे.याची प्रचिती'सुखाचा शोध' ही कादंबरी वाचताना लक्षात येते.अप्रतिम कांदबरी आहे.लेखणीस विनम्र अभिवादन!आणि त्रिवार वंदन!!!
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे
Comments
Post a Comment