पुस्तक परिचय क्रमांक-८२ खुळ्याची चावडी





वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-८२

 पुस्तकाचे नांव--खुळ्याची चावडी

 लेखकाचे नांव--शंकर पाटील

प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण एप्रिल २०१७

एकूण पृष्ठ संख्या-१४८

वाड्मय प्रकार --कथासंग्रह

मूल्य--१४०₹

------------------------------------------------

महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्तिचित्रांतून वेध घेणारे पटकथाकार, जेष्ठ कथालेखक, सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार ..शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळविले आहे. लेखणीबध्द झालेल्या ग्रामीण भागातील इरसाल कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे.ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण आणि खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायलामिळतात. ऐकायला व वाचायला मिळतात.नैसर्गिकपणे आसलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणि जिवंतपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते बारकाईने व  चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात.असाच एक ग्रामीण बाज जपत, वाचक रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कथासंग्रह 'खुळ्याची चावडी'.....वाचताना हास्याची लकेर चेहऱ्यावर उमटतेच.इरसाल,हसऱ्या व मिश्किली कथांचा खजिना आपणाला उलगडून दाखवला आहे.


कथा,कादंबरी,वगनाट्य, चित्रपट पटकथा या सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.ऊन, खुशखरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, टारफुला, धिंड,पाऊलवाटा यासारख्याअनेककथासंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे.'शंकर पाटलांची कथा मराठी कथेचं एक देणे आहे.त्यांचे मन संस्कारक्षम आहे.केवळ ग्रामीण जीवनाचे दर्शन घडावे एवढाच त्यांचा हेतू नाही.तसेचलोकप्रियतेसाठी गावरान किस्से सांगून रसिकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणे एवढाच त्यांचा हेतू नसून त्यांची कथा म्हणजे आत्मशोधाचे साधन आहे. लेखनामागे खेडेगावातील सामाजिक जाणीव आहे.तसेच मूल्यांवर आधारीत समाजव्यवस्थेचे चित्रण ते आपल्या कथेतून बेगडी परिवर्तनाचेव्यंगचित्रण करत आहेत."


कथा निर्मितीमागे ध्यास आहे.सुक्ष्म निरीक्षण आहे. वास्तवतेत घडणारा संवाद आहे.गप्पा,हितगुज,संवाद आणि चर्चेतील संभाषण आहे. चिंतनाच्या डोहातूनच तीचा जन्म झाला आहे.मराठी कथेला ऐश्र्वर्याचा लाभ दिला आहे.मौखीक प्रसिध्दी देणाऱ्या शाळा,शेत, चावडी,देऊळ आणि गाव या ठिकाणी घडलेले संभाषण सहज सुंदर शब्दात गुंफले आहे.यातील ग्रामीण लकब व कोल्हापूरी बोलीभाषेचा वापर रसदार केलेला आहे. कथेचा रसास्वाद घेताना हास्याची लकेर चेहऱ्यावर आपसूक उमटते. तर काहीजण पोटदुखेपर्यत हास्याचा अनुभव घेतात.इतकं कथेचं गोष्टीरुप लेखन रसदार आहे.


 शंकर पाटील ह्यांच्या ग्रामीण कथा विनोदी आणि हसता हसता रडवणाऱ्या असतात ज्यांना ग्रामीण कथेत अधिक रस आहे त्यांच्या साठी ही पुस्तके पर्वणी आहेत.ग्रामीण भाषेचं सौंदर्य अनुभव त्यांच्या कथा वाचन व श्रवण करताना होतो. ग्रामीण परिसरातील माणसे असोत, की नागरी परिसरातील माणसे असोत, पाटील आपल्या कथांतून व्यक्तिंचा स्वभाव व शरीरयष्टीचे वर्णंन अस्सलपणे करतात.त्यामुळे प्रत्यक्ष घटना-प्रसंग डोळ्यासमोर तराळतात.त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही. 


त्यांच्या सर्वच कथा बहारदार इरसालआणि मिश्किली रुपातल्या आहेत.त्या रसग्रहण करताना सामाजिक प्रश्न,प्रथा,परंपराआणि चर्चा यांचा उहापोह होतो. वाचताना हसत हसत आपणाला त्यातील सामाजिक जाणीव समजते."खुळ्याची चावडी"या कथासंग्रहात अस्सल गावरान भाषेतील चौदा कथांची मेजवानीच

रसिक वाचकांना आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. इंगा,ह्योच माझा शिलोन, डोहाळे,दोन कमी पांडव, धुळा,टोळ भैरव, कोंबडी, पोटदुखी, पदरमोड,विलायती पीक, गोम,खुळ्याची चावडी,भुजंग,ऊन या कथा एकसे बढकर एक आहेत.


श्रीमंधर आण्णांच्या दोन कन्या शिकणाऱ्या झालेल्या म्हणून गावातच हायस्कूल काढले. गाववाल्यांना भासविले गावात शिक्षणाची सोय झाली.मग काय?तेच संस्थेचे चेअरमन होतात. हेडमास्तर कामिरे आणि आण्णांच्यातसंस्थेच्या कामावरून आणि मुलांच्या शिक्षणावरुन सतत कलह होत असतो.त्यालाअद्दल घडविण्यासाठी चेअरमन आणि त्यांचे साथीदार काय काय करतात? याचे वर्णन अस्सल गावरान बोलीत केले आहे.अगदी आण्णांचं बेरकी पात्र 'इंगा'या कथेत सुंदर शब्दात खुलविले आहे.


नामा घरातून भांडून गेल्यावर दोन वर्षांनी गावात येऊन 'कला टेलर्स'हे दुकान थाटतो. त्यामुळे त्यांची ओळख स्पेशालिस्ट होऊन सगळेजण त्याला नामा ऐवजी स्पेशालिस्ट म्हणायला लागतात.त्याची खुशमस्करी करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात. असेच एकदा शिवून तयार झालंय का? म्हणून आलेलं माणसं दुकानात गप्पा मारत असतात.तेंव्हा छानशा दुकानात एखादा रेडिव असेल तर गिऱ्हाईक वाढेल.अशी फुणगी बाळक्या सोडतो.तर रेडिव सासऱ्याकडून कसा मिळवावा याचं इंगित बांबू सांगतो.अशी बहारदार गावची कथा 'ह्योच माझा शिलोन' आहे.सासरा मिणत्या करुनही जावायाला बधत नाही. त्यापायी तो तुरुंगातही जातो.अशी ही गोष्ट आहे.शेवटी लाडात येऊन बायकोला च तो म्हणतो,"आता तूच गाणं म्हण...मी ऐकत बसतो... मनाला सांगायचं,ह्योच माझा शिलोन! दुसरं काय."अशी ऐकावे तरी कोणाचं ही म्हण सार्थ करणारी गोष्ट आहे.


महाकजाग अन्  चिक्कू म्हातारी,महाऊधळ्या अन् सिनेमाळू तुका आणि त्याची महाखादाड नर्गिस यांची बहारदार कथा म्हणजे 'डोहाळे' आहे.एकदंर वेगळ्याच धाटणीची ही हास्यकथा आहे.पोटोशी असणाऱ्या नर्गिसच्या डोहाळ्याचे वर्णन छानच रंगविले आहे.


इमान इतबारे घरगडी म्हणून काम करणाऱ्या धुळाची कथा फारच काळजाची ठावं घेत राहते.थोडासा तो विचित्र वागतो पण मनानं साफ वाटतो.सांग काम्या आणि एक नाम्या असा धुळा….शाळा तपासणीचे वेळी शाळा शिकणाऱ्या मालकांना दुध पियाला घेऊन जाण्यासाठी केलेला खल,आईचे गुडघे दुखणं असताना कोणीतरी लेप लावण्यासाठी पाला पाहिजे म्हणून लांब सह्याद्रीच्या डोंगरात जाऊन पोतभर पाला आणणारा धुळा.तीन दिवसांनी माघारी येतो.अशा प्रसंगांचे सुंदर वर्णन कथेत मांडले आहे.जरी तो वेंधळा होता तरी सगळे तो वेळेवर आला नाही तर चिंतातूर होत असत.ते कथानक 'धुळा'नावानेच रंगविले आहे.छानच कथा आहे.


खुशाल चेंडू सारखे टर उडविणाऱ्या पोरांची, उंडगेपणा करणारी, उडाणटप्पूपणा करणाऱ्या पोरांच्या टोळक्यांची कथा 'टोळ भैरव'आहे. मनुहाराची प्रेमापोटी त्यांचे मैत्र कशी फजिती करतात.ते या कथेत मांडले आहे.


बेचाळीसच्या चळवळीत मोडतोडीला आणि जाळपोळीला उधाण आलं होतं.कुरडीच्या रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी सरकारनं एक चार  पोलिसांची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात केली होती.त्यांना दररोज हातानं करुन झुणकाभात खावा लागत.त्यामुळे त्यांच्या जीभा चांगलं चुंगलं खाण्यासाठी, वशाटासाठी चटावल्या होत्या.म्हणून ते वर्गणी काढून कोंबडीचा बेत ठरवितात.यासाठी गावातल्या पाटलाला पैसे देतात.तो जबाबदारी घेतो.पण त्याकडून काय पूर्तता होत नाही.ती कथा 'कोंबडी'होय.अगदी मसालेदार शब्दात तिचं चित्रण केले आहे.


पेव फुटावं तशी बातमी फुटते.अन् एक दिवस गावात चमत्कार घडतो. नरु खोताच्या अडाणी मुलाला म्हाद्याला कोड्याचं बक्षीस लागतं. एकदम बारा हजार रुपयांचे! म्हणून गावकरी त्याला भेटायला धावतपळत जातात.जणूकाही तिन्हीसांजेला कुस्तीच्या मैदाना सारखी गर्दी जमते. त्या'पोटदुखी'कथेत गावकऱ्यांचे आणि माणसांच्या तऱ्हेवाईकपणाचे वर्णन अप्रतिम शब्दधारेत केले आहे. अगदी अस्सल कोल्हापुरी गावरान बाज आहे.


'पदरमोड' या कथेत शिवाचं लगीन कसं झालं आणि लग्नानंतर काय काय झालं याचं वर्णन केलेले आहे.लग्न केवळ भाकरी खाण्यासाठी करायचा एवढाच विचार मनाशी धरणारा शिवा,त्याला गणा बाशिंग बांधायला लावतो.अन् लग्नाला तयार करतो.लग्नापायी मुलीच्या बापाला पैसे द्यावे लागतील असंही भरवणारा गणा...अशी ही कथा संवाद रुपात व्यक्त केली आहे.मुलगी बघण्याचे व लग्न सोहळ्याते सुंदर शब्दांकन केले आहे.


शेतीला कल्पकतेची जोड मिळाली की पीक कसं वारेमाप येते याची प्रचिती करुन देणारी कथा म्हणजे'विलायती पीक'. बियाणांच्या प्रसिध्दीसाठी, प्रचारासाठी सरकारी साहेब शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी गावोगावी जाऊन शेतकी अधिकारी मार्गदर्शन करत असतात.अशाच एका गावात ते संकरीत पीकांची माहिती देत असताना.दिगंबरपंतांवर यांचा परिणाम होऊन ते एक एकर कोबी लावतात.औषध फवारणी करताना लोकं शेतात गोळा होत.औषधांची नावंही ते नेहमी बोलताना वापरीत असत.पीक जोमदार आले.दोन गाड्या भरुन कोबी शहरात नेला.पण घरी चेहरा पडलेल्या अवस्थेत आले.''किती पैसे आले.''बायकोने विचारल्यावर ते एकही शब्द बोलले नाहीत. अगं वारे माप पिकामुळे रुपया मिळायचा तिथं दोन आणेही मिळेनात म्हणून गाडल्या माघारी घेऊन आलो.फुकापरी माल देण्यापेक्षाएकगाडी गावात कोबीचे गड्डे फुकट वाटतेय.यल दुसरी गाडी ज्या शेतकी अधिकाऱ्याच्या जीवावर एवढा माल पिकविला त्याला एक गाडी माल धाडला आहे.


लग्न लावणाऱ्या मध्यस्ती माणसाच्या स्वभावागुणांची पारख करून देणारी 'गोम' कथा. दोन्हीकडच्या माणसांची नेमकी नस पकडून लग्न जुळविण्यातवाकबगार व चाणाक्ष असणाऱ्या या लोकांची ही कथा आहे.


कथासंग्रहाचे शिर्षक असणारी कथा 'खुळ्याची चावडी' होय.पोरगं तापानं फणफणत असताना त्याला दवापाणी करायला उशीर करणा-या तातोबाचे व्यक्तीचित्रण उभारले आहे. दळणदळायच्या नादात तो पोराच्या आजारपणाकडे चालढकल करतो.जवा पोराचे अंग गरम होतं तेव्हा काकुळतीला येऊन बायको डॉक्टरला घेऊन यायला सांगते. तरीही तो मान्य नाही म्हणून ती कपाळ बडवून घेते. मग नाईलाजाने तातोबा डॉक्टरला घेऊन येतो.डॉक्टर तपासून झोपेचे इंजेक्शन देतात.व संध्याकाळपर्यंत जवळ कोणी जाऊ नये असं सांगतात.बायको स्वयंपाक करते आणि तो गिरणी चालू करतो.पण पोरगं हकनाक जातं….अशी कथा बायकोची वेदना नवऱ्याला कळत नाही.तो आपला कामात दंग.त्यामुळे ओढावलेल्या प्रसंगाचं वर्णन आहे.


भुजंग कथेवर आधारित 'भुजंग'मराठी चित्रपट बनवला आहे.त्यात निळू फुले आणि रंजना यांनी चमकदार कामगिरी केली आहे.नशीबाचे फासे उलटे पडल्यावर जीवनात भोग कसे येतात याचे उत्तम चित्रण या कथेत आहे.कथा वाचताना डोळ्यासमोर शेतातील व घरातील प्रत्यक्ष प्रसंग उभा ठाकतो.दु:खद प्रसंगाने डोळ्यातून आसवं गळतात.इतकं हुबेहूब वर्णन कथाकार शंकर पाटील यांनी बहारदारपणे केले आहे.शेतात काबाडकष्ट करून प्रपंच करणारी जनाई.


एकदा ऊसाला पाणी पाजून घराकडे निघालेली असते. सोमवार उपास म्हणून आणि पोरही चार शेंगा खात्याल म्हणून ती भुईमुगाचे चार डहाळे उपटायला वावरात शिरते. डहाळे उपटताना विमानाचा आवाज आला म्हणून ती वर बघते तर आकाशात विमान दिसत नाही.पण रौं रौं आवाज मात्र जवळच येतो.काळ्या ठिपक्यांचा भलामोठा साप बघून ती भितीने पळत सुटते.


तिच्या पोटात घाबरा पडतो.सारं आंग घामानं भिजून जातं.तिला वाचा गेल्यागत होतं.सारे भाऊबंद गोळा होतात.पण तिला बोलायला सुदरत नाही.तदनंतर तो साप तिला अनेकदा शेतात काम करताना दिसतो.तोच भलामोठा भुजंग.तर इकडं तिचा खुळा नवरा पोटाची भूक शमविण्यासाठी सगळ्यांसाठी बनविलेल्या भाकऱ्यांचं टोपलं पसरत करणारा.राक्षसावाणी  खाणारा नवरा...पण कामधंदा न करणारा ऐतखाऊ.त्यामुळे तिच्या संसाराची कशी होरपळ होते.ती 'भुजंग'कथा प्रवाही शब्दात कथा गुंफली आहे. वाचताना अंगावर शहारे येतात.


रामूचं पोरगं शिवन्या आईविना पोरकं असतं. तीनएक वर्षाच्या लहानमुलाला घरातील पाणी भरण्याचं काम झाल्यावर दुपारच्या वेळी फिरायला शेतात घेऊन जाताना त्याच्याबरोबर झालेल्या संवादाचे वर्णन 'ऊन'कथेत मांडले आहे.


सर्वच कथेत व्यक्तिंचे चित्रण खुमासदार शैलीत मांडले आहे.मराठमोळी भाषा या कथांतून गतिमान करुन समृध्द करण्याचं कामं ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांनी केले आहे. हसरी मिश्किली कथांतून गावाची सामाजिक जाणीव उलगडते.अप्रतिम कथासंग्रह आहे.लेखणीस सलाम!आणि त्रिवार वंदन!!!


#श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


दिनांक-२७ आॅक्टोंबर २०२१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड