५१|पुस्तक परिचय, अमृतवेल
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
५१|पुस्तक परिचय
अमृतवेल
लेखक-वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही.मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही.त्याला भविष्याचा गरुडपंखांचं वरदान लाभलं आहे,एखादं स्वप्न पाहणं,ते फुलविणं,ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे.
त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तरी त्याच्या तुकड्यांवरुन रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागं धावणं.हा मानवी मनाचा धर्म आहे, मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं! हे संस्मरण कोरलं आहे भाऊसाहेब खांडेकरांच्या 'अमृतवेल'या कादंबरीत.कल्पनाविश्वात रममाण करणारी सदाबहार लेखणीत सजली आहे.
मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने देश पातळीवर लोकप्रियता मिळवून देणारे महान ऋषितुल्य गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक, पटकथा लेखक,ज्ञानपीठ पारितोषिक सन्मानित भाऊसाहेब तथा वि स खांडेकर अशा अनेकविध बिरुदावलीने सन्मानित झाले आहेत.त्यांची साहित्य संपदा विपुल आहे.
कादंबरीचा अर्थ अभिप्रेत करणारं हे संस्मरण वेचक वेधक आहे.अमृतवेल या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे. बाळ,प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे!त्या वासनेची किंमत मी कमी मानीत नाही. साऱ्या संसाराचा आधार ती वेल आहे. आणि या वासनेला जेव्हा खोल खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही 'अमृतवेल' होते. मग या वेलीवर करुणा उमटते, मैत्री फुलते.मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग,सुष्टदुष्ट माणसे आहेत.साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधकांपर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत.'' पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रीत झाली तर आत्मपूजेशिवाय तिला दुसरे काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांच्या शत्रू होत नाही. तर स्वतःचाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात…"
या कादंबरीतील कथेचा मुख्य गाभा आहे, सावित्रीच्या व्रताची कथा आणि लोकप्रिय शेक्सपिअरच्या नाटकातील हॅम्लेटच्या आईचे गूढ.प्रेमानं अस्वस्थता निर्माण झालेली पात्रं एकमेकांशी पत्रसंदेशाने हितगुज साधतात.आयुष्य म्हणजे नेमकं काय?प्रेमाची प्रचिती आणि ऐश्वर्य यांच्या व्याख्या पावलोपावली कशा बदलतात.याचं काल्पनिक चित्र या कादंबरीत रेखाटले आहे.वैमानिक शेखरवर निरपेक्ष प्रेम करणारी अलकनंदा (नंदा)लग्नाचे इमले रचताना अचानक शेखरचा दुर्दैवी अंत होतो.त्यामुळे ती दु:खाला कवटाळून बसलेली असते.तीच्या दु:खावर फुंकर घालण्याचे तिचे आई-वडील प्रयत्न करीत असतात.'तू काहीही कर,पण दु:खाच्या पिंजऱ्यात स्वत:लाख बंदिस्त करून घेऊ नकोस,त्या पिंजऱ्याचे दार उघड,पंख पसरून आकाशात भरारी मार.
जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार.'असं वडील तिला पत्रातून संदेश देतात.आयुष्य हा सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ आहे.जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे, आणि स्वप्नभंगामुळं होणारा विषादही आहे.दुखऱ्या वेदनेच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी ती पीएचडी करण्याचे ठरविले.त्यासाठी तिचे वडील आणि नंदा प्राध्यापक दादासाहेबांच्या घरी जातात.तिथं तीला आयुष्याच्या जीवनाचे जग कसे आहे? ते पहायला घराबाहेर पडण्याचा सल्ला देतात.
वसुंधरा जहागिरदारीणीला कंम्पेनियन म्हणून एका स्त्रीची गरज आहे.त्यांच्याच कॉलेजातली ती विद्यार्थीनी असते.
तीला पार्श्र्वगायिका व्हायचं होतं.तिचं 'ओ सजना,बरखा बहार आयी'हे गीत नंदाच्या फार आवडीचं होतं.तिलाच कंम्पेनियन हवी होती.आई-वडीलांच्या परवानगीने ती वसू सोबत विलासपूरला जाते.वसूला एक छोटी मुलगी आहे.
अधूनमधून गोड मुलीला फीटस् येतात.त्यामुळे तीची काळजी घेणे आणि वसूला विरंगुळा म्हणून ती तिथं आलेली आसते.
पण तिथं तर वेगळंच वातावरण असतं.वसू आणि देवदत्त पतिपत्नी असूनही वेगळं स्वतंत्र जीवन जगत असतात.
मद्यपी आणि हेकेखोर देवदत्त आणि स्वत:च्याच विश्वात भयानं राहणारी वसू...मधूरा आणि नंदाची गट्टी छान जमलेली असते.पुस्तकाचीआणि ऐषोआरामात मशग्गुल असणारा देवदत्त,कुढत भयभीत अवस्थेत राहणारी वसू आणि वसूला कंपनी म्हणून आलेली नंदा नकळतपणे देवदत्तकडे आकृष्ट होते.अशी हे तिहेरी कथानक उच्च कोटीच्या कल्पना विलासात रेखाटले आहे.
सर्वच व्यक्तींची चित्रे अव्यक्त प्रेमाची भावना दर्शवितात पण मनमोकळेपणाने एकमेकांना समजून न घेतल्याने कुढत राहतात.पती-पत्नी असूनही समोरासमोर हितगुज घडत नाही.देवदत्तच्या आई-वडिलांचा पुर्व इतिहास समजल्याने अश्वथाम्यासारखी त्यांची अवस्था होते.नेमकं खरं कुणाचं.त्यातच नंदा आणि देवदत्त यांच्या जवळीकीच्या भानगडी वसूला कळल्यावर ती संतापाने क्रोधीत होते.
तिन्हीही व्यक्ती शेवटी स्वतंत्रपणे जीवन कंठत राहतात अशी ही 'अमृतवेल' कादंबरी आहे.यातील घटना प्रसंगाचे वर्णन अतिशय कल्पकतेने लेखन केले आहे.वाचताना पानोपानी ओथंबून भरलेला आहे.आशयघन शब्दात माहोल तयार केला आहे.एक वेगळीच जीवनातील मनुष्यस्वभावाचे पैलू उलगडून दाखविणारी कादंबरी आहे.
परिचय कर्ता-रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नांव -अमृतवेल
लेखक-वि.स.खांडेकर
साहित्य प्रकार-कादंबरी
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
आवृत्ती-पुनर्मुद्रण हे २०१८
पृष्ठे-१५२
मूल्य-१५०₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
छान कादंबरी...सुंदर परिचय
ReplyDeleteमनपुर्वक आभार
ReplyDelete