वाचन यात्री पुरस्कार अहवाल प्रतिभाताई
सत्कार मूर्ती सन्माननीय श्री. रवींद्रकुमार लटिंगे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा कोंढावळे, तहसील वाई, जिल्हा सातारा यांचा #वाचनयात्री पुरस्कार सत्कार समारंभ एक कौटुंबिक सोहळा..... काल शनिवार दिनांक 25/ 12/ 2021 रोजी देवगिरी हॉटेल येथे सुंदर आयोजन व नियोजनात वाचनयात्री पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न झाला. त्याचा संक्षिप्त आढावा मांडण्याचा छोटासा प्रयत्न. या समारंभात वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य संयोजिका या नात्याने अध्यक्षपद भूषविण्याचा मान मला मिळाला. आपण सुरू केलेल्या एखाद्या छोट्याशा उपक्रमात हजारो लोकांनी सहभागी व्हावे व इवल्याशा रोपट्याचे अवघ्या 18 महिन्यात वटवृक्षात रुपांतर व्हावे याचा आनंद नसे थोडका.
19 डिसेंबर 2021 ला वाचन साखळी समूह सदस्य, लेखक, आदर्श मुख्याध्यापक माननीय रवींद्र लटिंगे सर यांच्या शंभराव्या पुस्तक परिचयाची पोस्ट पडताच त्यांना समूहातर्फे वाचनयात्री पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जाहीर करून मी थांबले..... पण आदरणीय श्री. गणेश तांबे सर वाचन साखळी समूह सदस्य, संस्थापक आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर, आदर्श शिक्षक, समाजसेवेच्या व्रतात स्वेच्छेने स्वतःला झोकून दिलेले व्यक्तिमत्व थोडेच थांबणार होते. 'सदैव सैनिका पुढेच जायचे' या उक्तीप्रमाणे लगेच त्यांचा मेसेज येऊन धडकला. अल्पावधीत आम्ही साताऱ्याला वाचनयात्री सत्कार सोहळ्याचे नियोजन करतोय फक्त तुम्ही यायची तयारी ठेवा. मला कोणतीही झळ पोहोचू न देता नियोजन झाले. सन्मानपत्र, पुस्तके...... सर्व काही तयारी त्यांचीच. सन 2015 ते 2017 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अधिकारी वर्गाला MOT(Management of Training) प्रशिक्षण देण्याचे भाग्य आम्हाला लाभले. पण त्याहीपेक्षा मोठे प्रशिक्षण MOP(Management of programme) चे प्रशिक्षण गेल्या चार दिवसात मी आदरणीय गणेश तांबे सरांकडून घेतले. सलाम आपल्या नियोजनाला🙏🙏
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली असे कायम लक्षात राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे लेखक, शिक्षक आदरणीय श्री लक्ष्मण जगताप बंधू .खरंच नावाप्रमाणेच आज्ञाधारी. समूहावर निमंत्रण पत्रिका पोस्ट होताच बंधूंचा फोन... ताई तुम्ही कशा येणार, दौंडला उतरा.... तेथून नेतो मी तुम्हाला कार्यक्रम स्थळी. पुण्याहून साताऱ्याला कसे जायचे? माझी काळजीच मिटली. अतिशय कडाक्याच्या थंडीत सकाळी साडेसात वाजता बंधू मला दौंड रेल्वे स्टेशनला घ्यायला हजर. तेथून बारामती... बंधूंचे घर. वहिनींची अगोदरच सर्व तयारी. चविष्ट आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले स्नेहभोजन. सोबतच भावाच्या घरची मोठ्या बहिणीला मानाची साडी. हृदयात कायमचे कोरले गेले हे सर्व आनंदक्षण.
बारामतीहून आम्ही फलटणला रवाना. तसेच ठरलेले. 24 तारखेला मी ट्रेनमध्ये बसल्यापासून आदरणीय लटिंगे सर, तांबे सर, जगताप सर व अंजली ताई यांचे तासाला फोन सुरू होते. यापेक्षा अधिक काळजी घेणार कुणी असू शकतं का ? बारामती हून फलटण..... श्री. गणेश तांबे यांचे घर. त्यांना सोबत घेऊनच आमचा पुढचा प्रवास ठरलेला. श्रीमती जयश्री तांबे मॅडम यांच्याशी माझी शाब्दिक ओळख होतीच. आज प्रत्यक्ष भेट झाली. सत्कारमूर्तीच्या अगोदरच माझा तांबे दांपत्यांनी सत्कार केला. खरं पाहता वाचन साखळी समूहात श्री. गणेश तांबे सर यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी इतक्या जलद गतीने शंभर पुस्तके वाचली नसती तर कदाचित मला आणि अनुजा ताईंना वाचनयात्री पुरस्कार सुचला ही नसता. पण मान मला.....
सत्कारमूर्ती श्री. रवींद्र लटिंगे यांनाही प्रेरित करणारे श्री. तांबेच. अशी जिवाभावाची माणसं मला मिळणे हे माझे भाग्यच. वेळ जलद गतीने पुढे सरकत होती तरीही तांबे सर यांच्या घरचे चिक्कूने लडबडलेले झाड पाहून फोटो काढण्याचा माझा मोह मला आवरता घेता आला नाही. दोन-चार फोटो काढूनच घेतले. लक्ष्मण बंधू, तांबे सर व मी.... आमचा पुढील प्रवास सुरू झाला. कार्यक्रम स्थळ अवघ्या दहा किलोमीटरवर असताना सौ. अंजलीताईंची अचानक झालेली भेट, कडकडून मारलेली मिठी.... मायेची ऊब देणारीच.
सत्कार मूर्ती स्वतः आम्हाला घ्यायला वाईच्या ढोल्या गणपती जवळ येऊन थांबलेले. ढोल्या गणपतीचे दर्शन करून आम्ही नियोजित कार्यक्रम स्थळी पोहोचलो. पाहतो तर काय..... नियोजित कार्यक्रम स्थळी आपल्या कार्यक्रमापूर्वी असणारा कार्यक्रम तीन वाजता संपणार होता. पण तो तीन वाजता जेमतेम सुरू झालेला.... एकच लगबग. काय करावे... पण संयमाचा महामेरू श्री.लटिंगे सर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात दुसरे कार्यक्रम स्थळ देवगिरी हॉटेल निश्चित केले. आम्ही सर्वजण तेथे पोहोचलो. कार्यक्रमाचे नियोजन अवाक करणारेच. ठराविकच उपस्थिती.... पण उपस्थित असलेली प्रत्येक सन्माननीय व्यक्ती त्यांच्या कार्यात उत्कृष्ट, आदरणीय, सामाजिक बांधिलकी जपणारी, वाचनप्रिय... सर्वच अभिनंदनीय, प्रेरणादायी. सौ प्रेमा रविंद्र लटिंगे सरळ, साध, हसतमुख व्यक्तिमत्त्व. या सर्वांच्या उपस्थितीत वाचनयात्री पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सत्कारमूर्ती श्री. रवींद्र लटिंगे यांना वाचनयात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय व्यक्तींकडून मनोगतात वाचनयात्री श्री. रवींद्र लटिंगे यांच्या कार्याचा प्रत्येक नवा पैलू मला उलगडत गेला आणि माझा सर्व क्षीण येथेच मावळला. नवऊर्जेचा संचार झाला. हळूहळू कार्यक्रम पुढे सरकत होता आणि एकेक भन्नाट कल्पना प्रत्यक्ष अमलात येत असल्याची प्रचिती सर्व उपस्थितांना आली. प्रत्येक निमंत्रित व्यक्तींचे शाल, पुस्तक व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एक आगळा वेगळा अनुभव. इतका अनुपम, अद्वितीय सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवला. लेखिका, कवयित्री, शिक्षिका सौ. अंजलीताई गोडसे यांची रसाळ वाणी तर ऐकत रहावी अशीच.
कार्यक्रमात उपस्थित सर्व सन्माननीय निमंत्रितांचे स्वागत सौ. प्रेमा लटिंगे, श्री.राहुल हावरे, श्री. शिवाजी फरांदे,श्री शिवाजी निकम, शेखर जाधव यांनी केले. प्रास्ताविक उद्धव निकम. सन्मान पत्राचे वाचन सौ. सारिका लटिंगे यांनी तर आभार श्री. सुनील जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. संतोष शिंदे यांनी केले.
अजून बरेच काही मांडन्याजोगे आहे..पण वाचकांपर्यंत या छोट्याशा लेखन प्रपंचातून
कार्यक्रम दृष्टिपटलावर आणण्याचा छोटासा प्रयत्न.
हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने,उपस्थितीने यशस्वी झाला त्या सर्वांचे वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य च्या वतीने मी आभार मानते. कार्यक्रमास उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तींचा नामोल्लेख करणे शक्य नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करते व तूर्तास माझ्या लेखणीस येथेच विराम देते.
कायम आपल्या स्नेहबंधनात व ऋणात......
श्रीमती प्रतिभा लोखंडे, नागपूर
Comments
Post a Comment