पुस्तक परिचय क्रमांक-९६ वाटेवरल्या सावल्या
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-९६
पुस्तकाचे नांव--वाटेवरल्या सावल्या
लेखकाचे नांव--ग.दि.माडगूळकर
प्रकाशक-साकेत प्रकाशन, औरंगाबाद
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०२१/ द्वितीयावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१६३
वाड्मय प्रकार--आत्मचरित्रपर लेख
मूल्य--२००₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
९६||पुस्तक परिचय
वाटेवरल्या सावल्या
लेखक:ग.दि.माडगूळकर
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
चित्रपट पद्यलेखक, पटकथाकार,शब्दमहर्षी,लेखक, महाराष्ट्राचे वाल्मिकी गीतरामायणकार प्रतिभासंपन्न साहित्यिक आदरणीय गजानन दिगंबर माडगूळकर तथा साहित्यक्षेत्रात 'गदिमा'या नावाने लोकप्रिय असलेले …. साहित्य आणि चित्रपट सृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न.याचं स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला.त्यांची कला लोकजीवनाशी समरस झाली.'वाटेवरच्या सावल्या' आत्मचरित्रपर पुस्तकात बालपणीचे संस्कार-संचित, सूक्ष्मनिरीक्षण, कीर्तनातून संतजनांचे ऐकलेले प्रबोधक अभंंग,माडगूळ गावातील दैन्य-दारिद्यावस्था आणि अतिव कष्ट व झगडा यांच्या धाग्यांनी विणलेले गरीबांचे हाल अपेष्टेचे आयुष्य यांचा ठसा उमटविला आहे.आत्मकथनातून त्यांच्या बालपणीच्या आठवणी मनाला भावतात. त्याकाळातील दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. त्यातून त्याकाळातील जीवन कंठताना होणाऱ्या विदारक अवस्थांचे वर्णन वाचताना मनाला स्पर्शून जाते.
'वाटेवरल्या सावल्या'या वि.स.खांडेकर यांच्या पुस्तकाच्या प्रवासात भेटलेल्या माणसांचे विविधांगी अनुभव त्यांनी शब्दात मांडले आहेत.कागदावरची अक्षरे जणू निळ्या रेशमाने विणली गेली.लिहिता लिहिता ते थांबले.पुढे गदिमा म्हणतात,'वाटेवरच्या स्थिर सावली सारखे बाबूरावांनी मला छत्र दिले.हाती लेखणी दिली.केंव्हाचे ऋणानुबंध असतील त्यांचेआणि माझे?ते धनी--मी चाकर! यांना कारण काय माझ्यावर एवढी मेहरबानी करण्याचे?...'मला उत्तर सापडले नाही.फक्त डोळ्यांच्या कडा पाणावल्या.घसा दाटल्यासारखा झाला. औंधच्या राजेसाहेबांचे स्मरण झाले.वडिलांचा आठव आला.माझ्या जन्मगावाच्या मध्यावर असलेला उत्तुंग कडुनिंबाचा वृक्ष डोळ्यासमोर आला.त्या लिंबाखाली खेळता-खेळताच त्यांचे शैशव बाल्याच्या पायऱ्या चढले होते.आता युवावस्थेतून प्रौढतेकडे जाताना माझ्यामस्तकी एका मानवी वृक्षाने छाया धरली होती. त्याची ख्याती कटुतेबद्दल होती.पण माझ्या डोळ्यांना त्याचा ज्योत्स्ना-धवल मोहर दिसत होता. मनात त्याचा धुंद सुगंध दाटला होता.दरवळत होता. मस्तकावर त्याच्याच छायेने शितळाई पसरली होती…. 'वाटेवरल्या सावल्या'...
या पुस्तकाला आनंद अंतरकर यांची प्रस्तावना लाभली आहे.आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वतःच्या मातोश्री, मास्टर विनायक, आचार्य अत्रे, बाबुराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, भालजी पेंढारकर, चित्रतपस्वी
बाबुराव पेंटर, कलामहर्षी शांतारामबापू आणि सुधीरजी फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दात आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वतःच्या मनस्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून, करूण- व्याकूळ संवेदक भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवाजडभौतिक संकल्पना तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या वीजेचा स्पर्शही लाभला की,ती तत्वे सजीव- समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात. त्यांच्या सिनेमा नट ते पटकथाकार आणि गीतकार (पद्यलेखक ) कसे घडत गेले. त्याच्या पायऱ्यांची कष्टप्रद कथा या चरित्र लेखात मांडलेल्या आहेत….
'गदिमा' हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते.त्यांनी ऋतूपरत्वे अनेक उन्हाळे,पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली आहेत. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्र्य व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला अभिजात व कलापूर्ण लोकप्रिय चित्रपटही दिलेले आहेत. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे.मराठी मनावर स्वतःची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रुपाने गदिमांनी साहित्य आणि चित्रपटसृष्टीत एक वैभवशाली पर्व निर्माण केले आहे.
'वाटेवरल्या सावल्या' या आत्मचरित्रपर कथा संग्रहात अकरा कथांचा समावेश केलेला आहे. यातील 'येथवरी आहे ऐसा एक प्रकार'ही कथा प्रामुख्याने त्यांचे बालपण आणि शिक्षण पर्वातील शाळा,मित्र, गावचा परिसर,कुटुंब आणि नातेवाईकांचे अंतरंग अनोख्या शब्दात उलगडून दाखवितात.तशी ही दीर्घ कथा आहे. कथांचे बीज,लेखणीला सुरुवात कशी झाली. याचे खुमासदार आणि सहज सुंदर शैलीत वर्णंन केलेले आहे.आई विषयी अत्यंत भावूक, हृदयस्पर्शी आणि ममत्त्वाने गदिमा व्यक्त झाले आहेत. वडिलांच्या तुटपुंज्या पैश्यात आई घरचा खर्च कसा भागविता होते.याचे वर्णंन वाचताना आपल्या मनालाही वेदनांची जाणिव होते. अप्रतिम शब्दसाजात आईची महानता शब्दबध्द केली आहे.अनेक परिच्छेदातील वेचे वाचताना याची जाणीव होते ते म्हणतात की,"माझी आई अशिक्षित खरी; पण सुशिक्षित स्त्रियांनी हेवा करावा अशी तिची जाज्वल्य रसिकता आहे. घरकाम करताना ती समर्थांची अष्टके म्हणे. सारवताना परिपाठाचा पाठ करीत;तर जात्यावर दळणदळताना भराभरा रचून कविता म्हणे. शाळेच्या लायब्ररी तून आणलेले एखादे पुस्तक मी तिला वाचून दाखवीत; तेव्हा ती लक्ष देऊन ऐके आणिअनेकदा त्यापुस्तकातील घटनांचे संदर्भ देई."
गदिमांचे अक्षरही चांगले होते.प्रथम येतील तसल्या गोष्टी लिहिल्या.कविता रचल्या.आणि त्यांचे हस्तलिखित मासिक काढले.स्वत:च कोरुन लिहिलेल्या 'गजानन कुळकर्णी'या अक्षरांवर ते मनोमन खुश व्हायचे. मासिकाच्या निमित्ताने माझे ध्यानलिहिण्याकडे वळले,याचा ते उल्लेख आवर्जून करतात.
आईचे मातृस्त्रोत सांगताना ते म्हणतात की, ''माझी आई कोंड्याचा मांडा करुन वेळ साजरी करणारी बाई होती.पण मांडा करायला कोंडा तरी हवा ना! भाकरीला पीठ असले तर कालवणाला काही नसायचे.कधी जोंधळ्याच्या पिठाचे पिठले करून आई वेळ मारुन नेई." मुलांना झळ लागू नये म्हणून आपल्या प्राणांचे पांघरूण करण्याची तिची सिध्दता होती.एकदा मी पास झाल्याचा आनंदात मी धाकट्या बहिणीला खेळवत होतो.दादा पाठीमागे येऊन उभे राहिले, आई भाकरीचे पीठ मळत होती. दादा मोठ्याने माझ्याकडे बघून म्हणाले,--"ही बाभळीची गाठ कधी मोठ्ठी होणार आणि मला सुखी करणार?"वडिलांच्या' त्या' वाक्यातील वेदना मला कळाल्या.मी मनोमन दृढनिश्चय केला.मोठा पगार मिळवायचा, दादा आणि आईला सुखात ठेवायचे.साऱ्या भावंडांना खूप खूप शिकवायचे.खेड्यातले शैशव आणि बालपण संपून मी एका सीमेवर उभा होतो. मागे-पुढे अंधार होता.काजव्यांच्या पंखावर असतो तसा अंधूक प्रकाश कुठेतरी माझ्या मनात उत्साहात लुकलुकत होता.पाय स्वत:च पुढे जाण्याच्या विचारात होते.तेव्हाडोळे म्हणत होते:'आम्ही काढू शोधून रस्ता.' येथवरी आहे ऐसा हा प्रकार.
'कोपऱ्यावरचा दिलासा'या कथेत महाराष्ट्रीयन रसिकांना खदखदून हसविणारे विनोदाचार्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामुळे चित्रपट सृष्टीत कसा पोहोचलो.मा.विनायक यांच्या 'हंस'चित्र संस्थेत कशी नोकरी मिळविली, मार्केडयार्ड मधील एका गणपतराव मिरजे यांच्या अडत-दुकानाच्या गाळ्यात कसे राहत होतो.बोलपटात अभिनयाला माडगूळकर हे नाव चिकटले कसं.याची मार्मिक आणि हृदय स्पर्शी शब्दातील ही कथा आहे.ती रसग्रहण करताना त्याकाळातील आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडतं जाते. प्रत्येकाचे जीवन वेगळे, त्यामुळे आयुष्याचे दर्शन वेगळे घडते.
अनवाणी आणि अर्धपोटी प्रवाशाला क्षणभर टेकायला मिळाले तर त्याला काय आठवेल? रस्त्यावर भोगलेल्या यातना!छे!त्यांचे स्मरणही नको वाटेल.ते म्हणतात,'निदान मला तरी दु:खाची याद नाही.उन्हाचा आठव नाही.आठव येतो तो बहारदार वृक्षांचा,सावल्यांचा अन् त्यांनी दिलेल्या थंडाव्याचा….. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते चित्रसृष्टीत आले.अन्न आणि अभिनय कमावण्यासाठी लागणारी अक्कल माझ्याजवळ वानवाच होती.चित्रपट सृष्टीची दारे सदाच बंद.ताटकळणाऱ्या उमदेवारांची गर्दी सदैवच त्या बंद कवाडापुढे धरणे धरून बसलेली असतात.मग मला आत घेतले कोणी?"
'पंधरा दुणे तीस!'या कथेत 'हंस' चित्रसंस्थेचा मासिक पगार १५रुपये आणि कॅमेरामन पांडुरंग नाईक यांच्या मुलांच्या शिकवणुकीचे दरमहा पंधरा रुपये असे एकंदर तीस रुपयांच्या पगाराची चित्तर कथा छानच शब्दसाजात गुंफली आहे.सिनेमा स्टुडिओत चित्रपटाच्या चित्रीकरणा वेळी वेगवेगळ्या एक्स्ट्राॅ नटासारख्या बोलपटासाठी सांगतील त्या भूमिकेची ड्रेपरी करून भूमिका वठवाव्या लागत होत्या. त्याचं वेळी अचानकपणे मला पगार मिळण्याची वार्ता बॉय कडून कळताच, हा असीम आनंद कोणाजवळ कसा प्रकट करावा तेच समजेना झालं.चित्रपट व्यवसायाच्या माध्यमातून मी आयुष्याचा प्रवास चालू केला.माझा फारसा परिचय नसतानाही बाबूराव पेंढारकर व पांडुरंगरावांनी माझी दु:खे जाणून मला जिव्हाळा दिला.योग्यवेळी या वृक्षांनी आपली छाया गदिमांच्या मस्तकावर केली नसती तर ते परत फिरुन आज कोण झाले असते.असा विचार त्यांच्या मनात घर करत होता..
'सुवर्णाक्षराचा मान'या कथेत साहित्यक्षेत्रातील दिग्गज प्रतिभासंपन्न ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक वि.स. खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांचे लेखनिक होण्याचे परमभाग्य गदिमांना लाभले.केवढे मोठं भाग्य त्यांना वाटले.त्याची ही आनंददायी अनुभव व्यक्त करणारी कथा.. वि.स. खांडेकरांच्या अनेक लिखाणांची मुद्रणप्रत तयार करण्याचं सदभाग्य गदिमांच्या अक्षरांना लाभलं होतं. म्हणूनच कथेचे नाव'सुवर्णाक्षरांचा मान'देऊन त्यांचे अप्रतिम अक्षरवैभवात प्रस्तुत केले आहे.
यातील छत्रीची घटना तरच फारच छान आहे.बाबूरावांची लिहिण्याची विचारणा, व स्कीन प्ले लिहायला सांगितले.मग आपल्या कडे चांगले फाऊंटन पेन असावे असं वाटले. त्याचवेळी बाबुरावांना लिहिण्यासाठी पेन मागताच...एक अक्षरही न बोलताकोटाच्या खिशाला असलेला पेन त्यांनी गदिमांना देणं. ते पेन घेऊन,तिथचं माझी लिखाणाला शिकाऊ प्रसिध्दी लेखक म्हणून वाटचाल सुरू झाली.
गदिमांच्या झोपडीवजा बिऱ्हाडात एकच छायाचित्र होते.ते म्हणजे वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांचे. त्यांच्या सहवासात मला लिहिण्याचा आणि काव्यरचनेचा सोपान समजत गेला.त्यांनी पद्यलेखक होण्याचा कानमंत्र दिला.तसेच अवेळी त्यांनी केलेल्या मदतीमुळे घरावर आलेली संक्रांत टळली. म्हणूनच गदिमा भाऊसाहेबांविषयी म्हणतात की,"भाऊसाहेब खांडेकरांच्या लेखणीत जे आहे तेच त्यांच्या हृदयात आहे."
नवयुग चित्रसंस्थेतील त्यांच्या स्थित्यंतरांचे वर्णन 'नवयुग' मधला लपंडाव या लेखात मांडले आहे.'लपंडाव' या बोलपटात दिग्दर्शन सहायकाची मिळालेल्या संधीचे वर्णन छानच आहे.त्यांच्या लेखातून अनेक नवनवीन शब्दांची माहिती समजत जाते.समर्पक यथार्थ शब्दांची घटनाप्रसंगात गदिमा पेरणी करुन प्रसंग खुलवतात.ते पानोपानी दिसून येते.चित्रपटीय तंत्रात इंग्रजी शब्दांऐवजी मराठी शब्द वापरणारे के.नारायण काळे.दृश्य,दृश्यानुसंधार,दूरदृश्य, समीपदृश्य, विहंगम दृश्य असे कित्येक शब्द मौजेने तयार केले होते. इथंच सिनेमा गीतरचनेच्या प्रवासाला आरंभ झाला.इथं भेटलेल्या माणसांचे चित्रण अफलातून केले आहे.
'पहिला पाळणा'ही कथा बोलपटाची आहे.श्री. बेडेकर यांची ती चित्रकथा.त्यावर आधारित पद्यलेखन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.त्यावेळी घडलेल्या करामती आणि गमतीजमतीचे वर्णन या कथेत केले आहे.
'समाधी--लेख'या आत्मचरित्रपर लेखात सावलीच्या आशेने भालजी पेंढारकर यांनी 'प्रभाकर' चित्र कंपनीत पद्यकार आणि नट अशी दुहेरी भूमिका वठवत होते.यातील ग्रामोपाध्ये मित्राच्या सहवासातील वर्णन मनाला स्पर्शून जाते.ते म्हणतात की,"बेकार झाल्यावर क्रांतिकार्यासाठी लेखन,स्वानंदासाठी वाचन आणि कालव्ययासाठी वाड़्मय-चर्चा असा त्रिविध आरंभिला होता.पण पोटाच्या व्यथेने हे सर्व उद्योग निष्फळ ठरले.मग पुन्हा विनायक रावांच्या स्टुडिओच्या वाऱ्या करु लागलो."
'मौजेचे स्वप्न' या कथेत कुटूंबाची व्यथा वाचताना मन हेलावून जाते.इतकं भावस्पर्शी वर्णंन गदिमांनी केले आहे.कलामहर्षी भालजी पेंढारकर यांच्या प्रफुल्ल कंपनीत करार झाला पण,बोलपटच रहित झाला.या घटनेचे वर्णन केले आहे.तसेच कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्याशी झालेलं माझ्या साहित्यावरील संभाषण.आणि त्यातून 'राजमंदिर' चित्रकंपनीचे शांताराम बापूंशी ओळख.आणि रामजोशी या लावणी-वाड़्मयावरील कथेचं लेखन.त्याच पडलेल्या स्वप्नाचे कथाबीज मांडले आहे.
राजकमल चित्रसंस्थेच्या तमाशाप्रधान 'रामजोशी' बोलपटाचे पटकथाकार होण्याचा मान शांताराम बापूंनी दिला.त्या घटनेची ही रंजक आणि प्रेरक कथा आहे.यशस्वी पटकथा कशी तयार होते.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'रामजोशी' उत्तीर्ण!ही आत्मकथा होय.
शेवटी 'सावल्यातील वाटचाल' या कथेत रामजोशी बोलपटाचे यश व्यक्त केले आहे. वाघ्या-मुरळी कथेतून तयार झालेला जय मल्हार सिनेमाची जडणघडण आणि वाटचाल अधोरेखित केली आहे.सुधीर फडके सोबत ग्रामोफोन वरील गीतगायन आणि वंदेमातरम चित्रपटाचे कथानक आदी वर्णन या लेखात गुंफले आहे.गदिमा म्हणतात की,''वंदे मातरम् हा चित्रपट पुरा झाला आणि माझ्या तद्नंतर पायाखालची वाट बदलली.खडे,काटे नाहीसे झाले.डोक्यावरचे ऊन शीतळले. सावल्यांचा शोध करण्याचे प्रयोजन उरले नाही.इथून पुढचा प्रवास प्रगतीसाठीच सुरू झाला.अन्न आणि निवारा यांचा अभाव उरला नाही.या चित्रपटांची जाहिरात लेखकाच्या नावाने प्राधान्य सादवीतच पत्रापत्रातून झळकली."
" 'रामजोशी'च्या माडगूळकरांचा नवा बोलपट: 'वंदे मातरम्'.....
रसिक वाचकांना शब्दसामर्थ्याने मोहळ घालून गारुड करणारे शब्दमहर्षी मराठी साहित्य-संस्कृती क्षेत्रातील प्रतिभासंपन्न साहित्यिक कथालेखक,पटकथाकार, संवाद, गीतकार आणि अभिनय करणारे चतुरस्त्र प्रतिभावंत गीतरामायणाकार ग.दि.माडगूळकर तथा गदिमा यांच्या लेखणीला त्रिवार वंदन!!!आणि साहित्यसंपदेस मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन!!!!
अप्रतिम आत्मचरित्रपर कथा संग्रह 'वाटेवरल्या सावल्या'हा स्मृतींची जपणूक करणारा ग्रंथ आहे.वाचनप्रेमी रसिकांच्या संग्रही असावे असा अनमोल ठेवा आहे.
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक-१० डिसेंबर २०२१
*****************************************
Comments
Post a Comment