पुस्तक परिचय क्रमांक-९९ मी अन् माझा आवाज
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,
वाई
पुस्तक परिचय क्रमांक-९९
पुस्तकाचे नांव--मी अन् माझा आवाज
कवीचे नांव--संदीप खरे
प्रकाशक-रसिक आंतरभारती, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०१९ /पुनर्मुद्रण तिसरे
वाड़्मय प्रकार--काव्यसंग्रह
पृष्ठे संख्या-९६
मूल्य/किंमत--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
९९||पुस्तक परिचय
मी अन् माझा आवाज
कवी:संदीप खरे
💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆
'दमलेल्या बाबाची कहाणी' यासारखी अप्रतिम आणि वास्तवेचे दर्शन घडवून आणून रसिकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गाणी.रसिकांच्या हृदयसिंहासनवर अधिराज्य गाजविणारे संदीप खरे हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे 'दिवस असे की','मी अन् माझा आवाज.' आणि 'आयुष्यावर बोलू काही' हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.लोकप्रिय गायक सलील कुलकर्णींसोबत त्यांनी बरेच गीतसंग्रह(अल्बम) प्रकाशित केले आहेत.त्यांच्या सोबत गाण्यांच्या अनेक मैफिली संदीप खरे यांनी केल्या आहेत. व्यासपीठावरील 'आयुष्यावर बोलू काही' या सांगितिक कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धीच्या झोतात आले. आयुष्यावर बोलू काही बरोबरच, ते कवी वैभव जोशी ह्यांच्या सोबत 'इर्शाद' हा कवितांचा कार्यक्रम देखील केलेला आहे.
गीतकार गायक संदीप खरे म्हणतात की,"प्रामाणिकपणे सांगायचे झालेतर,घरातली 'ती' म्हणजे आई, बायको किंवा मुलगी सोडल्यास सातत्याने संपर्कात किंवा सहवासात असलेली कुणीही मैत्रीण मला नाही.माझ्या प्रेमकविता वाचून याचे अनेकांना आश्चर्य वाटेल; पण आयुष्य असे विसंगतीनेच भरलेले आहे. मात्र, एक 'ती' मला अनेकदा भेटत गेली,भेटते आहे. जिच्याकडे आपण व्यक्त होतो, जिच्या सहवासात आपल्याला हायसे वाटते, अबोध मनातल्या गोष्टी जिच्यापाशी आपसूकच प्रकट होतात किंवा आपल्या मनातील अनेक भावना जी हळूवारपणे पृष्ठभागावर आणते,अशी 'ती' अर्थातच 'कविता' मला इयत्ता चौथीत असताना भेटली,आजही तिची सोबत मला प्रगल्भ करत आहे.
सहवासातून प्रेम व्यक्त होते,सततच्या ध्यासाने एकमेकांमधील स्नेह वाढत जातो, त्याप्रमाणे आमच्यातील बंध आणखी दृढ होत गेले. त्या त्या वयात ती माझ्याशी त्याच वयाची होऊन बोलायची.यातून तिचा आवाका किती मोठा आणि कक्षा किती रूंद आहेत,हे उमगत गेले.ती माझ्याभोवती सतत पिंगा घालते.त्याच कवितेने मला आयुष्याच्या ओंजळीत खूप काही दिले. माझ्या पोटापाण्याची काळजी तीने घेतली. ती नक्षत्रांचे देणे आहे.कोणत्याही गाण्याच्या मागे ज्याप्रमाणे षड्ज लावलेला असतो, म्हणजे गायकाच्या पार्श्वसंगीतावर कायम 'सा' सुरू असतो,तसाच 'कवितेचा षड्ज' माझ्या आयुष्याच्या मागे कायम सुरू आहे आणि राहीलही.तिचा सूर मला नेहमी ऐकू येतो. साद घालत राहतो.त्याच कवितांची अत्युत्तम काव्यानुभूती 'मी अन् माझा आवाज….'या काव्यसंग्रहातून संदीप खरे यांनी रसिकांना वाचायला लिखित केलीय.
'दमलेल्या बाबाची कहाणी'या गीताविषयी ते म्हणतात की," हे काही एका रात्रीत सुचलेले नाही. त्यातील मुलीचे अंतरंग मला केवळ माझ्या मुलीकडून उलगडता आलेले नाही किंवा वडील म्हणून ते केवळ माझ्या एकट्याचे भाष्य नाही, तर अनेक वडिलांच्या दिनक्रमाचे ते निरीक्षण आहे. अशा रचनांसाठी मी ठोकळेबाज नोंदी ठेवत नाही, तर त्याचे सार वापरतो. याच मानसिकतेमधून कवितेतली 'ती' मला भेटत जाते, उलगडत जाते आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचतेही. अशी ती मला व्यक्ती सारखी समोर प्रत्यक्ष कधीच भेटत नाही. वारा भोवती असतो, तो दिसत नाही. सूरही दिसत नाही, फक्त ऐकू येतो.तशी ती मला व्यक्ति रुपात कधीही दिसलेली नाही. जन्माची रेषा ओलांडताना ती एकदा सशरीर दिसावी,अशी उत्सुकता मात्र मनात आहे.अखेर तिच्याविषयी हेच सांगेन,की…...करते जवळीक अपरंपार,तरीही नेहमी स्पर्शापार…"
'मी अन् माझा आवाज…'या काव्यसंग्रहात ९५ काव्यशलाकांचा अनमोल ठेवा काव्यरसिकांना वाचायला आहे.'मी अन् माझा आवाज' शीर्षकाची कविता अंतिमतः आहे.त्यातील काही आवडलेल्या आणि आठवणीत राहणाऱ्या खास ओळी…
एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी
'जिवलग'होतो दोघे...मी अन् माझा आवाज!
आता मी एका घरात राहतो….तो दुसऱ्या घरात….
मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचेच फाटलेच
मी म्हटले-'मला महान वाटते आहे…'
तो म्हणाला-'मला वाटलेच!'
अन् मग गेलाच तो….दूर नाही...माझ्याच आत...खोल खोल
माझ्याच आत बांधून घर...म्हटला-'हां! आता इथे येऊन बोल!'
एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी…मी अन् माझा आवाज!
आता मी एका घरात राहतो….तो दुसऱ्या घरात….
प्रत्येक कवितेची खासियत वेगवेगळी. विविधांगी रचना गेय,वर्णन,कल्पक,रुपक,गद्य छंद,प्रतिक आणि संवाद...कवी संदीप खरे प्रारंभी, 'आरंभ ओळ'या कवितेने सुरुवातकेली आहे.कविता सुचते कशी?कधी,हृदयातून मनात अन् कधी डोळ्यातून चित्रात,कागदावर उमटते शब्दाअक्षरात…. शब्दकळेत….
आरंभओळ
कविता सुचताना
सुचलेली पहिलीच ओळ वाटली शेवटची
पण त्यानंतर लाटेगत अनिवार्यपणे आली
अजून एक ओळ वाटलं-नव्हे,खरं तर ती शेवटची!
आणिक मग सुचली अजून एक ओळ…
काव्यनिर्मितीच्या मागे सर्जनशीलतेची असलेल्याप्रतिभेचे मनोगत सुंदर शब्दकळेत गुंफलेले आहे.प्रतिकांचा समर्पक आविष्कार 'माझा नाही काही भरवसा'या काव्यातून व्यक्त होतोय..
मी तर पाऊस,कायमच माझे भान हरपुनी कोसळणे
भिजले ते ते भिजले आणि उरले जे ते उरले गं…
जगण्याचे अक्षर उमटे वळसे घेऊन देहाचे
मोक्षाआधी हे मध्यांतर जमले त्यांना जमले गं….
पांढरा शुभ्र कागद आणि कविता खिडकी, पाखरू, फुलपाखरू आणि रद्दीवाला यांचा स्वभावपैलूंचा अचूक वापर करुन कविता छानच भावतेय…तर पालखी कवितेत वास्तवतेचे आणि तनमनाचे यथार्थ दर्शन रचनेतून दृष्टीत पडते..तर 'ते' आणि 'ती'चा संवादरुपातल्या नाट्यप्रवेशाचा रसास्वाद घेताना,शब्दसामर्थ्याची आणि आशयघन कवितेची खासियत लक्षात राहते..
पण दृश्य असं दिसावं की तिने एका मध्यरात्रीच्या पोटातल्या उत्कट स्वप्नावर
-शुभ्राच्या जितक्या म्हणून छटा असतील
त्याआवर सोनपिवळं उन्ह माखून-आणि
-देवचाफ्यापासून सोनचाफ्यापर्यंत गंधांच्या
जितक्या काही तऱ्हा असतील
त्यांचं हलकं अत्तर टाकून--
सौम्य मादकपणाने हलके हलके पाऊल टाकीत
चाफ्याच्या झाडामागून एक पाऊल पुढे यावे...!
पावसाचे वर्णन करणाऱ्या आता पाऊस, पाऊसराव…,पाऊस म्हणजे असते काय?,झड ,ढगांनी या ढगांना या….अप्रतिम आहेत.त्यातील काही मनपसंतीच्या ओळी..
पाऊस म्हणजे असते काय?
आभाळाचे लाखो पाय!
पाऊस हिरव्याचे चाळे
कातळ दगडावरचे शेवाळे!
सगळेच ढग सक्त असतात
हळुवार,संथपणे कुठेकुठे तरी…
टपटप पुन्हा पान पान निथळे
हिरव्याला खरा खरा'हिरवा'मिळे…
फांदी आली आडोशाला पानाखालती;
मुळापासुनिया झाड हसले पुन्हा….
आरसा,आलो मोडुनिया वेस.,नको म्हणालिस तर आता, आता आता,समजूत आणि अरे, जमणार नाही,राधेचे झाड, वर्तमान आदी कविताही रसग्रहण करताना मनाला स्पर्शून जातात. विचारचक्र फिरवितात..
समजूत मधील रचना
चंद्र आहे पूर्वीसारखाच..
वारा तसाच वाहतो आहे!
एक सौम्य, जुना गंध…
अजून तसाच फिरतो आहे!
हेच बघून एकटेपणी
पूर्वी किती झुरलो आहोत
रात्रभर आहे तशीच तरुण…
आपण पुढे सरलो आहोत!
'वर्तमान' काव्यातली रचना
उन्हे विकली...वारे विकले
ओलेसुके दुष्काळ विकले
ज्याने विकले त्यांचे टिकले
वाळवंटातून केशर पिकले!
पुन्हा उद्या हाच खेळ
हाच पुन्हा खेळ उद्या
खेळ पुन्हा उद्या हाच
हाच खेळ उद्या पुन्हा!
बेजबाबदार वृत्तीने काम करणाऱ्या प्रवृत्तीची ही कविता वैचारिक मंथन चिंतन करायला भुंग्याप्रमाणे मनात आवर्तने करायला लावणारी 'काॅशन्स'नावाची कविता आहे.
एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस त्याने उडवून नेले सारे...
ओबडधोबड फणसासारखे पिकत चाललेत क्षण...
आवाज झालाय पावरीसारखा.. अन् शेवरीसारखे मन..
म्हातारपणाचे दर्शन शब्दरचनेतून सांगणारी कविता, 'म्हातारपण'.
सायकल शिकताना येणारी आनंदानुभुतीसुरेख अक्षरवैभवात 'सायकल'या कार्यात रेखाटली आहे.वाचताना प्रत्यक्ष मुलाला वडील सायकल शिकवत आहेत.मागे कॅरिअर धरुन सुचेना करतायत.अन सुचनेनुसार तो मुलगा पेडल मारुन चालवितोय,असा फील नजरेसमोर येतो.
नाट्यप्रयोगासाठी कलावंतांना गावोगावी दौऱ्यावर जावे लागते.तेव्हा त्याच्या मनभावना 'दौरा'या कार्यात व्यक्त केलेल्या आहेत.
जड मन...जड जीभ….जड जड अंग
तसाच घ्यायचा चेहऱ्यावर लावून थोडा रंग
ढवळून येतात सत्य,स्वप्न,दिवस आणि रात
दिसत राहतात फक्त टाळल्या वाजवणारे हात…!
जेव्हा मिळेल तेव्हा घास.जो-जो मिळेल तो
सवयीनेच हात ओंजळ ओठांशी नेतो!
असोशीने होत नाही क्षुधेचा उत्सव
पाण्याला या उरली नाही तहानेचीही चव!
'सारखे' या काव्यातील भावलेल्या ओळी
जागवावेस केव्हा पहाटे मला
मी टिपावे तुला अन् दवासारखे!
सांज दाटून येतात सरींची तुझ्या
शब्द जळतात माझे दिव्यासारखे!
'दु:ख येतेच'ही कविता आयुष्यातील दु:ख कसे येते.याचे मर्मभेदक रचना केली आहे.
दु:ख येते……
दु:ख येतेच!
पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून...सांदीफटींतून….
खिडक्या--तावदानांतून…
अगदी पाणी गेलेल्या नळातून…
पण दु:ख येतेच…..!
तर सुखाची व्याख्या छानच समजून 'सुख'
रचनेत केलीय.
आता सुख येते सारखे सारखे भेटायला
मुळीच वाटेस जात नाही;तरीही येते खेटायला !
काय जाणे पुण्य केले गेल्या जन्मी कळत नाही
तंद्रीनामक एक मैत्रीण भेटण्यासारखे सुख नाही
घोट सुख!घास सुख!येता-जाता श्वास सुख!
वर-सुख!शाप-सुख!पुण्य-सुख! पाप-सुख!
रसिक प्रेक्षकांना मनमुरादपणे आनंद देणारी मैफिलीतील अवीट लोकप्रिय गाणी या काव्यसंग्रहात कवितेच्या रुपात वाचायला मिळतात.त्या गायक कविवर्य संदीप खरे यांचे' मी अन् माझा आवाज'काव्यसंग्रहातील सर्वच कविता रसग्रहणात्मक रुची वाढणाऱ्या आहेत. कवी संदीप खरे यांनी काव्यरसिकांना कार्याचा आस्वाद या संग्रहातून लोकांपर्यंत पोहचविल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!!
जादुई लेखणी व सुरास मनापासून सलाम!!!
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- १३ डिसेंबर २०२१
💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆
Comments
Post a Comment