पुस्तक परिचय क्रमांक-९७ विशाखा
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-९७
पुस्तकाचे नांव--विशाखा
कवीचे नांव-- कुसुमाग्रज
प्रकाशक-कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रणे २०१८
प्रथमावृत्ती: १९४२
एकूण पृष्ठ संख्या-११२
वाङ् मय प्रकार ---काव्यसंग्रह
मूल्य--१५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚🌹☘️🍂🌹☘️🍂🌹🌹☘️🍂🌹
९७||पुस्तक परिचय
' विशाखा' ज्ञानपीठ पुरस्कार विजेता काव्यसंग्रह
कवी: कुसुमाग्रज
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
वेडात मराठे वीर दौडले सात!
"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपली वार्ता
रण सोडूनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर खऱ्या लाजतिल आता
भरदिवसा आम्हा दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात!!!!
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ||
अन् व्रजांचे छातीवरती चर्या झेलून प्रहार||
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची||
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतही तिजला भरावयाची||
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा...
पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा…
"माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टीळा
तिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा"
या सारख्या अमाप जोश,आवेश आणि उत्साह व चैतन्य निर्माण करणाऱ्या लोकप्रिय गाण्यांचे रचनाकार साहित्यक्षितीजावरील एक तेजस्वी तारा ---ज्ञानपीठ पारितोषिकाने गौरविण्यात आलेले ऋषीतुल्य शब्दप्रभू , प्रतिभासंपन्न साहित्यमहर्षी नाटककार लेखक आणि कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह 'विशाखा' यातील वेडात मराठे वीर दौडले सात आणि क्रांतीचा जयजयकार ही काव्यपलिते वीररसातील शौर्याचा अभिमान पुलकित करणारी आहेत.तर काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीला पहिले ज्ञानपीठ पारितोषिकविजेते साहित्याचे भीष्माचार्य प्रतिभावान शब्दप्रभू लेखक वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब यांची 'अर्ध्यदान'शीर्षक लेखाची लाभली आहे.
विष्णू वामन शिरवाडकर 'कुसुमाग्रज' या टोपणनावाने काव्यलेखन करीत होते. १९४२साली त्यांनी 'विशाखा 'काव्यसंग्रहाचे लोकापर्ण केले आहे.त्यांना आधुनिक मराठी काव्याचे भूषण मानतात.भाऊसाहेब खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ पारितोषिक मिळविणारे दुसरे लोकप्रिय 'नटसम्राट'नाटकाचे लेखक कुसुमाग्रज आहेत.त्यांच्या साहित्यातील चौफेर लेखणाबद्दल आणि साहित्यकृतीस अभिवादन करण्यासाठी २७फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्म दिन 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या अनेक साहित्य- कृतीस पुस्तकांस महाराष्ट्र सरकार व साहित्य अकादमीने सन्मानित केले आहे. आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक, कवीश्रेष्ठ,नाटककार आणि समिक्षक म्हणून त्यांना लोकमान्यता होती.
'विशाखा' या काव्यसंग्रहात एकूण सत्तावण्ण कवितांचा अनमोल खजिना काव्यरसिकांना रसग्रहण करायला दिलेला आहे.त्यांच्याकविता क्रांतिप्रवण मनोवृत्ती विजिगीषू मनाची व ध्येयवादी आहेत.प्रीतीच्या भव्योदात्त कल्पना चित्रांनी व अर्थसंपन्न शब्दसाजाने निर्मिलेल्या स्फूर्तिदायक आविष्कार त्यांच्या कवितेत असतो.त्यांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.कुसुमाग्रज म्हणतात की,''साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे." सामाजिक अन्याय व विषमता या विषयावर ते लेखातून कवितेतून टीका करत.
कुसुमाग्रज म्हणजे नावीन्याची संकल्पना,ती आकृतिवादी नसून आशयवादी आहे.त्यांनी क्रांतीला साहित्याची प्रेरणा मानले आहे.काव्य म्हणजे माणसाच्या भोवतालच्या परिसराशी झालेला संवाद होय.आपल्याला उत्कटपणे जाणिवलेले दुसऱ्यापर्यत पोहोचविणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे.शब्दाच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. काव्य हा कवीचा आत्माविष्कार तो संवादातून ओळीत उतरतो..आणि तिथंच कार्याचा उदय होतो.कौतुक माणसाला आत्मबळ व लिहायला चेतना देते.भावनेची उत्कटता आणि कल्पनांची उत्तुंगता 'विशाखा'काव्यसंग्रहातील काव्यात जाणवते.
या काव्यसंग्रहातील कविता नवतारुण्यातील उत्कटता दर्शवितात.बलिदानाच्या रक्तरंजित राजकीय आणि सामाजिक घटनांचा ठसा उमटवितात.स्वातंत्र्यक्रांतीची प्रेरणा देवून दुर्दम्य ओढ दाखवितात,शेतकऱ्यांचे सावकारी कर्जापायी होणाऱ्या शोषणाचे वेदनांचे आक्रोश व्यक्त करतात.तर काही कविता मानवतावादी दृष्टीकोन दाखवितात तर वैचारिक मंथन-चिंतन करायला उद्युक्त करतात….अशा आशयघन आणि आशयगर्भता संचित असलेल्या कविता आहेत.
जीवनातील उत्कट स्वानुभवापासून ते प्रखर राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य लालित्यपूर्ण आणि ओघवत्या शैलीत 'विशाखा' या उत्तम काव्यफुलोरा जगन्मान्य साहित्यिक कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून रचनेतून उतरलाय!
मराठी वाचकांच्या अभिजात काव्यप्रेमाला ओहोटी लागल्यानंतरच्या काळात कवीवर्य कुसुमाग्रजांचा उदय झाला.आणि मग नामांकित मासिकातून त्यांची कविता प्रसिद्ध व्हायची पण तिचा म्हणावा तितका प्रसार झाला नाही.बोलबाला झाला नाही.
"वृक्षराजीतून चमकणाऱ्या काजव्यांकडे लोक पुन्हा:पुन्हा कौतुकाने पाहतात.पण क्षणार्धात आकाश उजळून जाणाऱ्या विजेचे दर्शनहोताच डोळे मिटून घेतात!तसाच प्रकार चित्रपटातील गाणी आणि कविता यांच्यात दिसून येतो. अश्यावेळी मराठी साहित्यात उद्याच्या आशा- आकांक्षांचे उद्गाते म्हणून ज्यांच्याकडे अभिमानाने बोट दाखविता येईल अशा तरुण मराठी कवींची गणना करताना कुसुमाग्रजांच्या नावाने अनामिका घालावी लागेल.कारण टिळक जसे फुलामुलांचे कवी, गोविंदाग्रज जसे कल्पनारम्य कवी तसे कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत"असे प्रतिपादन भाऊसाहेब खांडेकर यांनी प्रास्तावणेत केले आहे.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही,तर तो अग्निरसाचा वर्षात करीत सुटतो.
''समिधाच सख्या या,त्यांत कसा ओलावा
कोठून फुलांपरि या मकरंद मिळावा?
जात्याच रुक्ष या एकच त्या आकांक्षा
तव अंतर अग्नी क्षणभर तरि पुरवावा!''
समिधा कवितेतील रचना म्हणजे विशाखा काव्यपुष्पातील कविता आहेत.तसेच समाजातील विषमता,पिळवणूक, गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजन समाजाची चीड आणि दाह अत्यंत उत्कट आणि सुंदर शब्दात काव्यातून व्यक्त केली आहे.कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकीत आहेत. त्या कविता जीवनातील अनुभवांची विविध प्रतिबिंबे आहेत.
दूर मनोऱ्यात, गोदाकाठचा संधिकाल, स्मृती, मातीची दर्पोक्ती, क्रांतीचा जयजयकार,सात, गुलाम,बळी,लिलाव, सहानुभूती,माळाचेमनोगत,ऋण, पावनखिंडीत, पाचोळा, मेघास,देवाच्या दारी, मेघास आदी कविता रसग्रहण करताना त्यातील आशय आणि अभिव्यक्ती लक्षात येते.सर्वच पद्ये उत्तम आहेत.त्यातील काही रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
स्वप्नाची समाप्ती यातील पुढील ओळी कल्पकता,संकल्पना आणि उपमा अधोरेखित करतात.
स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
खिरे रात्रभर कणकण
प्रकाशाच्या सांगतात
रातपाखरांचा आर्त
नाद कच कानी पडे
संपवुनी भावगीत
झोपलेले रातकिडे
'ग्रीष्माची चाहूल' निसर्गातील बदलाचे वर्णन वाखाणण्यासारखे आहे.सुंदर शब्दफुलोऱ्यात
रचना सजवलीय….
नवा फुलोरा नवं पर्णावलि
हिमशीतल चहुकडे सावली
जीवनगंगा जगि अवतरली
तरि उदास मानस होई कसे!
दिशा दिशा या उज्ज्वल मंगल
आम्रांतुनि ललकारति कोकिल
दुमदुमतो वनि तो ध्वनि मंजुल
मनि रात्रिंचर का कण्हत असे!
'किनाऱ्यावर' या कवितेतून संसारक्षितीजातील आवर्तने,आनंद दुःखाचे उन्हाळेपावसाळे, दिशा आणि दशा यांचे सुरेख वर्णन केले आहे.
पुढे पसरला अथांग दरिया
सखे,किनाऱ्यावरती आपण
कोर शनीची शुभ्र शिदोरी
टाकी निज किरणांची रापण!
हळुहळु खळबळ करीत लाटा
येउनि पुळणीवर ओसरती
जणू जगाची जीवन-स्वप्ने
स्फुरती,पुरती,फुटती,विरती!
स्मति काव्यातील आवडलेली रचना…
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरती तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!!
वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे,चरणचाल हो मंद
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!!
जालियनवाला बाग रक्तरंजित गोळीबाराची भावस्पर्शी रचना केली आहे.
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले नाध्वनि तुझ्या प्रेषिता,अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष..
"प्रेम शांती अन् क्षमा यांमध्ये बसतो परमेश!"
बळी कवितेतील उत्तम रचना वाचताना मनात घालमेल सुरू होते.
शोधण्याला भाकरीचा घास आला योजने
आणि अन्ती मृत्यूच्या घासात वेडा सापडे..!
आरक्षण डोळ्यांतून सारी आखलेली आसवे
आत दावाग्नीच पेटे ओढ घेई आतडे…!
'पाचोळा 'झाडावरच्या हिरवीगार पर्णिका आणि झाडाखालचे हिरवेगार गवत सदैव हसून उपहास करीत असतात.झाडाच्या पायथ्याशी पडलेल्या पाचोळ्याला उषा हसवू शकत नाही. रात रिझवू शकत नाही.वाटसरु पाचोळ्याला तुडवून जातो..वंचित समाजाचे कारुण्य या कवितेतून उलगडून दाखविले आहे.
तरुवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने,
वाटसरु वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत!
आणि अन्ती दिन एक त्या वनात
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा,घेरुनी त्यांचे
नेई उडवुनि त्या दूर दूर कोठे!
अतिशय उत्तम शब्दकळेत अनुभवसिद्ध रचना 'विशाखा' काव्यसंग्रहात आहेत.यातील काही काव्यांची लोकप्रिय गाणीही गाजलेली आहेत.ती रसिकांना मंत्रमुग्ध करतात. आवेश आणि जोश निर्माण करतात.प्रेरक स्फूर्ती देणारी गीते आहेत.हा काव्यसंग्रह अत्युत्तम काव्यानुभूती देणारा आहे. प्रत्येकाने आपल्या घरात हृदयात मनात काळजाच्या कप्प्यात साठवून ठेवावा असा आहे.प्रतिभासंपन्न कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज
यांच्या लेखणीस त्रिवार वंदन!!!
'"'"''"""""""''''''''''""""''''"'"'"'''''"'''''"'''''""""""""
परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक-११डिसेंबर२९२१
Comments
Post a Comment