पुस्तक परिचय क्रमांक-९८ जावईबापूंच्या गोष्टी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,
वाई
पुस्तक परिचय क्रमांक-९८
पुस्तकाचे नांव--जावईबापूंच्या गोष्टी
लेखकांचे नांव--द.मा.मिरासदार
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-आॅक्टोंबर२०१८ /पुनर्मुद्रण
वाड़्मय प्रकार--विनोदी कथासंग्रह
पृष्ठे संख्या-६०
मूल्य/किंमत--७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
९८||पुस्तक परिचय
जावईबापूंच्या गोष्टी
लेखक:द.मा.मिरासदार
💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆
गावातल्या माणसांच्या इरसाल ढंगदार बेरकी आणि विक्षिप्तपणाच्या बहारदार विनोदीकथा आपल्या लेखणीने व वाढीने हुबेहूब अस्सल चित्र उभे करून रसिक श्रोत्यांना मनसोक्त खळखळून हसविणारे कलाकार,लेखक, सिनेमा पटकथाकार द.मा. मिरासदार होत.
हास्यविनोदी कथाकथनाच्या क्षितिजा वरील एक जेष्ठ साहित्यिक,आपल्या आवाज आणि हावभावाने साभिनयाने रसिक प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावणारे द.मा. मिरासदार. तसेच आपल्या अमोघ वाक् चातुर्याने रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे उत्कृष्ट कथाकार म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.त्यांच्या विनोदी इरसाल कथालेखन व कथाकथनाच्या उस्फुर्त, बहारदार,हावभावयुक्त समयसूचक,आणि ढंगदारपणामुळे त्यांच्या साहित्यावर निस्सीम प्रेम करणारा वाचक व श्रावक वर्ग हास्यनगरीत मनसोक्त खळखळून हसण्याचा आनंद घेत असत.
त्यांच्या कथा पोटधरून हसवत हसवत ज्वलंत समस्येवर झणझणीत अंजन घालून वैचारिक मंथन-चिंतनाची फोडणी देत असत.विनोदी साहित्याची समृद्ध परंपरा द.मा. मिरासदारांनी पुढे चालू ठेवली.त्यांच्या विनोदी कथा लेखन व श्रवणामुळे त्यांचा चाहतावर्ग निर्माण झालेला होता. चित्रपटलेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी अलौकिक कामगिरी केली आहे.'एक डाव भुताचा', ठकास महाठक आदि बोलपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्याआहेत.उत्कृष्ट पटकथालेखक आणि कथाकार म्हणून झालेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांचे अनेक संस्थांनी व महाराष्ट्र राज्य सरकारने नामांकित पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अशीच इरसाल कथांचे अस्सल किस्से आणि धमाल गमतीजमती असणारे 'जावई बापूंच्या गोष्टी'हा कथासंग्रह आहे.त्या मिश्किल कथांतून त्यांच्या लेखणीची ताकद,सजगता,ओघवती शैली, विनोदाची समयसुचकता अस्खलितपणामुळे, गावरान बोलीतल्या अस्सल शब्दांची कळा दिसून येते.
द.मा.मिरासदार यांच्या कथा आणि कथेतील पात्रे आपणाला हसवत हसवत सामाजिक परिस्थितीची ओळख वेगळ्या ढंगात करून देतात.त्या व्यक्तिंच्या रुपाने समाजातील गंभीर व ज्वलंत प्रश्र्नांची उकल करत असतात.तसेच सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कथा रसग्रहण करताना अथवा कार्यक्रमात श्रवण करताना हसत हसत मनाला चिंतन करायला,विचार प्रवृत्त करायला भाग पडतात.
कथेचे बीज त्यांना कधीही शोधावे लागलेनाही. त्यातील पात्र कर्मधर्मसंयोगांने त्यांना त्यांच्या घरीच निरखायला मिळाली. पहायला ऐकायला मिळाली.कारण त्यांचे वडील पंढरपुरातील प्रसिध्द कायदेपंडित असल्याने अनेक अशिल/ पुरस्कार कायदेविषयक सल्ला आणि केस लढवायला देण्यासाठी येत असत.तेव्हा अशा माणसांच्या गप्पागोष्टी त्यांना ऐकायला मिळत. त्यातूनच अनेक कथांचे बीज त्यांना आयते घरीच सापडले.
विनोदी लेखक द.मा.मिरासदार कथांविषयी भाष्य करताना म्हणतात की,"आज माझ्या सगळ्या विनोदी कथा एकत्रितपणे चाळल्या तर काही गोष्टी चटकन पटकन ध्यानात येतात. गावातील चावडीवर,कट्ट्यावर किंवा पारावर गावकरी मंडळी तंबाखू चोळत बसलेलीआहेत.
गप्पांना रंग चढलेला आहे,लालभडक पिचकाऱ्यांनी आसमंत'टेक्निकलर'होत आहे.अशा वातावरणात बऱ्याच वेळा माझी गोष्ट रंगत जाते.ती बहुधा पारावर, चावडीवर किंवा कुठल्याही मित्रांच्या गप्पागोष्टीत सुरू होते आणि तिथेच थांबते.विड्यांचा धूर आणि तंबाखूची पिंक त्यात हमखास असते.गुळमट गप्पांची तिथं काय चव?बेरकी,रिकामटेकडी, उडाणटप्पू आणि गप्पिष्ट माणसांचे कोंडाळे असतं त्यात विनोदाचे मुख्य भांडवल असते.
या कथासंग्रहात अस्सल ग्रामीण दहा कथा वाचक रसिकांना वाचायल मिळतात.जावईबुवांच्या सुपीक डोक्यातील अफलातून भन्नाट आयड्याच्या कल्पना बाहेर पडतात.आणि मग खमंग विनोदाचे किस्से घडताना, सासरच्या मंडळींनी त्यांना कसं समजावं लागतं.त्यांची कशी त्रेधातिरपीट होते.आणि त्यातूनच विनोदाचा नाटुकलं कसं घडतं.त्या कथांचे सादरीकरण खालील क्रमशः शीर्षक कथेने केले आहे.अगदी धमाल कॉमेडी जावयाने कशी केलेय,ती वाचताना हास्याची कारंजी थुईथुई नाचत राहतात.मामा भुर्रर्रर्र..!, उच्च स्थानी बसावे!,सूर्याची पिल्ले, वैद्याचा धंदा, डोक्याचे माप,भुताशी झटापट, ताप उतरला, जावईबुवांचा कीचकवध,'श्री' लहान झाली! अस्वल आणि चोर! या लघुकथांतून जावयांचा दिवाळीचा पाहुणचार कसा नामी घडतोय.याचं हुबेहूब चित्रणकथांतून डोळ्यापुढे उभे राहते.
जावईबापू म्हणजे एक वेगळीच व्यक्ती ! पण त्यांच्या डोक्यात काय भरले होते, कुणास ठाऊक!कांदे-बटाटे की नर्मदेतले गोटे?अशा ह्या उडाणटप्पू जावयाचे लग्न झाल्यानंतर दिवस पालटले.दिवाळी आली.जावई बापूंची पहिली दिवाळी!मग काय? जावईबापूंना दिवाळसणाची सासऱ्यांकडून आमंत्रण आले. वडिलांनी त्याला सांगितले, "तू त्यांचा जावई आहेस ना?"दिवाळीसाठी त्यांनी तुला बोलावले आहे? ऐक माझे, "सासुरवाडीला गेल्यावर अगदी ऐटीत वागायचं, सगळ्यांवर आपली छाप पडली पाहिजे.सगळ्यांना दरारा वाटला पाहिजे. "असा उपदेश वडिलांनी त्याला पढवून- पढवून सासुरवाडीला पाठवले.
तोही तट्टावर बसून ऐटीत सासुरवाडीला गेला.त्याच्या मनात सासुसासऱ्यांचे शिष्टाचार कसे टाळायचे?याची उलघाल सतत होत असते.मग तो ठरवितो.मामा नमस्कार,मामी नमस्कार.आणि विसरु नये म्हणून सतत घोकत राहतो.वाटेतल्या झाडावरील पाखरे बघून चाबकाचा आवाज काढला.त्या आवाजाने पाखरे घाबरून भुर्रर्र….उडाली.त्या आवाजाने त्याच्या रिकाम्या डोक्यात तो आवाज पोहोचला.अन् जावईबापू घोकत निघाले."मामा भुर्रर्र... मामी भुर्रर्र…."सासुरवाडीला गेल्यावर तो नमस्कार करताना तसेच म्हणतो..मामा भुर्रर्र... मामी भुर्रर्र…ती ही कथा छानच शब्दसाजात गुंफलेली आहे.त्यांच्या असे बोलण्याने आसपासची सगळी माणसं मोठमोठ्यांदा हसू लागली.
'उच्च स्थानी बसावे'या खुमासदार कथेत जावईबापू टेचात बसण्यासाठी गववताच्या गंजीवर कडब्याच्या पेंढीवर बसून तिथंच जेवणाचा हट्ट करणारे जावईबापू आणि त्यांना सगळीकडे शोधताना होणाऱ्या इतरांच्या तारांबळीचे वर्णंन फारच सुंदर शब्दात केलेय. दिवाळी सणाला अंगणात आणि घरात तेजस्वी प्रकाशासाठी पणत्या लावून सगळे घरदार अंगण उजवळलेले असते.ते पाहून, 'उजेड तर फारच मजेदार पडतोय.हे काय आहे,' असे जावईबापू मेहुण्याला विचारतात.मेहुण्याला थट्टा करायची लहर आली म्हणून तो दाजींना हे दिवे 'सूर्याची पिल्ले' आहेत असे सांगून मस्करी करतो.
त्यामुळे जावईबापूंना खरे वाटून रात्रीची पिल्ले ढापायची आणि आपल्या घरी नेहण्याचे ठरवितात.पण रात्री सगळे दिवे तेल संपल्याने विझतात, अंगणात एकच दिवा तेवत असतो. तो उचलून ते कुणाला कळू नये म्हणून कडबा ठेवलेल्या खोलीत नेमून ठेवतात.थोड्यावेळाने दिव्याच्या ज्योतीच्या उष्णतेने कडाबा पेटून आगडोंब उसळतो.घर बचावले म्हणून सगळ्यांना बरे वाटते..तर जावईबापू सूर्याचंं पिल्लू फुकट जळून मेली म्हणून घळाघळा पाणी काढून रडतरडत ते म्हणतात."कुणी मूर्खाने हा उद्योग केला कुणास ठाऊक!"
'वैद्याचा धंदा'या कथेत वैद्य दवापाणी कसा करतो याचं अनुकरण करून त्याप्रमाणे जावईबापू दुसरा आजारीपणाचं सोंग केलेल्या मुलांवर तसाच उपचार करतात.त्यामुळे तो मुलगा खरंखरं सांगतो.त्यामुळे सगळेजण बेमालुमपणे त्यांचे कौतुक करतात.अशी ही कथा छानच रंगविली आहे.
आवडलेल्या गायीच्या डोक्याचे माप घेण्यासाठी केलेल्या करामती आणि त्यातून गायीच्या शिंगात यांचं डोकं अडकल्याने गाय अशी निबराटून घोळासते ,त्यामुळे जावईबापू जायबंदी होतात.ओरडू लागतात.ती 'डोक्याचे माप'कथा अफलातून रंगविली आहे.
भुताबरोबर झालेली झटापट नेमकी कुणाशी होते.त्यामुळे जावईबापू लोकांच्या भुतं बघण्याच्या गोष्टीला दुजोरा देवून मध्यरात्री वडाच्या झाडाखाली गेल्यावर भंबेरी व त्रेधातिरपीट उडते ती 'भुताशी झटापट'ही छानच अक्षरवैभवात मांडलेली आहे.
वैद्यबुवाची ताप उतरवण्यासाठी डोक्यावर थंड पाण्यात भिजवून कापडीपट्टी ठेवण्याची कृती पाहून,वैद्याला भंडावून सोडणारे जावईबापू खरं उत्तर कळेपर्यंत वैद्याची पाठ सोडत नाहीत.हेच अनुकरण करून सासऱ्याच्या वाड्यातील मागच्या भागात लहान खोलीत राहणाऱ्या गड्याच्या पोरावर उपचार करतात. पोरगं तापाने लय फणफणत असते म्हणून तो गडी जावईबापूंना नुसता घरात जाळ होतोय म्हणून सांगतो.तर जावायबापू त्या मुलाला चक्क जवळच्या हौदात बुचकळून काढतो.अशा उपायाची 'ताप उतरला'कथा वाचताना हास्याची लकेर चेहऱ्यावर उमटतेच.
नाट्यभूषण कलाकार आदरणीय मच्छिंद्र कांबळी यांचे मालवणी बोलीभाषेतील नाटक 'द्रोपदी वस्त्रहरण'बघताना आपण हास्यरसात चिंब भिजून जातो.त्याच शैलीचे व रंगढंगातील नाटकाचे वर्णन 'जावईबापूंचा कीचकवध'ही कथा वाचताना अनुभूती येते.इतकं प्रवाही लेखन या कथेची केलीय.
वडिलांच्या आलेल्या चिठ्ठी वजा पत्राचे वाचन करताना जावईबापूंच्या देहबोलीचे व पत्नीशी झालेल्या संवादातील प्रसंगाचे वर्णन 'श्री'लहान झाली!या कथेत बहारदारपणे रंगविले आहे.
प्रत्यक्षात लिहिलेला 'श्री' हडकुळा वाटला म्हणून रडणारे जावईबापू पाहून सगळ्यांनीच कपाळावर हात मारुन घेतला.अशा विचित्र स्वभावाचे जावईबापूंचे शब्दचित्र छानच रंगले आहे.
ताटात सासुबाई काकवी वाढताना नको नको म्हणताना तीन-चार थेंब ताटात पडतातच.तेच थेंब जावईबापू चाटताना ते जीभेला चवदार लागतात.पण मागून घेता येईना म्हणून ते सर्वत्र सामसूम झाल्यावर स्वयंपाकघरातील काकवीच्या मडक्यावर डल्ला मारतात.त्या मडक्यावर काठीने हलकासा घाव मारुन भोक पाडतात.काकवी गटागटा पीतापीता दुसरा ठोका मडक्याला जोरात बसल्याने मडके फुटते.त्यातील काकवी जावईबापूंच्या अंगभर माखते.मडक्याच्या आवाजाने घरातील प्रत्येकजण तिकडे धाव घेतात.जावई अंधाराचा फायदा घेऊन अडगळीच्या खोलीत येऊन धडकतात.तिथल्या कापसाच्या ढिगाऱ्यात लपतात. त्याचवेळी घरातून चोरी केलेले दोन चोरही अडगळीच्या खोलीत येतात.अन् पांढऱ्या अस्वलाप्रमाणे दिसणाऱ्या माणसाला बघून त्यांची बोबडीच वळते.चोरीचा माल तेथेच टाकून एकजण खाली कोसळतो,तर दुसरा एकजण किंचाळतो.."मेलो..मेलो..धावा. "अन् सगळ्यांचा जावईबापूंच्या काहीतरी उपद्वापाने चोर सापडले.त्यांचे भारी कौतुक वाटते..अशी कथा 'अस्वल आणि चोर'आहे.
एकंदर अप्रतिम विनोदी कथा जावईबापूंची सासुरवाडीला साजऱ्या झालेल्या पहिल्या दिवाळीत घडलेल्या पाहुणचाऱ्याचे मिश्किली किस्से आणि घटनाप्रसंगाचे नर्मविनोदी ढंगदार कथानक लेखणीतून पाझरले आहे.उत्तम अक्षरवैभवात विनोदी कथासंग्रहातील जावई बापूंचा कलाविष्कार रसिकांना वाचायला आवडेल.असा सुंदर 'जावईबापूंच्या गोष्टी 'द.मा.मिरासदार लिखित कथासंग्रह आहे. खरोखर कथाकारच जावयाची गोष्ट सांगतायत वाचक श्रवण करतायत,अशी प्रचिती येते. द.मा.मिरासदार यांच्या लेखणीस आणि वाणीस विनम्र अभिवादन आणि त्रिवार वंदन!!!
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- १२ डिसेंबर २०२१
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
Comments
Post a Comment