पुस्तक परिचय क्रमांक-१०० वृध्दाश्रम







वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,

 वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१००

पुस्तकाचे नांव--वृध्दाश्रम

कवीचे नांव--सचीन तावरे

प्रकाशक-अक्षरबंध प्रकाशन,नीरा ता.पुरंदर, जि.पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०१७ /प्रथमावृत्ती

वाड़्मय प्रकार--कथासंग्रह

पृष्ठे संख्या-११०

मूल्य/किंमत--१२०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

१००||पुस्तक परिचय

         वृध्दाश्रम

          लेखक:सचीन तावरे

💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆

 वाचन साखळी फेसबुक समूह महाराष्ट्र राज्य संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे मॅडम व प्रतिभाताई टेमकर मॅडम यांच्या वतीने वाचनचळवळ रुजविण्यासाठी.'पुस्तक परिचय' हा अभिनव उपक्रम लिहित्या हातांसाठी व्यक्त व्हायला,स्वता:आनंदानुभूती घेऊन इतरांना ज्ञानाची शिदोरी द्यायला उपलब्ध करून दिला आहे….


माहे नोव्हेंबर २०२१मधे सर्वात जास्त पुस्तके पुस्तक परिचय केल्याबद्दलचे ,या बक्षीसाचे प्रायोजक माझे स्नेही शिक्षक मित्रवर्य श्री गणेश तांबे यांनी अनमोल भेट बक्षीस रुपाने पाठविले ,ते म्हणजे लेखक श्री सतीश तावरे, बारामती लिखित 'वृध्दाश्रम' पुस्तक.आणि प्रेमळपणाने आपुलकीने विनंती केली," सर, तुम्ही शतकी पुस्तक परिचय 'वृध्दाश्रम' याचं पुस्तकाने करा…..."मग काय,पुस्तक भेटल्यावर वाचायला सुरुवात केली.


हल्लीच्या काळात 'ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप, वेगळं राहायचं भारीच सुख…'या कवी प्रा.मोरेश्वर देशमुख यांची रचना कवीवर्य गायक विसूभाऊ बापट यांच्या आवाजात ऐकलीहोती. घरातील सासु सासरे,नणंद,दीर,जाऊ यांच्याशी नाते तोडून,एकत्र कुटूंबातील सूनबाई वेगळं राहण्याचा लकडा पतीशी करत असते.आणि मग दोघांचा संसार कसा होतो याची मार्मिक रचना केलेली आहे.सध्या कुटूंबाची संकल्पना बदलली आहे.मी माझी पत्नी आणि मुलं. एवढाच पायापुरता परीघ आखून त्यात सुखाने नांदण्याचा प्रयत्न करीत असतात. ...ज्येष्ठांना, आई वडिलांना,घरातील बुजुर्ग जेष्ठ मंडळींना त्यांच्या स्थिरावलेल्या(म्हातारपणात) वयात कानाडोळा करुन आपल्याच सुखात मश्गुल असतात.

आपल्याच घरट्याचा केवळ विचार. पण सिंहावलोकन करून आपल्या बालपणीचा भूतकाळाचा आठव नकरता धूसर करतात. 


आपल्या वाडवडिलांनी अपार कष्ट करत, घाम गाळून आपल्याला वाढवलयं,आपल्या स्वप्नांना छेद देऊन आपले भवितव्य घडविण्यासाठी संघर्ष केलाय. तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहण्यासाठी ताकद दिलीय.याचा विसरपडतो. तुमच्याच यशात स्वता:चे सुखसमाधान त्यांनी मानले. तुमच्यासाठी झिजत राहिले.विनातक्रार तुमच्या आयुष्याला आधार देत राहिले.त्याच वडिलधाऱ्या बुजुर्ग मंडळींची संवेदना,उपेक्षा, व्यथा,दुर्लक्षता,मनस्ताप,आणि सहनशीलतेची मनस्थितीची व विदारक परिस्थितीची कथा .

 लेखक सचीन तावरे लिखित'वृध्दाश्रम' पुस्तक

या कथामालिकेतून जेष्ठ व्यक्तिंच्या वास्तव दाहकतेचे दर्शन लेखणीतून बध्द केले आहे. लेखक सचीन तावरे माळेगांव शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेजात प्राध्यापक असून त्यांना विमल चॅरिटेबल ट्रस्टने शब्दरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. 


'वृध्दाश्रम'पुस्तकाचे लेखन करताना त्यांनी भेटी दिलेल्या, फिरलेल्या आणि ओघाने अकस्मात भेट झालेल्या अनेक कुटूंबातील वडिलधारी बुजुर्ग मंडळींशी गप्पागोष्टी करत करत त्यांच्या काळजातली घालमेल, व्यथा आणि दशा समजून घेऊन त्यांच्या विषयीच्या वास्तवकथा या लेखातून मांडलेल्या आहेत.एकच खंत त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते की, ज्यांनी कष्टप्रद  जीवन जगून, तुमचं आमचं जीवन फुलविले. तुमच्या पायात बळ दिले. मनाची मशागत केली. संस्काराच्या अमृताचे शिंपण केले तरी वयस्कर व्यक्तींकडे तरुणाई कानाडोळा का करतात.त्यांच्यावर मायेची पाखर का करीत नाहीत.आणि त्यांचा मानसन्मानाने सांभाळ का करीत नाहीत. आजी-आजोबा आणि आई-वडील या कथांचे नायक असून ते तमाम वयस्कर व्यक्तींचे या शब्दचित्रातून  प्रतिनिधित्व करत आहेत.


पुस्तकाचा आशय आधारवडासारखे कार्य केलेल्या आपल्या घरातील श्रेष्ठ वृध्दांना मायेचा भक्कम आधार देऊन त्यांचाही सन्मान करा.कुटूंबातील सर्व नात्यांमध्ये ओलावा टिकवून ठेवा.वृध्दांच्या समस्या कथेतून मांडण्याचा सुंदर प्रयत्न झालेला दिसून येतोय.

कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचे भाव हळूवारपणे टिपून त्यांना अलगदपणे समर्पक शब्दसाज चढवून भावनेच्या ओलाव्याने आणि सहज सुंदर सोप्या प्रवाही शब्दात  वास्तव गोष्टीचे दर्शन घडविले आहे. हा कथासंग्रह वास्तवतेचे भान करून देणारा आणि वडिलधाऱ्या बुजुर्ग मंडळींकडे नव्या दृष्टीने बघायला शिकविणारा आहे.प्रत्येक कथेतील व्यथा जेष्ठ व तरुणाई यांच्यातील दुराव्यामुळे झालेल्या दोघांच्या ओढाताणीची आणि संस्कारक्षम मूल्यांची झालेली घसरण दाखवून देतात.कथेतील घटना प्रसंग वाचत असताना मनात भावनांचे तांडव सुरू होते.आणि मन जेष्ठांप्रती आई-वडीलांशी आपण कसे वागतो याची नकळतपणे जाणीव करून देते.


'वृध्दाश्रम'या कथासंग्रहात एकूण बारा सत्य कथांचा समावेश केला आहे.त्यांनी हा कथा संग्रह त्यांचे आई-वडील प्रिय 'ताई-भाऊ'आणि पूजनीय दादाजींना समर्पित केला आहे.  

मनोगत आणि प्रस्तावनेत पुस्तक लिहिण्याची उर्मी,आत्मबळ आणि प्रेरणा कशी निर्माण झाली याचा उहापोह सुंदर शब्दात लेखक सचीन तावरे यांनी केला आहे.समाज्यातील ज्वलंत समस्येवर चिंतन आणि मंथन करायला लावणारी वैचारिक शिदोरी वास्तव कथांत मांडलेली आहे.लेखक म्हणतात की,"वयस्कर व्यक्तींना समजून घेणं, त्यांचं वय समजून घेणं. त्यांचे अनुभव विश्व समजून घेणं,आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करणे,आदर ठेवणे.त्यांचे प्रश्न समजून घेणं हाच खरा संस्कार आणि तेच खरे कर्तव्य आहे.

संस्कार शिदोरी

भटकंती

आठवण

कृतज्ञता

मातीतील माणसं

प्रतीक्षा

वृध्दाश्रम

नैतिक विश्र्वास

शहरी राजकारण

सयाजी

ताई-भाऊ

समारोप

अशा सुंदर कथा आपणाला जेष्ठाप्रती कसे वागणं गरजेचे आहे याची खरोखरच जाणीव करून देतात.कथेतील व्यक्ती उतारवयातही असाहयपणे, वेदनांचे गाठोडे पांघरुन जीवन कसे कंठीत आहेत?त्यांचे अंतरंग उलगडून दाखवण्याचे मौलिक कार्य लेखक सचीन तावरे यांनी केलेआहे.कथांचे शीर्षक भावनेशी बांधीलकी उठावदार करतात.विषयाची आशय घनता दृष्टीस येते.ज्वलंत समस्येवर लेखन करण्याचे साहस त्यांनी केले आहे.वृध्दाश्रम कमी होऊन कुटूंबसंस्था बळकट व्हावी. चांगल्या संस्कारांचे बीज पेरले गेले तर कुटूंब संस्थेतील सर्वच नाती गुण्यागोविंदाने नांदतील. असा विश्वास देणाऱ्या या कथा आहेत.कथेच्या समारोपात कथेतील महत्त्वाचे विचार सांगितले आहेत.तसेच असं घडू नये यासाठी काय करावे याचाही उहापोह त्यांनी केला आहे. प्रत्येक कथाही सहज सुंदर शब्दात त्यांनी मांडून ज्वलंत महत्त्वाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत देण्याचा स्तुत्य प्रयत्न या कथासंग्रहात केलेला आहे.त्यांचे मनपुर्वक अभिनंदन आणि लेखणीस सलाम!!! 


मातृपितृदेवोभव:या सुविचाराप्रमाणे आपण अनुकरण करतोय का ?आधार देणाऱ्या वटवृक्षांची आपण पूजा करतोय का?आपला त्यांच्याशी गोडीने हसतखेळत बोलतोय का?प्रत्येकाच्या आयुष्यात विचारांची शिदोरी पेरणारे अनुभवसिद्ध भिष्माचार्य म्हणजे वडिलधारी बुजुर्ग मंडळी असतात.जन्मदाते व जन्मदात्री यांना कुटुंबात मानाचे पान दिलेच पाहिजे. त्यांना समजावून घेऊन, समाधान देऊन ,प्रेम व विश्वास आदराने देऊन, हितगुज साधले पाहिजे.

'वृध्दाश्रम' हा सचीन तावरे लिखित कथासंग्रह वैचारिक मंथन चिंतन करायला लावणारे पुस्तक आहे.प्रत्येकाने आवर्जून वाचन करून  मातृदेवोभव:पितृदेवोभव:आणि वडिलधाऱ्या बुजुर्ग मंडळींचाआदरभाव व्यक्त केलाचपाहिजे अशी जाणीव निर्माण करणारे पुस्तक आहे.


परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई

लेखन दिनांक-१७ डिसेंबर २०२१

 *"*"""*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*""*

यापुर्वीचे सर्व लेख, कविता, चारोळी आणि प्रवासवर्णने वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्या.

raviprema.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड