पुस्तक परिचय क्रमांक-९५ बहिणाबाईची गाणी





वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

पुस्तक क्रमांक-९५

पुस्तकाचे नांव--बहिणाबाईची गाणी

कवयित्रीचे नांव--बहिणाबाई चौधरी

प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी, नागपूर

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२२डिसेंबर २०१८ द्वितीयावृत्ती 

एकूण पृष्ठ संख्या-१२८

वाङ् मय प्रकार ---काव्यसंग्रह

मूल्य--१५०₹

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚🌹☘️🍂🌹☘️🍂🌹🌹☘️🍂🌹

             ९५||पुस्तक परिचय

बहिणाबाईची गाणी

कवयित्री: बहिणाबाई चौधरी

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत जीवनाचे सार आपल्या कवितेतून कथन करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री, बहिणाबाई चौधरी   ....

शेती माती अन् निसर्गनाती यांची महती सहज सोप्या ओवीतून वाक् शैलीत व्यक्त करणाऱ्या जगण्यात आनंद पेरणाऱ्या  खानेदेशी भूमीकन्या 'माझी माय सरसोती' बहिणाबाई…..


"जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल" असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांनी कवयित्री बहिणाबाईंच्याकाव्याविषयी अभिप्राय दिला होता….


"मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं

किती हाकला तरी येत पिकावरं "

मनाचे विश्लेषण आणि संश्लेषण साध्या सरळ सोप्या भाषेत सहजपणे अहिराणी ग्राम्यबोलीत करणाऱ्या काव्यप्रतिभा बहिणाबाई.

'अरे खोप्यामधी खोपा ,

सुगरणीचा चांगला 

देखा पिलासाठी तिनं 

झोका झाडाले टांगला'

" बहिणाबाईची गाणी" कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा निर्भेळ आनंद आणि ऊर्जा देणारा लोकप्रिय काव्यसंग्रह.


   खानदेशातील एका शेतकरी कुटुंबात बहिणाबाईंचा जन्म झाला.पाठ्यपुस्तकाचा तर सोडाच,पण अक्षराचा ही गंध नसलेल्या बहिणाबाईंचा दिवस,उगवल्यापासून ते मावळेपर्यंत काळ्याभोर जमिनीच्या सानिध्यात जात असे.या 'काळया आई'च्या कुशीतच त्या वाढल्या.त्यांचे व्यक्तिमत्त्वही त्या काळया आईनेच घडवले. तिच्याजवळ त्या आपली सगळी सुखदुःखे बोलत. सरस्वतीचा त्यांच्यावर जणू वरदहस्त होता.त्यामुळे त्यांचे साधे बोलणेही ओवीचं गाणं होऊन जाई. अशा अनेक गाण्यांच्या रचना त्यांनी केल्या आहेत. बोलीभाषेच्या लडिवाळपणामुळे बहिणाबाईंची गाणी अधिक मधुर वाटतात. काळजाला आणि थेट हृदयाला भिडतात.


 बहिणाबाईंची गाणी ही त्यांच्या संसाराची गाणी आहेत.ही गाणी त्यांच्या पोटातून ओठांवर आलेली आहेत. त्यामुळे त्यात सहजता सुंदरता गेयता भावार्थता आहे. निसर्गातील विविधतेचे निरीक्षण दर्शन  व बारकाव्यांचे त्यांनी केलेले वर्णन खरोखर वाखाणण्यासारखे आहे. अशा अनेक त्यांच्या रचना लोकप्रिय आहेत. लोकांच्या मनावर त्या गाण्यांनी गारुड केले आहे. लोकही त्यातील ओळी गुणगुणत असतात.


 घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना ओवीसारखं काव्य सुचले. आणि तेच काव्य, मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले.मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे.पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. ओठांवर गुणगुणत रहावे अशा त्यांच्या कविता आहेत.आज घर आणि शेतातील कवितांचे भावविश्व सहज सुंदर समर्पक शब्दांत व्यक्त होऊन मनाला,विचाराला चालना देणाऱ्या त्यांच्यासगळ्या रचना आहेत.

 काव्यसृष्टीतला हा चमत्कार खरोखरच 'माय सरसोतीनं लेक 'बहिनाच्या' मनी पेरलेली गुपित'च आहे ! कागद अन् शाईचा स्पर्शही न झालेल्या 'कबीराची वंशज' शोभावी,अशी कवयित्री म्हणजे बहिणाबाई !!


एकदा एका बाईने (राजसआत्याने) बहिणाबाईंना विचारले,'तुला एवढे हे शिकवतो कोण?माझ्यासारखीच तू ना शिकलेली,ना पडलेली, तुला ही गाणी सुचतात तरी कशी?' त्यावर  बहिणाबाईंनी दिलेले समयसूचकत उत्तर असे--

” माझी माय सरसोती,माले शिकवते बोली

लेक बहिणाईच्या मनी,किती गुपितं पेरली,

माझ्यासाठी पांडुरंगा,तुझं गीता-भागवत

पावसांत समावतं, माटीमधी उगवतं! ” 


यावरून त्यांच्या काव्यातील सहज सुंदरता व निरागसता लक्षात येते.


मायेची(आईची) महती अन् मातृप्रेम विषयी सांगताना बहिणाबाई चौधरी असं रचनेत म्हणतात. शेतात अन् घरात काम करत असताना अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरतास्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता.''तो होता काव्याचा ओवीचा रचनेचा आणि गुणगुणत अव्यक्त होण्याचा! " 


वर्षभरातील विविध सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते. आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली.प्रतिभा ही कुणा सुशिक्षित विचारवंताची जहागिरी नसते, हेच खरं. प्रतिभेचा साक्षात्कार हा नैसर्गिक असतो आणि ज्याचं अंत:करण शुद्ध नि आत्मा पवित्र असतो, त्यालाच तो होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी.या खेड्यातील लोकसंस्कृतीच्या काव्यपीठास डॉक्टर आशा सावदेकर, नागपूर यांची 'मोहराचा हंडा'या शीर्षकाची प्रस्तावना अप्रतिम शब्दगंधात दरवळत राहतेय.आणि गाणी ओवी कविता आणि काव्यांचा खजिना रसिकांना रसग्रहण करायला उद्युक्त करत आहे.


पहिली आवृत्ती १९५२साली प्रकाशित झाली होती.त्यास प्रतिभासंपन्न साहित्यमहर्षी प्रल्हाद केशव अत्रे यांची प्रस्तावना लाभली होती.ते म्हणतात की,"खरोखरच रानावनात फुलणाऱ्या काही फुलांना नाव नसते.पण त्यांचे खास देखणेपण असते,त्यांनाही मंद सुगंध असतो.तो वाऱ्यासोबत डोलतो.आणि पाहणाऱ्यांना प्रसन्न करतो.हे ही एक सौंदर्यभानच असते.त्यांचे गीत जीवनाचे तत्त्वज्ञान सहजपणे उलगडून दाखविते.बहिणाबाईंचे मन ग्रामजीवनाच्या तंतूनीच जणू विणलं आहे.त्यात व्यवहार आहे, रक्ताची ओढ आहे.वास्तव आहे.रुपकांची आणि उपायांची रेलचेल आहे.खेड्यातलं जगणं जगत गोफणी, फाट्या आणि तिव्हारी अशा अनुभवांनी जाणवलेले तपशीलही विणतात. इतक्या वर्षांनीही अमृतमय चवीची गोडी कमी झालेली नाही.कारण बहिणाबाईंचे आयुष्यच गावाशी,झाडांशी,पिकांनी, मातीशी, पशुपक्ष्यांशी आणि नात्यांशी बध्द झालेलेआहे.


या ग्रामीण काव्यपीठात पन्नास कवितांचे संकलन केलेले आहे.सर्वच रचना काळजाला भिडतात.यातील बऱ्याच कविता मुलांना शिकविताना येणारा आनंद समाधान देऊन जातो.अशा अवीट गोडीच्या आशयघन रचना सगळ्या आहेत.माझी माय सरसोती,माहेर, संसार,कशाले काय म्हनू नहीं,घरोटं(जातं), पेरणी, खोप्यामधी खोपा,कापनी, माणूस, पोया, सासुरवाशीण,मन आणि धरत्रीले दंडवत आदी रचना मनाला भावतात.


'माझी माय सरसोती' यातील उपमात किती यथार्थ वर्णन मायेचे विविध रुपक देऊन मातृत्वाचे दर्शन घडवितात..

तुझ्या पायाची चाहूल

लागे पानापानांमधी

देवा तुझं येनंजानं

वारा सांगे कानामधी..


किती रंगवशी रंग

रंग भरले डोयात

माझ्यासाठी शिरिरंग

रंग खेये आसामात….

माहेर काव्यपुष्पातील रचना माहेरच्या नात्याची शिरिमंती दाखवतात.

माय माझी माऊली

जशी आंब्याची साऊली

आम्हाईले केलं गार

सोता उन्हात तावली|

भाऊ 'घमा'गाये घाम

'गना'भगत रानात

'घना'माझा विकणार

गेला शिकावे धुयात|

माहेरुन ते निरोप

सांगे कानामंधी वारा

माझ्या माहेराच्या खेपा

'लौकी'नदीला इचारा!

संसाराविषयाची त्यांची ओवी यथार्थ दर्शन घडविणारी आहे.

"अरे संसार संसार 

जसा तवा चुल्यावर 

आधी हाताले चटके 

तव्हा मीयते (मिळते) भाकर''


तर पूर्वी भरल्या पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळण्याचे काम नित्यनेमाने करावे लागायचे.त्यावेळी दळत दळत मुखातून सासर माहेरच्या आपल्या माणसांच्या आठव ओवीतून व्यक्त व्हायची.

अरे जोडता तोडलं

त्याले नातं म्हनू नही

ज्याच्यातून येतं पीठ

त्याले जातं म्हणू नही


माझा घरोट घरोट 

दोन दाढा दोन व्होट

दाने खाये मूठ मूठ

त्याच्यातून गये पीठ


दाने दयता दयता

जशी घामानं मी भिजले

तुझी घरोटा घरोटा 

तशी पाऊ तुझी जिथे

 

निसर्गसृष्टीला सृजनात्मक आनंद देणारा, चराचरांना जीवन देणाऱ्या पावसाचे वर्णन 'आला पाऊस'याकवितेतून केले आहे.

आला पह्यला पाऊस

             शिपडली भुई सारी

धरत्रीचा पर्यंत

              माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

                गडगडाट करत

धडधड करे छाती

               पोरं दडाले घरात

देवा, पाऊस पाऊस

              तुझ्या डोयातले आंस

दैवा,तुझा रे हारास

            जीवा,तुझी रे मिरास

नात्यागोत्यातील परिसरातील काही व्यक्तींची शब्दचित्रं या काव्यसंग्रहात रेखाटली आहेत. त्यातून त्या माणसांचे अंतरंग अनोख्या काव्यशैलीत ,शब्दसाजात उलगडून दाखविले आहेत.तसेच स्फुट ओव्या,म्हणी आणि शब्दकोश उपलब्ध आहे.

'धरत्रीले दंडवत'या कवितेत शेतशिवाराची आणि मातीची महती अधोरेखित केली आहे.

काया काया शेतामंधी 

घाम जिरव जिरव

तव्हा उगलं उगलं

कायामधून हिरवं!


अशी धरत्रीची माया

अरे, तीले नही सीमा

दुनियाचे सर्वे पोटं

तिच्यामधी झाले जमा!


अशी भाग्यवंत माय

भाऊरायाची जमीन

वाडवडीलाचं देवा,

राखी ठेव रे वतन!

यातील कवितेचे रसग्रहण करताना शाळेची आणि मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.ते तन्मयतेने कवितेचा अर्थ आणि साभिनय गायन भान हरपून करायचे.तो तास डोळ्यासमोर रुंजी घालत राहतो.या काव्यसंग्रहात खेड्यातील संस्कृतीचे दर्शन घडते.ओवीतून कवितेतून काव्य वाड्मयाचे ग्रामीण विद्यापीठ म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचना. जीवनाची ओवी गाणाऱ्या बहिणाबाई चौधरींचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला दिले आहे.काव्यप्रतिभा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यरुपी साहित्यास  विनम्र अभिवादन ❗

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂


परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे

लेखन दिनांक-९डिसेंबर २०२१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड