पुस्तक परिचय क्रमांक-९१शिवनेत्र बहिर्जी नाईक खंंड-१
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-९१
पुस्तकाचे नांव--शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड-१
लेखकाचे नांव--प्रेम धांडे
प्रकाशक-रुद्र एंटरप्रायझेस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सप्टेंबर २०२१/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-३१२
वाड्मय प्रकार--ऐतिहासिक कादंबरी
मूल्य--३२५₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚९१||पुस्तक परिचय
शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड-१
लेखक-प्रेम धांडे
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
युगप्रवर्तक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अलौकिकअसणारा शिवइतिहास अथांग खोल असून त्यात अनेक शौर्यगाथेचा खजिना लपलेला आहे. अनेक शिलेदारांच्या शौर्यगाथा आहेत.या शिवसागरात रक्ताच्या अभिषेकाने आणि महापराक्रमाने स्वराज्य निर्माण करण्यात अनेक दुर्मिळरत्नांनी मुर्दुमूकीने रणांगणे गाजविली आहेत.त्याच शिवकाळातील आपल्या बुध्दीचातुर्याने, चाणाक्षपणे आणि समयसूचकतेने शत्रूच्या गोटातील बित्तंम खबरबात महाराजांपर्यंत वाऱ्याच्या वेगाने पोहचविणारे बहिर्जी नाईक.त्यांच्या महान व असामान्य कार्याचा वेध घेणारीकादंबरी इतिहासप्रेमी लेखक प्रेम धांडेयांनी'शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड-१' लिहिली आहे.
युगप्रवर्तक हिंदवीस्वराज संस्थापक जाणते राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांसारख्या द्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या विभागाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत गुप्तहेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते.या व्यवस्थेस प्रबळ आणि बलाढ्य करण्याचे सर्व प्रयत्न शिवाजी राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनी सुद्धा शिवरायांच्या गुप्तहेरखात्याचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे सगळे श्रेय निःसंशयपणे शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. विश्वास, कुशाग्रता, बुद्धिमत्ता, समयसूचकतेला साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळातील सुराज्य स्वराज्यात दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.
'शिवनेत्र बहिर्जी नाईक'खंड :१ ही स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारी पहिली कादंबरी लेखक प्रेम धांडे यांनी इतिहासप्रेमी रसिक वाचकांना लोकार्पण केली आहे.
शिवबाच्या खडतर वाटेवरले,पायघड जे जाहले;
एक जन्मी हजार रुपयांचे ,मांगल्य तयांना लाभले||
वैराग्याचा शोक न केला,लालसा ना किर्तीची;
रहस्य हेच जयांचे लौकिक,ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी||
या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक प्रेम धांडे यांना बालपणापासूनच इतिहास,पुराण आणि तत्त्वज्ञान याबद्दल असलेल्या ओढीमुळे त्यांना वाचन आणि लेखण्याची गोडी लागली. सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या लेखणीने अनेक आविष्कार सादर केले.स्वप्नाला ध्येय बनवून सिनेजगतात सहाय्यक लेखक बनले.सप्टेंबर २०२०मध्ये 'औदुंबरावत'या कादंबरीचे लेखन केले.तदनंतर अमोघ लेखन शैली,अफाट कल्पनाशक्ती आणि सखोल अभ्यासपूर्ण मांडणीची ओळख म्हणजे'शिवनेत्र बहिर्जी नाईक'
स्वराज्याचे शिलेदार गुप्तहेर खात्याचे प्रमुख शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या- कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या- कोल्ह्यांना मारूनत्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले होते, तेंव्हा दौलतराव रामोशी म्हणजेच बहिर्जी यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या होत्या.आणि सोन्याची कडी मिळविली होती. पण त्या बक्षीसापेक्षा प्रत्यक्ष राजांना जवळून डोळेभरून बघायचे होते.म्हणून त्यांनी लांडगं मारलं होतं.त्यावेळी शिवाजीराजे सवंगड्यासह खेळासोबत शस्त्रांचे प्रशिक्षण रानात घेत होते. तेव्हा दौलतराव बरोबर झालेल्या संवादातून, हितगुजात त्यांचे बुध्दिचातुर्याचे आणि शस्त्रांच्या बरोबर दोन हात करताना,शस्त्र चालविण्याचे तेंव्हाच त्यांच्यातील शिवरायांनी कसब हेरले.आणि बहिर्जी नाईक यांना गुप्तहेर खात्याचे प्रमुख नेमले.गुप्तहेरांना मनाच्या इच्छा व आकांक्षांचा त्याग करावा लागतो. गुप्तहेर म्हणजे गगनातला बाज पक्षी.बहिर्जी हे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेलं नांव आहे.
ब म्हणजे बहुरुपी,हे म्हणजे हेर आणि जी म्हणजे शिवाजी.या संघटनेचे मुख्य नायक दौलतराव उर्फ बहिर्जी नाईक.शिवाजी महाराजांनी दुशेल्यातील 'म्यानबंद कट्यारी' चा नजराणा दिला होता. बहिर्जिंनि प्रत्येक वळणावर मदतीसाठी,बाक्या प्रसंगावेळी उपयोगी पडेल अशी भेट दिली होती.
नांवे व धर्म बदलून शत्रुच्या गोटात राहून मुक्तपणे घटनांवर तीक्ष्ण नजरेने लक्ष ठेवून
महाराजांपर्यंत खबरा पोहचविणारे बाजिंद
शिलेदार बहिर्जी नाईक …. ……शत्रुच्या प्रदेशात गुप्तहेरांची फौज उभी करणारे, गुप्तस्थळे,जंगलवाटा तुडवत स्वराज्य कार्यात सर्वस्व अर्पण करणारे बाजीगर, महिलांनाही गुप्तहेर संघटनेत सहभागी करणारे…. बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याच्या ध्येयासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते.महादेवाला जसा तिसरा डोळा होता.तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे शिलेदार बहिर्जी नाईक होते.हुबेहुब बहुरुप्यावानी रुप घेऊन ते आणि त्यांचे साथीदार शत्रुच्या गोटात घसून खबरबात मिळवित असत.तेवढ्याच चलाखीने ती बातमी गुप्तहेरगिराकडून व संदेशवहकाकडून, कर्णोपकर्णी सांकेतिक भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यत खबरबात पोहचवत असत. शिवाजी राजांच्या समवेत असणाऱ्या शिलेदारांना कित्येकांना ते कोण आहेत? याचा थांगपत्ता लागत नसे.
या आवृत्तीत बहिर्जी नाईक यांच्या अलौकिक गुप्तकार्याच्या हेरगिरीचाचा पट अप्रतिम अक्षरदौलतात रंगविला आहे. कित्येक नवर्या ऐतिहासिक घटनांची माहिती या पुस्तकातून उलगडत जाते.त्यांची हेरगिरीची पध्दत विजापूर दरबार ते राजगड कशी चालायची याच्या माहितीचे कथानक वाचताना अक्षरशः कुतूहल जागृत होते.अचानकपणे घडत जाणाऱ्या प्रसंगांचे-घटनांचे वर्णन रसग्रहण करताना रहस्यमय अद् भूत वाटते.आपण समरस होऊन वाचत राहतो.तसेच एक हेर दुसऱ्या संदेशवहकाला सांकेतिक भाषेत कसे ओळखतात. इतरांना नकळता प्राणी व पक्ष्यांच्या आवाजाने संकेत कसे देतात.संदेश वहन कसे करतात.याची माहिती समजते.
गुप्तहेर संघटनेत हेराची नियुक्ती करताना गुणवत्ता आणि विश्वासाची कशी पडताळणी करतात.आदी बाबींची माहिती वाचताना, आपण देहभान विसरूनपुस्तकातील प्रसंगाशी समरस होऊन जातो.इतकं लेखन रसाळ व प्रवाही शैलीत केले आहे.
या कादंबरीतील कथानक इतिहासातील मूळ कथा आणि लोककथांच्या गाभ्यावर आधारित आहे.परंतु त्यातील प्रसंग हा लेखकाचा कल्पनाविस्तार आहे. कथेत वापरलेली नांवे, चरित्रे,स्थळे यांचाही काल्पनिक रुपकात वापर केला आहे.इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठा यांचा आदर राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात लेखक प्रेम धांडे यांनी केलेला आहे.
या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या भेटीची,स्वराज्यस्थापनेची,पहिल्या युध्दाची पार्श्वभूमी, बहिर्जी नाईक आणि इतर गुप्तहेर यांच्या अलौकिक कार्याचा वेध या पुस्तकात घेतला आहे.प्रमुख व्यक्तिरेखांच्या कार्याची महती व माहिती तीन भागात प्रसिद्ध केली आहे.पहिल्या भागात नऊ आहेत. भूपाळगडी देह टेकला..,छत्रपती शिवाजी महाराज आणि दौलतराव यांची भेट,गुरु कान्होजी जेधे यांचे प्रथम दर्शन,दौलतरावाचे विजापूरकडे मार्गक्रमण,प्रताप कोळी नावाड्याचा गुप्तहेर झाला, दौलतराव बहिर्जी नाईक झाले..,पत्नी शारदेला पाहण्याची ओढ, सारंगा गुप्तहेर.तर दुसऱ्या भागात आठ लेखमालिका आहेत.कुतुबशाहीतील सरदाराची कन्या मार्जिना, विजापुरात पुनरागमन,पहिल्या युध्दाची चाहूल,कावेरी, फतेहखानाच्या सैन्यात प्रवेश, पहिल्या युध्दात स्वराज्याचा विजय, शहाजीराजे यांची सुटका, औरंगजेब-मीर जुम्लाच्या मैत्रीचा भेद.तिसऱ्या भागात चार प्रकरणे आहेत.सारंगाला विरगती प्राप्त झाली.औरंगजेबाचे आदिलशाही वर आक्रमण, श्रीगोंद्याच्या पेठेची पहाणी आणि जुन्नरची लूट… प्रमुख व्यक्तीरेखांची यादीही दिलेली आहे.आवश्यक तिथे कृष्णधवल चित्रे रेखाटली आहेत.मुखपृष्ठ आणि मलपृष्ठही चित्ताकर्षक व रंगीत आहे.मलपृष्ठावर हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा आहे.एकंदर अप्रतिम रहस्यमय कादंबरी आहे. ऐतिहासिक कादंबरीतून स्वराज्याचे शिलेदार व गुप्तहेर पथकाचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा वेध घेतल्याबद्दल लेखक प्रेम धांडे यांचे मनपुर्वक अभिनंदन!!!लेखणीस सलाम!
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- २२नोव्हेंबर २०२१
सुंदर परिचय..
ReplyDelete