पुस्तक परिचय क्रमांक-७२ साताऱ्याच्या सहवासात





वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-७२

 पुस्तकाचे नांव--साताऱ्याच्या सहवासात

 लेखकाचे नांव--श्री सुनील शेडगे

प्रकाशक- वैभव शेडगे, शाकुंतल प्रकाशन, सातारा

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०१९

एकूण पृष्ठ संख्या-१३६

वाङमय प्रकार ----पर्यटन व प्रवासवर्णन 

मूल्य--२००₹

📖📚📚📚📚🍁📚📚📚📚🍁

७२||पुस्तक परिचय

साताऱ्याच्या सहवासात

लेखक सुनील शेडगे

☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️

'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे|

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे|

 देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती|

  वाळवंटी सुद्धा स्वस्तिपद्मे रोखिती||'

निसर्ग कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या वरील काव्यपंक्तीची उपमा, ज्यांना 'देखने हात आणि देखणी दृष्टी' लाभलेली आहे.असे प्रतिभासंपन्न पत्रकार, छायाचित्रकार आणि ब्लॉग लेखक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.


 मित्रवर्य सुनील शेडगे सर  माझे साहित्यातील प्रेरणास्थान ज्यांच्या मुळे मी माझी दोन पुस्तके प्रकाशित करु शकलो. 'हिरवी पाती' व 'पाऊले चालती'या दोन पुस्तकांची प्रस्तावना श्री सुनील शेडगे अप्पांची आहे. त्यांचा 'साताऱ्याच्या सहवासात'हा ग्रंथ सुंदर अक्षरशिल्प आहे.या साहित्याच्या प्रकाशन समारंभात उपस्थित राहून साताऱ्यातील साहित्यिकांचे विचार श्रवण करण्याची संधी मिळाली.


 या साहित्य शिल्पाचे लेखक महाराष्ट्रातील नामांकित दैनिक सकाळमध्ये पत्रकार असून पेशाने प्राथमिक शिक्षक आहेत.छायाचित्रकार, निसर्ग पर्यटक आणि भ्रमंतीकार अाहेत.अनवट वाटेने निसर्गातील गडकिल्ले,डोंगरदऱ्या, जंगले आणि घाटरस्ते आदींची भ्रमंती केली आहे. निसर्गात रममाण व्हायला त्यांना फारच आवडते.सरांची बहुतांश सेवा कास बामणोली तापोळा भागातील सह्याद्रीच्या कुशीत घनदाट झाडोऱ्यात असलेल्या गावात झाली आहे. ते निसर्गसौंदर्याचे आगरच.त्यामुळे चौफेर जाता येताही निसर्गसानिध्य लाभते.अशा निसर्गाने मोहित झालेले लेखक आपल्या नजरेने वेचक वेधक क्षण कॅमेऱ्यात टिपतात. तिथल्या अनेक मनोहारी सौंदर्याने,विविधतेने नटलेल्या परिचित आणि दुलर्क्षित (अपरिचित) स्थळांची ओळख दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या माध्यमातून निसर्ग प्रेमींना नव्याने ओळख करून देतात.


त्यांनी आपल्या लेखणीने ब्लाॅगवर वेगळा वाचकवर्ग तयार केला आहे.अनेक ठिकाणांना भेटी देऊन त्यांचे सकाळमध्ये विविध सदरात लेख लिहिले आहेत.त्याच भटकंतीचे 'साताऱ्याच्या सहवासात' हे पर्यटनाचे पुस्तक इतरांना पथदर्शक आहे.''लेखक श्री शेडगे सरांची अनेक निसर्ग चित्रे आणि व्यक्तिचित्रे सातत्याने मोबाईलच्या छोट्या पटलावरील पाहणाऱ्याला भुरळ घालतात.त्याच छोट्या पटलावर दिसणाऱ्या चित्रांचे आयुष्य हे काही क्षणभर असतं.हेच विलक्षण क्षण ग्रंथरूपात साकार झाल्यामुळे ते आता चिरंतर चैतन्याचे अक्षर लिहून बनले आहे.'' "त्यांची लेखन शैली प्रवाही प्रसन्न आहे. भाषा डौलदार आहे. समाज आणि संस्कृती यांचे वैभव जोपासण्यासाठी मनामध्ये माणसाविषयी सद्भाव असावा लागतो. नव्या च्या नादात जुन्याचे विस्मरण होऊ नये म्हणून जाणत्यांनी ते अक्षरात बांधाव लागतं आणि तेच कार्य लेखक श्री सुनील शेडगे यांनी मोठ्या कौशल्याने केली आहे." अशा शब्दांत महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांनी 'आशीर्वाद' प्रस्तावनेत गौरव केला आहे. 


लेखक श्री.सुनील शेडगे यांना अनेकविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेय.लेखणी सारखीच त्यांची वाणीही मधाळ आहे. अनेक सामाजिक संस्थांशी ते संलग्न असून वेगळ्या वाटेने नवोपक्रम राबवून  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि प्रसिद्धी देण्याचे काम 'उपक्रमशील शिक्षक' आणि 'तंत्रस्नेही शिक्षक' या मालिकेत केली आहे.त्याचे दोन अनमोल ग्रंथरुपी दस्ताऐवज दैनिक सकाळ वृत्तसेवा माध्यमाने प्रसिद्ध केले आहेत.शैक्षणिक आणि पत्रकारिता यांच्या भरीव कार्याबद्दल अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे.


साताऱ्यातील प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी'प्रेरणा'लेखातून पुस्तकाचे कौतुक केले आहे.ते उल्लेखतात,''प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास आनंदी करणारं हे पुस्तक आहे.पुस्तकातील भाषा साधी सोपी असूनही सजग आहे.साताऱ्यातील अनेक नवनवीन स्थळांचा परिचय त्यांनी आपल्या लेखणीने केलेला आहे.निसर्गाच्या समवेत मुशाफिरी करताना निसर्गाबरोबरच माणसांचे चित्र टिपून त्यांचे व्यक्तीचित्रण सजग शैलीत लिखित केले आहे.''


'मनातलं'लिहिताना त्यांनी या पुस्तकाच्या सहवासाचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला आहे.मातापित्यांचे स्वप्न,सोशल मिडीयावर प्रकाशित केलेल्या लेखमाला आणि  मित्रसमूहाच्या संकल्पनेतून आणि प्रेमळ सूचनेतून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.ज्यांच्यामुळे पुस्तकाला आकार आला.त्या सर्वांप्रति कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त केला आहे.

मुखपृष्ठावर नव्यानेच परिचित केलेल्या कासपठाराजवळील भांबवली -वजराईचा धबधबा रेखाटला आहे.देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा अशी बिरुदावली लाभल्याने हौशी पर्यटकांची पावले तिकडे वळतात.गर्द जंगलातून कड्यातून वळणा वळणाची निसरडी वाटेने तिथं जाता येतं.


अंतरंगात पुस्तकातील धार्मिक तीर्थक्षेत्रे,पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणं, गडकिल्ले, धबधबे,कासबामणोली पठार आणि प्रेक्षणिय शिवमंदिरे आदींची माहिती उपलब्ध आहे.तसेच लेखकांनी मित्रांच्या संगतीने केलेल्या भटकंतीची वर्णने वाचताना तिथली स्थळे डोळ्यासमोर दिसतात. लेखकाच्या बोटाला धरुन घरबसल्या आपला प्रवास घडतो. इतकं सामर्थ्य लेखणीतून साकारले आहे.आजपर्यत त्यांनी केलेल्या भ्रमंतीपैकी अरण्ययात्रा, शिवसागरापलीकडं, इतिहासवाटा,दुर्गवाटा,स्मारकवाटा,निसर्गाचा मोहक कॅनव्हास:केरळ, देवदरी-एक रिपोर्टाज, प्रतिसाद,चिंब करणारा सातारा आदी प्रवासवर्णने रसग्रहण करताना आनंद मिळतो.मनात अपरिचयाच्या न बघितलेल्या स्थळी जाण्याची ओढ लागते.ती स्थळे भेटीची आतुरता वाढते. इतकं रसभरीत रसदार सहज सोप्या भाषेत वर्णन केले आहे.


आपल्या अवतीभवती असणाऱ्या स्थळ ठिकाणांची ओळख नव्या दृष्टिने समजते.भेटीत त्या ठिकाणाचे काय आणि कसं बघावं याची माहिती समजते.यातील पानोपानी उत्कृष्ट छायाचित्रे रंगित आणि कृष्णधवल स्वरुपात प्रत्येक स्थळांचे दर्शन घडविते.यातील कैक छायाचित्रे सरांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपली आहेत. स्थळांचे वैशिष्ट्य दिसणारं शीर्षक लेखमालेचे वेगळेपण जपतात.उदाहरणार्थ पुरातन यवतेश्वर ,मंदिरांची माहुली,ओझर्डेची भुरळ,सडा वाघापूरचा 'रिव्हर्स पॉईंट',कणखर कल्याणगड,निसर्गरम्य नागेश्वर,विराट परंपरेचा वैराटगड इत्यादी सातारा जिल्ह्यातील ३९ सौंदर्यस्थळांचा समावेश केलेला आहे.तर सात प्रवास वर्णनांचे लेखन या पुस्तकात वाचावयास मिळते.तसेच शेवटी. समारोपात तनमन चिंब भिजविणारी साताऱ्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रे, धबधबे,धरण परिसर, मंदिरे, पठार, ऐतिहासिक घळी, घाटमार्ग आणि गडकिल्ले यांचा नामोल्लेख केला आहे.


एकदिवसाची सहल साताऱ्याच्या परिघात कुठं आयोजित करता येईल अशा पर्यटन स्थळांची यादी दिली आहे. सातारा शहरापासून त्या स्थळाचे अंतर किलोमीटरमध्ये दिले आहे.सातारा जिल्ह्याच्या नकाशा माहितीसाठी उपलब्ध आहे.


अनेक मान्यवर मित्रवर्यांनी या पुस्तकातील लेखांची कौतुकाची मोहोर प्रतिसाद….सदरात उठविली आहे.यापुर्वी ब्लॉगवर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या भटकंतीच्या प्रवास वर्णनाचे लेखास वाचक रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.त्यातील निवडक अभिप्राय या पुस्तकात आहेत.यातील बरेच हितचिंतक सजग वाचक आहेत.

सातारा जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीची प्रत जिल्हा परिषद,सातारा शिक्षण विभागाने मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहे.ही लेखकांच्या लेखणीची खासियत आणि गौरवशाली घटना होय.यावरुनच या पुस्तकाची महती आणि उपयोग लक्षात येतो.   


 कमी शब्दात विषय बांधण्याची कला अनोखी आहे. निसर्गाशी समरसून केलेली प्रवासवर्णने अक्षररुपाने घडत गेली आहे.निसर्गाचे विलोभनीय रुप आणि माणसांचे अनोखे रंग टिपले आहेत.त्या भ्रमंतीचे वर्णन आपणच सहप्रवासी असल्याचे रसास्वाद घेताना जाणवते.आपल्याच परिसरातील स्थळांचे नवे कोंदण अक्षररुपाने अधोरेखित करते.


अशा अनवटवाटेने केलेल्या प्रवासाचे वर्णन  अप्रतिम शब्दसाजात बहारदार केले आहे.लेखकांच्या शब्दात या पुस्तकातील भटकंती लेखाची आणि भ्रमंती का करावी याची महती पटते."केल्याने देशाटन,थोडा आनंद,थोडा बदल…..नवे जग,नवे अनुभव,नवे विचार,नवे ज्ञान ,नवी माहिती,नवे मित्र,नवी नाती! हे सगळं समजून, उमजून घेणं!स्वता:ला अपडेट करणं...अधिक चांगलं जगणं पुढं घेऊन जात राहाणं!"


सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रेक्षणिय पर्यटन स्थळांचे समग्र दर्शन या पुस्तकाने अधोरेखित केली आहे.सर्वांच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजे.कारण अद्भुत प्रवासाचे अद्वितीय स्थळ वर्णन केले आहे.एखाद्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथं काय पाहिलं, त्या स्थळाचा इतिहास, तिथं भेटलेली माणसं आणि तिथल्या अनुभवांची आपल्या जगण्याशी तुलना या नेहमीच्या घटकांचा समावेश त्यात केला आहे.


माणूस निसर्गाच्या जेवढा अधिक जवळ जातो, जेवढा त्याची आव्हाने अंगावर घेतो तेवढा तो नतमस्तक होतो, स्वतः बघितलेले पाहिलेले, अनुभवलेले, निरीक्षणलेले, आवडलेले, मनमोहक वाटलेले,भुरळ पाडलेल्या स्थळांना लेखणीतून साक्षात्कारी केले आहे. याचा खरा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे.लेखकाचे व्यक्तिमत्व, संस्कार, संवेदनशीलता,स्थळाविषयी व तेथील लोकांविषयीचे कुतूहल,परिस्थितीचे मार्मिक आकलन,सहप्रवाशांचे चित्रण इत्यादी वैशिष्ट्यांनी त्यांची प्रवासवर्णने वाचनीय आहेत.


प्राकृतिक सौंदर्याचे अस्खलितपणे वर्णंन केले आहे.निसर्गा सारखा नाही रे सोयरा,

गुरु सखा बंधू माय बाप,

त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप,

 मिठती क्षणात आपोआप….

कारण त्यांनी केलेल्या भटकंतीची प्रवास आहे. निसर्ग आणि धार्मिक तीर्थक्षेत्रे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटायला लावणारा,आपल्या जगण्यातले सामान्यत्व अधोरेखित करणारे 'साताऱ्याच्या सहवासात'हे  अनुभवसिद्ध प्रवासवर्णनाचे पुस्तक आहे.

जिंदगी का सफर ,है ये कैसा सफर,कोई समजा नहीं,कोई जाना नहीं….


परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक १२ आक्टोंबर २०२१

☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️

Comments

  1. साताऱ्याच्या सहवासात वर्णन केलेली सर्व पर्यटन स्थळे ही सुनिल आप्पा शेडगे यांनी स्वतः पादाक्रांत केलेली आहेत प्रत्येक पर्यटन स्थळांचे वर्णन हे अतिशय सुंदर पद्धतीने आणि हुबेहुब केलेले आहे पुस्तक वाचताना वाचक त्यात भान हरपून जातो मनाला मोहिनी घालणारे व वाचकांच्या मनाचा अचूक वेध घेणारे लेखक सुनिल आप्पा शेडगे यांच्या लेखनाला सलाम आणि यापेखही सुंदर लेखनमला आप्पा आपल्या लेखणीतून उतरो याच आपल्या लेखन कार्याला शुभेच्छा

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लटिंगे सर...

    ReplyDelete
  3. अभिमानास्पद

    ReplyDelete
  4. धन्यवाद मित्रांनो

    ReplyDelete
  5. Sir Very nice. पुस्तक परीक्षणाची अतिशय छान आणि सविस्तर अशी मांडणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड